Wednesday, September 18, 2013

निर्भयाचा संदेश : मेणबत्त्या पेटत्या ठेवा !

घटनेने स्त्री-पुरुष समानता आणि स्वातंत्र्य मान्य केले असले तरी त्याची  आमच्यात अद्यापही रुजायला सुरुवात झाली नसल्याचे धगधगते वास्तव निर्भया प्रकरणातील एका आरोपीच्या वकिलाच्या तोंडून प्रकट झाले. निर्भया सारखी 'चूक" त्याच्या मुलीने  केली असती तर तिला त्याने पेट्रोल टाकून जाळले असते !. घटना , कायदा आणि माणुसकी विरोधी एवढे खुलेआम बोलण्याची हिम्मत त्याच्यात आली यास आम्ही आणि आमचा समाज कारणीभूत आहे.
-------------------------------------------------------

गेल्या वर्षीच्या १६ डिसेंबरला निर्भयावर झालेला अमानुष अत्याचार आणि नंतर तिचा झालेला मृत्यू  या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला. सर्व वयस्क आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. १६ डिसेंबरची घटना जघन्यतम अपराधाच्या श्रेणीत मोडत असल्याचे सांगून न्यायधीशांनी कायद्यानुसार हि शिक्षा सुनावली. त्या आधी वृत्त वाहिन्यांनी आरोपींना काय शिक्षा झाली पाहिजे हे कॅमेऱ्या समोर विचारत आरोपींना फाशीच झाली पाहिजे असे उन्मादी वातावरण तयार केले होते. अर्थात वृत्त वाहिन्यांच्या या अगोचरपणाचा  निकालावर परिणाम झाला असण्याची सुतराम शक्यता नाही  पण १६ डिसेंबरच्या घटने नंतर देशभरातून उमटलेल्या प्रतिक्रिया , उफाळून आलेला जनक्षोभ याच्याच परिणामी खटला न रेंगाळता जलद निकाल लागून आरोपींना कठोर शासन झाले हे मान्य करावे लागेल. जागृत आणि संघटीत जनमत कसे परिणामकारक ठरते याचे हा खटला उत्तम उदाहरण आहे. पण जनमत आणि जमावाचे मत याच्यातील सीमारेषा किती पुसट आहे याची प्रचीती देखील या खटल्याने आणून दिली. १६ डिसेंबरच्या घटने नंतर गल्ली पासून दिल्लीच्या संसदे पर्यंत गुन्हेगारांना फाशी देण्याची मागणी झाली होती. गांधीवादी समजल्या जाणाऱ्या अण्णा हजारेनी तर गुन्हेगारांना मैदानात फाशी देण्याची मध्ययुगीन मागणी केली होती. जघन्य अपराधाबाबत लोकांचा राग अशा पद्धतीने व्यक्त व्हावा यात अस्वाभाविक असे काही नाही. मात्र कायद्यानुसार फाशी झालेल्या या गंभीर प्रकरणात फाशीच्या शिक्षेवर आनंद आणि समाधान व्यक्त होत असेल तर ते जनमताचे नव्हे तर जमावाच्या मताचे निदर्शक आहे. जमावाचे मत नेहमीच उथळ असते . आता या फाशीमुळे गुन्हेगाराच्या मनात जबर जरब बसेल . असा गुन्हा करण्यास कोणी धजावणार नाही अशा उथळपणातून फाशी बद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. या निकालाची सर्वत्र अशी जोरजोरात चर्चा सुरु असतानाच जम्मूतील पोलीसठाण्यात पोलीस अधिकारी व शिपायांनी केलेल्या बलात्काराचे वृत्त बाहेर आले. धावत्या रेल्वेत सी बी आय कर्मचाऱ्याने महिलेचा विनयभंग केला. हे तर कायद्याचे रक्षक. पण कायद्यानुसार झालेल्या फाशीची जबर जरब सोडा यत्किंचीतही जरब त्यांना बसली नाही. १६ डिसेंबरच्या घटने नंतर दिल्लीत पेटलेल्या मेणबत्त्यांच्या उजेडात धावत्या बस मध्ये पुन्हा बलात्कार झालाच होता. विनयभंगही सुरूच होते. बलात्कारा सारख्या घटने बद्दल एवढा रोष प्रकट होत असताना अशा घटनात अजिबात खंड पडत नाही याचा अर्थच फाशी झाली म्हणून समाधान आणि आनंद व्यक्त करणे निरर्थक आहे.
 

