Thursday, December 26, 2013

'आप' महात्म्य !




 २००२ साली मुस्लीम समुदाया विषयी घृणा दाखवून नरेंद्र मोदी जसे मोठे झाले तसेच समग्र राजकीय वर्गाविषयी घृणा निर्माण करून केजरीवाल मोठे होत आहेत. एखाद्या वर्गाविषयी कमालीची आणि मनापासून घृणा बाळगणारा व्यक्ती तळागाळाच्या लोकांना सोबत घेवून हिटलर बनू शकतो हे इतिहासाने दाखवून दिले आहे. हा इतिहास केजरीवाल यांनी खोटा ठरविला तरच ‘आप’च्या विजयाने नवा इतिहास घडला असे मानता येईल.                
----------------------------------------------------------


हा लेख वाचकांच्या हाती येईल तो पर्यंत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेल्या ‘आम आदमी पार्टी’चे सरकार दिल्ली राजधानी क्षेत्रात सत्तारूढ झालेले असेल . पाच राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर या पक्षाला दिल्लीत लाभलेल्या जनसमर्थना बाबत सर्वच माध्यमाचार्यांचे आणि राजकीय विश्लेषकांचे अंदाज सपशेल चुकल्यानंतर आपला अंदाज का चुकला याबाबत विचार करून तो लोकांसमोर मांडण्याचे धैर्य नसलेल्या माध्यमाचार्यानी आणि विचारवंतानी अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पार्टी’च्या विजयाला ‘अभूतपूर्व’ म्हणण्याची स्पर्धा लागली. एकदा विजयाला न’ भूतो न भविष्यती ‘ श्रेणीत बसविले की  अंदाज आणि विश्लेषण चुकल्याला समर्थन मिळते आणि इतिहासाच्या अज्ञानावर पांघरून घालता येते . दिल्लीच्या निवडणूक निकालानंतर आम आदमी पार्टी काहींच्या डोक्यात शिरली तर काहींच्या डोक्यावर मिरवू लागली ते अंदाज साफ चुकल्याने ! त्यामुळे विजयाचे कारण आणि परिणाम याचे सम्यक विश्लेषण समोर येत नाही. राजकीय विश्लेषक म्हणून या पार्टीच्या निवडणुकीतील कामगिरीचा माझाही अंदाज चुकला. कारण मोठ्या आंदोलनाच्या कुशीतून जन्मलेल्या पक्षाला एवढे कमी यश मिळाल्याचा इतिहास नाही ! अण्णा आंदोलनाचा शेवटच या पार्टीच्या स्थापनेने झाला होता. हा शेवट उत्साह वाढविण्या ऐवजी निराशाजनक ठरला होता. आंदोलनातून झालेली निराशा या पक्षाच्या यशाआड येईल असे वाटत होते. आंदोलनाने निराश केले तरी लोकांच्या मनात आजच्या राजकीय व्यवस्थे विषयी , पक्ष आणि राजकीय नेते यांच्या विषयी जी घृणेची आणि निराशेची भावना रुजविली होती ती काही प्रमाणात कायम होती. विद्यमान पक्ष आणि त्यांचे नेते चोर आहेत हाच अण्णा आंदोलनाचा नकारात्मक पण मध्यवर्ती संदेश होता . आंदोलन संपले तरी या संदेशाचा परिणाम अनेकांच्या मनात घर करून राहिला. याचाच मोठा फायदा केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला झाला. या आंदोलनाचे केंद्रच मुळी दिल्ली राहिली असल्याने तिथे ही भावना काहीसी जास्त असणे स्वाभाविक होते. आंदोलनाने सध्याच्या राजकीय संस्कृती विरोधात जी व्यापक सुरुंग पेरणी केली होती त्यातील अनेक सुरुंग आंदोलनाच्या निराशाजनक शेवटाने फुस्स झाले तरी सगळेच सुरुंग निकामी झाले नव्हते . आंदोलन संपले तरी तेव्हापासून निवडणुकीपर्यंत सुरुंग निकामी होणार नाही याची जी काळजी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली त्याचमुळे आम आदमी पार्टीला दिल्लीत मर्यादित यश लाभले. ज्या विजयाला सर्व माध्यमे अभूतपूर्व यश समजू लागले आहेत वस्तुत: ते यश मर्यादितच आहे.



