Thursday, March 20, 2014

भान हरपलेली माध्यमे !

लोकांना एखाद्या बाजूने उभे करता येते. एखाद्या व्यक्तीला आभाळा इतके मोठे करता येते किंवा मोठ्या व्यक्तीला कस्पटासमान बनविता येते या शक्तीचा साक्षात्कार माध्यमांना अण्णा आंदोलनामुळे झाला.  या साक्षात्कारातून  माध्यमांचे पुढचे पडलेले पाउल म्हणजे  या देशाचा पंतप्रधान कोण असावा हे ठरविणे ! प्रसिद्धी माध्यमांचे सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचे वार्तांकन जेवढे आक्षेपार्ह आहे तेवढेच अण्णा आंदोलनाचे वार्तांकन आक्षेपार्ह होते याचा केजरीवाल यांना विसर पडला आहे.
------------------------------------------------------


अनेक व्यक्ती व विषय माध्यमामुळे चर्चेत येत असतात. व्यक्तीमुळे सरसकट सगळी माध्यमे चर्चेत येतात असे सहसा घडत नाही. 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल यांनी ती किमया साध्य केली. त्यांनी केलेल्या आरोपामुळे सगळीच माध्यमे आरोपीच्या पिंजऱ्यात उभी झाली आहेत. माध्यमे पक्षपाती आणि विकाऊ बनली आहेत या आरोपाने दुसऱ्यांची चिरफाड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माध्यमांचीच चिरफाड होवू लागली आहे. अरविंद केजरीवाल आज जे जाहीरपणे बोलत आहेत त्याची चर्चा दबक्या आवाजात समाजातच नाही तर प्रसार माध्यमातील लोकांमध्ये होतच होती. पण मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार या विचाराने चर्चेला कंठ फुटला नाही. अरविंद केजरीवाल यांनी या विषयाला वाचा फोडली आहे. स्वत:ला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवून घेणाऱ्या माध्यमांनी लोकशाहीचा मांडलेला बाजार चव्हाट्यावर मांडण्याचे धाडस दाखवितानाच राजकीय सोय म्हणून त्यात बोटचेपेपणा देखील केला आहे. माध्यमांच्या मालकांना दोषी धरत पत्रकार जगताला त्यांनी क्लीनचीट दिली आहे. मालक धुतल्या तांदुळा सारखे नाहीतच , पण त्यांच्या मतलबी धोरणामुळे माध्यमांची घसरण झाली असे म्हणणे पूर्ण खरे नाही. माध्यमांचा विकाऊपणा हे झाले समस्येचे एक अंग. या विकाऊपणात  देखील केवळ मालकच सामील असतात असे नाही , लेखणी आणि वाणी विकणारांची  माध्यमजगतात कमी नाही. विकाऊपणा पेक्षाही  माध्यमे पत्रकारितेचे मुलतत्व आणि समाजातील माध्यमांची भूमिका  विसरत चाललेत ही खरी मुलभूत समस्या आहे. विकाऊपणाचा जन्म देखील यातूनच झाला आहे. संपादक आणि पत्रकारांवर आपली भूमिका लादणारे किंवा विशिष्ठ भूमिका घ्यायला बाध्य करणारे जितके माध्यम मालक आहेत त्यापेक्षा कैकपटीने जास्त मालक पत्रकारांना पूर्ण स्वातंत्र्य देणारे आहेत. पण पूर्ण स्वातंत्र्य देणाऱ्या   मालकांच्या वृत्तवाहिन्या देखील तटस्थ आणि निष्पक्ष असत नाहीत हे आजचे विदारक वास्तव आहे. याचे ढळढळीत आणि जळजळीत उदाहरण आपल्या समोर आहे. महाराष्ट्रातील एका वृत्तवाहिनीचे मालक कोळसा घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप आहे आणि 'आप' पक्षाने त्यावर टीकाही केली आहे. पण संपादक उघडपणे 'आप'ची बाजू घेताना दिसतात. काहींची बाजू घेणे आणि काहीना विरोध करणे हा प्रकार या वृत्तवाहिनीत होतो असे नाही तर तो बहुतांश ठिकाणी होतो . यात केजरीवाल म्हणतात तसा देवघेवीचा संबंध असेल असे मानण्याचे कारण नाही. देवघेवीतून पक्षपात हा गुन्हा आहेच , पण बिगर देवघेवीतून चालणारा पक्षपात देखील तितकाच आक्षेपार्ह आहे याचे भान अनेकांना नाही . यावरून असे म्हणता येईल कि  मालकाकडून स्वातंत्र्य असणे ही तटस्थतेची हमी असू शकत नाही.  अनेक मालकांना तर त्यांच्या वृत्तपत्रात वा वृत्तवाहिन्यांवर काय बातम्या दिल्या जातात हे पाहायला आणि ऐकायला वेळच नसतो. तसा वेळ राहिला असता तर देश अनेक व्यासंगी आणि श्रेष्ठ पत्रकारांना मुकला असता ! आणीबाणीचा विरोध करणाऱ्यात आघाडीवर असलेल्या वृत्तपत्रसमूहात आणीबाणीचे समर्थन करणारा संपादक पाहायला मिळाला नसता ! माध्यम मालक म्हणून मिळणारे अनुषंगिक लाभच मोठे असल्याने त्यांचे नियतकालिक किंवा वृत्तवाहिनी चालू असणे एवढेच त्यांच्यासाठी महत्वाचे असते . असे लाभ मिळविण्यासाठी विकले जाण्याची गरज नसते. उलट माध्यमजगतात न विकल्या जाण्याचे जास्त फायदे असतात ! म्हणूनच माध्यमांच्या आजच्या घसरणीला माध्यम मालकांना जबाबदार धरणे वस्तुस्थितीला धरून नाही.