 बलात्काराच्या  प्रश्नाची मुळे खोलवर आणि सर्वत्र विस्तारली आहेत आणि याचा विस्तार कुठे जमिनीत झालेला नाही तर तो आमच्या मना मनात झाला आहे. १६ डिसेंबरच्या घटनेनंतर आपला रोष आणि दु:ख व्यक्त करण्याचे प्रतिक म्हणून दिल्लीत आणि दिल्ली बाहेरही हजारो तरुण-तरुणी , स्त्री-पुरुष पेटत्या मेणबत्या घेवून रस्त्यावर उतरले होते. अशा सगळ्या तरुण -तरुणींना आणि स्त्री-पुरुषांना येशू ख्रिस्ता सारखे ' ज्यांनी आपल्या आयुष्यात स्त्रीशी गैरवर्तन केले नसेल त्यांनीच मेणबत्ती पेटवावी' असे सांगितले असते तर कदाचित मेणबत्ती पेटवायला एकही पुरुष समोर आला नसता ! मेणबत्ती घेवून रस्त्यावर उतरलेल्या तरुणी आणि महिलांना देखील ' ज्यांनी आपल्यावर झालेली लैंगिक जबरदस्ती मुकाट्याने सहन केली नाही त्यांनीच मेणबत्ती पेटवावी असे सांगितले असते तर दिल्लीच्या रस्त्यावर किंवा देशभरात लैंगिक अन्याय-अत्याचाराच्या विरोधात एकही मेणबत्ती पेटली नसती. याचा अर्थ लैंगिक अत्याचारा विरुद्ध आवाज उठविण्यासाठी रस्त्यावर उतरलेले स्त्री-पुरुष ढोंगी होते असा नाही. प्रश्नाचे मूळ आणि व्यापकतेचे पाहिजे तेवढे भान त्यांना नसावे असे फार तर म्हणता येईल. रस्त्यावर उतरणे आणि आरोपींना कायद्याने कठोर शासन होणे गरजेचे असले तरी त्याचा  उपयोग फार मर्यादित आहे याचे भान त्यांना नाही असे म्हणता येईल.  त्यांच्याकडून फाशीची होणारी आग्रही मागणी आणि आरोपींना फाशी झाल्यावर त्यांना वाटणारे समाधान यातून प्रश्नाच्या व्यापकतेचे भान नसल्याचीच पुष्ठी होते. प्रश्नाचे मुळ आमच्या मनात आहे , आमच्या कुटुंबाने ते आमच्या मनात रुजविले आहे आणि तथाकथित धर्माच्या शिकवणुकीमुळेच कुटुंबाने ते आमच्यात रुजविले आहे.
 

