Thursday, September 18, 2014

संघपरिवाराचा प्रेमाविरुद्ध जिहाद !

घरातच राहा , अमुकच कपडे घाला , आपल्या मर्जीने विवाह करू नका असे सांगितले तर आजच्या मुली किंवा स्त्रिया ऐकत नाहीत. म्हणून 'लव्ह जिहाद' ची शक्कल काढण्यात आली आहे. तुम्ही समाजात मोकळ्या वावरल्या तर मुस्लीम तरुण तुम्हाला फसवतील अशी भिती त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दाखवून घरा बाहेर पडलेल्या सावित्रीच्या लेकीना पुन्हा घरात बंदिस्त करण्याचा हा फंडा आहे.
----------------------------------------------------------------------


हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात मुस्लिमांचे लाड करून हिंदुंवर अन्याय केला जातो असे भावनिक पालुपद लावून संघ लहानाचा मोठा झाला. तसा मुस्लीम विरोध हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एककलमी कार्यक्रम राहात आला आहे. देशाचे स्वातंत्र्य , देशापुढील आर्थिक , सामाजिक प्रश्न संघाच्या लेखी बिनमहत्वाचे आणि कायम दुय्यम राहात आले आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मात्र संघाला हिंदू-मुस्लीम प्रश्न दुय्यम वाटू लागला होता. अगदी राम मंदिराचे तुणतुणे देखील संघाने बंद केले होते. आर्थिक विकासाचा प्रश्न संघासाठी सर्वोच्च महत्वाचा बनला होता. भ्रष्टाचार , काळा पैसा संपविणे हेच संघाचे जीवनकार्य बनल्याचे भासत होते. रेड्याच्या तोंडून वेद बाहेर पडावे या चमत्कारा सारखाच संघाने देशात हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करणाऱ्या आपल्या विभाजनवादी विचारांना लगाम घातल्याचा चमत्कार घडल्याचे चित्र देशासमोर उभे राहिले होते. आपला देश चमत्काराला नमस्कार करण्यासाठी प्रसिद्ध आहेच. सर्वसामान्य जनतेने संघाचे हे बदललेले रूप खरे मानून त्याच्यावर विश्वास टाकला आणि नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला अनपेक्षित बहुमत दिले !
केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तारूढ होताच संघाच्या दृष्टीने ज्वलंत बनलेले भ्रष्टाचार ,काळा पैसा , आर्थिक विकास हे प्रश्न एका रात्रीतून पुन्हा गौण बनले. निवडणूक काळात आपल्या विचारसरणीला स्वत:हून लगाम लावणाऱ्या संघाने पहिले काम कोणते केले असेल तर हा लगाम काढून फेकून दिला . संघाच्या विविध संघटना बेलगाम होवून विकासाचा नाही तर हिंदुत्वाचा अजेंडा पुढे करू लागल्या. त्यांच्या मध्येच 'पळा पळा कोण पुढे पळते ' अशी स्पर्धा लागली. कोणी राम मंदिराच्या मागे धावू लागले. कोणी कत्तलखान्याकडे आपला मोर्चा वळविला. कोणी मुस्लिमांच्या मदरशावर हल्ला बोल करू लागला. संघ परिवाराच्या जितक्या संघटना तितके हिंदू-मुस्लीम यांच्यात दुही आणि दरीनिर्माण करणारे  वेगवेगळे कार्यक्रम . एवढेच नाही तर या सर्व संघटनांना प्रेमा विरुद्ध जिहाद पुकारण्याचा समान कार्यक्रम देण्यात आला. दस्तुरखुद्द संघ प्रमुख मोहनजी भागवत यांनी 'लव्ह जिहाद'चे आपल्या पोतडीतले भूत बाहेर काढले. याच भुताने आज सगळ्या संघपरिवाराला पछाडले आहे. निवडणुकीच्या आधी संघपरिवाराला जिकडे तिकडे मनमोहन सरकारचा भ्रष्टाचार आणि काळा पैसा दिसत होता त्याच्या जागी जिकडे तिकडे लव्ह जिहाद दिसू लागला . निवडणुकीच्या वेळी विकास हाच देशा समोरचा एकमेव मुद्दा आहे असे उच्च रवाने बोलणाऱ्या संघप्रमुखांनी लव्ह जिहाद ही भारता पुढची सर्वात मोठी समस्या आहे असे सांगून सौहार्दाच्या मार्गात सुरुंग पेरणी सुरु केली आहे.

