Thursday, August 16, 2012

प्रेषितांचे पाय मातीचे


-बाबा रामदेव यांची तीन दिवसात मागण्या मान्य करा नाही तर महाक्रांती होईल किंवा अण्णा आणि त्यांच्या टीमची आम्ही आठ दिवसापासून उपोषण करीत आहोत तरी सरकार लक्ष देत नाही म्हणून राजकारणात उतरण्याची भाषा परिवर्तनाच्या चळवळी बद्दलचे अज्ञान आणि विचारातील पोकळपणा व उथळपणा दर्शविते. पण समाजासाठी त्याग केला म्हटल्यावर त्यांच्या  उणीवाकडे बोट दाखविण्या इतका दुसरा मोठा अपराध नसतो.
--------------------------------------------------------------------------------------------------------------

बाबा रामदेव यांच्या नुकत्याच पार पडलेल्या उपवास आंदोलनात त्यांनी वारंवार क्रांती शब्दाचा वापर केला. इतक्या तासात आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर देशात क्रांती होईल असे ते सारखे सांगत होते. क्रांती शब्द कमी पडतो असे वाटल्याने त्यांनी अनेकदा महाक्रांती होईल असे बजावले. क्रांती होईल किंवा महाक्रांती होईल म्हणजे नेमके काय होईल याचा खुलासा त्यांनी केला नाही. बाबा रामदेवचे शब्द ऐकून मला माझ्या वडिलानी माझ्या बाबतीत वापरलेल्या शब्दाची आठवण झाली. १९७० च्या दशकात शिक्षण अर्धवट सोडून समाज परिवर्तनाचा संकल्प करून मी घराबाहेर पडल्या नंतर ज्यांनी ज्यांनी खेड्यात राहणाऱ्या  माझ्या वडिलांना मी काय करतो असे विचारले त्यांना त्यांना मी क्रांती करतो असे उत्तर ते देत असतं. आम्हा मित्रांच्या चर्चेतून हा शब्द त्यांच्या केव्हा तरी कानी पडला असावा आणि प्रश्नकर्त्याच्या तोंडावर फेकण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग होत होता. बाबा रामदेव यांनी सुद्धा असाच हा शब्द कुठेतरी ऐकला असावा आणि आपल्या शिष्यांना प्रभावित करण्यासाठी त्याचा ते सारखा वापर करीत असावेत असे जाणवत होते. पण बाबांनी माझ्या वडिला सारखा भाबडेपणाने त्याचा वापर केला नव्हता हे तीन दिवसानंतर स्पष्ट झाले.    तीन दिवसानंतर त्यांच्या क्रांतीचा अर्थ देशाला कळला. कॉंग्रेसला सत्ताच्यूत करणे म्हणजे क्रांती हा बाबांनी देशाला सांगितलेला क्रांतीचा मंत्र होता. त्यांच्या पूर्वी असाच काहीसा साक्षात्कार देशातून भ्रष्टाचाराचा नायनाट करून नवा समाज निर्माण करण्याचा वसा घेतलेल्या अण्णा आणि त्यांच्या टीमला देखील  झाला होता. संसदेत चारित्र्य संपन्न लोक गेल्या शिवाय बदल घडूच शकत नाही या निष्कर्षावर आल्याचे अण्णा आणि त्यांच्या टीमने आधीच जाहीर केले होते. सर्व राजकीय पक्ष भ्रष्ट आणि सर्व नेते चोर असल्याचे टीम अण्णाचे ठाम मत असल्याने टीम अण्णाच्या नेतृत्वाखाली नवा पक्ष निर्माण होणे अपरिहार्यच होते. टीम अण्णाला चांगल्या कामासाठी सत्ताधारी व्हायचे आहे तर बाबा रामदेव यांना सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला सत्तेतून हुसकावून लावायचे आहे. हे झाल्याशिवाय व्यवस्था बदल शक्य नाही असे टीम बाबा आणि टीम अण्णा यांचे ठाम मत बनले आहे. अण्णा आणि बाबा वर्षभरात २-३ वेळेस उपवास केल्यानंतर या निष्कर्षाला येवून पोचले आहेत आणि त्यांच्या काठावरच्या समर्थकांना नसला तरी कट्टर समर्थकांना हा निष्कर्ष मान्य आहे. आज देशात हजारोच्या संख्येने असे अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्षे समाज परिवर्तनासाठीच्या संघर्षात घालविली आहेत, अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतरही  अपेक्षित बदल त्यांना साधता आला नाही. पण तरीही ती मंडळी अण्णा आणि बाबा सारखी निराश   वा हताश झाले आणि आपले सारे प्रयत्न वाया गेलेत असे म्हणू लागल्याचे ऐकिवात नाही. माझ्या सारखे अनेक कार्यकर्ते असे आहेत की ते ज्या कल्पना उराशी बाळगून आणि भारावून परिवर्तनाच्या चळवळीत सामील झालेत त्यांना आज त्या कल्पना बालिश आणि हास्यास्पद वाटतात. कारण चळवळीत सामील होताना असलेली अपरिपक्वता परिस्थितीचा मुकाबला करीत असताना कमी कमी होत जाते . परिपक्वता वाढल्याने अपरिपक्व अवस्थेत केलेल्या कल्पना हास्यास्पद ठरल्या तर नवल वाटायला नको. आपल्या कल्पनाच चुकीच्या असल्याने समोरचा अपेक्षित प्रतिसाद देत नाही हे कळायला वेळ लागत नाही. यात निराशा वाटावी असे काहीच नसते. उलट नवा विचार , नव्या कल्पना आणि नवी रणनिती घेवून पुढे जाण्याची प्रेरणा यातून मिळत असते. म्हणूनच वर्षानुवर्षे चळवळीत काम केल्या नंतर अपेक्षित परिणाम साध्य झाला नाही तरी कार्यकर्त्याला आपण खडकावर डोके आपटून घेत आहोत असे कधीच वाटत नाही. जी चळवळीतील सामान्य कार्यकर्त्याच्या बाबतीत सामान्य बाब असते ती अण्णा आणि बाबा सारख्या स्वत:ला अवतार पुरुष समजणाऱ्या महापुरुषांसाठी अफाट निराशा आणणारी बाब कशी असू शकते असा प्रश्न समाजाला का पडत नाही हा एक प्रश्नच आहे. बाबा रामदेव यांची तीन दिवसात मागण्या मान्य करा नाही तर महाक्रांती होईल किंवा अण्णा आणि त्यांच्या टीमची आम्ही आठ दिवसापासून उपोषण करीत आहोत तरी सरकार लक्ष देत नाही म्हणून राजकारणात उतरण्याची भाषा परिवर्तनाच्या चळवळी बद्दलचे अज्ञान आणि विचारातील पोकळपणा व उथळपणा दर्शविते. पण समाजासाठी त्याग केला म्हटल्यावर त्याच्या उणीवाकडे बोट दाखविण्या इतका दुसरा अपराध नसतो. अण्णा आणि बाबांनी लोक मैदानात जमवायचे , जितक्या प्रमाणात उपस्थिती असेल तितके दिवस उपवास करून सरकार झुकेल तितके झुकवयाचे आणि यालाच क्रांती म्हणायचे अशी क्रांतीची नवी परिभाषा नव्याने रूढ होत आहे. सरकार झुकायला तयार नसेल तर त्याला सत्ताच्यूत करायचे ही झाली महाक्रांती. लोकांच्या भल्याचे वेड असलेले लोक किती वेडाचार करू शकतात हे अण्णा आणि बाबांनी आंदोलन भरकटवून दाखवून  दिले आहे. 