कुटुंबात आणि समाजात स्त्रीचे स्थान दुय्यम आहे , पुरुष हा तिच्या पेक्षा श्रेष्ठ आहे , तिचा त्राता आणि रक्षणकर्ता आहे ,  पुरुषांना समाधान देण्यासाठीच स्त्रीचा जन्म आहे. पुरुषांच्या उपभोगा साठीच स्त्रीचा जन्म असल्याने त्याबद्दल स्त्रीने तक्रार करता कामा नये अशा प्रकारच्या कुटुंबातून होणाऱ्या संस्काराने स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार वाढत चालले आहे. पुरुष श्रेष्ठ असल्यामुळे तो असे वागणारच आणि म्हणून स्त्रीने तिच्यावर त्याची नजर पडणार नाही , त्याच्या हाती लागणार नाही अशा पद्धतीने स्वत;ला चार भिंतीच्या आत सुरक्षित ठेवले पाहिजे आणि स्त्रीने अशा प्रकारे स्वत:ला बंदिस्त करून घेतले नाही तर तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांना पुरुष नाही तर तीच जबाबदार असते या कुटुंबाच्या आणि समाजाच्या मानसिकतेने पुरुषांना अत्याचार करण्याचे स्वातंत्र्य आणि बळ दिले आहे. घटनेने स्त्री-पुरुष समानता आणि स्वातंत्र्य मान्य केले असले तरी त्याची  आमच्यात अद्यापही रुजायला सुरुवात झाली नसल्याचे धगधगते वास्तव निर्भया प्रकरणातील एका आरोपीच्या वकिलाच्या तोंडून प्रकट झाले. या महाशयाच्या मते १६ डिसेंबरच्या घटनेत चूक निर्भयाचीच होती. रात्री उशिरा आपल्या मित्रासोबत फिरायला जाण्याची , सिनेमाला जाण्याची चूक तिने केली होती. त्याच्यामते स्त्री जातीला हे शोभणारे नाही. त्याच्या मुलीने अशी चूक केली असती तर तिला पेट्रोल टाकून जाळले असते !. घटना , कायदा आणि माणुसकी विरोधी एवढे खुलेआम बोलण्याची हिम्मत त्याच्यात आली कोठून ? कुटुंब आणि समाजाचे स्त्री-पुरुष भेदाभेदाचे , स्त्रीला हीन समजण्याच्या संस्काराचे हे बळ आणि फळ आहे. हा गृहस्थ टोकाचा बोलला म्हणून आज आमच्या निशाण्यावर आहे. पण हा माणूस एकटा नाही . प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी देखील आज गाजत असलेल्या आसाराम प्रकरणात तर चक्क त्या फिर्यादी मुलीलाच पुरुषाकडे आकर्षित होण्याची बिमारी असल्याचा आरोप करून फिर्यादी मुलीची बदनामी केली . आजपर्यंत बलात्कारा संदर्भात जी काही थोडी प्रकरणे कोर्टात पोचली त्या सर्व प्रकरणात बचाव पक्षाच्या वकिलाने स्त्रीच्या चारित्र्याकडेच बोट दाखवून स्त्रीलाच जबाबदार धरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येईल. आपल्या आवडीचे कपडे घालणे ,रात्री घराबाहेर पडणे , हॉटेल मध्ये पार्टीत सामील होणे , मित्रा बरोबर बागेत फिरणे किंवा सिनेमाला जाणे हे सगळे प्रकार स्त्रीच्या स्वैर वर्तनात आणि चारित्र्यहिनतेत मोडत असल्याची आपल्याकडे व्यापक मान्यता असल्यामुळेच आपल्याकडे भर कोर्टात स्त्रीची अप्रतिष्ठा करण्याचा प्रयत्न होतो हे विसरून चालणार नाही.
 
