Thursday, August 9, 2012

जंतर मंतरचे डॉन क्विझोट


आणिबाणी नंतर १९७७ साली झालेल्या सार्वत्रिक  निवडणुकीतून  टीम अण्णाने सर्वात महत्वाचा जर कोणता धडा घ्यायचा असेल तर तो हा घेतला पाहिजे की चांगला , चारित्र्य संपन्न उमेदवार ही कल्पनाच व्यर्थ आहे. या  निवडणुकीत बेदाग आणि चारित्र्य संपन्न उमेदवारांची कमी नव्हती. अशा उमेदवारापैकी लालू प्रसाद यादव हे ही एक उमेदवार होते. हेच लालू प्रसाद पुढे चारा घोटाळ्यातील एक प्रमुख आरोपी बनले . चांगल्या आणि चारित्र्य संपन्न उमेदवारामुळे राजकीय गटारगंगा साफ होईल हा भ्रम आहे. उलट चांगले आणि चारित्र्य संपन्न उमेदवार निवडून आले की या गटारगंगेत गटांगळ्या खातात हाच आजवरचा अनुभव आहे. राजकीय गटारगंगा साफ करण्यासाठी व्यवस्थात्मक बदलाची गरज आहे हे लक्षात घेतल्याशिवाय नवा राजकीय पर्याय उभा राहू शकत नाही हे टीम अण्णाला समजेल त्या दिवशी टीम अण्णा कडून राजकीय पर्यायाची मुहूर्तमेढ रोवल्या जाईल.
---------------------------------------------------------------------------------

