Thursday, November 21, 2013

अण्णा आंदोलनाचे धिंडवडे

 भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींच्या गुजराथ दंगलीतील चुकांची पाठराखण केली , पण संधी मिळताच मोदींनी जशी अडवाणींना त्यांची जागा दाखवून दिली त्याचीच पुनरावृत्ती अण्णा आणि  केजरीवाल या गुरु-शिष्याच्या  बाबतीत होत असल्याचे पाहायला मिळत आहे !
--------------------------------------------------------------

सध्या सुरु असलेला काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकाच्या प्रचाराच्या निमित्ताने देशाच्या आसमंतात राजकीय प्रचाराचा जोरदार धुराळा उडणे सुरु आहे. कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षात रोज नव्या विषयावर वादाला तोंड फुटत आहे. त्या निमित्ताने या दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या तोंडून जी मुक्ताफळे बाहेर पडत आहेत तो कधी जनतेच्या करमणुकीचा तर कधी संतापाचा विषय बनत आहे. या दोन्ही पक्षाकडून अपेक्षित असे धोरणात्मक विवेचन व प्रबोधन क्वचितच होते. या पक्षांचा शिमगा देशाला नवीन नाही .त्यामुळे जनतेला या पक्षांकडून वेगळे काही घडेल अशी अपेक्षा नसल्याने निवडणुकीत जनता 'उडदामाजी काळे गोरे' निवडत आली आहे. देशाच्या अशा प्रकारच्या राजकारणाला कंटाळलेल्या जनतेला आपला राग आणि भावना व्यक्त करण्यासाठी देशात दोन वर्षापूर्वी झालेल्या अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचे माध्यम मिळाले. लोकांच्या राजकीय पक्ष व राजकीय नेतृत्व यांच्या बद्दलचा राग आणि असंतोषामुळे आंदोलनाला एकप्रकारे राजकीय उद्रेक आणि उठावाचे स्वरूप आले होते. जनअसंतोषाचे हे रौद्ररूप पाहून केंद्र सरकार तर हादरलेच होते पण सगळीच राजकीय बिरादरी अस्वस्थ झाली होती. लोकांना गृहीत धरून ज्या प्रकारचे स्वार्थी आणि मतलबी राजकारण देशात सुरु होते आणि पर्याया अभावी जी घुसमट जनतेची होत होती ती घुसमट या आंदोलनामुळे शक्ती बनून बाहेर पडली होती. आंदोलन आणि आंदोलनाचे नेते यासाठी निमित्त बनले होते. त्याचमुळे आंदोलनाच्या नेत्यांना  लोकांना संघटीत करून , त्यांचे प्रबोधन करून त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी काहीच प्रयत्न करावे लागले नाही. अण्णा हजारे यांच्या एका उपोषणाने हे काम केले . आधीच भ्रष्टाचाराने त्रस्त असलेल्या जनतेला त्याकाळात पुढे आलेल्या नवनव्या आणि मोठमोठ्या भ्रष्टाचाराच्या वार्तानी बेभान केले. भान हरपून जनतेने अण्णा हजारे , अरविंद केजरीवाल त्यांच्या  चौकडीला डोक्यावर घेतल्याने या नेत्यांचे देखील डोके ठिकाणावर राहिले नाही. आधीच यांच्या डोक्यात स्पष्टतेचा व दिशेचा गोंधळच नाही तर अभाव होता. त्यांच्या डोक्यातील पोकळीत जनसमर्थनाची हवा शिरल्याने आंदोलन सुरुवातीपासूनच दिशाहीन झाले होते. पण एकीकडे भ्रष्टाचाराच्या दलदलित फसलेली राजकीय प्रणाली आणि दुसरीकडे साफसुथरी आणि नि:स्वार्थ प्रतिमा असलेले आंदोलनाचे  नेतृत्व यात जनता आंदोलनाच्या नेत्यांच्या पाठीमागे जाणे स्वाभाविक होते. या स्वच्छ प्रतिमेच्या नव्या नेत्यांवर कोणतेही शिंतोडे उडालेले पाहण्याची जनतेची अजिबात तयारी