Thursday, July 17, 2014

रा.स्व.संघ बदलला आहे !

अमित शाह यांचेवर  सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यापूर्वी त्यांना सर्व प्रकरणातून निर्दोष सुटू देण्याची वाट पाहिली असती तर रा.स्व.संघ उच्च नैतिक परंपरेचे पालन करतो हे सिद्ध झाले असते. या नियुक्तीमुळे संघाला सार्वजनिक जीवनात उच्च नैतिक मुल्ये आणि आदर्शाशी काही देणे घेणे नाही असा संदेश गेला आहे.
----------------------------------------------------

नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील विजयाला तांत्रिक दृष्टीने भारतीय जनता पक्षाचा विजय म्हंटला जात असला तरी प्रत्यक्षात तो मोदी विजयच समाजाला आणि मानला जातो. या विजयामागची सारी आखणी , रणनीति आणि मेहनत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची होती हे ही लपून राहिले नाही. आणिबाणी नंतरच्या १९७७च्या सार्वत्रिक निवडणुकीत तुरुंगा बाहेर असलेल्या संघ स्वयंसेवकांनी हिरीरीने भाग घेतल्याचे यापूर्वीचे उदाहरण आहे. त्यावेळी सुद्धा संघाने संघटना म्हणून उघडपणे भाग घेतला नव्हता. यावेळी मात्र संघाने प्रथा , संकेत आणि संघाची घटना बाजूला ठेवून उघडपणे या निवडणुकीत भाग घेतला. पंतप्रधान पदाच्या उमेद्वारापासून ते वेळोवेळी उद्भवणारे वाद संघाच्या प्रत्यक्ष आणि जाहीर हस्तक्षेपाने सुटले. निवडणुकीतील बूथ आणि प्रचार नियोजन संघाचे होते. असे असले तरी प्रचारा दरम्यान आणि विजयानंतर सरकार आणि पक्ष याचे जे स्वरूप पुढे आले आहे त्यात संघ-भाजपच्या आजवरच्या मान्यतांचे धिंडवडे निघाल्याचे पाहायला मिळते.
 
