Thursday, August 21, 2014

पंतप्रधानांचा दिशाहीन आत्मविश्वास !

मोदींनी भाषणात पेरलेल्या प्रतीकात्मक बाबी आणि घोषवाक्य इकडेच सर्वसामान्यांचे लक्ष जाणार आणि नेमकी देशाला काय दिशा दिली याकडे जनसामन्यांचे लक्ष जाणार नाही याची  काळजी या भाषणातून घेतली गेली आहे आणि तोच खरा चिंतेचा विषय आहे. चांगले भाषण करून मोदींनी स्वातंत्र्याचा सण तर साजरा केला , पण असे करीत असताना मोदींना अजून दिशा सापडलेली नाही हे लपून राहिले नाही.
-------------------------------------------------------------

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लालकिल्ल्यावरील पहिल्यावहिल्या भाषणाची अनेकांना उत्सुकता होती. या उत्सुकतेची कारणेही अनेक होती. यातील सर्वात महत्वाचे कारण होते स्वातंत्र्य चळवळीशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या पक्षाचा नेता पंतप्रधान म्हणून देशाला संबोधित करणार होता. गांधी - नेहरू बद्दल स्वत: पंतप्रधान , त्यांचा पक्ष आणि या पक्षामागे उभा असलेला संघ परिवार यांचे काय मत आहे हे कोणापासून लपून राहिलेले नाही. स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्य दिन यांच्या पासून फारकत करणे अशक्य असलेल्या पण संघ परिवाराला नकोशा असलेल्या या दोन नावांचा उल्लेख आणि एकूणच स्वातंत्र्य चळवळीचा उल्लेख नवे पंतप्रधान कसा करतात याबाबत विशेष उत्सुकता होती. देवेगौडा सोडले तर आज पर्यंतचे सर्वच पंतप्रधान दिल्लीच्या सत्तेच्या वर्तुळात कायम वावर असणारे होते. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग पंतप्रधान होण्यापूर्वी राजकीय नेते म्हणून नसले तरी एक उच्च पदस्थ नोकरशाह आणि अर्थमंत्री म्हणून दिल्लीच्या सत्तावर्तुळात चांगलाच वावर होता. अस्थिर राजकीय वातावरणात दिल्लीच्या सत्तावर्तुळा पासून दूर असलेले देवेगौडा यांना पंतप्रधानपदाची अक्षरश: लॉटरी लागली होती. त्यात त्यांचे कर्तृत्व काहीच नव्हते. त्यामुळे स्वत:च्या कर्तृत्वाच्या बळावर आणि अगदी नियोजनबद्ध रीतीने सगळ्या दिल्लीश्वरांना बाजूला सारून खऱ्या अर्थाने दिल्ली बाहेरचा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचेकडे पाहिले जाते. दिल्लीवर प्रभुत्व असलेली मंडळी दुसऱ्यांची डाळ शिजू देत नाहीत याचा सर्वच पक्षातील मराठीजनांना चांगला अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींची दिल्लीवर पकड बसली कि नाही याचा अंदाज या भाषणातून येणार असल्याने या भाषणाबाबत या कारणाने सुद्धा उत्सुकता होती. या दोन्ही कारणापेक्षा उत्सुकतेचे तिसरे कारण जास्त मोठे आणि महत्वाचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने विजयश्री खेचून आणली आणि सरकार बनविले त्यामुळे लोकांच्या मोदी सरकारकडून अपेक्षा खूप वाढल्या होत्या. या अपेक्षांची पूर्ती अल्पवेळात होणे शक्य नसले तरी त्या दिशेने सरकारची आश्वासक पाउले पडत आहे असे दिसत नसल्याने देशभरात अस्वस्थता पसरत चालली होती. देशाला हवी असलेली आश्वासकता अर्थसंकल्पातून दिसली नाही ती १५ ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरील भाषणातून नक्की मिळेल अशी त्यांच्या समर्थकांना आणि भक्तांना विशेष अपेक्षा होती. या मुद्द्यावर मोदी काय बोलतात आणि त्यांच्या फुग्याला टाचणी लावता येते का या अपेक्षेने मोदी विरोधक देखील या भाषणाकडे डोळे लावून बसले होते. या सगळ्या कारणांनी असंख्य नवे श्रोते पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरील भाषणाला लाभले होते यात वाद नाही. असे निरनिराळे घटक निरनिराळ्या मनीषा बाळगून पंतप्रधानाचे भाषण ऐकण्याची बहुधा ही पहिली वेळ असेल आणि लाल किल्ल्यावरून आपले पहिले भाषण करणाऱ्या नरेंद्र मोदींनी कोणाचीच निराशा केली नाही असेच म्हणावे लागेल. २ महिन्यापासून 'हेच का अच्छे दिन' या प्रश्नाला सतत सामोरे जावे लागल्याने वैतागलेल्या मोदी समर्थकांना काही काळासाठी का होईना लाल किल्ल्यावरील भाषणाने लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधल्या जाईल असे किमया भाषणातून मोदींनी केल्यामुळे दिलासा मिळाला आहे. देशाची दशा आणि दिशा याबद्दल मोदी काहीच न बोलल्यामुळे किंवा जे बोलले ते सगळेच गोलमोल असल्याने विरोधकांनाही नव्या सरकारवर नव्या जोमाने टीका करण्याची संधी या भाषणाने दिली आहे. विरोधकांना आणि समर्थकांना समान न्याय देणारे हे भाषण होते असे म्हंटले तर ते अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. टोकाचे समर्थक किंवा टोकाचे विरोधक नसलेल्या सर्वसामान्यांनासुद्धा मोदींच्या भाषणाने दिलासा दिला आहे. गेली दहा वर्षे मनमोहनसिंग यांची अतिशय निरस  भाषण ऐकून कंटाळलेल्या या लोकांना मोदींच्या भाषणाने सुखावले आहे.  