'ला मंचा येथील डॉन क्विझोट नावाची वल्ली ' असे मराठीत ढोबळमानाने म्हणता येईल अशा नावाची स्पैनिश भाषेत १६ व्या शतकात लिहिल्या गेलेली एक गाजलेली कादंबरी आहे. या कादंबरीचा नायक अर्थातच डॉन क्विझोट आहे. ऐतिहासिक पुस्तके वाचताना त्या कालखंडातील उमदे सरदार आणि उमराव यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकताना हा नायक एवढा तल्लीन आणि एकरूप होवून जायचा की आपण त्या कालखंडातच जगतो आहोत असा त्याला भास व्हायचा. एवढेच नाही तर स्वत:ला इतिहासातील सरदारा सारखाच सरदार समजून रंजल्या-गांजल्यांच्या उद्धारासाठीच आपला जन्म असल्याची समजूत करून घेवून ही स्वारी सरदाराच्या थाटात घोड्यावर बसून रस्त्यावर जगाच्या उद्धारासाठी दौडायाची ! विवेकानंद, गांधी वाचून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजाच्या , देशाच्या उद्धारासाठी वर्षा-सव्वा वर्षा पूर्वी अशाच सरदारांचा समूह दिल्लीतील जंतर मंतर वर जमला होता. वर उल्लेख केलेल्या कादंबरीचा नायक सरदाराच्या थाटात घोड्यावर बसून रस्त्यावरून रपेट करायचा तेव्हा लोक त्याला गालातल्या गालात हसायचे. पण आपल्या येथील जंतर मंतर वरील सरदारांना लोकांनी खरोखर उद्धारकर्ते समजून गल्लोगल्ली त्यांच्या स्वागता खातर जल्लोष केला होता. अण्णाजी आणि त्यांच्या सरदारांबद्दल मी लिहितोय हे एव्हाना वाचकांच्या लक्षात आले असेल. या मंडळींची डॉन क्विझोटशी तुलना करण्याचा मोह झाला तो परवा जंतर मंतर वर यांनी दिलेली भाषणे ऐकून ! देशाचे सर्व निर्णय ग्रामसभा मार्फत घेतले जातील , ग्राम सभेचा निर्णय संसदेलाही मान्य करावा लागेल अशी राज्य व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प तेथील भाषणातून व्यक्त होत होता. एवढेच नव्हे तर ज्या राजकीय पर्यायाची घोषणा जंतर मंतर वरून झाली त्या पर्यायाला मूर्त रूप देण्यासाठी देशातील सर्व खेड्यातील ग्राम सभांनी पुढाकार घेवून ठराव करण्याचे आवाहन केल्या गेले. आतबट्ट्याच्या शेतीमुळे खेडी ओस पडत आहेत , कोणाला गावात राहण्यात रस राहिलेला नाही , शहरीकरण झपाट्याने वाढत चालले आहे ही वस्तुस्थिती विसरून इतिहासात विकासाच्या एका टप्प्यावर निर्माण झालेली ग्राम राज्ये व नगर राज्ये आजच्या काळात निर्माण करण्याची भाषा करणारी मंडळी वर्तमाना पासून दुर इतिहासात रमणारी आहेत असे  म्हणणे चुकीचे ठरू नये.  सव्वा वर्षा पूर्वी जंतर मंतर वरून समाजाच्या आणि देशाच्या उद्धारासाठी सुरु केलेल्या मोहिमेचा शेवट जंतर मंतर वर झाला त्यामागे स्वत:च्या कल्पना विश्वात रममाण राहण्याची या सरदारांची सवय कारणीभूत ठरली. लोकपाल आला की भ्रष्टाचाराचे उच्चाटन होईल हा ही काल्पनिक विश्वात रमण्याचा प्रकार होता.  रामलीला मैदानातील उपोषणाच्या वेळी लाभलेले अभूतपूर्व जन समर्थन म्हणजे १२१ कोटी लोकसंख्येचा  आपल्याला  पाठींबा असल्याच्या भासातून या सरदारांची भाषाच बदलून गेली होती. आपण म्हणतो तेच खरे आणि आम्ही म्हणतो तसेच झाले पाहिजे हा आग्रह यातून निर्माण झाला. मोडेल पण वाकणार नाही या थाटात अण्णांच्या सरदारांची ही टीम वर्ष-सव्वा वर्ष वावरली आणि ती उक्ती खरी करून दाखविली. टीम मोडली पण वाकली नाही ! अचानक एखादी वीज कडकडावी तशी टीम अण्णा कडकडली , लोकांचे डोळे दिपले आणि केंद्र सरकारवर ती वीज कोसळल्याने ते लुळे पांगळे झाले. अण्णा टीम चा कडकडाट विजे सारखाच क्षण भंगुर ठरला. पण वीज क्षणात कोसळून गेली तरी त्याचे परिणाम मात्र दीर्घ काळ भोगावे लागतात. टीम अण्णाच्या आंदोलनालाही ही बाब शब्दश: लागू पडते. या आंदोलनाने भ्रष्टाचाराच्या बाबतीत अगतिक झालेल्या समाजाला संघर्षाला प्रेरित केले . निरंकुश राज्यकर्ते व सगळ्याच राजकीय वर्गावर लोकांचा अंकुश राहू शकतो याची प्रचिती लोकांना या आंदोलनाने आणून दिली. पण लोकांचा अंकुश कायम राहील अशी व्यवस्था निर्माण करण्या ऐवजी स्वत:चा अंकुश राजकीय वर्गावर ठेवण्याचा मोह टीम अण्णाला झाला . टीम अण्णा तारतम्य विसरली. लोकांपेक्षा त्यांना स्वत:ची ताकद दाखविण्याची वेळोवेळी खुमखुमी येवू लागली. जसे लोकांना सरकारचे व राजकीय वर्गाचे निरंकुश वागणे पसंत नव्हते तसेच टीम अण्णाचे निरंकुश वागणेही लोकांना भावले नाही. लोकांनी पाठ फिरविली तरी टीम अण्णा मात्र रामलीला मैदानाच्या इतिहासातच रमली होती. तेच समर्थन आज ही आपल्या पाठीशी आहे या भासाने टीम अण्णाला पछाडले होते. या भासानेच टीम ने  स्वत:चा घात करून घेतला. त्या डॉन क्विझोट सारखेच टीम अण्णाने स्वत:चे हसू करून घेतले. आंदोलन समाप्त करण्यासाठी आणि नवा राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी दिल्या गेलेली कारणे सुद्धा हास्यास्पदच म्हणावी लागतील . त्याच मुळे  आजच्या राजकीय बजबजपुरीला नवा पर्याय देण्याची नितांत गरज लक्षात घेता टीम अण्णाच्या राजकीय पर्याय देण्याच्या घोषणेचे देशभर उत्साहात स्वागत व्हायला हवे होते पण तसे अजिबात झाले नाही. 