या पूर्वीच्या काही चळवळीचे रुपांतर राजकीय पक्षात झाले किंवा चळवळीच्या गर्भातून राजकीय पक्षाचा उदय झाला तेव्हा त्यांना मिळालेले यश ‘आप’च्या तुलनेत कितीतरी मोठे होते. राजकारणाची किंवा राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलनाच्या तरुण आणि नवख्या नेत्यांनी यापूर्वी निवडणुकीच्या राजकारणात दैदिप्यमान यश मिळविले आहे. आसामातील ‘आसाम गण परिषद’ हा पक्ष आसामच्या विद्यार्थी आंदोलनाच्या गर्भातून जन्माला. अगदीच नवख्या तरुणांच्या या पक्षाने कॉंग्रेसला चारीमुंड्या चीत करून स्वबळावर आसामची सत्ता काबीज केली होती. त्यांची लढाई देखील भ्रष्टाचार आणि कुशासना विरुद्ध होती. राजकीय व्यवस्थेविषयी कोणताही नकारात्मक संदेश न पसरविता त्यावेळच्या व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या तरुणाचे यश केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळविलेल्या यशा पेक्षा सरस होते. आणीबाणी विरुद्धच्या लढाईतून जन्मलेल्या जनता पक्षाचे यश तर अभूतपूर्व होते. कॉंग्रेसला पहिल्यांदा केंद्रातील सत्ता सोडावी लागली ती जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाच्या कुशीतून निर्माण झालेल्या पक्षामुळे. व्यवस्थेच्या समग्र परिवर्तनासाठी झालेल्या या आंदोलनाचा मुख्य रोख अण्णा आंदोलना प्रमाणेच उच्चस्तरावरील राजकीय भ्रष्टाचारा विरुद्धच होता. जयप्रकाश आंदोलना पेक्षा अण्णा आंदोलन किती तरी मोठे होते. जयप्रकाश आंदोलनाचा जसा बिहार मध्ये जास्त प्रभाव होता तसाच अण्णा आंदोलनाचा दिल्लीत मोठा प्रभाव होता. या तुलनेत देशातील सर्वात मोठ्या दिल्ली केंद्रित आंदोलनाच्या कुशीतून निर्माण झालेल्या पक्षाला विधानसभेच्या ७० जागांपैकी २८ जागा मिळविणाऱ्या ‘आप’ पक्षाच्या यशाला फार मोठे यश किंवा अभूतपूर्व यश नक्कीच म्हणता येणार नाही. आजच्या सारखी प्रचार-प्रसाराच्या साधनांची सहज सुलभ उपलब्धता नसताना आणि आजच्या काही प्रसार साधनांचा जन्मही झाला नसताना  या पूर्वीच्या चळवळीच्या गर्भातून निघालेल्या पक्षांनी मिळविलेले  यश किती तरी मोठे होते हे मान्य करावे लागेल. या पक्षांचे पुढे काय झाले याची ‘आप’शी आत्ताच तुलना करता येणार नाही. कारण ‘आप’चे पुढे काय होणार हे बघायला आणखी काही काळ जावू द्यावा लागणार आहे.


