Thursday, August 7, 2014

विद्यार्थ्यांसाठी लाजीरवाणे !

१८ वर्षावरील तरुणांना मतदानाचा अधिकार देण्याची प्रक्रिया एकीकडे पूर्णत्वास गेली असताना दुसरीकडे महाविद्यालये आणि विद्यापीठ यात निवडणूक लढविण्याचा विद्यार्थ्यांचा अधिकार हिरावला गेला. परिणामी १८ वर्षावरील तरुण - तरुणींना मतदानाचा अधिकार मिळूनही त्यांच्यात जी राजकीय समज यायला हवी त्याचा कुठे मागमुगुसही दिसत नाही
-----------------------------------------------------------------


'देशोन्नती' दैनिकाचे संपादक श्री प्रकाश पोहरे यांनी महाविद्यालयात होणाऱ्या लुटुपुटूच्या निवडणुकांवर गेल्या आठवड्यात 'प्रहार' करून एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली आहे. मुक्त आणि मोकळ्या वातावरणातील निवडणुका ऐवजी महाविद्यालय आणि विद्यापीठ प्रशासनाद्वारे नियंत्रित आणि संचालित या निवडणुकांबाबत विद्यार्थ्यांनी आवाज उठाविण्याचीच नाही तर आंदोलन करण्याची गरज होती. पण वर्षानुवर्षे मुक्त निवडणुकीचा हक्क मारला जात असताना सारा तरुण वर्ग आपल्याला याच्याशी काही सोयरसुतक नसल्या सारखा वागत आला आहे. कधीकाळी महाविद्यालयात प्रशासनाच्या हस्तक्षेपापासून मुक्त निवडणुका व्हायच्या आणि त्या उत्साहाने लढविल्या जायच्या याची कल्पनाही आज महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुण-तरुणींना नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख किंवा उपमुख्यमंत्री राहिलेले गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व पुढे आले ते विद्यार्थीसंघासाठी झालेल्या निवडणुकांमधून . असे किती तरी नावे सांगता येतील .विद्यार्थ्यांनी समाजकारण आणि राजकारण यात भाग घेवू नये अशी आज जवळपास सर्वच पालकांची इच्छा असते आणि पालकांची हीच इच्छा महाविद्यालय आणि विद्यापीठ प्रशासनाच्या पथ्यावर पडली आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तकात डोके घालून बसण्याशिवाय दुसरा कशाचाही विचार करू नये अशी समाजाची धारणा ८० च्या दशका पासून वाढीला लागली. या भावनेने प्रत्येक पालक , प्रत्येक विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना ग्रासून टाकले आहे. समाजकारण - राजकारण म्हणजे नसती कटकट अशी भावना मोठ्या प्रमाणावर वाढीस लागल्याने महाविद्यालयीन निवडणुकांबद्दल कोणालाच काही वाटेनासे झाले आहे. समाजाबाबत , सामाजिक -राजकीय प्रश्नांबाबत कोणालाच काही भूमिका घ्यायची नाही आहे आणि त्याचमुळे विद्यार्थीसंसदेच्या निवडणुकांचा खेळखंडोबा अनेक वर्षापासून बिनबोभाट सुरु आहे. याचा सर्वात मोठा परिणाम शिक्षणाबद्दलचा विचारच विद्यार्थी करीत नाहीत हा झाला आहे. आपल्या स्वत:साठी , समाजासाठी आणि देशासाठी कशाप्रकारचे शिक्षण गरजेचे आहे याचा विचार न होता निमुटपणे जे शिकविले जाते ते ऐकायचे एवढा मुर्दाडपणा आजच्या विद्यार्थ्यांमध्ये आला आहे.जिथे ते स्वत:च्या शिक्षणाबद्दलचा विचार करण्याच्या अवस्थेत नाहीत तिथे त्यांच्याकडून समाजाबद्दल आणि देशाबद्दल विचार करण्याची अपेक्षा कोणी करीत असेल तर त्याला स्वप्नरंजना पलीकडे काही अर्थ नाही.