                                            लोकशाही बळकट करणारा निर्णय 

नवा राजकीय पर्याय देण्याची घोषणाच ठिसूळ आधारावर झाली. सरकार उपोषणाला भीक घालीत नाही , मग कुठपर्यंत उपोषण करणार अशी पराभूत भूमिका टीम अण्णाने एकाएकी घेतली. कारण टीम अण्णाचा स्वत:चाच उपोषणावर विश्वास नव्हता. उपोषणाच्या निमित्ताने प्रसिद्धी माध्यमांचे कॅमेरे जंतर मंतर रोखायला लावून गर्दी जमवायची आणि गर्दीच्या जोरावर सरकारला झुकवायचे अशी त्यांची योजना होती. पण मुंबई उपोषणाची जी दुर्गती झाली त्या पेक्षा काही वेगळे चित्र दिल्लीत नव्हते. टीम अण्णाला याचा एवढा राग आला की जाहीरपणे त्यांनी प्रसिद्धी माध्यमाला लक्ष्य केले. आम्हाला गर्दीची गरज नाही आम्ही पाच लोक पुरे आहोत अशी भाषा उच्चारली गेली. चीड , राग आणि निराशा यातून आंदोलन संपविण्याची घोषणा झाली. व्यवस्था बदलासाठी सरकार प्रतिसाद देत नाही म्हणून आंदोलनच मागे घेवून एक नवा इतिहास रचला गेला. याला पर्याय म्हणून राजकारणात उतरण्याचा निर्णय झाला. हा निर्णय चूक की बरोबर हे न पाहताही ज्या पद्धतीने निर्णय झाला ती पद्धत चुकीची होती असे निश्चित म्हणता येईल. अगदी वेळेवर सुचला किंवा काही प्रतिष्ठीत मंडळीनी सुचविला म्हणून निर्णय झाला असेल तर याला टीम अण्णाची बौद्धिक दिवाळखोरी म्हणावी लागेल. व्यापक विचारविनिमय व तयारी न करता असा निर्णय घेणे वेडेपणाचे ठरते. आणि दुसरी शक्यता गृहित धरली की हा विचार टीम अण्णाने आधी पासूनच केला होता तर ते जास्तच आक्षेपार्ह ठरते. जनतेला विश्वासात न घेता टीम अण्णा असा निर्णय कसा घेवू शकते असा प्रश्न निर्माण होतो. एकूण परिस्थिती लक्षात घेता या निर्णयाच्या बाबतीत दुसरी शक्यता अधिक यथार्थ वाटते.  वर्ष-दिड वर्ष मेहनत करून मिळविलेले जन समर्थन राजकारणासाठी वापरण्याचा निर्णय टीम अण्णाचा स्वत:चाच असला पाहिजे. कारण ज्या मान्यवर व्यक्तींच्या आवाहनानुसार आंदोलन संपवून राजकीय पर्याय देण्याची घोषणा झाली त्या मान्यवर व्यक्तींनी एकत्र येवून विचार विनिमय करून टीम अण्णाला असा सल्ला दिला नाही. टीम अण्णाकडून निवेदनाचा मसुदा या महानुभवाना पाठवून त्यांच्या सह्या घेण्यात आल्या आणि त्यांनी सल्ला दिला म्हणून आम्ही असा निर्णय घेतला असे जाहीर करण्यात आले. टीम अण्णाच्या   राजकारण प्रवेशासाठी पुढे करण्यात आलेली कारणे म्हणजे ताक मागायला जावून गाडगे लपविण्याचा प्रकार आहे. पण कारणे काहीही असू देत टीम अण्णाने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला हा देशातील लोकशाही व्यवस्थे साठी वरदान मानले पाहिजे. कारण अण्णा आंदोलनाने गेल्या वर्षभरात इथल्या राजकीय व्यवस्थे बद्दल समाजात घृणेच  वातावरण निर्माण केले होते. देशातील लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या संसदे बद्दल अत्यंत विषारी आणि अनादराची भाषा या आंदोलनाकडून वापरल्या गेली होती. निवडणुका