 मर्यादित यश मिळूनही देशात जे ‘आप’ महात्म्य सुरु झाले आहे त्याचे प्रसार माध्यमे एक कारण असले तरी ते एकमेव किंवा महत्वाचे कारण नाही. पूर्वीच्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत एक महत्वाचा फरक पडला आहे. पूर्वी सर्वत्र कॉंग्रेसची सत्ता असल्याने लोकांचा सर्व राग कॉंग्रेसवर असायचा. पण नंतरच्या काळात जवळपास सर्वच पक्षांचा  राज्यात किंवा केंद्राच्या सत्तेत सहभाग राहिला आहे. पक्षांच्या सत्ताकेंद्रित आणि परिवार केंद्रित राजकारणाने जनतेशी असलेली नाळ जवळपास तुटली आहे. कॉंग्रेसने दीर्घकाळ सत्ता उपभोगली असल्याने सर्वाधिक दोष त्या पक्षात निर्माण झाल्याने हा पक्ष जनतेच्या मनातून पार उतरला आहे. इतर पक्षांकडून देखील लोक निराश झाले आहेत. या भावनेमुळे सर्व पक्ष आणि त्यांचे नेते चोर आणि नालायक आहेत ही भावना अण्णा आंदोलनाला लोकांच्या मनात खोलवर रुजविणे शक्य झाले .अण्णा आंदोलनाने राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात यश मिळविले त्याचा उपयोग नवा पर्याय लोकांसमोर ठेवण्यासाठी करता येतो आणि लोक त्याला प्रतिसाद देतात असा संकेत ‘आप’च्या मर्यादित यशाने दिला आहे. हा प्रयोग देश पातळीवर करण्यासाठी कॉंग्रेसने आदर्श परिस्थिती निर्माण करून ठेवल्यामुळे या नव्या पक्षाची त्याची कुवत आणि मर्यादा लक्षात न घेता अधिक चर्चा होत आहे. ‘आप’चे दिल्लीत प्रभावी अस्तित्व निर्माण होणे हे देखील आप महात्म्याचे महत्वाचे कारण आहे. आसाम मध्ये विद्यार्थी नेत्यांनी केलेला प्रयोग देशभर होवू शकतो हे कोणाच्या डोक्यातही आले नाही. पण दिल्लीत झालेला प्रयोग देशभर पसरविणे सहज शक्य आहे. देशाच्या राजधानीत असणे ही बाबच फायदा देवून जाते. ‘आप’ला तो फायदा मिळत आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आंदोलनात शक्ती आणि आशय याचा संगम असूनही त्याचा व्यापक प्रभाव पडला नाही . पण दिल्ली परिसरात असल्याने टिकैत यांचा सरकारवरील प्रभाव आणि परिणाम शरद जोशी पेक्षा कितीतरी अधिक होता हे लक्षात घेतले तर ‘आप’ला दिल्लीत असणे किती उपयोगी आणि प्रभावी ठरत आहे याचा अंदाज येईल. दुसऱ्या राज्यांच्या निवडणुकीत पडण्याचा मोह सोडून स्वत:ला दिल्लीत केंद्रित करण्याच्या रणनीतीसाठी केजरीवाल यांना श्रेय द्यावे लागेल . 


