Thursday, October 18, 2012

स्त्री मुक्तीचा 'मलाला' मार्ग


खाप पंचायती  बलात्काराचा बागुलबुवा उभा करून स्त्रियांना बंदिवासात ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ताज्या घटनाक्रमावरून स्पष्ट झाले आहे. बलात्कार होवू नये यासाठी प्रयत्न आणि उपाय योजना करण्याऐवजी बलात्काराची भिती दाखवून  स्त्रियांना घरात डांबण्याचा डाम्बिस प्रयत्न खाप पंचायती कडून होत आहे. मुलींचे लग्नाचे वय कमी करावे ही मागणी त्याचाच एक भाग आहे. १६ व्या वर्षी लग्न करून दिले की मुलीचे शिक्षण आपोआप थांबते आणि प्रगतीच्या सगळ्या शक्यता संपुष्टात येतात हे त्यामागचे खरे गणित आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

सावित्रीबाई फुलेनी स्त्री शिक्षणासाठी जिद्दीने  दिलेल्या लढ्याची आणि त्यासाठी भोगलेल्या यातनांच्या इतिहासाची पुनरावृत्ती इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा घडली. विभाजना पूर्वीच्या भारतात सावित्रीबाईने जे भोगले त्या भारतातच आज पाकिस्तान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भूभागात एका १४ वर्षे वयाच्या मुलीला स्त्री शिक्षणासाठी तेच भोगावे लागले आहे . मलाला युसुफजई तिचे नाव. शिक्षण हक्का खातर तीला तालेबानी आतंकवाद्याच्या गोळीचा सामना करावा लागला आहे.  सावित्रीबाईनी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेवून आपला देह झिजविला त्यावेळी त्यांचे वय या मलाला पेक्षा थोडे अधिक होते  आणि आपल्या ध्यासापायी त्यांना शेण आणि दगडाचा मारा सहन करावा लागला होता. आज बंदुका जशा सहज उपलब्ध होतात तशा सावित्रीबाईच्या काळात झाल्या असत्या तर कदाचित त्यांनाही दगड आणि शेणा ऐवजी मलाला सारखाच बंदुकीच्या गोळीचा सामना करावा लागला असता. युगे लोटली ,पण तीच सनातनी वृत्ती आणि स्त्रियांना बंदिवासात ठेवण्याची तीच क्रूर धडपड आज दिसते तेव्हा प्रगतीचा आपला दावा किती पोकळ आहे याची प्रचिती येते. मलाला वरील हल्ल्याने स्त्रियांच्या बाबतीत पुरुषी वर्तन किती दुटप्पी आणि अमानवी  आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मलालावर झालेल्या हल्ल्याने साऱ्या जगाला हादरवून टाकले आहे. पाकिस्तानात आतंकवाद हा भस्मासूर बनला आहे. रोज पाकिस्तानात कोठे ना कोठे आतंकवादी हल्ला होत असतो. हे हल्ले अंगवळणी पडण्याची सवय झालेल्या पाकिस्तानात देखील मलाला वरील हल्ला पचविणे जड जात आहे.  पाकिस्तानी आतंकवादी भारतात येवून हल्ला करतात म्हणून आधीच पाकिस्तान वर खार खाऊन असलेल्या भारतीय जनमताला मलाला घटनेने पाकिस्तानी आतंकवाद्यावर तोंड सूख घेण्याची आयतीच संधी मिळाली. स्त्री शिक्षणा बाबत आणि त्यांच्या स्वातंत्र्याबाबत आपण पाकिस्तान पेक्षा पुढे आणि पुढारलेले आहोत ही अभिमानाची भावना मलाला युसुफजईला पाठींबा व्यक्त करतांना भारतीयात जाणवावी इतकी प्रबळ होती. पाकिस्तानच्या या घटनेस सदृश्य आणि समांतर अशा काही घटना भारतात घडत असताना देखील त्या तुलनेत मलाला घटनेची भारतीयांनी अधिक दखल घेतली .   