सुरुवातीला ज्या तीन प्रकारच्या अपेक्षांबद्दल लिहिले त्या संदर्भात बोलायचे तर पहिल्या दोन अपेक्षांची पूर्ती मोदींच्या भाषणातून झाली असे म्हणता येईल. गांधी - नेहरू प्रती संघ परिवाराच्या भावना सरकार प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे देखील व्यक्त होवू दिल्या नाहीत हे मान्य करावे लागेल. गांधीना टाळणे तर शक्यच नव्हते. नेहरूंचे त्यांनी नाव घेतले नाही तरी सर्व पंतप्रधानांसोबत त्यांच्या बद्दलचा आदर त्यांच्या भाषणातून व्यक्त झालाच. या बाबतीत संघ परिवाराच्या विचाराचे सावट मोदींनी आपल्या भाषणावर पडू दिलेले नाही. दुसरी अपेक्षाही त्यांनी ठासून पूर्ण केली आहे. दिल्लीच्या सत्तेच्या वर्तुळाबाहेरचा असलो तरी सत्तेवरील पकड मजबूत आहे हे लाल किल्ल्यावरून आत्मविश्वासाने बोलून जगाला दाखवून दिले. बाहेरचा असल्याचा कोणताही न्यूनगंड मोदींच्या भाषणात आढळला नाही. अल्प वेळात मोदींनी दिल्लीच्या सत्तेच्या वर्तुळात आपला दबदबा निर्माण केल्याची त्यांची देहबोली सांगत होती. मात्र तिसर्या अपेक्षेची पूर्ती मोदींच्या भाषणातून झाली नाही. नवी दिशा, नवे धोरण या बाबत फारसे आश्वासक असे त्यांच्या भाषणात काही नव्हते. निवडणूक भाषणात मोदी जे बोलत होते आणि निवडून आल्यानंतर संसदीय पक्षासमोर तसेच संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात ते जे बोलले त्यापेक्षा वेगळे असे लाल किल्ल्यावरील भाषणात काही नव्हते. सरकारची सूत्रे हाती घेण्याआधी आणि सूत्रे हाती घेतांना मोदी जिथे होते तिथेच आहेत आणि दोन महिन्यापेक्षा अधिक काळ उलटला तरी पाउल कोणत्या दिशेने उचलायचे या बाबतचा संभ्रम सुटलेला नाही हा अर्थ मोदींच्या भाषणातून ध्वनीत होत होता. संरक्षक कवच समोर न ठेवता भाषण करणे , फेटा बांधणे आणि उत्स्फूर्त बोलणे यामुळे वेगळे वलय निर्माण होवून भाषणाच्या आशया ऐवजी तिकडे अधिक लक्ष जाईल याची काळजी घेतल्या गेली. मोदींनी भाषणात पेरलेल्या प्रतीकात्मक बाबी आणि घोषवाक्य इकडेच सर्वसामान्यांचे लक्ष जाणार आणि नेमकी देशाला काय दिशा दिली याकडे जनसामन्यांचे लक्ष जाणार नाही याची  काळजी या भाषणातून घेतली गेली आहे आणि तोच खरा चिंतेचा विषय आहे. चांगले भाषण करून मोदींनी स्वातंत्र्याचा सण तर साजरा केला , पण असे करीत असताना मोदींना अजून दिशा सापडलेली नाही हे लपून राहिले नाही.
 
पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून स्वच्छता अभियान , शाळेत मुलींसाठी वेगळे स्वच्छता गृह आणि संसद आदर्श ग्राम योजना हे जे तीन कार्यक्रम जनतेपुढे ठेवले त्याचे महत्व कोणी नाकारणार नाही. हे तर आमचेच कार्यक्रम आहेत अशी पाठ थोपटून घेण्याचे काँग्रेसला कारण नाही. भलेही हे कार्यक्रम कॉंग्रेस राजवटीत सुरु करण्यात आले असतील पण प्रत्यक्षात ते किती उतरले याची काळजी कॉंग्रेसजनानी कधीच घेतली नाही. पैसे खर्च होवूनही व्हावी तशी कामे झाली नाहीत. याचे महत्वाचे कारण कॉंग्रेस सरकार आणि पक्ष याचा जनतेशी आणि कामाशी संबंध फक्त कमिशन पुरता उरला होता. कॉंग्रेस राजवटीत शाळेत शौचालय सक्तीचे केले होते . पण अंमलबजावणीकडे कधीतरी लक्ष देण्यात आले का हा प्रश्न कॉंग्रेसजनानी स्वत:ला विचारावा आणि मग मोदी आमचेच कार्यक्रम राबवितात असा कांगावा करावा. पंतप्रधानांनी शाळेत स्वच्छतागृहे बांधण्यासाठी धर्मादाय संस्था आणि उद्योगजगताला आवाहन केले त्याची खरे तर गरज नव्हती. अव्वाच्या सव्वा फी आकारणाऱ्या खाजगी संस्थाना अशा मदतीची नाही तर कायद्याचा बडगा उचलण्याची गरज आहे. स्वच्छता गृहे नसलेल्या शाळांची परवानगी रद्द करणे सुरु केले तर सहा महिन्यात शाळेच्या स्वच्छता गृहाची समस्या सुटेल. खासदार निधीतून मदत देण्याची कल्पना तर भ्रष्ट व्यवहाराला निमंत्रण देणारी ठरेल.कारण अनेक खासदार हे स्वत:च संस्था चालक देखील आहेत !आपला देश घाणीचे साम्राज्य असलेला देश आहे आणि स्वच्छतेच्या जनचळवळीची गरज वाटावी अशी स्थिती आहे. पण अशा कार्यक्रमाचा काही उपयोग नसतो हे आता पर्यंत हाती घेतलेल्या प्रौढ शिक्षण , सर्व शिक्षा अभियान , गरम स्वच्छता अभियान या सारख्या कार्यक्रमाच्या असफलते वरून धडा घेण्याची गरज आहे. आर्थिक परिस्थिती सुधारली तरच या समस्या कमी होतात हा अनुभव विसरून उत्सवप्रिय देशाला उत्सवी स्वरूपाचे कार्यक्रम दिले तर ते आवडणार, त्याची तारीफ होणार पण प्रत्यक्षात समस्या मात्र जिथल्या तिथे राहणार. या समस्यावर कार्यक्रम सुचवून मोदींनी लोकांच्या काळजाला हात घातला असेल पण बुद्धीला मात्र स्पर्शही होवू दिला नाही.. गाव ओसाड पडत आहेत आणि पडणार आहेत हे वास्तव स्वीकारून नागरीकरणाची योजना बनवून अंमलात आणण्याची गरज आहे. कालप्रवाहात नामशेष