Thursday, March 6, 2014

नैतिक अहंकाराचे बळी


निवडणुकी ऐवजी सर्वसंमती हवी असेल तर अल्पमतात असणाऱ्यांनी बहुमताचा आणि बहुमतात असलेल्यांनी अल्पमताचा आदर करणे गरजेचे असते. सर्वोदयाची शीर्षस्थ संस्था असलेल्या सर्व सेवा संघाच्या अधिवेशनात जमलेल्या प्रतिनीधीत दोन्ही बाजूने अशी आदराची भावना नव्हती. सर्वसंमतीने निर्णय घेण्याचे इंद्रधनुष्य पेलण्याची क्षमता नसताना तसा प्रयत्न झाल्याने फजिती झाली. गांधीजींच्या आश्रमात गोंधळ घालण्याचे अपश्रेय गांधीजनांच्या पदरी पडले.
--------------------------------------------------------------



विनोबा आणि जयप्रकाश नारायण यांचे नंतर सर्वोदय चळवळीत काय चाललय याची उत्सुकता सर्वसामान्यांना वाटावी अशी कर्तबगारी या चळवळीत कार्यरत कार्यकर्त्यांना दाखविता आली नाही. जयप्रकाश नारायण यांचे पाठोपाठ चळवळीतील दिग्गज नेते आणि कार्यकर्ते काळाच्या पडद्याआड गेल्याने या चळवळीची धुरा  स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या पिढीच्या खांद्यावर आली. पण नव्या दमाच्या नेतृत्वात ही चळवळ पुढे नेण्याचा दमखम नाही हे या चळवळीची शीर्षस्थ संस्था असलेल्या सर्व सेवा संघाच्या सेवाग्राम आश्रमात नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनावरून स्पष्ट झाले आहे. खरे तर असे अधिवेशन झाले याची दखलही घेतल्या गेली नसती , पण अधिवेशनात सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून प्रतिनीधीत झालेल्या हमरीतुमरीने हे अधिवेशन प्रकाशझोतात आले आणि सर्वोदय चळवळीच्या सद्यस्थितीवर देखील प्रकाश पडला.