 
माध्यमजगतात ध्येयवादाची जागा व्यावसायिकतेने घेतली आहे. यात वाईट घडले असे मानण्याचे कारण नाही. व्यावसायिकतेमुळे माध्यमांचा विकास झाला , लोकजीवनाचा ती अभिन्न हिस्सा बनलीत हे विसरून चालणार नाही. व्यावसायिकतेला विकला जाणे म्हणणे चुकीचे  आहे. माध्यमांच्या घसरणीची कारणे व्यावसायिकतेत नसून भूमिका बदलात ती शोधावी लागतील. ध्येय्वादाकडून व्यावसायिकतेकडे वाटचाल होत असताना पत्रकारितेचे गुणसूत्र देखील बदलत गेले हे ध्यानात घ्यावे लागेल. पत्रकारितेच्या बदलत्या गुणसूत्राच्या सामर्थ्याचा परिपूर्ण साक्षात्कार पत्रकार जगताला आणि देशाला अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने रामलीला आंदोलनाने घडविला. रामलीला मैदानातील अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या वेळी प्रिंट मेडीयातील सन्माननीय अपवाद सोडले तर सर्वच माध्यमांनी अण्णा हजारे , अरविंद केजरीवाल  आणि त्यांच्या आंदोलनाची तळी उचलून धरली होती. तळी उचलून धरणे हा फारच सौम्य शब्द झाला. माध्यमांनी स्वत:ला या आंदोलनाच्या दावणीला बांधून घेतले होते. ज्यांना त्यावेळी माध्यमांची भूमिका आवडली त्यांच्या समाधानासाठी असे म्हणता येईल कि माध्यमांनी या आंदोलनात स्वत:ला झोकून दिले होते ! या आंदोलनाने आणि त्या आंदोलनात माध्यमांनी बजावलेल्या भूमिकेने माध्यमात आमूल परिवर्तन झाले. हे आंदोलन किंवा अरविंद केजरीवाल माध्यमांची उपज आहे हे म्हणणे निश्चितच अतिशयोक्तीपूर्ण आहे , पण किसन हजारेना महात्मा गांधीपेक्षाही मोठे बनवू शकण्याची माध्यमांची  क्षमता या आंदोलन काळातील पत्रकारितेने सिद्ध केली हे नाकारता येणार नाही. या आंदोलन काळातील पत्रकारितेने माध्यमजगताला नवा साक्षात्कार झाला . आंदोलन निर्माण करता आले नाही तरी एखाद्या आंदोलनासाठी लोकात उन्माद निर्माण करता येतो , लोकांना एखाद्या बाजूने उभे करता येते. एखाद्या व्यक्तीला आभाळा इतके मोठे करता येते किंवा मोठ्या व्यक्तीला कस्पटासमान बनविता येते. अशा भावनेने पछाडलेल्या माध्यमांचे पुढचे पाउल म्हणजे  या देशाचा पंतप्रधान कोण असावा हे ठरविण्याचे असेल तर त्यात आश्चर्य वाटण्या सारखे काहीच नाही.   माध्यमजगताला झालेल्या या नव्या साक्षात्काराने जुनी पत्रकारिताच नाही तर पत्रकारितेची मुल्ये  काळाआड गेली. सरळ जसे घडले तसे सांगण्या ऐवजी किंवा जसे बोलले गेले तेच सांगण्या ऐवजी संपादकाच्या मताच्या विरुद्ध जाणार नाही याची काळजी घेत प्रत्येक बातमी मल्लीनाथी करीतच दिली जाण्याचा नवा प्रघात सुरु झाला. कोण काय बोलले हे सांगण्या ऐवजी कोणाच्या बोलण्याचा काय अर्थ निघतो हे सांगण्यात आणि लिहिण्यात अक्कल खर्च करणाऱ्या पत्रकारितेचा उदय झाला.राजकारणी लोक एखादे वक्तव्य अंगलट आले कि आपण असे बोललो नाही असे म्हणत असतात हे खरे आहे , पण बहुतांश वेळा जे बोलले जाते तेच छापल्या किंवा बोलल्या जात नाही हेही तितकेच खरे आहे. संपादकीयात किंवा लेखात जे सांगायला पाहिजे ते बातम्यात सांगणारी नवी पत्रकारिता जन्माला आली आहे. तेव्हा केजरीवाल जे म्हणतात ते अगदी खरे आहे. आपण कोणाला बनवू किंवा बिघडू शकतो या केजरीवालांच्या लोकजनपाल आंदोलनाने निर्माण केलेल्या समजातून आलेली उद्दामता मोदीला पंतप्रधान बनविण्याच्या कामी लागली आहे. हे चुकीचे असले तरी केजरीवाल यांना माध्यमांना नावे ठेवण्याचा नैतिक अधिकार नाही. आंदोलनाच्या काळात केजरीवाल यांनी जसा माध्यमांचा उपयोग आणि वापर करून घेतला तसाच वापर मोदी पंतप्रधान बनण्यासाठी करून घेत आहेत. आंदोलनाच्या काळात माध्यमांनी पैसा घेतला नाही असे म्हणता येईल. पण एकतर्फी पत्रकारितेचे , उन्मादी पत्रकारितेचे नवे धडे या आंदोलनाने दिले. त्या पत्रकारितेला मिळालेल्या गौरवाची किंमत आता निवडणूक काळात लोकांना आणि लोकशाहीला चुकवावी लागत आहे. माध्यमांनी 'जनमत' तयार करण्यासाठी पत्रकारितेच्या नीतीमूल्यांना हरताळ फासणे किती घातक असू शकते हे निवडणूक काळातील माध्यमांच्या वर्तनावरून दिसते. पण पक्षपाती आणि एकतर्फी प्रचाराची हीच घातकता अण्णा-केजरीवाल आंदोलनातही दिसली होती. त्याचे स्वागत आणि कौतुक झाले नसते तर केजरीवाल यांचेवर माध्यमाच्या बाबतीत कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली नसती.

