Thursday, October 11, 2012

केजरीवाल पक्ष : नव्या बाटलीत जुनी दारू

नवा राजकीय पर्याय देणे म्हणजे जुनी माणसे वाईट आहेत म्हणून त्यांच्या जागी नवी चांगली माणसे बसविणे नव्हे.  कारण व्यक्तींचा हा प्रश्न नाही. पर्यायी व्यक्ती नव्हे तर पर्यायी धोरण हवे. पण धोरण जुनेच आणि व्यक्ती नवे हा असफल प्रयोग पुन्हा पुन्हा आम्ही करीत आहोत. खरी गरज आज विचार आणि कृती याच्या सीमोल्लंघनाची आहे. पण तसे सीमोल्लंघन करण्याची कुवत केजरीवाल , त्यांचे सहकारी आणि त्यांचा पक्ष यांच्यात नसल्याने ते फक्त भ्रष्टाचाराच्या नावाने  शिमगा करीत आहेत. केजरीवाल यांनी देशापुढे नवा पर्याय ठेवला नसून आधीच्या सुमार अशा बेसुमार पक्षात एका नव्या पक्षाची तेवढी भर पडली आहे. 
---------------------------------------------------------------------------------------



अण्णा आंदोलन सुरु झाल्या पासून केजरीवाल अण्णांवर जे फासे टाकत होते त्याला अनुकूल दान अण्णा आंदोलनाचा ऱ्हास होईपर्यंत त्यांना मिळत गेले. पहिल्यांदा हरियाणातील हिस्सार लोकसभा पोट निवडणुकीच्या वेळी टीमअण्णा मधील मतभेद समोर आले होते तेव्हाच अण्णा आणि केजरीवाल यांच्या राजकीय भूमिका परस्परांना छेद देणाऱ्या असल्याचे स्पष्ट झाले होते. सुरुवातीला अण्णांनी हिस्सार पोट निवडणुकीत कॉंग्रेस विरोधी प्रचाराला ना म्हंटले होते. पण आपले म्हणणे गळी उतरविण्यात तरबेज असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी त्यावेळी अण्णांना राजी केले होते. 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ' असे हिस्सार पोटनिवडणुकीकडे पाहून अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत म्हंटले गेले होते आणि कालांतराने ते सिद्धही झाले. याचा अर्थ अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापण्याची चूक केली असे नव्हे. पण पक्ष स्थापन करते वेळेसचे त्यांचे सोंग 'अग अग म्हशी मला कोठे नेशी' या प्रकारातले होते. सरकार आणि अन्य राजकीय पक्षांनी आपल्याला हे 'पाप ' करावयास भाग पाडले आणि आपला उद्देश्य जन लोकपाल आणणे हाच असून तो सफल झाला की आपण राजकारणाच्या  पापी दुनियेतून बाहेर पडू अशी त्यांनी घोषणा केली होती. राजकारण हे वाईटच आहे यावर अण्णा आणि केजरीवाल यांचे एकमत असल्याचा आभास त्यांच्या या वक्तव्यातून होत होता. जंतर मंतर वर अण्णांनी घेतलेली भूमिका देखील या पेक्षा वेगळी नव्हती. सरकार आमचे ऐकत नसल्याने आता संसदेत जाण्यावाचून पर्याय नसल्याचे अण्णांनी म्हंटले होते. काहीच उपयोग होत नसल्याने आता आंदोलन नाहीच अशी जाहीर घोषणा अण्णांनी जंतर मंतर वर केली होती. आपण नव्या राजकीय पक्षात  सामील होणार नाही , पण या पक्षास आपले समर्थन आणि आशिर्वाद असेल असे अण्णांनी म्हंटले होते. हाच धागा पकडून अरविंद केजरीवाल यांनी आपली इच्छा नव्हती पण अण्णानी सुचविले म्हणून पक्ष स्थापन करतो आहे असा आव आणला. एवढेच नाही तर अण्णानी पक्ष स्थापण्यास विरोध केल्यास आपण पक्ष काढणार नाही असे जाहीर वक्तव्य केले.  पण पहिल्यांदा विपरीत आक्रीत घडले. अण्णांना आपण टोपी घालू शकतो या केजरीवाल यांच्या आत्मविश्वासाला पहिल्यांदा तडा गेला. पूर्वी अण्णांनी एखादी भूमिका केजरीवाल यांचेशी विचार विनिमय न करता घेतली तरी त्यात  पाहिजे तसा बदल घडवून आणण्यात केजरीवाल यांना नेहमीच यश आले होते. जंतर मंतर वर देखील केजरीवाल यांना हवी होती अशीच भूमिका अण्णांनी घेतली होती. पण राळेगण सिद्धीला परतल्यावर अण्णांनी वेगळे बोलायला सुरुवात केली. राजकारण हे वाईटच असते या पूर्वीच्या भूमिकेकडे ते पुन्हा वळले. एवढेच नाही तर केजरीवाल यांच्या पक्ष स्थापन करण्याच्या आग्रहामुळे आंदोलनात फूट पडल्याचा आरोप केला. आपला विरोध असेल तर पक्ष स्थापन करणार नाही या वचनाची अण्णांनी केजरीवाल यांना आठवण करून दिली . पण केजरीवाल हे कच्चा गुरुचे पक्के चेले निघाले ! मुळात पक्ष स्थापन करण्याची मूळ कल्पना अण्णा यांचीच असल्याचे त्यांनी स्वत:च्या तोंडून न सांगता पुण्यप्रसून  वाजपेयी या वरिष्ठ पत्रकाराच्या तोंडून वदवून घेतले. पक्षाच्या बाबतीत लोकमत आजमाविण्याचा अण्णांनी आपल्याला आदेश दिला होता आणि त्याप्रमाणे जनमताचा पाठींबा व आग्रह लक्षात घेवूनच आपण पक्ष स्थापन करीत असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. अण्णांनीच आपला शब्द फिरविला असल्याने आपण दिलेला शब्द पाळण्याचे आपल्यावर बंधन नसल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित करून शब्द पाळण्याच्या बाबतीत इतर राजकारणी मंडळी व आपल्यात फरक नसल्याचे दाखवून अखेर अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. एक प्रकारे नव्या बाटलीत जुनी दारू ओतण्याचा हा प्रारंभ होता असेच त्यांच्या पक्षाच्या घोषित तत्वज्ञानावरून म्हणणे भाग पडते. 