६० आणि ७० च्या दशकात यापेक्षा फार वेगळी परिस्थिती होती. सारेच विद्यार्थी समाजाबद्दल विचार करायचे असे नाही , पण अनेक विद्यार्थी समूह आणि विद्यार्थी संघटना शिक्षणातील समस्या आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना बाबत जागरूक असायचे. यात महाविद्यालय आणि विद्यापीठात निवडून आलेल्या विद्यार्थी संघटना नेहमीच महत्वाची भूमिका पार पाडीत आल्या आहेत. परिसरात , प्रांतात आणि देशातच नव्हे तर जगात चाललेल्या घडामोडी बद्दल विद्यार्थी संघटना जागरूक असायच्या . अनेक प्रश्न आणि समस्या याबद्दल त्यांच्या स्पष्ट भूमिका असायच्या. या भूमिका घेवून विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका लढविण्यात येत असल्यामुळे विद्यार्थी जगत समाजाशी जोडलेले असायचे. आपल्याच नाही तर समाजाच्या गरजा शिक्षणातून पूर्ण होत नाहीत याची प्रखर जाणीव त्यामुळे विद्यार्थ्यांना असायची. याच जाणीवेतून शिक्षणातील बदलासाठी आणि सामाजिक बदलासाठी विद्यार्थ्यांची आंदोलने व्हायची. या आंदोलनातून नवा विचार , नवे नेतृत्व पुढे यायचे. देशातील राजकारणाला आणि समाजकारणाला नवी दिशा ७० च्या दशकात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाने दिली. या दशकात झालेल्या गुजरात , बिहार आणि आसाम राज्यातील विद्यार्थी आंदोलनाने देशाचे राजकीय मानचित्रच बदलून टाकले होते. आज देशात दिसत असलेले राजकीय नेतृत्व बहुतांशी त्याच आंदोलनाची देन आहे. कॉंग्रेस सोडले तर सर्व पक्षांचे आणि सर्व विचारधारेचे नेतृत्व त्याच आंदोलनामधून पुढे आल्याचे दिसून येईल. तसेही ७० च्या दशका पर्यंत कॉंग्रेसचे नेतृत्व देखील त्याच विद्यार्थ्यांच्या हाती होते ज्यांनी शाळा-कॉलेज मध्ये असताना स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांची राजकीय -सामाजिक समज आणि बदल घडवून आणण्याची क्षमता समोर आल्यानेच घटना दुरुस्ती करून १८ वर्षावरील युवक-युवतींना मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला. एकीकडे असा अधिकार देवून तरुणांना राजकीय -सामाजिक प्रवाहात आणण्याचा राजकीय निर्णय झाला असताना दुसरीकडे शैक्षणिक व्यवस्थाच अशी निर्माण करण्यात आली कि राज्यघटनेतील अक्षरांपेक्षा पुस्तकातील अक्षरांनाच महत्व दिले गेले. यातूनच १८ वर्षावरील तरुणांना मतदानाचा अधिकार देण्याची प्रक्रिया एकीकडे पूर्णत्वास गेली असताना दुसरीकडे महाविद्यालये आणि विद्यापीठ यात निवडणूक लढविण्याचा विद्यार्थ्यांचा अधिकार हिरावला गेला. परिणामी १८ वर्षावरील तरुण - तरुणींना मतदानाचा अधिकार मिळूनही त्यांच्यात जी राजकीय समज यायला हवी त्याचा कुठे मागमुगुसही दिसत नाही. अभ्यासक्रमातील चौकटी बाहेरच्या जगापासून विद्यार्थी तुटल्याचा हा परिणाम आहे. अभ्यासक्रमाची चौकट आणि राजकीय समज हे एकमेकांचे शत्रू असल्यासारखे आज भासते आहे. राजकीय समज याचा अर्थच आजूबाजूचा समाज , त्याच्या समस्या समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे असा आहे. राजकीय समज जशी निव्वळ विद्यार्थी एके विद्यार्थी राहून निर्माण होत नाही ,तशीच निव्वळ राजकारणात पडूनही निर्माण होत नाही. विद्यार्थी दशेत तुमचा समाजाशी किती आणि कशाप्रकारे संबंध येतो यावर राजकीय समज अवलंबून असते. आज विद्यार्थ्यांची राजकीय समज शून्य आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. परीक्षा केंद्रित शिक्षणाने आणि गुणाधारित गुणवत्तेने विद्यार्थ्यांची पार वाट लावली आहे. नवा विचार आणि नवे नेतृत्व गर्भातच मारण्याचा हा प्रयत्न आहे. स्त्री भृणहत्या विरोधात आज आवाज तरी ऐकायला येवू लागला आहे , पण शिक्षण व्यवस्थेत नवा विचार , नवे नेतृत्व गर्भातच मारले जात आहे त्याबद्दल कोणी काही बोलत नाही. कारण ज्या विद्यार्थ्यांनी या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे तो एक तर फक्त मोबाईलवर बोलण्यात गुंग आहे किंवा त्याला सामाजिक, राजकीय अनास्थेची गुंगी आली आहे. तो असा गुंगीत असल्यानेच विद्यार्थी संसदेच्या निवडणुकांबद्दल त्याला काहीच वाटत नाही.