फक्त पैशाच्या , दारूच्या, गुंडांच्या  आणि जाती धर्माच्या बळावरच जिंकता येतात असा समज या आंदोलनाने मोठया प्रमाणात पसरविला होता. लोकशाही संस्थात प्रवेश करणाऱ्या व्यक्ती चुकीच्या आहेत म्हणून सर्व संस्थांच्या विश्वसनीयतेवर या आंदोलनाने प्रश्न चिन्ह निर्माण केले होते. आधीच राजकीय निरीक्षर असलेला तरुण अण्णा आंदोलनाच्या प्रभावाने हिटलरचे गुणगान गाऊ लागला होता. राजकारण प्रवेशाच्या आणि निवडणूक लढविण्याच्या टीम अण्णाच्या निर्णयाने लोकशाही विरोधी मंथन करून जे विष निर्माण केले होते ते विष आता त्यांनाच प्यावे लागणार आहे. शिवाय राजकारण करायचे म्हणजे सर्वसमावेशक भूमिका घेणे टीम अण्णा साठी अपरिहार्य ठरणार आहे. राजकारणात टोकाची भूमिका घेतली तर क्षणिक फायदा झाला तरी दीर्घ काळ तोटा सहन करावा लागतो याचा अनुभव भारतीय जनता पक्षाला बाबरी मस्जिद व गुजरात नरसंहाराने आणून दिला आहे. कोणत्याही विषयावर टोकाची व एककल्ली भूमिका घातक ठरते याचा पाठ राजकारणाच्या शाळेतच टीम अण्णाला शिकायला मिळेल. सर्वात महत्वाचे म्हणजे विकासाचे मोल टीम अण्णाला कळेल. विकासापासून पारख्या राहिलेल्या ग्रामीण माणसाकडे मत मागताना भ्रष्टाचाराच्या प्रश्ना पेक्षा शेतीचा प्रश्न किती मोठा आणि महत्वाचा आहे याचे भान टीमला येईल. एक वेळ भ्रष्टाचाराकडे पाठ फिरविता येईल पण लोकांच्या जगण्याच्या प्रश्नाकडे पाठ फिरविता येणार नाही याचे भान टीम अण्णाला येणे गरजेचे होते . या निर्णयाने तसे भान येणे अपेक्षित आहे.  राजकारणात येण्यामुळे आणि निवडणुका लढविल्यामुळे भ्रष्टाचाराच्या गंगोत्रीचा उगम कोठे होतो आणि उगमा नंतर हा प्रवाह कसा वाढत जातो याचे ज्ञान टीम अण्णाला मिळेल. भ्रष्टाचार समजला तर उपाय लक्षात येतील आणि लोकपाल सारखी नव्या भ्रष्टाचाराला जन्म देणाऱ्या संस्थे बाबत नव्याने विचार करणे टीम अण्णाला भाग पडेल.  राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर 'मी ' च्या ऐवजी 'आम्ही'ची भाषा टीम अण्णाला शिकावी लागेल. त्यागाची टिमकी वाजविणे तोट्याचे ठरू शकते याचेही भान टीम अण्णाला येईल. कारण कोणी आपण लग्न केले नाही , संसार केला नाही असे म्हणत  समाजासाठी मोठा त्याग केला असे सांगत सुटत असेल तर प्रतिस्पर्धी देशासाठी आपल्या बापाने आणि आपल्या आजीने बलिदान दिल्याचे सांगून त्यांच्या त्यागावर कुरघोडी करू शकतो हे ही टीम अण्णाच्या ध्यानी येईल. एकूण हवेत असलेल्या टीम अण्णाला जमिनीवर पाय टेकायला लावणारा हा निर्णय असल्याने या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. टीम अण्णा पर्याय देण्यात अपयशी ठरली तरी टीम अण्णाच्या राजकारण प्रवेशाने वर उल्लेखिलेले सर्व फायदे मिळणारच आहे . या निर्णयामुळे लोकशाहीत येत चाललेल्या विकृतीला काही अंशी लगाम बसेलच , शिवाय टीम अण्णा च्या आंदोलनाने देशभर निर्माण झालेले  नकारात्मक वातावरण निवळायला मदत होणार आहे. 

