Wednesday, March 26, 2014

संधीसाधुंच्या जत्रेने राजकीय स्वास्थ्याला धोका

माणूस हा चांगला किंवा वाईट नसतो . तो चांगला आणि वाईट असतो हे सत्य स्विकारले तर राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी चांगल्या माणसांची वाट पाहणे थांबेल आणि राजकीय व्यवस्था आणि पद्धत अधिकाधिक निर्दोष करीत जाण्याकडे आमची वाटचाल सुरु होईल.
-------------------------------------------------------

राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांच्या विषयी जनमानसात धुमसत असलेल्या असंतोषाचे उग्र आणि व्यापक दर्शन अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाने घडविले होते. लोकांच्या मनातील असंतोष लक्षात घेवून पक्षाच्या कार्यपद्धती बदलतील , राजकीय नेते आणि कार्यकर्ते लोकांच्या अपेक्षेनुसार बदलतील असे वाटावे इतका प्रभाव या आंदोलनाने पाडला होता. पण ते आंदोलन जसे अल्पकाळ टिकले तसेच त्याचा प्रभावही अल्पकाळ टिकला. लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाल्या नंतर राजकारणाचे जुनेच रंग उधळल्या जावू लागले आहेत आणि जुनेच खेळ नव्या जोमाने खेळल्या जावू लागले आहेत. पक्ष आणि जनता यांचा काहीही संबंध उरला नाही हे जसे अण्णा आंदोलनाने दाखवून दिले तसेच पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते यांचेही नाते अतिशय तकलादू आहे हे या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रकर्षाने समोर आले आहे. वर्षानुवर्षे एखाद्या पक्षात राहून पदाचे सुख अनुभवले ती मंडळीसुद्धा पदासाठी क्षणार्धात आपल्या पक्षाला ठेंगा दाखवून दुसऱ्या पक्षात सामील होत आहे. दर निवडणुकीत काही प्रमाणात या पक्षातून त्या पक्षात जाणारे दिसतातच , पण या निवडणुकीत 'आयाराम-गयाराम'चे उच्चांक प्रस्थापित होत आहेत. सकाळी एका पक्षाचा झेंडा खांद्यावर घेवून निघालेला नेता - कार्यकर्ता दुपारी दुसऱ्या पक्षाच्या तंबूत दाखल झालेला पाहायला मिळत आहे. त्या तंबूत वर्षानुवर्षे राहात असलेल्या कार्यकर्त्यांना -नेत्यांना डावलून अशा अगंतुकाचा जन्मोजन्मीचा संबंध असल्याच्या थाटात स्वागत होत आहे. ज्यांच्यात अंगावरचे कपडे बदलावे तसा पक्ष बदलण्याचा निर्लज्जपणा नाही ते आत राहून सुरुंग पेरणी करीत आहेत. पक्ष आणि राजकारण कोणत्याही निती-नियमांनी आणि विचाराने बांधल्या गेलेले नाही याचे विराट दर्शन या निवडणुकीतून होवू लागले आहे. देशातील पक्ष देशाचे सरकार आणि धोरण ठरवतात, मात्र पक्ष कसे चालले पाहिजेत याबाबतचे काहीच धोरण आणि दिशा नाही . यामुळे सर्वच पक्ष मनमानी पद्धतीने चालतात. याच मनमानीने सगळे पक्ष खिळखिळे केले आहेत. पक्षाचे कार्यकर्त्यावर आणि कार्यकर्त्याचे पक्षावर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे पक्षात अनागोंदी आहे. असे पक्ष सत्तेत आले कि देशात अनागोंदी निर्माण होते. आज सगळ्याच पक्षात अस्थिरता दिसत आहे . सर्वच पक्ष अस्थिर बनले तर देशात राजकीय अस्थिरता निर्माण होणे अपरिहार्य आहे. यावरून एक बाब लक्षात येते कि देशाचे भवितव्य पक्षांच्या  हाती आहे पक्ष जर एवढ्या महत्वाच्या भूमिकेत असतील तर ते निती-नियमांच्या आणि कायद्याच्या चौकटीत चालले पाहिजे. आज तसे होताना दिसत नाही. देशाची लोकशाही ज्या पक्षांवर अवलंबून आहे त्या पक्षातच लोकशाही नसण्याचा हा परिपाक आहे. अनियंत्रित पक्षांनी लोकशाहीला बाजारू बनविल्याने आज सर्वच पक्षात आणि पर्यायाने देशाच्या राजकारणात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