                                       अण्णा टीम विरुद्ध बाबा टीम 
                                            
परवा परवा पर्यंत अण्णा हे बाबाच्या वरचढ आहेत असे मानले जायचे. अण्णांचा सामाजिक प्रश्नाचा किंवा देशाच्या अर्थकारणाचा बाबा पेक्षा जास्त अभ्यास आणि अधिक आकलन आहे म्हणून अण्णा वरचढ नाहीत. सामाजिक ,राजकीय व आर्थिक प्रश्नांची दोहोंची समज सारखीच आहे. दोघांची समज सारखी आणि एकाच पातळीवरची आहे हे दर्शविणारे उत्तम उदाहरण म्हणजे दोघांची आंदोलने वेगळी असण्यामागची दोघांनी पुढे केलेले कारण. अण्णा म्हणतात आमचे आंदोलन भ्रष्टाचारा विरोधात आहे, तर बाबा म्हणतात आमचे आंदोलन काळ्या पैशा विरोधात आहे ! अर्थशास्त्राच्या ढ विद्यार्थ्याला जरी विचारले की काळा पैसा आणि भ्रष्टाचार याचा काय संबंध आहे तर तो देखील सांगेल की भ्रष्टाचारातून जो पैसा जमा होतो तोच काळा पैसा असतो !  अण्णा आणि बाबांनी मात्र काळा पैसा आणि भ्रष्टाचार या दोन वेगवेगळया समस्या असल्याचे भासवून आपल्या वेगवेगळ्या लढाईचे समर्थन केले आहे. यावरून प्रश्नांची समज दोघांची सारखीच आहे हे कळते. अण्णा हे बाबा रामदेव पेक्षा वरचढ असण्याचे कारण होते ते अण्णा हे सर्वसंगपरित्यागी  होते. मंदिरात राहणारे, लोकांनी दिले ते खाणारे. पण बाबांचे तसे नव्हते. त्यांनी संन्यास घेतला असला तरी आपल्या संस्थांचे मोठे आर्थिक साम्राज्य उभे केले आहे. या फरकामुळे अण्णांचा रथ जमिनीपासून वितभर वर चालायचा तर बाबांचा रथ जमिनीवरील  चिखलात  असायचा. पण अण्णांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतल्या बरोबर अण्णांच्या रथाचे चाक जमिनीत रुतून बसले.  जो पर्यंत टीम अण्णा जवळ मोठे जन समर्थन होते तो पर्यंत आंदोलनात सामील होण्या साठी अण्णांच्या परवानगीची बाबांना वाट बघावी लागली होती. जन समर्थन आटले तेव्हा कुठे टीम अण्णाला बाबा रामदेवची गरज भासू  लागली होती. आपली बाजू आता वरचढ झाल्याचे लक्षात येताच बाबांनी टीम अण्णा कडे पाठ फिरवून आपल्या अपमानाचा बदला घेतला.  जंतर मंतरच्या फजिती नंतर तर टीम अण्णा आंदोलनाच्या मैदानातून स्वत:च दुर झाली आणि बाबा रामदेव साठी आंदोलनाचे मैदान मोकळे झाले ! राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी जशा तिरक्या चाली चालतात तसाच प्रकार टीम अण्णा व टीम रामदेव यांच्यात वर्षभर सुरु होता. यांच्यातील संघर्ष आणि धुसफुस किती मोठी होती याची प्रचिती नुकत्याच झालेल्या बाबा रामदेव यांच्या आंदोलनातील भाषणावरून येईल. रामदेव बाबांच्या सहा दिवसाच्या आंदोलनातील पहिल्या तीन दिवसातील भाषणात आपले आंदोलन कसे टीम अण्णाच्या आंदोलना पेक्षा वेगळे आहे हेच बिंबविण्याचा प्रयत्न झाला होता. आपण टीम अण्णा सारखे हेकड नसल्याचे दाखविण्यावर त्यांचा विशेष भर होता. एवढेच नाही तर आज पर्यंत लोकपाल बाबत गुळमुळीत भूमिका घेणाऱ्या  बाबांच्या आंदोलनात लोकपालच्या मागणीला महत्वाचे स्थान देवून टीम अण्णाची जागा आपण घेत असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केले. याचा परिणाम असा झाला की बाबांना अडगळीत टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना रामदेव आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी एक निवेदन काढून बाबांच्या काळ्या पैशाच्या विरोधातील आंदोलनाला पाठींबा जाहीर करावा लागला. हा पाठींबा देत असताना त्यांनी काळ्या पैशाचा मुद्दा अधोरेखित करून बाबांचे आंदोलन तेवढ्या मुद्दया पुरते आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला. बाबांनी लोकपालचा मुद्दा पळविला आहे हे लक्षात येताच जंतर मंतर वर लोकपाल आंदोलन मागे घेण्याची घोषणा करून मौनात गेलेल्या अण्णांनी १५ ऑगस्टला मौन सोडून आपण लोकपाल आंदोलन बंद केले नसून त्यासाठी देशभर फिरण्याची घोषणा केली. टीम अण्णा आणि टीम बाबा यांच्या तिरक्या चाली आणि संधी मिळताच एकमेकावर कुरघोडी करण्याची प्रवृत्ती लक्षात घेतली तर ही मंडळी राजकीय पक्षांच्या नेत्या सारखेच राजकारण खेळू शकतात या बाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. प्रेषितांचे पाय मातीचेच असतात हे यातील तात्पर्य आहे. अण्णा आणि बाबा यांच्या प्रचारामुळे देशात राजकारणी नेते आणि राजकीय संस्था यांच्या बाबतीत लोकमत कमालीचे कलुषित झालेले आहे आणि त्यामुळे देशातील राजकीय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे. राजकीय नेतृत्वाबाबत घृणेचे विष जनमानसात किती खोलवर भिनत चालले आहे याची दोन ठळक उदाहरणे नुकतीच समोर आली आहेत. कविता महाजन हे मराठी साहित्य विश्वातील गाजलेले आणि लोकप्रिय नाव. या विद्वान लेखिकेने विलासराव देशमुख यांना यकृत मिळाले नाही म्हणून मृत्यू झाल्याचे जे वृत्त आले होते त्यावर मल्लीनाथी करताना राजकारणी नेत्याची हीन दर्जाच्या गुन्हेगारांशी तुलना करून आपण करणार असलेल्या अवयव दानाचा उपयोग राजकीय नेत्याला होणार नाही असे मृत्युपत्रात नमूद करणार असल्याचे सांगितले. असेच दुसरे प्रसिद्ध नाव आहे सिंधुताई सपकाळ यांचे. त्याग आणि सेवाभाव सिद्ध केला की आपण काहीही बोलू शकतो असे मानणाऱ्यांपैकी त्या एक. अण्णांच्या धाकट्या बहीणच म्हणा ना ! तर या थोर समाजसेविकेने तुम्ही मुख्यमंत्री झाला तर काय कराल या जाहीरपणे विचारण्यात आलेल्या प्रश्नाला जाहीर उत्तर देताना आधी सगळ्यांना बंदुकीच्या गोळ्या झाडून ठार करू असे बेदरकारपणे सांगितले. राजकारणी तर बेताल आहेतच. पण या थोर थोर पुण्यात्मांचा बेतालपणा राजकारण्यापेक्षा यत्किंचितही कमी नाही हे लक्षात घेतले पाहिजे. अधिकार मिळण्याच्या नुसत्या कल्पनेने हे एवढे बेताल होत असतील तर यांच्या हाती प्रत्यक्ष सत्ता आली तर ते कोणत्या थराला जातील याचा अंदाज करणे देखील कठीण आहे. लोकांनी ताकद दिली म्हणून राजकारणी बेदरकार झालेत. आंदोलकांना देखील लोकांनीच ताकद दिली . या ताकदीनेच आंदोलनाचे नेते देखील बेदरकारपणे वागू लागले होते. दोघांच्याही बेदरकारपणात फरक असलाच तर तो उन्नीस-बीस चा आहे. आंदोलकांना दिलेली ताकद आपला विवेक वापरून लोकांनी काढून घेतली. पण एका निवडणुकीत राजकारण्यांना दिलेली ताकद पुन्हा निवडणूक होई पर्यंत काढून घेण्याची सोय नसणे ही आजच्या राजकीय व्यवस्थेमधील सर्वात मोठी त्रुटी आहे. ही त्रुटी दुर करण्याची खरी गरज असताना बाबा आणि अण्णांना आपल्या समर्थकांना संसदेत बसविण्याची घाई झाली आहे. 

