राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी पैसा लागतो आणि तसा पैसा जमा करण्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट व्यवहार होतात हेच तर भारतीय राजकारणाचे बरे न होणारे दुखणे बनले आहे. अण्णा आंदोलनाने आणि या आंदोलनातून निर्माण झालेल्या 'आप' पक्षाने या वास्तवाकडे सतत पाठ फिरविली आणि राजकीय पक्षांना बदनाम केले. पण निवडणुकीच्या राजकारणात पडताच इतर पक्षांप्रमाणेच या नव्या पक्षाला देखील याच दुखण्याने ग्रासले आहे हेच या पार्टी संबंधी बाहेर आलेली चित्रफित दर्शविते .
----------------------------------------------
----------------------------------------------
अण्णा आंदोलनाच्या काळात राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते , नेते नखशिखांत भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याचे चित्र देशापुढे उभा करण्यात आले. ही भ्रष्ट राजकीय सर्कस शुद्ध करण्यासाठी जनलोकपालच्या रुपात रंगविण्यात आलेल्या रिंग मास्टरच्या प्रेमात तर आक्खा देश पडला होता. त्याचे असूड भ्रष्ट राजकीय नेत्यांच्या पाठीवर बरसून राजकारणाची मैली गंगा साफ होईल याबाबत तिळमात्रही शंका जनतेच्या मनात उरली नव्हती. अण्णा आंदोलनाला सत्तेची हाव नव्हती , हवा होता तो फक्त एक जनलोकपाल. एवढ्या मोठ्या आंदोलना नंतरही सरकार आणि विविध राजकीय पक्ष आंदोलनाला हवा तसा लोकपाल द्यायला तयार नाहीत . त्यामुळे देशातील भ्रष्टाचार संपविणारा जनलोकपाल आणायचा असेल तर सत्तेत जाण्या शिवाय पर्याय नाही असे सांगत अण्णा आंदोलनाचा कणा असलेले अरविंद केजरीवाल यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. हा पक्ष स्थापन करताना त्यांनी तीन सुस्पष्ट घोषणा केल्या होत्या . पहिली घोषणा होती. नव्या पक्षाला सत्ता नको आहे. पाहिजे आहे फक्त जनलोकपाल. त्याची निर्मिती झाली कि आपण पक्ष विसर्जित करू ! दुसरी घोषणा होती पैसा खर्च न करता निवडणूक लढविण्याची . आणि तिसरी घोषणा होती अण्णा हजारे यांना पक्ष नको असेल तर तो तात्काळ विसर्जित करण्याची ! या तीन घोषणांच्या पायावर केजरीवाल यांची 'आम आदमी पार्टी' उभी राहिली. या घोषणा लक्षात घेतल्या तर देशाला नवा राजकीय पर्याय देणारा राजकीय पक्ष असा 'आम आदमी पार्टी'(आप) चा संकल्प नव्हता हे लक्षात येईल. ज्यावेळी नवा पक्ष स्थापनेची घोषणा करण्यात आली त्यावेळी अण्णा हजारे केजरीवाल यांचे सोबत होते. पक्षीय राजकारणा बद्दल अण्णा हजारे यांच्या मनात असलेला तिरस्कार लक्षात घेवून कदाचित केजरीवाल यांनी जनलोकपाल हेच नव्या पक्षाचे जीवन कार्य असल्याचे घोषित केले असावे. पण याचा अण्णा हजारे यांचेवर प्रभाव आणि परिणाम झाला नाही. त्यांनी पक्षाच्या प्रयोगा पासून स्वत:ला दूर ठेवणेच पसंत केले. अण्णा स्वत:हून दूर झाल्याने केजरीवाल आपल्या मतानुसार पक्ष बांधण्यास आणि चालविण्यास मोकळे झाले. अण्णांना सोबत ठेवण्यासाठी ज्या प्रकारच्या पक्षाची कल्पना मांडण्यात आली होती ती कल्पना अण्णा सोबतच दूर झाली . इतर राजकीय पक्षाप्रमाणे एक पक्ष या पद्धतीने पक्षाची वाटचाल सुरु झाली . अर्थात प्रत्येक पक्षाचे थोडे फार वेगळेपण असते तसे वेगळेपण आम आदमी पार्टी (आप) चे देखील आहे. प्रत्येक पक्षाची ओळख तो वापरत असलेल्या पालूपदावरून होते. जसे 'गरीब' हे कॉंग्रेसचे पालुपद आहे. हिंदुत्व हे भारतीय जनता पक्षाचे पालुपद आहे . तसेच इमानदारी हे केजरीवाल यांच्या नव्या पक्षाचे पालुपद आहे ! पालुपद वेगळे असले तरी सत्ताप्राप्तीचा रुळलेल्या आणि ठरलेल्या मार्गावरून राजकीय पक्ष मार्गक्रमण करीत आले आहेत. आम आदमी पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीत पडल्या नंतर पार्टी विषयी जे वाद निर्माण झाले , पार्टीवर जे आरोप झालेत त्यावरून आम आदमी पार्टी देखील याच मार्गावरून चालत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