केंद्रातील सत्तेच्या दावेदारीत सर्वात पुढे असलेल्या भाजपवर नजर टाकली तर नेमका दोष काय आहे आणि तो दूर करण्यासाठी काय करावे लागेल याचा अंदाज येईल. जे भाजपत सुरु आहे ते कम्युनिस्ट पक्षाचा अपवाद वगळता सर्वच पक्षात तसेच सुरु आहे. केंद्रातील सत्तेत येवू पाहणाऱ्या भाजपात आज जो असंतोष पाहायला मिळत आहे त्याचे मुख्य कारण पक्षाची सगळी सूत्रे नरेंद्र मोदी यांच्या हाती जाण्याने निर्माण झाला आहे. नरेंद्र मोदींच्या हाती पक्षाची सूत्रे लोकशाही मार्गाने गेली नाहीत तर पक्षा बाहेरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हस्तक्षेपातून ती गेली आहेत. केंद्राच्या राजकारणात हे नवे नेतृत्व प्रस्थापीत व्हायचे असेल तर जुन्या नेतृत्वाचे आव्हान मोडीत काढणे गरजेचे आहे. आज भारतीय जनता पक्षात शह-काटशहाचे जे राजकारण सुरु आहे त्याचे हे प्रमुख कारण आहे. पण त्याच्याशी इथे आपल्याला देणेघेणे नाही. सर्वात जास्त शिस्तबद्ध समजल्या जाणारा भाजप पक्ष किती ढिसाळ आहे हे मोदी उद्याने सिद्ध केले आहे. कमी शिस्तीच्या पक्षाबद्दल तर न बोललेच बरे ! एखादा पक्ष एवढा सहज एका व्यक्तीच्या हाती जात असेल तर असा किंवा असे पक्ष देशाची लोकशाही सुरक्षित ठेवू शकतील काय हा खरा चिंतेचा विषय आहे. आज भाजपत अडवाणी आणि इतर ज्येष्ठ नेते नाराज आहेत. त्यांच्या नाराजीचे कारण पक्षांतर्गत लोकशाही नाही हे नाही आहे. ते आता पर्यंत पक्ष जसे आपल्या मुठीत ठेवून चालवीत होते त्यांच्या मुठीतून पक्ष निसटून मोदींच्या हाती गेला हे त्यांचे दु:ख आहे. कॉंग्रेस सोनिया-राहुलच्या मुठीत आहे , तर जनतेत अपेक्षा निर्माण करणारा 'आम आदमी' केजरीवाल यांच्या मुठीत आहे. मुळात पक्ष यांच्या किंवा त्यांच्या - कोणाच्याच- मुठीत असता कामा नये असा विचार मात्र कोणी करीत नाही. पक्ष मुठीत ठेवण्याची प्रवृत्ती वाढीस लागली कारण पक्षाच्या माध्यमातून मिळणाऱ्या केंद्राच्या किंवा राज्याच्या सत्तेला मुठीत ठेवता येते. पक्ष माफियांच्या हाती सत्ता हे लोकशाहीचे विडंबन आहे. पक्ष माफियांच्या हातून पक्षांची आणि लोकशाहीची मुक्तता करायची असेल तर पक्षाच्या लोकशाहीकरणाला प्राधान्य दिले गेले पाहिजे. सर्व पक्षासाठी उमेदवार निवडीच्या पद्धती कायद्याने सुनिश्चित करून दिल्या तर पक्ष माफिया निर्माण होण्याचा मार्ग बंद होईल राहुल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षात तसा प्रयोग सुरु केला आहे. मतदार संघातील पक्षाची कार्यकर्ते मतदान करून उमेदवार ठरविण्याच्या प्रयोगात पक्षश्रेष्ठी नामक माफियांच्या हातून पक्षाची सुटका करण्याची नक्कीच क्षमता आहे. राहुल गांधी यांनी हा प्रयोग बोटावर मोजण्या इतक्या मतदार संघात केल्याने त्यामुळे कॉंग्रेसचे चरित्र बदलणार नाही. मात्र सर्व पक्षासाठी सर्व उमेदवार याच पद्धतीने निवडण्याचे कायदेशीर बंधन आले तर पक्षश्रेष्ठींच्या मनमानीला आपोआप आळा बसेल. पक्षश्रेष्ठींची जी हुजुरी करण्याची किळसवाणी पद्धत बंद होईल. आज पक्षात घेतले आणि उमेदवारी दिली या संधिसाधुपणावर हा जालीम उपाय ठरणार आहे. आपली नेहमी एकच ओरड असते. चांगली माणसे राजकारणात येत नाही. पण राजकारण चांगले राहील अशा संस्थागत बदलांकडे आपण कायम दुर्लक्ष करीत आलो आहोत. अगदी स्वार्थी हेतूने कोणी राजकारणात आला तरी सहजासहजी त्याला स्वार्थ साधण्याची संधी मिळणार नाही अशीच आपली राजकीय संरचना असायला हवी. अशा संरचनेकडे आपण कधीच लक्ष दिले नाही. माणसांवर दोष देवून मोकळे होतो . माणूस हा चांगला किंवा वाईट नसतो . तो चांगला आणि वाईट असतो हे सत्य स्विकारले तर राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी चांगल्या माणसांची वाट पाहणे थांबेल आणि राजकीय व्यवस्था आणि पद्धत अधिकाधिक निर्दोष करीत जाण्याकडे आमची वाटचाल सुरु होईल.