होणार असलेल्या गावाला आदर्श बनविण्याचा खटाटोप हा काल विसंगत आणि सरकारी संसाधनाची उधळपट्टी करणारा ठरणार आहे. म्हणूनच मोदींनी उपस्थित केलेल्या समस्या महत्वाच्या असल्या तरी त्या सोडविण्याची पठडी जुनीच असल्याने त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. देशात आर्थिक समृद्धीची लोकचळवळ उभी करण्याची खरी गरज आहे आणि त्याबाबतीत दिशा दर्शन करण्यास मोदींचे भाषण असफल ठरले आहे..मोदीनी प्रगतीचे श्रेय शेतकऱ्यांना देवून त्यांच्याशी भावनिक नाळ जोडण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांच्या संपूर्ण भाषणात शेतकऱ्यांसाठी आश्वासक असे काहीच नव्हते. मोदींचा आर्थिक कार्यक्रम हा ढोबळ आणि ठोकळ घोषणाबाजीच्या पलीकडे गेला नाही.या संपूर्ण भाषणात मोदींनी एकच महत्वाचा आर्थिक निर्णय घोषित केला तो म्हणजे नियोजन आयोग रद्द करण्याचा ! नियोजन आयोग रद्द  झाले तर विकास सरकारी तुरुंगातून आणि नोकरशाहीच्या मगरमिठीतून मुक्त होईल ही स्वागत योग्य बाब असली तरी याला पर्याय काय असणार हे पंतप्रधानांनी गुलदस्त्यातच ठेवले आहे. मोदींना झटपट निर्णय घेणे जड जात आहे याचाच हा पुरावा आहे. मोदींची आर्थिक व्हिजन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आर्थिक विचार वेगळा असल्याने तर मोदी सरकारला आर्थिक निर्णय घेणे अवघड तर झाले नाही ना अशी  शंका येणे अगदी स्वाभाविक आहे. सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांच्यातील आर्थिक धोरणा संबंधीच्या मतभेदाने सरकारच्या निर्णय प्रक्रीयेवर विपरीत परिणाम झाला होता. त्याचीच पुनरुक्ती आत्ता होत असेल तर देशाला ते महाग पडेल आणि आज कॉंग्रेसची जी गत झाली तीच उद्या भारतीय जनता पक्षाची होईल. कारण आणि परिणाम याचा विचार क्षणभर बाजूला ठेवला तरी सरकारात आल्यापासून मोदी गोंधळले आहेत , चाचपडत आहेत यावर या भाषणाने नक्कीच शिक्कामोर्तब केले आहे. भाषणातून प्रकट झालेल्या आत्मविश्वासाने त्यांचे चाचपडणे तूर्तास सर्वसामान्यांच्या नजरेतून सुटले असले तरी सरकारला लवकर दिशा सापडली नाही तर निराशा वाढायला वेळ लागणार नाही.

---------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
---------------------------------------------------

No comments:

Post a Comment