माध्यमकर्मीना व्यापक भूमिका साकार करण्याची इच्छा होणे यात वावगे काहीच नाही. माध्यमात राहून अशी व्यापक भूमिका निभवायची असेल तर त्यासाठी तटस्थता व नि:पक्षपातीपणा अंगी असावा  लागतो. तसा नसेल तर स्वार्थ साधण्यासाठी माध्यमांचा दुरुपयोग ठरतो, नव्हे तो माध्यमद्रोह ठरतो. अशा माध्यमद्रोह्यांची संख्या माध्यमजगतात वाढल्याने माध्यमांच्या घसरणीला गती मिळाली आहे.  माध्यमे लोकशाहीचा गेम करीत आहेत हा केजरीवाल यांचा आरोप टोकाचा वाटत असला तरी त्यात सकृतदर्शनी तथ्य दिसते. त्याचमुळे माध्यमांनी थोडे थांबून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. लोकांना एखाद्या व्यक्तीबद्दल अनुकूल किंवा प्रतिकूल बनविणे हे माध्यमांचे काम नाही. जे घडते , जसे घडते ते कोणाची व कशाचीही पर्वा न करता लोकांपुढे मांडणे हे माध्यमांचे काम असल्याचे धडे गिरविण्याची माध्यमजगताला स्वत:च्या विश्वासार्हतेसाठी आणि लोकशाहीच्या संवर्धनासाठी गरजेचे आहे. बातम्यांचे आणि घटनांचे विश्लेषण हे देखील माध्यमांचे काम आहे. मात्र या कामासाठी तटस्थता आणि चौफेर ज्ञान असणे महत्वाचे आहे. नेमका या बाबतीत माध्यमांमध्ये - विशेषत: वृत्तवाहिन्यांमध्ये आनंदी आनंद आहे.  दुसऱ्याला ज्ञानामृत पाजणारी माध्यमे अज्ञानाच्या अंध:कारात बुडालेली आहेत हे अनेक प्रसंगी दिसले आहेत. दिवसरात्र माध्यमे ज्या स्पेक्ट्रम घोटाळ्याची चर्चा करीत होती त्या माध्यमांना स्पेक्ट्रम प्रकरण  कळलेले नाही. त्यामुळे माध्यमे आजही स्पेक्ट्रम प्रकरणाचा उल्लेख १.७६ लाख कोटीचा घोटाळा असाच करतात. ज्या नैसर्गिक वायूच्या भाववाढीचे प्रकरण अरविंद केजरीवाल यांनी लावून धरले आहे त्यातले सत्य सुद्धा माध्यमांना जनतेपुढे मांडता आले नाही. या प्रकरणात तद्न्य समितीने शिफारस केलेला भाव सरकारने मान्य केला आणि हा भाव आज आपण बहुमोल परकीय चलन खर्च करून नैसर्गिक वायूची ज्या भावाने आयात करतो त्याच्या निम्मा आहे .कोणताही अभ्यास न करता आरोपांची पोपटपंची करणे हेच माध्यमांचे काम बनले आहे. इतिहासाचे अज्ञान, वर्तमानाचे अपुरे आणि पूर्वग्रहदुषित ज्ञान यामुळे माध्यमे उथळ आणि पक्षपाती बनत चालली आहे. यामुळे माध्यमांचेच नाही तर लोकशाहीचे भवितव्य पणाला लागले आहे. लोकांना प्रकाश दाखविण्याचा अहंकार बाळणाऱ्या माध्यमांनाच प्रकाशाची खरी गरज आहे.