नव्हती. नेतृत्वाच्या आर्थिक अनियमिततेबद्दलच नाही तर त्यांच्या राजकीय आणि बौद्धिक क्षमतेवर कोणीही ,कोणतेही प्रश्नचिन्ह लावलेले पाहण्याची लोकांची तयारी नव्हती आणि लोकांना ते खपतही नव्हते. जे आंदोलना बद्दल . नेतृत्वाच्या क्षमतेबद्दल आणि गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित करीत होते तेच लोकांच्या डोळ्यात खुपत होते. आंदोलनाबद्दल प्रश्न उपस्थित करणारे सरकारचे हस्तक मानल्या गेल्याने त्याकाळात विवेकाचा आवाज ना लोकांच्या कानात शिरत होता ना आंदोलनाच्या नेत्यांच्या. आंदोलनाच्या नेत्यांकडे आंदोलन चालविण्याची क्षमता आणि आंदोलनाला दिशा देण्याची प्रतिभा नव्हती हे लोकांनी लक्षात घेतले नाही . त्याचा व्हायचा तो परिणाम होवून काहीही विधायक न घडता आंदोलन संपले आणि नेतृत्वाचीही वेगवेगळ्या दिशेने पांगापांग झाली. आंदोलनातून विधायक काहीच न निघाल्याने देशातील राजकीय प्रणाली बद्दलचा तिटकारा तेवढा वाढून खोलवर रुजला गेला. राजकीय पक्ष आणि नेते चोर आणि डाकू आहेत ही आंदोलनाने व त्यांच्या नेत्यांनी खतपाणी घालून वाढविलेल्या आणि पसरविलेल्या सनकी भावनेचे बळी आता आंदोलनाचे नेते ठरले आहेत. आंदोलनाच्या काळात या आंदोलनावर आणि आंदोलनाच्या नेत्यांवर जे प्रश्नचिन्ह लावले गेले होते ते खरे असल्याचे उत्तर आता या आंदोलनाच्या नेत्यांच्या तोंडूनच जनतेला ऐकायला मिळत आहे. काही काळ का होईना पण साऱ्या देशाला आंदोलित करून राजकीय नेतृत्वाला आपल्या चुकांचे क्षणिक भान करून देण्यात हे आंदोलन प्रभावी ठरले होते हे आंदोलनाचा विरोध करणारेही मान्य करीत होते.ही एकप्रकारची आंदोलनाची उपलब्धीच होती.  पण आंदोलनाच्या नेत्यांचे वर्तन या मान्यतेवर आणि उपलब्धतेवर पाणी फिरवून स्वत:च आंदोलनाचे धिंडवडे काढण्याचे राहिले आहे.
विधानसभा निवडणुकाच्या निमित्ताने  कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात पातळी सोडून प्रचाराचे जे धमासान सुरु आहे तशीच चिखलफेक दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अण्णा आंदोलनाचे नेते हजारे आणि केजरीवाल एकमेकांवर करू लागले आहेत. त्या काळात आंदोलनाच्या नेत्यांच्या आर्थिक व्यवहारातील अनियमितता आणि आंदोलनासाठी जमा झालेल्या पैशाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. केजरीवाल आणि किरण बेदी या  आंदोलनातील अण्णांच्या प्रमुख सहकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप झाला , पुरावे दिले गेले. पण त्यावेळी हे आंदोलनाचे नेते गायी पेक्षाही अधिक पवित्र वाटत असल्याने असे पुरावे देवून आरोप करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. सरकारचे ९-१० लाख रुपये बुडविण्याचा केजरीवाल यांचेवर आरोप झाला तेव्हा सरकार विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप झाला. नंतर केजरीवालानी गाजावाजा करून ते पैसे परत केले .पण तरीही सरकार केजरीवाल यांना विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप पुसला गेला नाही. आंदोलनाच्या पैशातून केजरीवाल यांच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांचे पगार देण्यात आल्याची चर्चा झाली. पण त्यावाही पडदा टाकला गेला.  