अर्थात देशाच्या राजकारणात यशस्वी होण्यासाठी एवढेच पुरेसे नाही. पण आप कडे खरी शक्ती आहे ती वाढत्या मध्यमवर्गीयांची. हा मध्यमवर्गीय मतदार एकतर त्याचा लोकशाही राजकीय व्यवस्थेवर विश्वास नसल्याने निवडणूक प्रक्रियेपासून दूर होता किंवा आजच्या राजकीय व्यवस्थेत  त्याला स्थान नसल्याने एकूणच लोकशाही व्यवस्थेबद्दल त्याला अनास्था होती. एवढेच नाही तर ‘अडाणी’ समाजाने निवडून दिलेले ‘अडाणी’ राज्यकर्ते आपल्यावर हुकुमत गाजवितात याची सल या वर्गाच्या मनात कायम राहात आली. बहुसंख्येत असलेल्या सर्वसामान्यांशी म्हणजेच त्यांच्या दृष्टीने अडाणी असलेल्या लोकांशी निवडून आलेल्या अडाणी लोकांचा संवाद आणि संपर्क कायम होता तो पर्यंत हा वर्ग राजकीय व्यवस्थेबद्दल मनातल्या मनात कुढत हात चोळीत बसण्या पलीकडे काही करू शकत नव्हता. देशातील राजकीय वर्गाला फटके मारले पाहिजेत , लोकशाही व्यवस्थेने जन्माला घातलेल्या नालायक राज्यकर्त्याची जागा हुकुमशहानी घेतल्याशिवाय आपले आणि देशाचे भले होणार नाही ही त्यांच्या मनातील भावना दोन कारणांनी बाहेर पडायला मदत झाली. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत हा वर्ग संख्येने लक्षणीय प्रमाणात वाढला. राजकीय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्या इतपत हा वर्ग साधन संपन्न आणि संख्या संपन्न बनला. दुसरीकडे राजकीय वर्गाचा आणि जनतेचा संवाद आणि संपर्क तुटण्याची आणीबाणीनंतर इंदिरा गांधीच्या पुनरागमना नंतर सुरु झालेली प्रक्रिया अर्धवट जागतिकीकरणाने वेगवान होवून पूर्णत्वाला गेली. जागतिकीकरणाने संपत्ती निर्मितीचा वेग आणि प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले , पण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत अभिप्रेत प्रशासनातील गुंतागुंत आणि अपारदर्शकता कमी करण्याची आणि सरकारच्या आर्थिक अधिकारावर कात्री लावणारी पाउले मात्र आम्ही उचलली नाहीत. त्यामुळे जनतेला आणि जनतेच्या समस्या वाऱ्यावर सोडून वाढत्या संपत्तीत वाढता वाटा आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा लागली. या स्पर्धेत राजकीय वर्ग मोक्याच्या जागी असल्याने पुढे असला तरी समाजातील इतर प्रभावी घटक मागे नव्हते. आजचा संपन्न व प्रभावी नवमध्यमवर्ग याच स्पर्धेचे अपत्य आहे. मोक्याच्या जागा बळकावून बसलेल्या राजकीय वर्गाचा जनाधार तुटल्यामुळे मध्यमवर्गीयांची साचलेली आजच्या लोकशाही राज्यव्यवस्थेबद्दलची सगळी खदखद बाहेर पडण्याच्या परिस्थितीने अण्णा आंदोलनाला जन्म दिला . मंडल आयोगाने जसा आता पर्यंत सत्तेपासून दूर असलेल्या आणि दूर ठेवलेल्या समाजातील दुबळ्या आणि वंचित घटकांना सत्तेच्या स्थाना पर्यंत पोचविले तसेच अण्णा आंदोलनाने आता पर्यंत सत्ते पासून दूर असलेल्या मध्यमवर्गासाठी सत्तेचा मार्ग प्रशस्त केला . एकप्रकारे मंडल  आयोगाला दिलेला यशस्वी शह असेही या आंदोलनाचे वर्णन करता येईल. अण्णा आंदोलनाने मध्यमवर्गीयांसाठी सत्तेचा मार्ग  प्रशस्त करताच त्या आंदोलनाचे औचित्य आणि उपयुक्तता संपली होती. मध्यमवर्गीयांसाठी नवे क्षितीज खुले झाल्याने ते आंदोलनापासून दूर झाले आणि आंदोलन संपले. गरज होती ती अण्णा आंदोलनाने निर्माण केलेल्या  मार्गावरून चालत जावून सत्तेजवळ  पोचण्याची. ही गरज हेरून केजरीवाल यांनी ‘आप’ची निर्मिती करून या मार्गावरून चालायला सुरुवात केली. केजरीवाल आणि त्यांचा पक्ष सत्ताकारणात नवा असल्याने तो इप्सित स्थळी कधी पोचेल आणि पोचेल की नाही या शंकेने ग्रासलेल्या व सत्ता मिळविण्यासाठी अधीर या नवसंपन्न वर्गाने नरेंद्र मोदींना आपली पसंती दिली. या वर्गाला भारतीय जनता पक्ष नको आहे ,पण मोदी का हवा याचे उत्तर या वर्गाच्या राज्यव्यवस्थे विषयक मानसिकतेत सापडते. भारतीय जनता पक्षाला आणि त्याच्या नेत्यांना गौण करून मोदींचा घोडा सुसाट का सुटला याचे उत्तर ही मानसिकता आहे. ही परिस्थिती हेरून केजरीवाल यांनी ‘आप’च्या सत्ता रथाचे कुशल सारथ्य करून हा रथ दिल्ली प्रदेशाच्या तख्ता पर्यंत पोचविला. भारतीय जनता पक्षाची साथ न घेता देखील अण्णा आंदोलनाने प्रशस्त केलेल्या मार्गावर चालून सत्ता मिळविता येते हे दाखवून देण्यात केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने यश मिळविल्याने नवी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कायेवरून दौडणारा मोदींचा घोडा केजरीवालच्या अनपेक्षित उदयाने गोंधळला आहे. ज्यांना धर्मवादी किंवा परधर्मीयांच्या द्वेषावर आधारित राजकारण पसंत नाही पण पर्याय नसल्याने मोदींच्या मागे गेले होते त्यांना केजरीवालच्या रुपाने नवा पर्याय मिळाला आहे. केजरीवाल आणि ‘आप’ पक्षाच्या मर्यादित विजयाची अमर्यादित चर्चा सुरु आहे ती यामुळेच .
.