या घटनेने आपल्या शत्रुराष्ट्राची जगभर नाचक्की होते आहे हे दखल घेण्या मागचे महत्वाचे कारण असले तरी यात  मलालाच्या शौर्याचा सिंहाचा वाटा  आहे हे नाकारून चालणार नाही. मलाला या मुलीस पाकिस्तानचे 'स्मॉल वंडर'च म्हंटले पाहिजे. ती राहात असलेल्या पाकिस्तानच्या सुंदर अशा स्वात खोऱ्यावर तालेबानी आतंकवाद्यानी कब्जा केल्यावर पहिली मोहीम स्त्री शिक्षणा विरुद्ध राबविली गेली. मुलीनी शाळेत जावू नये यासाठी नुसत्या धमक्या देवून आतंकवादी थांबले नाही तर त्यांनी मुली शिकत असलेल्या शाळांवर बॉम्ब हल्ले देखील केले होते. अशा परिस्थितीत वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी या मुलीने आतंकवाद्याच्या या कारवाया विरुद्ध आवाज बुलंद केला. बी बी सी साठी ब्लॉग लिहून आतंकवाद्यांच्या कारवायाची माहिती जगाला दिली , होणारी घुसमट व्यक्त केली. आतंकवाद्यांच्या टोकाच्या विरोधाला न जुमानता शिक्षण सुरु ठेवले, इतर मुलीना शिक्षणासाठी साथ आणि प्रोत्साहन दिले. या मुलीने जे केले आणि त्यासाठी जे सोसले ते कोणत्याही प्रकारे सावित्रीबाईच्या तुलनेत कमी नव्हते. मलाला युसुफजईस  खऱ्या अर्थाने सावित्रीची लेक म्हणता येईल. भारतात सावित्रीबाईच्या कर्तृत्वाची आठवण ठेवणाऱ्या , तिच्यामुळे शिकता सवरता आले याची जाण असणाऱ्या मुलींची आणि महिलांची कमी नाही. त्यांचे सावित्रीबाई विषयीचे श्रद्धा आणि प्रेम खोटे नाही. सावित्रीबाईचा उपयोग त्यांना स्वकर्तृत्व फुलविण्यासाठी झाल्याचे त्या अभिमानाने सांगतात देखील. आपण सावित्रीच्या लेकी आहोत हे अभिमानाने सांगणाऱ्या भारतीय महिला आणि मुलीना मलाला ला दाखविता आली तशी सावित्रीबाईची धमक आणि चमक मात्र दाखविता आली नाही. त्यामुळे भारतात अनेक महिला आणि मुली यशाची शिखरे गाठत असतानाच पाकिस्तानात स्त्री-शिक्षणा बाबत व स्त्री - स्वातंत्र्या बाबत जी प्रतिकूलता आहे तशीच प्रतिकूलता भारतात देखील आढळते. मलालाच्या प्रयत्नाने पाकिस्तानात या प्रतिकूलतेला मोठा हादरा बसला आहे आणि सावित्रीचा वारसा अभिमानाने मिरविणाऱ्या भारतात नवे निमित्त आणि नव्या सबबी पुढे करून मुली आणि स्त्रिया यांच्या स्वातंत्र्य व प्रगतीच्या आड प्रतीकुलतेचे डोंगर उभे करण्याचे प्रयत्न होत आहेत. स्वत: सर्व आधुनिक सुखसोयींनी लैस होवून स्त्रियांनी मात्र मध्ययुगीन बंधनात वावरण्याची अपेक्षा बाळगणारे तथाकथित संस्कृती रक्षकाचे टोळक्याचे  आणि ६० वर्षाच्या स्वातंत्र्याच्या वाऱ्याचा यत्किंचितही परिणाम न झालेल्या  खाप पंचायती सारख्या बुरुजाचे आतंकवादी सावट आजही स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर आणि प्रगतीवर पडत आहे. सावित्रीच्या लेकींकडून मात्र हे सावट दुर करण्याचा संघटीत प्रयत्न होताना दिसत नाही. पाकिस्तानातील आतंकवाद्याना स्त्रियांच्या प्रगतीत अडथळे आणण्यासाठी आणि त्यांना गुलामीत ठेवण्यासाठी बंदुकीचा आणि बॉम्बचा वापर करावा लागत आहे . भारतात तर त्याचीही गरज पडत नाही. रुढी,परंपरा आणि संस्कृतीचा सोटा उगारून महिलांना घरात बसविण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे.  कायदा आणि घटना यांना ठेंगा दाखवून  संस्कृती रक्षकांचे आणि खाप पंचायतीचे निर्वेधपणे निघणारे फतवे हेच दर्शवितात. 