'आप' वर करण्यात आलेले आरोप खरे कि खोटे यात न शिरताही एक गोष्ट स्पष्टपणे सांगता येईल कि आपल्यावर झालेले आरोप पक्षाच्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने घेतलेत आणि फेटाळले ती पद्धत आपल्याकडच्या पारंपारिक राजकारणाची राहिली आहे. आरोप झाले कि लगेच झटकून मोकळे व्हायचे आणि मुद्दामहून अडकविण्यात आल्याचा कांगावा करायचा हेच विविध पक्षाचे पक्ष प्रवक्ते करीत असतात. 'आप'ने हेच केले . केजरीवाल पक्षाच्या उमेदवारांचे जे चित्रण करण्यात आले ते त्यांना अडकविण्यासाठीच होते यात वाद नाही. जी मंडळी आपल्या इमानदारीचा आणि नैतिकतेचा टेंभा मिरवीत असतात ते खरेच तसे आहेत कि नाही हे तपासून पाहण्याची कोणाचीही इच्छा होईल . जो तो आपापल्या परीने शोध घेईल. त्याला फार तर परीक्षा घेणे म्हणता येईल. जे चुकीचे वागत नाही असा सदैव दावा करतात त्यांचा कशात अडकण्याचा प्रश्न येतो कुठे? जे चित्रण दाखविले गेले ते खोटे नव्हतेच. मागचे पुढचे बोलणे कापून सी डी तयार करण्यात आली होती हे खरे .पण जे दाखविण्यात आले ते बनावट नव्हते. नव्या पक्षाला बदनाम करण्यासाठी असे चित्रण करण्यात आले हे मान्य केले तरी त्यामुळे पक्षाचे उमेदवार पैशाच्या मोहात पडलेत हे वास्तव बदलत नाही. राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी पैसा लागतो आणि तसा पैसा जमा करण्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट व्यवहार होतात हेच तर भारतीय राजकारणाचे बरे न होणारे दुखणे बनले आहे. अण्णा आंदोलनाने आणि या आंदोलनातून निर्माण झालेल्या 'आप' पक्षाने या वास्तवाकडे सतत पाठ फिरविली. राजकीय पक्षातील माणसे वाईट आहेत , स्वार्थी आहेत , चरित्रहीन आहेत म्हणून भ्रष्टाचार होतो. राजकीय कार्यकर्ते आणि नेते इमानदार असले तर भ्रष्टाचार होणार नाही अशी या मंडळींची बाळबोध मांडणी राहिली आहे. म्हणून तर त्यांनी 'इमानदार' लोकांचा पक्ष काढला ! प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरल्यावर पैशाच्या गरजेचे भान या मंडळीना झाले आणि जी चित्रफित समोर आली त्यात हेच भान प्रकट झाले आहे . या पूर्वी 'तहलका'ने अशीच एक चित्रफित तयार करून प्रचंड खळबळ निर्माण केली होती. अटलजी पंतप्रधान असताना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले बंगारू लक्ष्मण यांना अशाच पद्धतीने अडकविण्यात आले होते. त्यांनी काही स्वत:हून पैशाची मागणी केली नव्हती. आमचे अमुक काम करून द्या , एवढा पक्षनिधी देतो असे सांगून त्यांना मोहात पाडण्यात आले होते. मोहात पडताना त्यांनी हेच सांगितले होते कि पक्षाचे कार्यालय चालवायला पुष्कळ खर्च येतो ! त्यांच्या या प्रमादासाठी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. बंगारू लक्ष्मण यांनी जे केले तेच केजरीवाल पार्टीच्या प्रमुख आणि मुखर नेत्या शाजीया इल्मी यांनी केले. बंगारु लक्ष्मण यांना शिक्षा झाली तेव्हा याच भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या नेत्यांना आनंद झाला होता. हीच मंडळी बंगारू लक्ष्मण सदृश्य प्रकरणात आपल्या उमेदवारांचे हिरीरीने