                    पक्षाचा कल्पना शून्य दस्तावेज
गाजावाजा करून गोष्टी करायच्या ही अरविंद केजरीवाल यांची सवय आहे.  गोष्टी करायच्या त्या गाजावाजा करण्यासाठीच या परंपरेनुसार 'व्हिजन डॉक्युमेंट ' या भारदस्त नावाने प्रसिद्धी माध्यमांसमोर एक दस्तावेज ठेवण्यात आला. यात दुरदृष्टी तर सोडा पण जवळची दृष्टी देखील नाही. ज्या सर्वसाधारणपणे सर्वच पक्षांच्या दस्तावेजात असतात त्याच गोष्ठी अगदी त्याच शब्दात मांडण्यात आल्या. काना मात्राचा देखील फरक आढळणार नाही. ज्या पक्षांवर केजरीवाल यांचा एवढा राग आहे त्याच पक्षांची उचलेगिरी करून त्यांनी आपले तथाकथित व्हिजन डॉक्युमेंट तयार केले. या पक्षांच्या कथित सिद्धांताने देशाचे वाटोळे होताना आपण बघतच आहोत. पण एक देखील नवी कल्पना , नवी दृष्टी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाजवळ नाही हे पुरतेपणी स्पष्ट झाले आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर वाचा ते काय करणार आहेत ते. सर्वांसाठी मोफत आरोग्य सेवा , सर्वांसाठी शिक्षण , मुल्यवृद्धीला लगाम ,  शेतकऱ्यांच्या उत्पादनाला किफायतशीर किंमती, लोकांच्या मान्यतेशिवाय जमिनीचे अधिग्रहण नाही,अनुसूचित जाती -जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी विशेष योजना या ठळक गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात सापडणाऱ्या या गोष्ठी आहेत. राईट टू रिकाल आणि राईट टू  रिजेक्ट , न्यायालयीन व पोलीस सुधारणा या सारख्या गोष्टी सुद्धा नवीन राहिल्या नाहीत. सगळेच पक्ष त्याचा पुरस्कार करतात. शरद जोशींच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलना नंतर सर्वच पक्षांनी आपल्या घोषणा पत्रात 'शेतीमालाला रास्त भाव ' असे घोषवाक्य कोरून ठेवले आहे , त्याच धर्तीवर अण्णा आंदोलना नंतर सर्वच पक्ष 'शक्तिशाली' लोकपालचा पुरस्कार करणार हे स्पष्ट आहे. फक्त अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने निवडून आल्यावर १० दिवसात जन लोकपाल अशी नवीन पण अव्यवहार्य घोषणा केली आहे. जे काही नवीन म्हणून सांगितले आहे ते निव्वळ स्वप्नरंजन किंवा उथळ व भडक घोषणाबाजीच्या सदरात मोडणारे आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती लोक ठरवतील ही या प्रकारातील मजेदार घोषणा आहे. अशी सवंग घोषणा जर गंभीरपणे दिली असेल तर केजरीवाल पक्षाचे निती-निर्धारक मुर्ख असले पाहिजेत किंवा लोक मुर्ख आहेत अशी या निती-निर्धारकांची ठाम समजूत असली पाहिजे. पक्षांच्या प्रतिनिधींनी लाल दिव्याची गाडी न वापरणे, राहण्यासाठी बंगल्यांचा वापर न करणे अशा काही किरकोळ असल्या तरी नव्या बाबींचा व्यवहार्यतेचा विचार न करता समावेश करण्यात आला आहे. १९७७ साली लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या जनता पक्षाने तर पारतंत्र्याचा वारसा सांगणारे राष्ट्रपती भवन राष्ट्रपती साठी न वापरता लोकहितकारी कार्यासाठी वापरण्याचा संकल्प सोडला होता. पण राष्ट्रपती व त्यांचे कार्यालय याची दुसरीकडे सोय करणे जास्त खर्चिक आणि गैरसोयीचे आहे हे लक्षात आल्यावर तो नाद सोडला होता. केजरीवाल पक्षाच्या बंगला व सुरक्षा न वापरण्याच्या घोषणेचे यापेक्षा वेगळे काही होण्याची शक्यता नाही. अशा घोषणा फक्त टाळ्या घेण्यासाठी असतात. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाबद्दल सर्वाधिक निराश करणारी कोणती बाब असेल तर तो आर्थिक धोरणा बद्दलचा गोंधळ आहे. जनतेने भाव ठरविणे, शेतकऱ्यांना फायदेशीर किंमत देणे आणि मूल्यवृद्धी रोखणे या वेगवेगळया घटकांना खुश करण्यासाठी आणि स्पष्ट शब्दात सांगायचे तर फसविण्यासाठी दिलेल्या घोषणा आहेत. कारण या घोषणाच एकमेकांना छेद देणाऱ्या असल्याने त्यांची अंमलबजावणी शक्य नाही. आपल्या सवंग घोषणाबाजीने इतर राजकीय पक्ष लोकांना फसवीत आलेत त्यापेक्षा वेगळे काही केजरीवाल पक्षाकडे नाही.