--------------------------------------
 सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि.यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------

2 comments:

  1. श्री.सुधाकर जाधव,
    आपला लेख वाचला.माध्यमावर पक्षपातीपणापासून माध्यमांच्या अज्ञानापर्यत अऩेक गोष्टींचा आपण लेखात उल्लेख केलात.आज समाजात जे घडतंय त्याला केवळ माद्यमंच जबाबदार आहेत असा गृह आपला लेख वाचून होऊ शकतो.हा माध्यमांबद्दलचा पक्षपात नाही काय माध्यमं काही चांगलं काम करीत नाही असा समज करून देणे हा माध्यमांवरचा अन्याय आहे.अरविंद केजरीवाल काल प्रकाशात आले असतील पण लोकशाही टिकविण्याचे ती अधिक बळकट करण्याचं का म आणीबाणीत असू दे किंवा नंतर माध्यमांनीच केले आहे.माध्यमांबद्दल ज्यांना काविळ आहे अशी मंडळी हे मान्य करणार नाही पण जे तटस्थपणे विचार करतात ते हे वास्तव आवर्जुन मान्य करतील.
    जाधवजी,संपादकांचे स्वातंत्र्य हा विषय आता कालबाह्य झालाय हे मी 28 वर्षे पत्रकारितेत काम केल्यानंतर सांगू शकतो.मी 23 वर्षे संपादक म्हणून काम केले आहे .त्यामुळे वाहिनीत आणि दैनिकात संपादकांना कााय किंमत असते ते मला माहित आहे.संपादकांपेक्षा मॅनेजर सर्वत्र शक्तीशाली झालेत,त्याचं कारण ते धंदा आणतात हे आहे.त्यामुळं मालकाचे काही हितसंबंध नाहीत हे मान्य नाही.काही तरी हितसंबंध असतात म्हणून तर ते कोटयवधींचा तोटा सहन करून माध्यमं चालवत असतात.
    अर्थात आपण म्हणता तसे आमच्यातले सारेच धुतल्या तांदळासारखे नाहीत.काही गोष्टी जरूर आहेत की,त्याचा माध्यमात काम करणाऱ्यांनी विचार केला पाहिजे.पण हे जे चार दोन टक्के बिघडलेले आहे ते कोणत्या व्यवसायात नाही.इतरांकडे बोट दाखवून जे चुकीचे चालले आहे त्याचं मी समर्थन करीत नाही पण शुध्दीकरण करायचेच तर ते खालपासून वरपर्यत व्हावं लागेल.एक वर्ग,एक व्यवसाय शुध्द करून किंवा तशी अपेक्षा क रून समाजाचे शुद्दीकरण होणार नाही.
    शेवटचा मुद्दा.माध्यमांबद्दल जी मंडळी वाईट बोलते , त्यातील बहुतांश मंडळी कधी ना कधी माध्यमांकडून दुखावलेली असते.म्हणजे बातमी विरोधात आली किंवा आपणास हवी ती बातमी दिली नाही की,माध्यमांना शिव्या दिल्या जातात.माध्यमं देश बुडवायला निधालेत असे आरोप केले जातात.