                            संधी गमावली 

टीम अण्णा राजकीय पर्याय देण्यास समर्थ ठरेल काय या प्रश्नाचे उत्तर आत्ताच देणे कठीण असले तरी त्या बाबतचे अंदाज बांधता येवू शकतात. ज्या कारणामुळे टीम अण्णाला आंदोलन संपवावे लागले तीच कारणे पर्याय उभा  करण्यातही अडथळा ठरू शकतात. दुसरे व्यक्ती, दुसरे विचार सामावून घेणे अशा पर्यायासाठी अपरिहार्य ठरते. आपल्याला अंतिम सत्य सापडले आहे त्यामुळे दुसऱ्याचे ऐकून घेण्याची गरज नाही हा उद्दामपणा टीम अण्णाला भोवला आहे. हा उद्दामपणा टीम अण्णाने सोडला नाही तर ते पर्याय उभा करण्यात सपशेल अपयशी ठरतील. रणनिती आणि मुत्सदिपणाचा संपुर्ण अभाव टीम मध्ये आहे. नाही तर संसदेत बील मांडल्या जाणे, लोकसभेत बील पारित होणे याला आंदोलनाचा मोठा विजय मानून टीमला आपले लक्ष दुसऱ्या मुद्द्याकडे , अगदी पर्यायाच्या मुद्द्याकडे वळविता आले असते. टीम मध्ये सांगोपांग विचार करण्याची शक्ती आणि क्षमता असती तर पर्याय देण्या आधी महत्वाच्या निवडणूक सुधारणा घडवून आणण्या बद्दल टीम अण्णा जागरूक आणि आग्रही राहिली असती. अशा सुधारणा हाच राजकीय गटारगंगा साफ करण्याचा उत्तम मार्ग होता. त्यासाठी गटारात उतरणे गरजेचे राहिले नसते. हिस्सार निवडणुकीत कॉंग्रेस ला विरोध करण्याचा बालिश निर्णय घेण्या ऐवजी तिन्ही उमेदवार धन आणि जाती धर्माचा आधार घेवून निवडणूक लढवीत असल्याने तिन्ही उमेदवाराला नाकारण्याची मोहीम टीम अण्णाने राबविली असती तर राजकीय पर्याय निर्मितीचा तो प्रारंभ ठरला असता. ती संधी टीम अण्णाने गमावली. आता त्यांच्याच विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह लागल्यावर पर्याय उभा करण्यासाठी टीम अण्णाला भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. आणिबाणी नंतर १९७७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुभवापासून शिकून पुढे जावे लागणार आहे. त्यावेळी स्वतंत्र पर्याय निर्माण करण्या इतपत वेळ नसल्याने जयप्रकाश नारायण यांना प्रस्थापित पक्षांचे कडबोळे एकत्र करून निवडणूक लढवावी लागली होती. हे कडबोळे टिकत नाही हा त्यातून मिळालेला धडा आहे. उमेदवार पैसेवाला असलाच पाहिजे हे अपरिहार्य नाही हे त्या निवडणुकीने दाखवून दिले आहे. सभामधून जमा होणाऱ्या पैशावर अनेक उमेदवाराने निवडणूक लढवून जिंकली होती. पण त्यासाठी वातावरण निर्मितीची गरज आहे. त्या निवडणुकी पासून टीम अण्णाने सर्वात महत्वाचा जर कोणता धडा घ्यायचा असेल तर तो हा घेतला पाहिजे की चांगला , चारित्र्य संपन्न उमेदवार ही कल्पनाच व्यर्थ आहे. १९७७ च्या निवडणुकीत बेदाग आणि चारित्र्य संपन्न उमेदवारांची कमी नव्हती. अशा उमेदवारापैकी लालू प्रसाद यादव हे ही एक उमेदवार होते. हेच लालू प्रसाद चारा घोटाळ्यातील एक प्रमुख आरोपी आहे. चांगल्या आणि चारित्र्य संपन्न उमेदवारामुळे राजकीय गटारगंगा साफ होईल हा भ्रम आहे. उलट चांगले आणि चारित्र्य संपन्न उमेदवार निवडून आले की या गटारगंगेत गटांगळ्या खातात हाच आजवरचा अनुभव आहे. राजकीय गटारगंगा साफ करण्यासाठी व्यवस्थात्मक बदलाची गरज आहे हे लक्षात घेतल्याशिवाय राजकीय पर्याय उभा राहू शकत नाही हे टीम अण्णाला समजेल त्या दिवशी टीम अण्णा कडून राजकीय पर्यायाची मुहूर्तमेढ रोवल्या जाईल. जो पर्यंत 'टीम अण्णा' हा शब्द 'लोक गंगे'त विलीन होत नाही तो पर्यंत पर्यायाची आशाच नाही. 