इतर संस्था , संघटना किंवा पक्षात अंतर्गत निवडणुकीच्यावेळी जसे वातावरण असते त्यापेक्षा वेगळे किंवा वाईट असे सर्व सेवा संघ अध्यक्ष निवडीच्या वेळी घडले नाही. इतर ठिकाणी जे घडते ते सर्वोदयातही घडते हेच वैषम्याचे कारण आहे. विनोबा-जयप्रकाशजींच्या काळाने सर्व सामान्य जनतेच्या मनात सर्वोदय चळवळी बद्दल उत्तुंग अपेक्षा निर्माण केल्या होत्या. नंतरच्या पिढीकडून तशा अपेक्षा बाळगणे तसे अन्यायकारकच आहे. अर्थात असा अन्याय होण्यासाठी ज्यांच्याकडे या चळवळीचे नेतृत्व आले ते कमी जबाबदार नाहीत. स्वातंत्र्य चळवळीतील त्यागाची पार्श्वभूमी असलेल्या  प्रतिभावंत नेतृत्वाच्या काळात सर्व सेवा संघ जसा चालत होता तसाच पुढे चालविण्याचा प्रयत्न झाला. सर्व सेवा संघाचे नियम आणि घटनेने सर्व सेवा संघ चालत नव्हता तर या नेतृत्वाचा शब्द अंतिम असायचा. तेवढी उंची त्या नेतृत्वाची होती. तसेही कोणतीही चळवळ किंवा आंदोलन जोरात सुरु असताना त्या चळवळीच्या नेत्याचा शब्द अंतिमच असतो. पण चळवळ ओसरायला लागली कि भिन्न विचार डोके वर काढू लागतात. चळवळीचा प्रभाव कमी झाला किंवा देशापुढील समस्या आता या चळवळीतून सुटू शकणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा सर्वसंमती किंवा सर्वानुमतीला आदर्श मानणाऱ्या आचार्य विनोबा भावे आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्यात मतभेद झाले होते आणि दोघेही आपापल्या भूमिकेला चिकटून राहिले होते. ज्या आणीबाणी विरुद्ध जयप्रकाश लढले त्याला विनोबांनी अनुशासन पर्व म्हंटले होते. इतर चळवळीत जसे मतभेद होतात तसेच आणि टोकाचे मतभेद सर्वोदय चळवळीत होवू शकतात हे या प्रसंगाने दाखवून दिले. या दोघातील मतभेदाने त्यांच्यात मनमुटाव झाला नसला तरी त्यांच्या अनुयायात तो झालाच होता. विनोबा-जयप्रकाशांच्या काळात ज्या पद्धतीने सर्वोदय संघटना चालली ती तशी पुढे चालू शकत नाही हे या घटनेने दाखवून दिले होते. विनोबा-जयप्रकाश यांच्या उंचीचे कोणतेच पद नसल्याने त्यांच्यात पदावरून संघर्ष होण्याचा प्रश्न नव्हता. पण पुढच्या काळात नियम आणि पदाला महत्व मिळणार याचे संकेत त्या काळातील घडामोडीने दिले होते. हे संकेत ओळखून आणि स्विकारून त्या पद्धतीने सर्वोदय संघटन चालविण्याचा प्रयत्न झाला असता तर गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात घडलेला अप्रिय प्रसंग घडलाच नसता. पण नियम आणि पदे हे खुज्या लोकांसाठी असतात आम्ही तर त्याच्यावर उठलेलो त्यागी जन आहोत हा अहंगंड अप्रिय घटनेला जन्म देवून गेला. पदावर बसण्याची इच्छा स्वाभाविक आहे आणि अनेकजण रिंगणात असतील तर निवडणुका घेवून निवड करण्यात काहीही गैर नाही किंवा नैतिक घसरण नाही हे मानले असते आणि सरळ मतदान घेतले असते तर हमरीतुमरीला वाव मिळाला नसता. निवडणूक म्हणजे नैतिक अध:पतन या मान्यतेनेच सर्व सेवा संघाचे अध:पतन जनते समोर आले. निवडणुकी ऐवजी सर्वसंमती हवी असेल तर अल्पमतात असणाऱ्यांनी बहुमताचा आणि बहुमतात असलेल्यांनी अल्पमताचा आदर करणे गरजेचे असते. पण तेथे जमलेल्या प्रतिनीधीत दोन्ही बाजूने अशी आदराची भावना नव्हती. सर्वसंमतीने निर्णय घेण्याचे इंद्रधनुष्य पेलण्याची क्षमता नसताना तसा प्रयत्न झाल्याने फजिती झाली. गांधीजींच्या आश्रमात गोंधळ घालण्याचे अपश्रेय गांधीजनांच्या पदरी पडले.