                                   पर्यायाचा चुकीचा अर्थ 

आजच्या सडलेल्या राजकीय व्यवस्थेत आजच्या सत्ताधाऱ्यांच्या जागी दुसऱ्याना सत्तेत आणून बसविणे हा पर्याय होवू शकत नाही. राजकीय व्यवस्था का सडली आहे त्या कारणांचे निराकरण न करता पर्याय देण्याचा प्रयत्न केला तर फक्त सत्ताधारी बदलतील , व्यवस्था तशीच राहील. सत्ताधारी बदलले तर फारसा फरक पडत नाही हे जनता पक्ष व नंतरच्या भाजप नेतृत्वाखालील सरकारने सिद्ध केले आहे. मोरारजी देसाई , अटलबिहारी बाजपेयी , व्हि.पी.सिंह किंवा चंद्रशेखर यांच्या पेक्षा मोदी उत्तम आहेत असे रामदेवाना वाटत असेल किंवा केजरीवाल -बेदी उत्तम आहेत असे अण्णांना वाटत असेल तर त्यांना राजकारणाची अजिबात समज नाही असेच म्हणावे लागेल. आजच्या राजकीय चौकटी बाहेरचे लोक राजकीय पदावर पाठवायचे असतील तर आजच्या निवडणूक व्यवस्थेत ते फारसे संभव नाही.  आंदोलन मजबूत होत गेले असते तरच अशी मंडळी संसदेत पोचण्याची अधिक शक्यता राहिली असती. पण अण्णा आणि बाबा या दोघानीही आंदोलन मागे घेतले असल्याने ती शक्यता धुसर झाली आहे. दोघांच्याही राजकीय अपरिपक्वतेमुळे संकटात असलेल्या कॉंग्रेसला जीवदान मिळू शकले असते. पण सरकार भ्रष्टाचारी आहे म्हणून नव्हे तर सरकार निष्प्रभ, निष्क्रिय आणि संवेदनाशून्य आहे म्हणून ते बदलण्याचा जनतेचा निर्धार जाणवत आहे.  राजकारणाची व अर्थकारणाची समज नसलेली व्यक्ती राजकीय आंदोलन करायला लायक असूच शकत नाही असा धडा जनतेने अण्णा आणि बाबांच्या आंदोलना पासून घेण्याची गरज आहे. राजकारण व अर्थकारण यांच्या आकलनाला सचोटी व संवेदनशीलतेची जोड आवश्यक आहे.  त्याग आणि सदभावना हा राजकीय -आर्थिक समजेला पर्याय होवू शकत नाही याची खुणगाठ बांधली पाहिजे. राजकारण्यांना सरळ करणे जनतेला कठीण नाही .   संत-महात्म्यांना सरळ करणे मात्र  भारतीय जनतेला कधीच जमले नाही. त्यामुळे अशा संत महात्म्यांना दुरून हात जोडण्यातच लोकांची आणि देशाची भलाई आहे. 

                                            (समाप्त)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा ,
जि. यवतमाळ 

2 comments:

  1. Great finding and evaluation of today's political situation. But people have short memory. All prophets and mahatma's have their short comings but they are famous for their steadfastness on their calling. These people you mentioned doesn't fit in any of those shoes. In fact spiritual decay is the main problem, distorted meaningless stories distroyed people's imaginations. Political person is more accountable than religious mahatma. Prophetic office is different from political office. All babas today are political that's why this mess. Common man is wise and watching patiently . People's expectation from political leaders is low and from Baba's,Anna's are messianic which is impossible . Meanwhile let's keep hoping,writing and imagining.

    ReplyDelete
  2. सुधाकरजी प्रिंट मिडियाणे खूप आंदोलनाला प्रसिद्धी दिली.रामदेव बाबांनी तीन दिवसात निर्णय घ्या असे सरकारला धमकावणे हास्यास्पद आहे.त्यांना आंदोलन कसेहि करून पुढे रेटायचे आणि आंदोलनाला प्रसिद्धी मिळावी असे अपेक्षित होते.म्हणून एवढा जनसमुदाय जमा करणे,सरकारवर दबावतंत्र आणणे असे प्रयोग चालू होते.अण्णा व बाबाना परिवर्तनाची खूप घाई झालेली दिसत आहे.आणि त्यांची ह्यातून अपरिपक्वता दिसून येते.केवळ सरकार बदलल्यानी व्यवस्था बदलणार नाही हे नक्की.दुसरे महाभ्रष्टाचारी उदयास येतील.त्यामुळे ह्या आंदोलनकर्त्यांनी आत्म:परीक्षण करून ह्यापुढे आंदोलन उभे करावे.

    ReplyDelete