समर्थन करीत आहेत. अनधिकृत पैशाच्या देण्या-घेण्याचा वाद बाजूला ठेवून या नव्या पक्षाने अधिकृतपणे जमविलेला पक्ष निधी काय दर्शवितो ? या पक्षाने केवळ दिल्लीच्या निवडणूक खर्चासाठी २० कोटी रुपयाचा निधी जमा केला आहे. इतर पक्षांकडे विशेषत: भाजप आणि कॉंग्रेस कडे जो पक्ष निधी जमा आहे त्याच्या तुलनेत ही २० कोटीची रक्कम अत्यल्प वाटते हे खरे. फक्त २० कोटी म्हणताना दोन मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. नव्या पक्षाची घोषणा करताना पक्षाचा निवडणूक निधीच असणार नाही असे सांगण्यात आले होते. दुसरा मुद्दा , कॉंग्रेस-भाजप कडे जो पक्षनिधी आहे तो राष्ट्रीय स्तरावर वापरण्यासाठी आहे आणि 'आप' ने जमविलेला २० कोटीचा निवडणूक निधी केवळ दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आहे . ७० जागांसाठी २० कोटी तर देशभरातील सर्व जागा लढवायच्या झाल्या तर किती निधी लागेल या त्रेराशीकाच्या उत्तराने कोणाचेही डोके चक्रावून जाईल ! ढोबळ मानाने याचा एवढाच अर्थ निघतो कि या पक्षाला सुद्धा कॉंग्रेस-भाजप सारखाच मोठा निधी जमवावा लागेल. २० कोटी जमविण्यात जी पारदर्शकता ठेवता येते ती हजार-दोन हजार कोटीचा निधी जमा करताना राहील का हा खरा प्रश्न आहे.या पक्षाला पारदर्शी पद्धतीने मोठा निधी उभा करता येईल असे मान्य केले तरी भारतीय राजकारणातील 'आप' च्या प्रवेशाने निवडणुकीतील भरमसाठ खर्चाचा प्रश्न सुटत नाही आणि हा प्रश्न सुटला नाही तर भ्रष्टाचारही कमी होणार नाही.
इमानदारी आणि जनलोकपाल हे दोन मुद्दे सोडले तर या पक्षाने भारतीय राजकारणाचा , अर्थकारणाचा आणि समाजकारणाचा खोलवर आणि वेगळा असा काही विचार केला आहे हे त्यांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातून दिसत नाही. या बद्दलची स्पष्टता नसेल तर केवळ इमानदारीच्या आधारावर राजकारणातील , अर्थकारणातील आव्हाने पेलता येत नाही. इमानदारी हा आपल्या ध्येया पर्यंत पोचविण्याचा राजमार्ग आहे . पण ध्येयच स्पष्ट नसतील तर राजमार्ग सुद्धा इप्सित स्थळी नेवू शकत नाही. निवडणुकीतील पैशाने जसे भारतीय राजकारण आणि लोकशाही संकटात सापडली आहे , तशीच सूट-सबसिडी आणि अर्थकारणाच्या नाड्या सरकारच्या हातात ठेवल्याने भ्रष्टाचार तर बोकाळलाच पण आर्थिक प्रगती देखील खुंटली आहे. 'आप' पक्षाचा जाहीरनामा अशा व्यवस्थागत भ्रष्टाचाराला प्रोत्साहन आणि गती देणारा आहे. लोकांना वीज किंवा पाणी फुकट नको आहे. वीज पुरवठा अखंड आणि पाणी पुरवठा पुरेसा हवा आहे. विजेचे आणि पाणी पुरवठ्याचे अर्थकारण बिघडले तर अखंड वीज पुरवठा आणि पुरेसा पाणीपुरवठा होवू शकत नाही. इमानदार पक्ष आहे याची लोकांना खात्री झाली तर ते सुद्धा इमानदारीने वीज आणि पाण्याचे पैसे भरतील. पक्षाच्या इमानदारीचा असा उपयोग करण्याचा प्रयत्न झाला तरच परिवर्तन येईल. पण 'आप'ला इमानदारी फक्त सत्ता परिवर्तनासाठी वापरायची आहे. व्यवस्था बदलण्यासाठी इमानदारी कशी वापरायची हे या पक्षाला उमगलेले नाही. त्यामुळे नवा पक्ष देशाला हवा असलेला नवा पर्याय देणारा नसून देशातील राजकीय पक्षाच्या संख्येत भर घालणारा पक्ष आहे. अण्णा आंदोलनाने जसा अपेक्षाभंग केला तसाच अपेक्षाभंग या आंदोलनातून जन्माला आलेला पक्षही करील असाच अंदाज 'आप'च्या आता पर्यंतच्या वाटचालीवरून बांधता येतो. अर्थात पाळण्यात दिसणाऱ्या बाळाच्या पायावरून केलेला हा अंदाज आहे !
(संपूर्ण)
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
No comments:
Post a Comment