 स्त्री स्वातंत्र्याचे असे वैरी सर्वत्र आणि समाजाच्या सर्व स्तरात आढळून येतील. मुलीनी अंगभर कपडे घातले नाही तर असे प्रकार घडणारच म्हणणाऱ्या समाजसेवी सिंधुताई सपकाळ काय किंवा स्त्रियांचे काम चूल आणि मुल सांभाळणे असल्याचे म्हणणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहनजी भागवत सौम्य शब्दात बोलत असले तरी मतितार्थ एकच. सिंधुताई किंवा भागवतांचा हा गोड बोलून गळा कापण्याचाच प्रकार आहे.  स्त्रियांनी कसा पेहराव करायचा इथपासून ते कोठे केव्हा जायचे किंवा जायचे नाही , काय करायचे आणि काय करायचे नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य स्त्रियांना नाही !  समाजाच्या  इच्छे विरुद्ध असे स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या स्त्रियांना धडा शिकविण्यासाठी , पुरुषी इच्छेचा अव्हेर करणाऱ्या स्त्रियांना धडा शिकविण्यासाठी बलात्काराचा हत्यार म्हणून वापर केला जातो याची कबुली बलात्कारा संबंधी काही आशियायी देशातील पुरुषांनी त्यांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिल्याचे जाहीर झाले आहे. निर्भया प्रकरणाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या तिच्या मित्राने जे सांगितले त्यात निर्भयावर बलात्कार करणारे या दोघांच्या रात्री बाहेर फिरण्याला , सिनेमा बघण्याला दोष देत होते !  म्हणजे मूळ समस्या बलात्कार नाहीच. समस्या आहे ती स्त्री स्वातंत्र्याची ! बलात्कार तर स्त्री स्वातंत्र्यावर आघात करणारे , स्त्रियांच्या मनात  स्वातंत्र्याचे विचार येवू नयेत म्हणून भीती घालणारे हत्यार आहे. या हत्याराचा उपयोग स्त्रीला नामोहरण करण्यासाठीच होतो असे नाही तर एखाद्या जातीच्या  किंवा धर्माच्या लोकांना धडा शिकविण्यासाठी सुद्धा केल्या जातो. फाळणीच्या वेळी सर्व धर्मियांनी हेच केले. खैरलांजीत किंवा गुजरातच्या दंगलीत हेच घडले. ही उदाहरणे कोणाला फार जुनी वाटत असतील  तर त्यांनी अजूनही शाई वाळली नाही अशा नुकत्याच झालेल्या मुझफ्फरनगर मधील दंगलीच्या बातम्यावर नजर टाकावी . तेथेही इतिहासाची पुनरावृत्तीच झाली आहे. अशा घटनांच्या परिणामी स्त्रीची अप्रतिष्ठा होतेच , शिवाय अधिक बंदिस्त जीवन तिच्या वाट्याला येते. या बंदिस्त जीवनापासून मुक्ती मिळविण्याचे पहिले पाउल म्हणून बलात्कार विरोधी लढा लढविला जाण्याची गरज आहे.   हे हत्यार वापरण्याला फाशी दिल्याने किंवा न दिल्याने मूळ प्रश्न सुटत नाही. गरज आहे ती बलात्काराच्या हत्यारातील धार काढून घेण्याची.
 
 बलात्कार झाला म्हणजे स्त्रीने सर्वस्व गमावले , समाजात तिला तोंड दाखविण्याला जागा राहिली नाही , ती अपवित्र झाली या सामाजिक संकल्पनाचे ओझे स्त्रियांनी फेकून दिले तर आणि तरच बलात्काराच्या हत्याराची धार जावून बलात्कार हा स्त्री स्वातंत्र्याच्या मार्गातील  अडथळा ठरणार नाही. स्त्री स्वातंत्र्याला वेगळ्या पद्धतीने विरोध करणारे , स्त्रीच्या पारतंत्र्याचा गौरव करणारे पदोपदी आढळतात , आपल्या कुटुंबात , शेजारी , समाजात सर्वत्र आढळतात त्यांचा मुकाबला कसा करणार हा खरा प्रश्न आहे. यांचा जो पर्यंत मुकाबला करता येत नाही , त्यांच्या मानसिकतेत बदल घडविता येत नाही तो पर्यंत स्त्री स्वातंत्र्याची प्रतिष्ठापना समाजात होणार नाही आणि जो पर्यंत कुटुंब आणि समाज स्त्री-पुरुष समानता आणि पुरुषासारखेच स्त्री देखील समाजात स्वातंत्र्य उपभोगू शकते हे मान्य करीत नाहीत तो पर्यंत बलात्कार संपणार नाहीत. बलात्कारित स्त्रियांच्या पाठीशी समाज उभा राहिला तरच हे ओझे फेकून देण्याचे बळ स्त्रीला मिळेल.. धर्म आणि परंपरेने निर्माण केलेल्या मानसिकतेने स्त्रीच्या वाट्याला बंदिवास आला हे खरे असले तरी समाजात स्त्रियांना जे भोगावे लागले आणि लागते आहे ते आपल्या मुलीच्या वाट्याला येवू नये ही भावना देखील स्त्री स्वातंत्र्यावर मर्यादा आणण्यास कारणीभूत असते. कुटुंबाला स्त्री स्वातंत्र्याची भीती वाटण्याचे हे देखील कारण आहे.  आपल्या सारखेच आपल्या कुटुंबाला निर्भय बनवून या लढाईत सामील करून घेण्याची गरज आहे. निर्भया प्रकरणाने याची सुरुवात झाली आहे.
 