‘आप’च्या उदयाने आणि विजयाने नवे जरूर घडले आहे. भारतीय लोकशाही लोकाभिमुख होण्याची आशा अनेकांच्या मनात पल्लवीत झाल्याने ते या विजयाने उत्तेजित झाले आहेत. लोकात जावून लोकांशी संवाद आणि संपर्क स्थापन करून राजकीय वर्गाचा लोकांशी तुटलेला संपर्क ‘आप’ने प्रस्थापित करून सत्ता मिळविली हे खरे आहे. पण एवढ्याने लोकशाही सुदृढ आणि लोकाभिमुख होण्याची प्रक्रिया सुरु झाली असे मानने उतावीळपणाचे नाही तर बालिशपणाचे आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचा उदय याच मार्गाने झाला होता हे विसरून चालणार नाही. अरविंद केजरीवाल यांनी अण्णा आंदोलनाच्या काळात संसदेची अवहेलना करून आपले जे रूप दाखविले ते बाळासाहेब ठाकरेच्या तोडीचेच होते. २००२ साली मुस्लीम समुदाया विषयी घृणा दाखवून नरेंद्र मोदी जसे मोठे झाले तसेच समग्र राजकीय वर्गाविषयी घृणा निर्माण करून केजरीवाल मोठे होत आहेत. एखाद्या वर्गाविषयी कमालीची आणि मनापासून घृणा बाळगणारा व्यक्ती तळागाळाच्या लोकांना सोबत घेवून हिटलर बनू शकतो हे इतिहासाने दाखवून दिले आहे. हा इतिहास केजरीवाल यांनी खोटा ठरविला तरच ‘आप’च्या विजयाने नवा इतिहास घडला असे मानता येईल.

                
                   (संपूर्ण)


सुधाकर जाधव ,पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८

1 comment:

  1. A really fresh and thought provoking article. What I liked most is the fresh and genuine analysis present in it. A relatively disturbing aspect is your jaundiced opinion about so called middle class in the society, aren't they just as humane as the other sections in the society? Personally I wish a day should dawn when the middle class people become politically strong,they would be more fearful for any misdeeds, more vulnerable to morality!

    ReplyDelete