अडवाणी किंवा जसवंतसिंह व्यक्ती म्हणून चांगलेच आहेत. मात्र एवढे वय झाले तरी त्यांना सत्तेचा मोह कसा सुटत नाही याचे अनेकांना कोडे पडते. निवडणुकांमध्ये इतक्या वेळा उमेदवारी दिली . इतकी सत्तेची पदे दिलीत आणि आता तिकीट नाकारले तर बंडखोरी कसे करू शकतात असा प्रश्न पडत असतो. त्याबद्दल त्यांना दुषणे दिली जातात. त्यांच्या वयातील अनेकांनी यापूर्वी सत्ता उपभोगली आहे. किंबहुना तरुणांच्या या देशात सत्तेवर वृद्धांचाच एकाधिकार राहात आला आहे. मग अडवाणी आणि जसवंतसिंह सारख्यांनी सत्तेत राहण्याचा आग्रह धरला तर त्यांचे काय चुकले? व्यक्तींना दोष देत बसण्यापेक्षा आपल्याला व्यवस्थाच अशी करता येणे शक्य आहे कि वृद्ध माणसाला सत्तेचा मोह झाला तरी त्याला सत्तेत राहताच येणार नाही.एकाला किती वेळा निवडणूक लढविता येईल हे सहज निश्चित करता येण्या सारखे.आहे. असे संस्थात्मक बदल न करता पक्षाच्या आणि नेत्यांच्या लहरीवर आणि मर्जीवर गोष्टी सोडल्या तर त्याची परिणती आजच्या सारख्या गोंधळात होणे अपरिहार्य आहे. पक्षाने ज्याला भरभरून दिले अशा जसवंतसिंह सारख्या ज्येष्ठ नेत्याने तिकीट दिले नाही म्हणून बंडखोरी करणे जितके चुकीचे आहे तितकेच जसवंतसिंह सारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्या आयारामला तिकीट देणे चुकीचे आहे. जसवंतसिंह यांचे बाबतीत तर पक्षाच्या निवडसमिती ऐवजी काही व्यक्तींनी परस्पर निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे. पक्षाचे निर्णय कार्यकर्त्यांवर बंधनकारक असले पाहिजे असे वाटत असेल तर पक्षाला सुद्धा निरंकुश पद्धतीने निर्णय घेता येणार नाही अशी व्यवस्था हवी. सर्व पक्षासाठी सारखे नियम करणे आणि त्या नियमातहत पक्षाचे संचलन झाले तरच अशी अप्रिय परिस्थिती टाळता येईल. फक्त 'चांगल्या' लोकांनी राजकारणात येवून परिस्थिती बदलणार नाही हे ध्यानात घेतले पाहिजे. याचे चांगले उदाहरण म्हणजे आम आदमी पार्टी ! स्वार्थी आणि सत्तालोलुप राजकारण्यांनी सारे राजकारण नासविले असा या पक्षाचा आरोप आहे. सत्तेसाठी नाही तर राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी राजकारणात उतरल्याचा पक्षाचा दावा आहे. खरोखरच 'चांगली' म्हणता येतील अशा माणसांचा या पक्षात भरणा आहे. आणि तरीही या पक्षात इतर पक्षाप्रमाणे तिकिटावरून असंतोष आणि हाणामारी होतेच आहे ना ? या पक्षातील माणसे तर इतर पक्षातील लोकांसारखी सत्तालोलुप नाहीत .तरीही इथे तेच घडतय ! दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना लगेच तिकीट देणे हा जितका उघड संधिसाधुपणा आहे तितकाच निवडणुका जाहीर झाल्यावर पक्षात प्रवेश करून तिकीट मिळविणे देखील संधीसाधुपनाचे आहे. राजकारणाच्या शुद्धीकरणाचा दावा करणाऱ्या 'आम आदमी पार्टी'त असा संधिसाधुपणा अनेकांनी केल्याचे पाहायला मिळते. या पक्षात अनेकांनी निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही मिनिटे आधी त्या पक्षाचे सदस्यत्व स्विकारले ! सुरुवातीपासून पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्यावर हा अन्यायच आहे आणि ऐनवेळेवर निवडणूक लढविण्यासाठी पक्षात येणाऱ्याला तिकीट देणे ही पक्षश्रेष्ठींची मनमानीच आहे. म्हणूनच नुसत्या चांगल्या माणसांच्या राजकारण प्रवेशाने राजकारण बदलणार नाही तर चांगल्या नियमांतहत पारदर्शी आणि लोकशाही पद्धतीने राजकारण केले तरच राजकारणाची मैली गंगा साफ होईल. निवडणूक सुधारणा अंमलात आणल्याशिवाय राजकीय परिस्थिती आणि राजकीय व्यवस्था बदलणार नाही .

---------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
---------------------------------------------------

No comments:

Post a Comment