या घटनेचा खरा अर्थ वेगळाच आहे आणि तो समजून घेणे जास्त महत्वाचा आहे. संतजन असा लौकिक असलेल्या सर्वोदय जगात पदासाठी अशा लढाया होवू लागल्या याचे खरे कारण आहे कार्यकर्ता म्हणून करण्यासारखे काहीच समोर नाही ! भूदान मिळणे विनोबांच्या काळातच बंद झाले होते. ग्रामदानाची प्रगती देखील जयप्रकाश नारायण यांच्या काळातच खुंटली होती. तब्बल दोन तपानंतर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील लेखामेंढा हे गाव ग्रामदानी गाव बनले आणि त्याचे श्रेय देखील सर्वोदय संघटनेच्या बाहेरच्या कार्यकर्त्यांना अधिक आहे. यावरून सर्वोदय चळवळीची गत, गती आणि प्रगती लक्षात येते. समाज परिवर्तनाच्या दृष्टीने भूदान-ग्रामदान यांच्या मर्यादा लक्षात आल्याने जयप्रकाशजींनी संपूर्ण क्रांतीची कल्पना समोर मांडून सर्वोदय चळवळीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. या दिशेने देखील सर्वोदय चळवळ पुढे गेली नाही. जयप्रकाश नारायण यांच्या नंतर तर या चळवळीला पुढे कसे न्यायचे , कोणता कार्यक्रम द्यायचा याचा विचार करणेच बंद झाले. त्यामुळे सर्वोदय चळवळीला उर्जितावस्था देवू शकेल असा नेता नाही कि तसा कार्यक्रम नाही. बदलत्या परिस्थिती बरोबर बदलण्याची तयारी आणि क्षमता देखील राहिली नाही. गावा संबंधीचे सर्व निर्णय ग्रामसभेने घ्यावेत आणि  देशासंबंधीच्या निर्णयातही ग्रामसभेला विचारात घ्यावे अशी  गांधी, विनोबा आणि जयप्रकाशजींची ग्रामस्वराज्य संकल्पना होती. यासाठीचे त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले नाहीत. उशिरा का होईना सरकारने ग्रामसभेला अधिकार देणारी घटनादुरुस्ती मंजूर करून घेतली. याच ग्रामसभांच्या कामात आशय भरून त्या सक्रीय आणि निर्णय घेण्यासाठी सक्षम करण्याचे काम सर्वोदय चळवळीला करता आले असते. ग्रामसभा अशी सक्रीय आणि सक्षम करण्याच्या प्रयत्नात तर लेखामेंढा गाव ग्रामदानी गांव बनले होते. पण भूदान-ग्रामदान अशा चाकोरीत कार्यकर्ते अडकून राहिलेत आणि थांबलेत. त्यामुळे हाती उरली ती फक्त संघटनेची पदे आणि कालौघात निर्माण झालेली संपत्ती. विनोबा , जयप्रकाशजींच्या काळापासून सर्वोदय चळवळीला सामुहिक नेतृत्व देत आलेली ठाकूरदास बंग , नारायण देसाई , सिद्धराज ढडा, मनमोहन चौधरी , गंगाप्रसाद अग्रवाल ही मंडळी सक्रीय असे पर्यंत सर्व सेवा संघाच्या कार्याला आणि कार्यकर्त्यांना पैशाची चणचण फारसी जाणवली नाही. त्यांच्यानंतर मात्र संचित संपत्तीच्या आधारे पुढे जाण्याचे दिवस आलेत. या संपत्तीचा सत्कार्यासाठी उपयोग करायचा असला तरी त्यासाठी पद आवश्यक आहे. सर्व सेवा संघाला सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे पदाधिकारी नेमण्यापासून सरकारमान्य प्रांतीय भूदान समित्या नेमण्यासारखे अनेक अधिकार असल्याने सर्व सेवा संघाचे अध्यक्ष हे मानाचेच पद नसून मोठ्या अधिकाराचे पद आहे. सर्वोदया सारख्या चळवळीत पदासाठी एवढी लालसा का याचे उत्तर या परिस्थितीत आहे. हे लक्षात घेतले तर ४०० प्रतिनिधी पैकी ४५ जण सर्व सेवा संघाचा अध्यक्ष बनण्यासाठी मैदानात उतरले याचे नवल वाटणार नाही.

 ही परिस्थिती निर्माण होते ती चळवळीचे समाजासाठीचे योगदान संपल्यानंतर , चळवळीची उपयुक्तता आणि संदर्भ संपल्यानंतरही ती चालूच ठेवण्याच्या अट्टाहासा पायी. असे घडते ते कार्यकर्त्यांचे चळवळीत , चळवळीचे संयोजन करणाऱ्या संघटनेत हितसंबंध निर्माण होतात म्हणून. एक तर त्या चळवळीमुळे समाजात ओळख आणि स्थान निर्माण झालेले असते ते सोडायची तयारी नसते. ज्या चळवळीसाठी उमेदीचा काल दिला , ते सोडून  उतारवयात कुठे जायचे हा व्यावहारिक प्रश्नही असतोच. ही स्थिती चळवळीची आणि कार्यकर्त्याची वाताहत करणारी असते. अशी वाताहत होवू द्यायची नसेल तर चळवळीची वेळीच इतिश्री करण्याची क्षमता आणि दृष्टी असणारे नेतृत्व आणि कार्यकर्ते असावे लागतात. गांधी आणि विनोबांना चळवळीतून निर्माण होणाऱ्या हितसंबंधांची प्रखर जाणीव होती. त्याचमुळे गांधीजीनी स्वातंत्र्य मिळाल्या नंतर लगेच कॉंग्रेस संघटनेचे विसर्जन करण्याचा सल्ला दिला होता. विनोबांनी देखील वेळीच सर्व सेवा संघ विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. गांधीजींचा सल्ला मानला नाही त्यामुळे त्यागी कॉंग्रेसचे भोगी कॉंग्रेसमध्ये रुपांतर झाले. सर्व सेवा संघाचे विसर्जन करण्याचा विनोबांचा सल्ला सर्वोदयी कार्यकर्त्यांनी मनाला नाही त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत असेच सेवाग्राम मध्ये घडलेल्या घटनेकडे पाहून म्हणता येईल.

-------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------- 

No comments:

Post a Comment