आजपर्यंत संघाचा असा दावा राहिला आहे कि समाजात करण्यात येत असलेले भेदभाव त्याला मान्य नाहीत. अमुक दलित , तमुक मुसलमान , मागासवर्गीय असे जे भेद केले जातात त्याला संघाने कधीच खतपाणी घातले नाही. जातीच्या आणि धर्माच्या भेदभावाच्या पलीकडे जावून संघाने सर्वाना समान मानले आहे. बौद्ध, जैन शीख हेच नव्हे तर मुस्लीम धर्मियांना देखील संघ हिंदू या सांस्कृतिक संबोधनाने ओळखतो असे सांगितले जायचे. प्रचाराची सूत्रे संघाच्या लोकांच्या हाती असताना  निवडणूक प्रचार काळात नेमके संघ धारणेच्या उलट चित्र दिसले. आत्ताचे पंतप्रधान मोदी यांनी तीनदा गुजरात विधानसभा निवडणूक लढवून विजय प्राप्त केला . या १०-१२ वर्षाच्या प्रदीर्घ काळात मोदी कोणत्या जातीचे आहेत हे कळले नव्हते. ते उच्चवर्गीय आहेत कि मागासवर्गीय आहेत हे सुद्धा माहित नव्हते. सर्वप्रथम देशाला मोदी हे मागासवर्गीय आहेत आणि त्यांची जात तेली आहे हे नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत देशाला कळले ते संघाच्या ताब्यात असलेल्या भाजपच्या प्रचार यंत्रणेकडून ! मोदी हे मागासवर्गीय आणि मागासजातीचे आहेत हा संदेश सर्वसाधारण मतदारा पर्यंत पोचविण्यासाठी या निवडणुकीत संघ स्वयंसेवक राब राब राबलेत. मागासवर्गीय , उच्चवर्गीय असा भेद केल्याने समाजाची एकता भंगते म्हणत याच संघपरिवाराने मंडल आयोगाला तीव्र विरोध केला होता. या निवडणुकीत मात्र संघाने आजवरच्या आपल्या घोषित मान्यताना या निवडणुकीत खुंटीवर टांगून ठेवले आणि राजकिय विजयासाठी समाजातील भेदाभेदाचा घोषित जातीयवाद्यांना देखील आजवर जमला नाही असा यशस्वी वापर केला. युद्धात आणि प्रेमात सगळे क्षम्य असते असे मानायचे असेल तर निवडणूक आटोपल्या नंतर खुंटीला टांगून ठेवलेल्या आपल्या मान्यता गळ्यात घालून घ्यायला हव्या होत्या. नाही तरी आपल्या समाजात याला मान्यता असतेच.. पंढरीची वारी करून आलेल्या माळकरी कडून मांसाहार करू नये या सारख्या काही गोष्टी अपेक्षित असतात. याचे पालन जमत नसेल तर  माळकरी माळ खुंटीला टांगतो आणि नको ते कार्य आटोपले कि पुन्हा माळ गळ्यात घालून घेतो हे काही आपल्यासाठी नवीन नाही !  संघाने निवडणूक आटोपल्या नंतर देखील निवडणूक काळात खुंटीवर टांगून ठेवलेल्या मान्यता  परत गळ्यात घातल्या नाहीत याचे संकेत मिळत आहेत. जातीपातीच्या गणिताचा चांगला वापर  करून मोदी विजयाचे इंद्रधनुष्य ज्यांनी पेलले त्या अमित शहाना भाजप अध्यक्ष पद बहाल करून रा.स्व. संघाने हे संकेत दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात जवळचे सहकारी असलेले अमित शाह यांच्यावर अनेक आरोप असून सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. सर्वसामन्याच्या भाषेत सांगायचे तर भाजप अध्यक्ष अमित शाह यांना गुजरात मधून तडीपार केले गेले होते. कोणत्याही प्रकरणात त्यांचेवर आरोप सिद्ध होवून त्यांना शिक्षा झालेली नाही हे खरे. पण त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यापूर्वी त्यांना सर्व प्रकरणातून निर्दोष सुटू देण्याची वाट पाहिली असती तर संघ उच्च नैतिक परंपरेचे पालन करतो हे सिद्ध झाले असते. या नियुक्तीमुळे संघाला सार्वजनिक जीवनात उच्च नैतिक मुल्ये आणि आदर्शाशी काही देणे घेणे नाही असा संदेश गेला आहे. संघाने यापूर्वी नितीन गडकरी यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा उच्च नैतिक मूल्यांचे पालन करण्याच्या नावावर त्यांना अध्यक्षपदावरून पायउतार केले गेले. आरोप तर त्यांच्यावरचेही सिद्ध झाले नव्हते. एवढेच नाही तर कोणत्याही कोर्टात गडकरी यांचेवर खटला देखील दाखल झाला नव्हता. मग संघाकडून गडकरींना एक न्याय आणि अमित शाह यांना दुसरा न्याय हे कसे असा प्रश्न उभा राहतो आणि इतर पक्ष , संस्था आणि संघटना यांचे प्रमाणे संघाचे पाय देखील मातीचे आहेत असा अर्थ निघतो.