अऱविंद केजरीवाल याचं रामलिला आंदोलनं सुरू होतं तेव्हा त्या आंदोलनास अवास्तव प्रसिध्दी दिली जात होती तेव्हा केजरीवाल देशातील माध्यमांचं तोंड भरून कौतूक करीत होते.मात्र नंतर त्यांच्या वागण्या बोलण्यातील दुटप्पीपणा,त्यांच्या सहकाऱ्यांचे उद्योग हे माध्यमांवर दिसायला लागले की,माध्यमं लोकशाही बुडवायला निघाले आहेत याचा साक्षात्कार त्यांना झाला..पैसे घेऊन माध्यमं बातम्या देतात असा आरोप करणाऱ्या केजरीवाल यांनी रामलिला आंदोलनाच्या वेळेस दिवसरात्र आंदोलनाचं दळण दळणाऱ्या माध्यमांना किती पैसे दिले होते हे सांगावे.समाजात सारेच विकावू नसतात हे केजरीवाल यांनी लक्षात ठेवावे.
    जाधवजी,मी 30 वर्षे पत्रकारितेत घालविल्यामुळे या व्यवसायात नेमंकं काय चाललंय ,पत्रकारांची अवस्था कशी आहे हे मी पाहिलं आहे आणि अनुभवलंही आहे.आपण आय़बीएन -लोकमतच्या संपादकांच्या स्वातंत्र्याचं उदाहऱण दिलंत,ते स्वातंत्र्य दिखावू आहे.मी ज्या दैनिकात 18 वर्षे संपादक म्हणून काम केलं तेथील नोकरी मला तीन मिनिटात सोडावी लागली कारण मालकाचे मित्र असलेल्या एका दादा नेत्याच्या विरोधात मी बोललो होतो.ते ही बाहेर.म्हणून.मला नोकरी सोडावी लागली.त्यामुळं स्वातंत्र्य वगैरे छुट आहे.मालकाचे हितसंबंध धोक्यात आलं की,स्वातंत्र्य संपते हे विसरू नये. हे सारे अनुभव घेतल्यानंतरच मी पत्रकाराचे संघटन करून पत्रकारांच्या प्रश्नासाठी आंवाज उठवत आहे.हे करताना जे सच्चे पत्रकार असतात त्याचीच मी बाजू घेतो.असे सच्चे ,हाडाचे आणि ध्येयवादी पत्रकार शिल्लकच नाहीत असे जर आपणास वाटत असेल तरी पत्रकारांनी आत्मपरिक्षण करावे म्हणाणाऱ्यांनाही मी सल्ला देईल की त्यांनीही आत्मपरिक्षण केले पाहिजे.,पत्रकारांकडे पाहताना घातला जाणारा पिवळा चष्मा काढून टाकला पाहिजे.कृपया एकतर्फी भूमिका घेऊन पत्रकारांना ठोकून काढू नये.पत्रकारांचा आवाज जर बंद झाला तर जाधवजी आपण कल्पना रकू शकणार नाही की या देशाचं काय होईल ते.़पत्रकारांवर टीकेचे मोहोळ उठविणाऱ्य ा अनेक पुढाऱ्याची हीच अपेक्षा आहे.आणीबाणीत काय घडलं हे आपणास स्मरत असेलच
    ताक.
    आज केजरीवाल माध्यमांना शिव्या घालतात,गुजरात ंदगलीच्या वेळेस माध्यमं मोदी आणि भाजपच्या विरोधात आग ओकत होते तेव्हा हेच मोदी माध्यमांवर पक्षपातीपणाचा आरोप करीत होते.माध्यमांबद्दलची भूमिका सोयीनुसार आणि स्वार्थापोटी बललली जाते.एवढेच.

    ReplyDelete