                               शिमगा नको , सीमोल्लंघन हवे
कार्यक्रमाच्या बाबतीत देखील हा पक्ष इतर पक्षांनी तयार केलेल्या वाटेवरूनच चालत असल्याची झलक मिळाली आहे. दिल्लीतील आगामी निवडणुकावर डोळा ठेवून वीज दर कमी करण्याच्या मागणीसाठी या पक्षाने आंदोलन छेडले आहे. विजेचा उत्पादन खर्च कमी होवून वीज उत्पादन वाढावे म्हणून सरकारने केलेल्या कोळसा खाण वाटपाला सरकारी तिजोरीला तोटा झाला म्हणून विरोध करायचा आणि दुसरीकडे वीज दर कमी करण्याची मागणी करून सरकारने विजेवर सबसिडी देवून तोटा सहन करायची मागणी करायची हा सरळ सरळ आर्थिक असमंजसपणा आहे. तत्वज्ञाना प्रमाणेच  कृतीत देखील   हा पक्ष इतर पक्षांपेक्षा वेगळा नसल्याचे या कृतीतून सिद्ध झाले आहे. खरे तर केजरीवाल आणि त्यांचे सहकारी देशाची राजकीय सूत्रे हाती घेवू इच्छिणाऱ्या स्वातंत्र्या नंतरच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करीत आहे. समाजवादी आणि जुनाट विचाराचा प्रभाव नसलेली ही पिढी आहे. जग बदलणारे तंत्रज्ञान या पिढीच्या मुठीत आहे. पण मानसिकता मात्र जुनीच आहे. त्यामुळे नव्या पद्धतीने विचार करणे , आज पर्यंतच्या अपयशा पासून धडा घेवून नवे प्रयोग करणे  जमू नये हे केजरीवाल यांच्या पिढीचे मोठे अपयश आहे. भ्रष्टाचार मुक्तीचा त्यांचा प्रयत्न देखील तितकाच वेडगळ आहे. पोलिसाच्या हाती दंडा देवून भ्रष्टाचार संपत नसतो , द्न्ड्याच्या आश्रयाखाली तो जास्त वाढतो या अनुभवा पासून ही पिढी शिकायला तयार नाही. अधिक अधिकार देणारी मोठी यंत्रणा म्हणजे भ्रष्टाचाराला निमंत्रण असते ही साधी गोष्ट कळत नसेल तर समाज बदलण्याच्या वल्गना निरर्थक ठरतात. नव्या तंत्रज्ञानाची मदत घेवून कोणतीही अतिरिक्त नोकरशाही उभी न करता आणि अतिरिक्त खर्च न करता पारदर्शी कारभाराच्या आधारे भ्रष्टाचाराला वेसण घालणे शक्य आहे हे या तंत्रज्ञान हाताळणाऱ्या पिढीच्या गावीही नसावे ही आश्चर्यकारक बाब आहे. पण ज्या पद्धतीने राजकीय व्यक्तींना किंवा राजकीय व्यक्तींच्या जवळच्या व्यक्तींना लक्ष्य करून भ्रष्टाचार विरोधी लढाई पुढे नेण्याचा प्रयत्न होत आहे त्यावरून भ्रष्ट व्यक्ती दुर झाले की भ्रष्टाचार संपेल अशा भ्रमात केजरीवाल आणि त्यांचा पक्ष असावा किंवा जनतेत तसा भ्रम पसरवून स्वत:चे घोडे पुढे दामटण्याचा त्यांचा प्रयत्न असावा हेच त्यांच्या 'पोलखोल' कृतीवरून दिसून येते. आज पद्धतशीरपणे असे वातावरण निर्माण केले जात आहे की राजकारणातील माणसे भ्रष्ट आहेत. त्यांच्या जागी चांगली माणसे आली की प्रश्न सुटेल . १९४७  साली आणि १९७७ साली देखील चांगलीच माणसे राजकारणात आली होती. पण पुढे त्यांचे काय झाले हे आपण पहातच आहोत. नवा राजकीय पर्याय देणे म्हणजे जुनी माणसे वाईट आहेत म्हणून त्यांच्या जागी नवी चांगली माणसे बसविणे नव्हे.  चांगली माणसे तिथे गेली की बिघडतात हाच आजवरचा अनुभव आहे. हा अनुभव लक्षात घेवूनच अण्णा हजारे सारखी अनेक माणसे राजकारण वाईट आहे म्हणून दुर पळत आहे. पण त्यांच्या राजकारणा पासून दुर राहण्याने आजच्या राजकारणात बदल होईल असे नाही आणि त्यांच्या सारखी चांगली माणसे राजकारणात आली तर राजकारण भ्रष्टाचार मुक्त होईल असेही नाही. कारण व्यक्तींचा हा प्रश्न नाही. पर्यायी व्यक्ती नव्हे तर पर्यायी धोरण हवे. पण धोरण जुनेच आणि व्यक्ती नवे हा असफल प्रयोग पुन्हा पुन्हा आम्ही करीत आहोत. खरी गरज आज विचार आणि कृती याच्या सीमोल्लंघनाची आहे. पण तसे सीमोल्लंघन करण्याची कुवत केजरीवाल , त्यांचे सहकारी आणि त्यांचा पक्ष यांच्यात नसल्याने ते फक्त शिमगा करीत आहेत. केजरीवाल यांनी देशापुढे नवा पर्याय ठेवला नसून आधीच्या सुमार अशा बेसुमार पक्षात एका नव्या पक्षाची तेवढी भर पडली आहे.
                                       