                           बलत्कार हा आतंकवादी हल्लाच 

पाकिस्तानातील आतंकवादी धाक दाखवून आणि बळाचा वापर करून मुलीना आणि स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवून चार भिंतीच्या आतच त्यांनी राहावे यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतात देखील असाच प्रयत्न सुरु आहे. धाक आणि बळाचा वापर याच्या जोडीला  स्त्रियांना बेआबरू करण्याचा प्रयत्न भारतात सर्रास होतो. अशी बेआबरू करण्यात तर तथाकथित संस्कृती रक्षक आघाडीवर असतात आणि त्यांना आपल्या दुस्कृत्याचा अभिमान देखील असतो. खाप पंचायतीचा जन्म आणि उपयोग मुली आणि महिलांना बंदिवासात ठेवण्यासाठीच झालेला असावा असेच खाप पंचायतींचे वर्तन असते. आतंकवाद्या सारखे या लोकांच्या हातात सतत शस्त्र दिसत नसले तरी वेळप्रसंगी हे लोक त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न करणाऱ्याची किंवा प्रेम करणाऱ्याची घोषित आतंकवाद्यालाही लाजवेल या पद्धतीने क्रूर हत्या करतात हे अगणित वेळा दिसून आले आहे. तालेबानी आतंकवादी आणि खाप व संस्कृतीवादी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे त्यांच्या उक्ती व कृतीवरून दिसून येते.  स्त्रियांना चार भिंतीच्या आड ठेवण्यासाठी आतंकवादी  शस्त्रा प्रमाणेच बलात्काराचा अस्त्र म्हणून वापर करीत असल्याची अनेक उदाहरणे काश्मीर मध्ये घडली आहेत. आता खाप पंचायती देखील बलात्काराचा बागुलबुवा उभा करून स्त्रियांना बंदिवासात ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ताज्या घटनाक्रमावरून स्पष्ट झाले आहे. बलात्कार होवू नये यासाठी प्रयत्न आणि उपाय योजना करण्याऐवजी बलात्काराची भिती दाखवून  स्त्रियांना घरात डांबण्याचा डाम्बिस प्रयत्न खाप पंचायती कडून होत आहे. मुलींचे लग्नाचे वय कमी करावे ही मागणी त्याचाच एक भाग आहे. १६ व्या वर्षी लग्न करून दिले की मुलीचे शिक्षण आपोआप थांबते आणि प्रगतीच्या सगळ्या शक्यता संपुष्टात येतात हे त्यामागचे खरे गणित आहे. बलात्काराच्या घटनांना आळा बसावा असा प्रयत्न राजकीय घटकांकडून देखील होत नाही. उलट या अपराधास मुली आणि महिलाच जबाबदार असल्याचे बेजबाबदार विधान या घटकांकडून सर्रास केले जाते.ज्यांच्यावर अशा घटना रोखण्याची जबाबदारी आहे ते पोलीस तर या मताचेच असतात असा अनुभव आहे.  त्यामुळे बलात्कारी लोकांचे मनोधैर्य वाढून बलात्कारांच्या घटना मध्ये वाढ होत आहे. बलात्काराला रोखण्यासाठी तो केवळ स्त्रीयावरील अत्याचार न समजता बलात्काराला आतंकवादी हल्लाच मानल्या गेला पाहिजे. मुली व स्त्रीयामुळेच बलात्कार होतात असे मानणाऱ्यांना आणि बोलणाऱ्यांना बलात्कार करणाऱ्या आतंकवाद्यांचे साथीदार मानले पाहिजे. या लोकांवर आतंकवादी समजूनच कारवाई झाली पाहिजे . कायद्यात तशा दुरुस्तीचा आग्रह स्त्री संघटनांनी धरला पाहिजे. पण स्त्री संघटनांचे व चळवळीचे स्वयंसेवीसंस्थाकरण झाल्याने त्यांची धार आणि जोर देखील कमी झाला आहे. स्वातंत्र्याच्या आणि सामाजिक समतेच्या चळवळीत स्त्रियांचा मोठा सहभाग राहिल्याने आणि घटना समितीतीतील स्त्री सदस्यांची कामगिरी देखील वाखाणण्याजोगी राहिल्याने स्त्रियांना अधिकारासाठी वेगळा संघर्ष करण्याची गरज पडली नाही. पण त्यामुळे स्वातंत्र्या नंतर स्त्रियांची अशी वेगळी ताकद निर्माणच झाली नाही. या ताकदी अभावीच स्त्रियांनी बंधने पाळण्याची भाषा आणि कृतीला उधान आले आहे. राजकारणा विषयी स्त्रियांची उदासीनता आणि भिती यामुळे तर स्त्रियांचे प्रश्न सुटण्या ऐवजी वाढू लागले आहेत. 