 निर्भया प्रकरणात आरोपींना फाशी झाली म्हणून आनंद आणि समाधान वाटून आमच्या हातातील मेणबत्त्या आम्ही विझवणार असू तर हा बलात्कार विरोधी आणि पर्यायाने स्त्री स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा पराभव ठरणार आहे. असा पराभव होवू द्यायचा नसेल तर निर्भया प्रकरणात पेटलेल्या मेणबत्त्या विझू देता कामा नये. या मेणबत्त्या महानगरातील किंवा विशिष्ट स्तरातील , जातीतील ,धर्मातील स्त्री साठीच मेणबत्त्या पेटता कामा नये तर प्रत्येक पिडीत स्त्री साठी त्या पेटल्या पाहिजेत. खैरलांजीतील पिडीतासाठी त्या पेटल्या पाहिजेत , गुजरात आणि मुझफ्फरनगर मधील पिडीतांसाठी पेटल्या गेल्या पाहिजेत आणि जोधपुर व अन्य ठिकाणच्या  आश्रमातील पिडीतांसाठी देखील मेणबत्त्या पेटल्या गेल्या पाहिजेत. सर्वत्र अशा मेणबत्त्या पेटल्या गेल्या तरच त्या न विझणाऱ्या मशाली सारख्या तेवत राहतील. तेवढ्याने बलात्कार थांबणार नाहीत हे खरे. पण त्यामुळे स्त्रीकडे बघण्याचा कुटुंबाचा , समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी जे बळ पाहिजे ते मिळेल. मेणबत्ती पेटवून रस्त्यावर येणाऱ्या पुरुषाला आपल्या हातून कधीतरी घडलेल्या प्रमादाची लाज वाटून घरात बहिणीच्या स्वातंत्र्याची पाठराखण करण्याची प्रेरणा आणि बळ मिळेल. मेणबत्ती पेटविणाऱ्या प्रत्येक स्त्रीला घरात आणि समाजात अन्याय व अत्याचार निमुटपणे सहन करीत आल्याची लाज वाटून अन्याय सहन न करण्याची प्रेरणा आणि बळ मिळेल. बलात्कार विरोधी लढाईत कायदा आणि सरकारचे पाठबळ मिळेल. पण कुटुंबाची आणि समाजाची मानसिकता बदलण्यासाठी त्यांचा फारसा उपयोग नाही. त्यासाठी हवे आत्मबळ. हे आत्मबळ या पेटत्या मेणबत्त्यांतून मिळणार आहे. असे आत्मबळ आले कि मेणबत्त्यांच्या मशाली व्हायला वेळ लागणार नाही. निर्भया प्रकरणाचा सर्व स्त्री-पुरुष स्वातंत्र्यवाद्यांसाठी हाच संदेश आहे.
  
                                  (संपूर्ण)
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८

No comments:

Post a Comment