वर वर पाहता गेल्या २-३ वर्षात अभ्यासक्रमाच्या आणि महाविद्यालयाच्या चौकटीबाहेर विद्यार्थी डोकावू लागला आणि चौकटीच्या बाहेर पडू लागल्याचे आशादायक चित्र दिसत असले तरी विद्यार्थ्यांची राजकीय समज वाढताना किंवा विद्यार्थी नेतृत्व तयार होताना दिसत नाही.  अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता हे तर स्पष्टच आहे. या आंदोलना नंतरच्या नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे परिणाम देखील विद्यार्थ्यांमुळे आणि तरुण मतदारांमुळे प्रभावित झालेत हे देखील नाकारता येणार नाही. सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा जितकी जास्त मते पडलीत ती संख्या आणि गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत वाढलेली तरुण मतदारांची संख्या जवळपास सारखी आहे हे लक्षात घेतले तर सत्ता परिवर्तनात विद्यार्थी आणि तरुणांचा वाटा निर्णायक स्वरूपाचा होता हे मान्य करावे लागेल. असे असले तरी अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे देशाची राजकीय धुरा सांभाळण्यास सक्षम असे नेतृत्व विद्यार्थ्यांमधून पुढे आलेले नाही. सत्ता बदल घडून आला असला तरी या सत्ताबदलात नवे नेतृत्व पुढे आले असे घडलेले नाही. ७० च्या दशकात विद्यार्थी आंदोलनातून पुढे आलेल्या विद्यार्थी नेते जे आता वृद्धत्वाकडे झुकले आहे त्याच्या हातून नव्या पिढीकडे नेतृत्व आलेले नाही. याचे कारणच आजच्या विद्यार्थ्यात राजकीय समज नसण्यात दडले आहे. गेल्या दोन-तीन वर्षात आंदोलनाच्या मैदानात तरुणांची डोकी अभूतपूर्व संख्येत दिसली आणि या संख्येने चमत्कार घडविला. पण या डोक्याच्या आत विचार करणारा मेंदू आहे असे मात्र अभावानेच दिसले. त्यामुळे या तरुणांना डोळे झाकून अण्णा हजारेच्या मागे जाण्यास संकोच झाला नाही कि त्यांच्याकडे पाठ फिरविण्यात संकोच वाटला नाही. अण्णांनी केलेल्या चुकांमुळे तरुणांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली हे मान्य केले तर या आंदोलनाला दिशा देण्यात  तरुणांचा काहीच वाटा नव्हता हेही मान्य करावे लागेल. सहभागाच्या दृष्टीने अण्णा आंदोलनात काय किंवा सार्वत्रिक निवडणुकीत काय तरुणांची भूमिका महत्वाची राहिली. सहभागा पलीकडे आंदोलनावर किंवा सत्ता परिवर्तनावर कोणतीही छाप विद्यार्थ्यांना आणि तरुणांना सोडता आली नाही. याचे कारण आजच्या शिक्षणाने आणि शिक्षण व्यवस्थेने तरुणात नेतृत्वाची आस आणि क्षमताच निर्माण केली नाही. आजचे विद्यार्थी आणि तरुण पुस्तकांचे ओझे वाहणारे गाढव बनले आहेत. देशाचे चांगले नागरिक बनण्याची इच्छा आणि क्षमता हरवून बसले आहेत. शिकण्याच्या प्रक्रियेत समाजाशी त्यांचा जीवंत संबंध येत नाही तोपर्यंत त्यांच्यात जिवंतपणा येणारच नाही. विद्यार्थीसंसदेच्या निवडणुका  त्याला समाजाशी जोडण्याचा रस्ता आहेत. या रस्त्यावर उभे करण्यात आलेले अडथळे दूर करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला तर समाजाला आणि देशाला नवा विचार देणारे तरुण आणि नवे नेतृत्व मिळण्याची आशा आहे. मोकळ्या आणि मुक्त वातावरणात विद्यार्थीसंसदेच्या निवडणुका व्हाव्यात यासाठी  विद्यार्थी आंदोलन उभे राहावे इतका महत्वाचा हा विषय नक्कीच आहे. त्यासाठी झोपलेली तरुणाई जागे होण्याची वाट पाहावी लागणार आहे.
-------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------------

No comments:

Post a Comment