किरण बेदीनी अनेक संस्थाकडून खोटे बील देवून अवाजवी विमानभाडे वसूल केल्याचे सिद्ध झाले. पण आंदोलनाच्या नेत्यांनी  स्वत: दिलगिरी व्यक्त केली नाही कि किरण बेदीना दिलगिरी व्यक्त करायला लावली नाही. झाल्या प्रकाराचे किरण बेदींनी समर्थन केले आणि आंदोलनाच्या नेत्यांनी किरण बेदीचे समर्थन केले ! आम्ही राजकारण्यांच्या भ्रष्टाचारा विरोधी बोलत असल्याने आमच्यावर आरोप केले जातात असा  कांगावा केला गेला. आंदोलनाचे प्रमुख नेते राहिलेले अण्णा हजारे या सर्वांची पाठराखण करण्यात पुढे होते ! आता स्वत: अण्णा हजारे आंदोलनासाठी जमलेल्या पैशाचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करून केजरीवाल आणि कंपनीकडे खुलासा करण्याची मागणी करू लागले आहेत. केजरीवाल आंदोलनाच्या निधी बाबत पारदर्शिता ठेवल्या बद्दल सतत ढोल बडवीत आले आहेत. एकदा नाही तर अनेकदा आंदोलनाच्या पैशाचा हिशेब आपण अण्णांकडे सादर केल्याचे सांगतात. अण्णांच्या विश्वासातील माणसांनी हिशेब तपासून क्लिनचीट दिल्याचे सांगतात.. मग तरीही अण्णा हजारे याबद्दल का प्रश्न उपस्थित करीत आहेत हा प्रश्न पडतो.  कागदोपत्री दाखविण्यात येत असलेल्या हिशेबा पलीकडचा वेगळा हिशेब आहे आणि त्याचा मेळ लागत नसल्याने अण्णांनी हा प्रश्न उपस्थित केला असा अर्थ यातून निघतो. अण्णांनी सीम कार्डचा जो मुद्दा उपस्थित केला आहे तो या अर्थाशी सुसंगत असाच आहे. जमा निधी व्यतिरिक्त अण्णांच्या नावाच्या सीम कार्डचा वापर करून बराच पैसा जमा करण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. एक स्तंभलेखक म्हणून या आंदोलनावर माझे बारकाईने लक्ष होते व याच स्तंभातून आंदोलनाबद्दल वेळोवेळी लिहित आलो आहे. सीमकार्डच्या भानगडीची मलाही माहिती नव्हती. सीमकार्डच्या माध्यमातून पैसा जमा केल्याचा प्रकार आत्ता अण्णा बोलले तेव्हाच कळले. अण्णा हजारेनी आंदोलनाच्या काळात आपल्या सहकाऱ्यांच्या चुकांची पाठराखण केली नसती तर आज आंदोलनाचे निघताहेत तसे धिंडवडे निघाले नसते. अण्णांच्या एका जुन्या सहकाऱ्याने तर अण्णांनी आपल्या नावावर जमा करण्यात आलेल्या पैशात आपला हिस्सा मागितल्याने आंदोलनाच्या नेत्यात बेबनाव झाल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर अण्णांनी आंदोलनाच्या निधीच्या गैरव्यवहारा बाबत प्रश्न उपस्थित करताच एक निनावी पत्र प्रचारित व प्रसारित करण्यात आले आहे. त्या पत्रात जंतरमंतरच्या आंदोलनाच्या आधी अण्णांना कोणी ओळखत नव्हते . माहिती अधिकाराचा कायदा  व जनलोकपाल बील बनविण्यात त्यांचा काही वाटा नव्हता. तरी या बाबतचे श्रेय देवून त्यांना मोठे करण्यात आल्याचा दावा या पत्रात करण्यात आला. एकंदरीत त्यांना काही कळत नसताना , त्यांची सामाजिक विषयाची समज कमी असताना त्यांना एवढ्या मोठ्या आंदोलनाचा नेता बनविल्याची अशी परतफेड करता का असा सवाल उपस्थित करून अण्णांना त्यांची लायकी दाखवून देण्याचा प्रयत्न झाला. या निनावी पत्रातील मजकूर पाहिला तर आम आदमी पार्टी तर्फे हे पत्र प्रसारित करण्यात आले याबद्दल शंकेला जागा उरत नाही. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींच्या चुकांची पाठराखण केली , पण संधी मिळताच मोदींनी जशी अडवाणींना त्यांची जागा दाखवून दिली त्याचीच पुनरावृत्ती केजरीवाल यांनी अण्णांच्या बाबतीत केल्याचे पाहायला मिळते !