हे लव्ह जिहाद आहे तरी काय ? संघपरिवाराच्या मते मुस्लीम तरुण हिंदू तरुणींना फूस लावून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. त्यांच्याशी लग्न करून त्यांचे धर्मांतर करतात. किंबहुना धर्मांतर करण्यासाठी आणि आपली जनसंख्या वाढविण्यासाठी मुस्लीम संघटना असे प्रयत्न योजनाबद्ध रीतीने करतात. यासाठी मुस्लीम तरुणांना पैसा दिला जातो असा आरोप जमेल त्या माध्यमाने करून वातावरण पेटविण्याचे काम संघपरिवाराने चालविले आहे. हिंदू ,शीख ,इसाई ,जैन किंवा बौद्ध धर्मीय तरुणींना फूस लावण्यासाठी किती पैसे पुरविले जातात याचे रेट कार्ड छापून वाटणाऱ्या संघ परिवाराने असे प्रकार कोठे आणि किती घडले याबद्दल मात्र काहीही सांगितले नाही. हे रेट कार्ड देखील संघाच्या भेदभाव करणाऱ्या नीतीनुसार स्त्रियात भेदभाव करणारे आहे . शीख तरुणीला फूस लावण्याचा रेट हिंदू तरुणी पेक्षा जास्त दाखविला आहे आणि इसाई,जैन , बौद्ध धर्मातील तरुणींपेक्षा तर खूपच जास्त दाखविला आहे. संघ परिवाराने अभ्यास करून हे रेट कार्ड बनविले असल्याने त्यातून इतर धर्मीय तरुणी बद्दलचे त्याचे अचूक मत व्यक्त झाले आहे ! इसाई, जैन , बौद्ध या तरुणींना पटविणे सोपे आहे असे संघ धुरिणांचे मत असावे. म्हणूनच या धर्मातील तरुणींना फूस लावून लग्न करण्यासाठी मुस्लीम तरुणांना १०-११ लाख मिळण्या ऐवजी २-३ लाख दिले जातात असा दावा करण्यात आला आहे. सडक्या मेंदूतूनच अशा गोष्टी बाहेर पडू शकतात.  रेट कार्ड सोबत 'लव्ह जिहाद' मुळे किती हिंदू तरुणींचे मुस्लीम मुलाशी लग्न होवून धर्मांतर झाले याचीही यादी संघ परिवाराने प्रसिद्ध केली असती तर या आरोपाची तपासणी कोणालाही करता आली असती. खरे तर आता देशात या परीवाराचेच सरकार आहे. संघ परिवाराकडे आकडे नसतील तर सरकारकडे असे आकडे गोळा करून ते देशापुढे ठेवण्याची मागणी संघ परिवाराला करता आली असती. पण अशी मागणी देखील संघ परिवाराने केली नाही. कारण स्पष्ट आहे. 'लव्ह जिहाद' नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही आहे. संघाने उभा केलेला तो बागुलबोवा आहे.