आजतागायत संघासाठी आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या भाजप साठी व्यक्ती कधीच महत्वाची नव्हती. व्यक्ती महात्म्यापेक्षा संघटना महात्म्य संघ भाजपला प्रिय होते. कॉंग्रेस सत्तेत असताना सत्तेची सारी सूत्रे एकाच घरातील एकाच व्यक्तीच्या हातात असण्यावर संघ-भाजपने अगदी काल पर्यंत सतत प्रखर टीका केली. ही एकाधिकारशाही संपविण्याच्या नावावर संघ-भाजप प्रत्येक निवडणुकीत मतांचा जोगवा मागत आले . या निवडणुकीत त्यांना यश देखील मिळाले. संघ आणि स्वत: भाजप नेते ज्या सामुहिक नेतृत्वाचा आत्मगौरव करीत आले ते सामुहिक नेतृत्व सत्ता हाती येताच गुंडाळून ठेवले गेले. इंदिरा गांधीच्या उदयानंतर कॉंग्रेस मध्ये एक हाती सत्ता ठेवण्याचे जे मॉडेल तयार झाले होते त्याच मॉडेलचा संघ-भाजपने स्विकार करून सर्वसत्ता एकहाती केंद्रित केली. आजपर्यंत एकहाती सत्ता मिळवून देणारा नेता भाजपकडे नव्हता आणि त्यामुळे कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणतात तसे एकहाती सत्तेचा संघ-भाजपने विरोध केला. मात्र नरेंद्र मोदी सारखा एकहाती सत्ता मिळवून देणारा नेता मिळताच सामुहिक नेतृत्व वगैरे सारे विसरले गेले. व्यक्तीपेक्षा संघटन श्रेष्ठ असते हे आतल्याआत गिळल्या गेले. इंदिरा गांधी , सोनिया गांधी यांच्या काळात जसे सारेकाही गांधी होते तसे आता सारेकाही नरेंद्र मोदी बनले आहेत. हाती आलेली सत्ता टिकविण्यासाठी संघ-भाजपने इतके वर्ष उराशी बाळगलेल्या तत्वाला मुरड घातली आहे.. एफ डी आय संदर्भात संघ-भाजपने जी भूमिका घेतली आहे त्यावरून त्यांची स्वदेशी निष्ठा देखील पातळ झाल्याचे दिसून येते. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचा नव्या भाजप सरकारकडे एकच रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होणे ! नव्या सरकारच्या या भूमिकेला रा.स्व.संघाने पूर्ण पाठींबा दिला आहे. परदेशी पैसा घेवून काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था संदर्भात आय बी ने नव्या सरकारला जो अहवाल दिला त्या संदर्भात जे वादंग निर्माण झाले आणि कोणाकोणाला परकीय मदत मिळते त्या संस्थाची जी नावे समोर आलीत त्यात संघ परिवारातील अनेक संस्थांचा समावेश आहे. गुरु दक्षिणेतून संघ संस्थांची सेवा किंवा शैक्षणिक कार्य चालत नसून भरीव परकीय मदतीवर बरेच कार्य चालते ही माहिती समोर आली. अनेक संघ संस्थांचे कार्यच परकीय पैशावर चालत असेल तर संघाचा स्वदेशी पुरस्कार पोकळ आहे असा त्याचा अर्थ होतो आणि एफ डी आय संदर्भातील संघाची भूमिका स्वदेशीची प्रतारणा करणारी का आहे याचा उलगडा होतो. संघाने मूळ धोरणापासून फारकत घेतली आहे असा याचा अर्थ काढता येतो. धोरणापासूनच नाही तर संघाच्या घटने पासून देखील संघाने फारकत घेतली असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे.
 
रा.स्व.संघाने तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निर्देशावरून संघाची घटना तयार केली आणि १ ऑगस्ट १९४९ रोजी स्वीकारली. रा.स्व. संघाच्या घटनेतील कलम ४ हे धोरणा संबंधी असून त्यातील कलम ४ - क प्रमाणे स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवले असून संघाने फक्त सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला वाहून घेतल्याची संघाची घटना सांगते आणि आजवर संघ नेतृत्व हाच दावा करीत आले आहे. पण या निवडणुकीत संघाने संघटन म्हणून या निवडणुकीत उघडपणे राजकीय भूमिका घेतली आणि निवडणुकीत संघाची भूमिका निर्णायक ठरली हे अमान्य करता येणार नाही. आज पर्यंत संघ भाजपला संघटन मंत्री पुरवत आला आणि स्वयंसेवक नागरिक या नात्याने निवडणुकीत आणि राजकारणात सहभागी होत आलेत. या निवडणुकीत मात्र पूर्वी पाळलेल्या सर्व मर्यादांचे उल्लंघन करून संघाने राजकारणात आणि निवडणुकीत विशेष भूमिका बजावली आहे. संघ आपल्या मूळ तत्वप्रणाली पासून दूर जात असल्याचा हा पुरावा आहे.बदलत्या परिस्थितीत संघाला बदलावे लागले असेल किंवा बदलावे वाटले असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. बदल हा सृष्टीचा नियम आहे. मात्र झालेला बदल आणि त्या बदला मागची कारणे संघाने समाजा समोर ठेवली पाहिजे. समाजाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे आणि सांगणे संघाचे कर्तव्य. संघ काही बोलत नसेल तर 'सत्तेसाठी सारेकाही' याला संघही अपवाद नाही असाच त्याचा अर्थ होईल !

----------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा ,जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
----------------------------------------

No comments:

Post a Comment