व्यक्तिगत आरोप-प्रत्यारुपातून आंदोलनाचे धिंडवडे निघालेच , उरलीसुरली कसर आम आदमी पार्टीने आपल्या धोरण आणि कार्यपद्धतीतून भरून काढण्याचा चंग बांधलेला दिसतो. अण्णा आंदोलनाची सर्वात मोठी जमेची बाजू होती या आंदोलनास समाजातील सर्व थरातून जात , धर्म , पंथ विसरून लोकांचे समर्थन लाभले होते. या आंदोलनाचा वारसा सांगणाऱ्या आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीत मते मिळविण्यासाठी जाती-धर्माचा वापर सुरु केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने या पक्षावर नोटीस देखील बजावली आहे. या पार्टीचा पार्टी फंड देखील वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीच्या पार्टी फंडा बद्दल चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. ज्या कारणांनी भारतीय राजकारण नासले त्याचाच वापर करून आम आदमी पार्टी सत्तेत येण्याचा प्रयत्न करीत असेल तर हा अण्णा आंदोलनाचा फार मोठा पराभव आहे. कशाही मार्गाने एकदा चांगली  माणसे सत्तेत आले कि भ्रष्टाचार संपून राजकारण शुद्ध आणि लोकहितकारी होईल ही समजूतच मुळी चुकीची आणि खुळचट आहे. चांगली माणसे सत्तेत आल्याने राजकारण सुधारत नाही तर चांगली माणसे बिघडतात हा आजवरचा अनुभव आहे. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बिहारच्या विद्यार्थी  आंदोलनात लालूप्रसाद यादव बेदाग विद्यार्थी नेते होते. अण्णा आंदोलनात केजरीवाल यांचेवर अनेक आरोप झालेत , तसा एकही आरोप त्याकाळात लालूप्रसाद यांचेवर झाला नाही. सत्तेत आले तेव्हा ते चांगलेच होते. सत्तेने त्यांचे पतन केले . सत्तेतून जितके जास्त अधिकार मिळतात तितकी माणसे भ्रष्ट होतात. याला अपवाद असतात ती प्रमेय सिद्ध करण्या पुरती ! अशा अपवादात्मक माणसांनी समाज बदलत नसतो. अण्णा आंदोलनाचा आणि आता केजरीवालांच्या आम आदमी पार्टीचा सगळा जोर आपण इमानदार असण्यावर आहे. सत्ता मिळविण्यासाठी इतर पक्ष ज्या  चुकीच्या गोष्टींचा आधार आणि उपयोग करून घेतात त्याच मार्गाने इमानदार म्हणविणारी पार्टी जाणार असेल तर सत्ताप्राप्ती नंतर इतर पक्षांच्या मार्गाने जाण्यापासून ती स्वत:ला रोखू शकत नाही. चारित्र्यवान माणूस आकाशातून पडत नाही, माणसाचे चारित्र्य त्याच्या सभोवतालची परिस्थिती आणि व्यवस्था घडवीत असते. म्हणून चारित्र्यवान माणसे घडतील आणि टिकतील अशी परिस्थिती आणि व्यवस्था निर्माण करण्यावर जोर देण्याची गरज आहे.  राजकारण , अर्थकारण आणि समाजकारण याच्या बदलाचा विचार करताना कोणत्या व्यक्तीला समोर केले म्हणजे बदल होईल असा विचार न करता कोणत्या धोरणांनी आणि कार्यक्रमांनी त्यात बदल होईल याचा विचार केला पाहिजे. व्यक्ती प्रेषित बनला तरी त्याचे पाय मातीचे असतात याचा विसर पडला कि त्याची परिणती अण्णा आंदोलनाची झाली तशी होते .

                             (संपूर्ण)

सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८

No comments:

Post a Comment