                                 मलालाचा धडा 

बदल घडवून आणण्यात राजकारणाचे महत्व आणि ताकद याचे जे आकलन पाकिस्तानातील अति मागासलेल्या भागात राहणाऱ्या अवघ्या १४ वर्षे वयाच्या मलालाला आहे ते आपल्याकडे अनुभवी आणि उच्च शिक्षित महिला व तरुणींना नाही. आपल्याकडे मुली आणि महिलांना राजकारण म्हणजे पाल आणि झुरळा सारखे वाटते. पाल आणि झुरळ यांची वाटते तशी आणि तितकीच  किळस आणि भिती  भारतीय महिला आणि मुलीना राजकारणा बद्दल  वाटत असते. शिक्षित महिलात हे प्रमाण किती प्रचंड आहे याची कल्पना फेसबुक वरून येवू शकतो. १०० पैकी ९९ मुली किंवा महिला राजकारणाला घाण आणि तुच्छ समजून त्यापासून दुर राहण्यात अभिमान आणि आनंद मानीत असल्याचे तुम्हाला दिसून येईल. स्वातंत्र्या पूर्वी इतर क्षेत्रात करण्यासारखे करिअर नसल्याने स्वातंत्र्याच्या व समतेच्या चळवळीत स्त्रियांचा सहभाग आणि ओढा वाढला असावा. पण स्त्रियांच्या अशा सहभागा मुळेच स्वातंत्र्यानंतर स्त्रियांसाठी अनेक वाटा मोकळ्या झाल्या . स्वातंत्र्यानंतर स्त्रियांचा राजकारणातील  सहभाग कमी कमी होत गेल्याने स्त्री नेतृत्वाला ओहोटी लागली आणि खुल्या झालेल्या वाटांचा संकोच होवू लागला आहे. राजकारणा विषयी स्त्रियांची मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे. महिलांच्या राजकीय उदासीनतेमुळे कायदेमंडळाच्या राखीव जागे संबंधीचे बील रखडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थात प्रतिनिधित्व मिळाले असले तरी निवडून आलेल्या स्त्रियांच्या उदासीनतेने त्यांचे कारभारीच कारभार करीत असतात ! स्त्रियांवर लादण्यात आलेली सगळी बंधने झुगारून देण्याचा राजमार्ग म्हणून राजकारणाकडे पाहिले पाहिजे. या संदर्भात मी पवार कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केला तर तो अनेकांना खटकेल याची जाणीव असून देखील त्यांच्या तरुणींचा राजकारणातील सहभाग वाढावा म्हणून चालू असलेल्या प्रयत्नांकडे लक्ष वेधू इच्छितो. या प्रयत्ना मागे त्यांचे अनेक हेतू असतील. पक्ष वाढवायचा असेल. पक्षात आपले स्थान बळकट करायचे असेल. अजित पवारांना शह द्यायचा असेल किंवा पुरोगामी महाराष्ट्राची  पहिली स्त्री मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पण जिल्ह्या-जिल्ह्यात १०-१० हजार तरुणींचे मेळावे तरुणींनी राजकारणात सहभागी व्हावे या घोषित उद्देश्यासाठी आयोजित करने हे स्त्रियांच्या राजकीय जागृतीच्या दिशेने पडत असलेले मोठे पाऊल आहे. त्या विशिष्ठ राजकीय पक्षाच्या आहेत म्हणून त्यांच्या प्रयत्नांना कमी लेखणे योग्य नाही. त्यांच्या पक्षालाच याचा फायदा मिळू नये असे वाटत असेल तर इतर पक्षांनी देखील असे मेळावे आयोजित करून स्त्रियांच्या राजकारणातील सहभागाचा मार्ग प्रशस्त केला पाहिजे. अरविंद केजरीवाल यांच्या नव्या पक्षाने पक्ष बांधण्यासाठी असे मेळावे घेतले तर प्रस्थापित पक्षांना ते खरोखर मोठे आव्हान उभे करू शकतील. स्त्रियांच्या राजकारणातील सहभागाने राजकारणाच्या शुद्धिकरणा सोबत स्त्रीमुक्तीचा मार्ग प्रशस्त होणार आहे. पाकिस्तानच्या मलालाने आपल्या कृतीतून आणि उक्तीतून हाच संदेश पाकिस्तानातीलच नव्हे तर जगातील मुली आणि महिलांना दिला आहे. 

                                     (संपूर्ण)

सुधाकर जाधव 
मोबाईल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा ,
जि. यवतमाळ 

1 comment:

  1. सुंदर लेख आहे पण याबाबत कायदे करून काही विशेष साध्य होईल असे वाटत नाही .

    ReplyDelete