                    (संपुर्ण)
सुधाकर जाधव
मोबाईल-९४२२१६८१५८
पांढरकवडा ,
जि.यवतमाळ 

2 comments:

  1. Read the article.
    It's very easy sitting in the chair and criticise anybody. No doubt there are some facts quoted by you. However, in my opinion what is "MY" contribution to correct the flaws pointed in the article remains the question. Today suggestions along with action is required, other wise every thing will go in vain.
    Please note that the status of country will never change by just writing critics or favours any more.

    ReplyDelete
    Replies
    1. Do agree with you. It's really important that what's 'My' contribution to overcome the situation everyone is facing. But what Mr. Jadhav is doing is also an effort to shown one of the aspects of the story as there are many. when he had return about the SAMARPAN YATRA also his views about the top people were very realistic. I think if Mr. Jadhav can give little more time with open mindset then he can be a very good campeigner of ARTHAKRANTI but I beleive he restricted himself to certain extent not willing to get into ARTHAKRANTI thoughorly, if he can do that his some views about ARTHAKRANTI will be definitely going to change.

      Herewith I request him to spend some more time with couple of us and Anilji so that either the proposal will have more value addition or Mr. Jadhav will be with us in totality. Whichever may be the case the country and society is going to get benefitted from this. Now it's up to Mr. Jadhav which way he would like to go.

      Delete