                                                                      (समाप्त)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा,
जि.यवतमाळ 

2 comments:

  1. लेख अतिशय समर्पक झाला आहे. आपले विचार सखोल आणि अर्थगर्भ आहेत. एक शंका अशी- जर चारित्र्यसंपन्न उमेदवारही राजकीय गटारगंगा साफ करू शकणार नसतील, तर हे काम व्यवस्थाबदलाने तरी कसे होईल? राजकीय इतिहासाची माझी समज अगदीच अपुरी आहे, त्यामुळे माझ्या या शंकेतील तथ्यार्थ मला माहीत नाही. पण लालूप्रसाद यादव हे पूर्वी फार चारित्र्यसंपन्न होते याला काही पुरावा उपलब्ध आहे काय? चारा घोटाळा, ज्याविषयी एके काळी फार लिहिले बोलले जात होते, त्याचे अंतिम फलित काय झाले? लालू त्यात दोषी असल्याचे सप्रमाण सिद्ध झाले का? आणि एखादी गोष्ट, विशेषतः जी नैतिकतेशी संबंधित आहे, न्यायालयीन निर्णयाने अथवा निवडणुकीतील यशापयशाने सिद्ध होते का? लालू खरोखरीच चारित्र्यसंपन्न असून जर सत्तेने भ्रष्ट होत असतील, तर अशी ठिसूळ चारित्र्यसंपन्नता काय कामाची? एकूणच नैतिकता ही फार अवघड गोष्ट आहे. निसर्गात नैतिकता नाही, ती निसर्गाला अभिप्रेत नाही, म्हणून कदाचित ती मनुष्य स्वभावातही सहजप्रेरणा म्हणून अस्तित्वात नाही. त्यामुळेच कदाचित मनुष्य स्खलनशील आहे. कितीही प्रयत्न केले तरी नैतिकतेच्यासंदर्भात युगानुयुगे माणसाची फारशी प्रगती झाली नाही, किंबहुना सदाचाराचे तेच ते प्राथमिक धडे गिरवून घेण्यासाठी वारंवार महात्म्यांना जन्म घ्यावा लागतो, असे दुर्दैवी वास्तव आहे. सारांश, नैतिकतेच्या संदर्भात मानव जातीची इयत्ता पहिली हे कायमच राहणार! ना त्याला व्यक्ती बदलू शकेल, ना व्यवस्था! गौतम बुद्ध, महात्मा गांधी हे जर महात्मे होते तर त्यांच्या वास्तव्यानंतर माणसाच्या मुलभूत प्रवृत्तीत काही बदल झाल्याचा पुरावा नाही. हे विचार निराशजनक वाटले तरी त्यातले सत्य उमगून घेण्यात शहाणपणा आहे. किमान त्यामुळे अपेक्षाभंग तरी होणार नाही!

    ReplyDelete