'लव्ह जिहाद'चे बुजगावणे उभे करून भीती दाखविण्याचा प्रयत्न संघ परिवाराकडून फार आधी पासून सुरु आहे. संघाने केरळ प्रांतात पाय रोवण्यासाठी सर्वप्रथम हा मुद्दा उचलला होता. या पासून प्रेरणा घेवून कर्नाटकातील संघ परिवाराच्या प्रमोद मुतालिक याने श्रीराम सेना स्थापन करून हिंदू पत्नी असलेल्या मुस्लीम पतीवर हल्ले करणे सुरु केले. इथून हा 'लव्ह जिहाद' विरोधी लढा सुरु झाला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी या प्रमोद मुतालिकला भाजप मध्ये प्रवेश देताच मोठा गहजब उडाला होता. त्यामुळे तासा भरातच त्याला पार्टीतून बाहेर काढण्याची नामुष्की भाजप वर ओढवली होती. महिनाभरा पूर्वीच या प्रमोद मुतालिकला भाजप शासित गोवा राज्यात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला हाताशी धरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लव्ह जिहादच्या काल्पनिक भूता विरुद्ध लढण्याचे नाटक करीत आहे. कर्नाटक आणि केरळ या दोन राज्यात यांनी केलेल्या गवगव्यामुळे आणि आरोपांचा धुराळा उडवून दिल्यामुळे केरळ आणि कर्नाटक मधील न्यायालयांना देखील 'लव्ह जिहाद'ची दखल घ्यावी लागली होती. असा प्रकार खरोखर घडतो काय याची कसून तपासणी करण्याचे न्यायालयाने पोलिसांना आदेश दिले होते. चौकशीअंती पोलिसांनी न्यायालयात जो अहवाल सादर केला त्यात स्पष्ट म्हंटले होते कि 'लव्ह जिहाद' नावाचा प्रकार अस्तित्वात नसून हिंदू तरुणींनी स्वेच्छेने मुस्लीम तरुणाशी विवाह केला आहे. असे विवाह सर्रास होत नसून बोटावर मोजण्या इतके होतात हे आपण आजूबाजूला नजर टाकली तरी लक्षात येईल. जसे हिंदू तरुणी मुस्लीम युवकाशी विवाह करतात त्याच प्रमाणे मुस्लीम तरुणी देखील हिंदू तरुणाशी विवाह करतात हे देखील दिसेल. अर्थात हे दोन्ही प्रकारचे विवाह संख्येने अगदी नगण्य आहेत. वास्तविक अशा आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देण्याची गरज असताना संघ परिवार फक्त हिंदू तरुणीचे मुस्लीम तरुणाशी विवाह होतात असे भासवून याचा जीवाच्या आकांताने का विरोध करीत आहे हे समजून घेतले पाहिजे.

 
 आंतरधर्मीय , आंतरजातीय विवाह होतात ते मुली आपला निर्णय आपण घेतात म्हणून. आपल्याकडील सामाजिक रचनेमुळे आणि सामाजिक धारणे मुळे सर्वसाधारणपणे अशा विवाहांना घरून विरोध होत असतो. असा विरोध हा काही एका जाती , धर्मापुरता मर्यादित नसतो. अपवाद सोडले तर सर्वच जाती-धर्माचे कुटुंब अशा विवाहांना विरोध करतात. स्त्रियांनी असा विरोध झुगारून विवाह करणे हे पुराणमतवादी आणि पुरुषप्रधान समाजाला रुचत नाही. संघ हा पुराणमतवादी आणि पुरुषप्रधान व्यवस्थेचा म्होरका आहे .संघ परिवारात वेगळी स्त्री संघटना असली तरी संघात जसा इतर धर्मियांना प्रवेश नाही तसाच स्त्रियांना देखील नाही यावरून त्याची पुरुष प्रधानता लक्षात येईल. मुलीनी मुक्तपणे समाजात वावरणे , चुलीकडे दुर्लक्ष करून घराबाहेर कामासाठी पडणे, आपल्या पसंतीचे कपडे घालणे हे नेहमीच संघजणांना खुपत आले आहे. या संबंधी ते वेळोवेळी बोलत देखील आले आहे. घरातच राहा , अमुकच कपडे घाला , आपल्या मर्जीने विवाह करू नका असे सांगितले तर आजच्या मुली किंवा स्त्रिया ऐकत नाही. म्हणून 'लव्ह जिहाद' ची शक्कल काढण्यात आली आहे. तुम्ही समाजात मोकळ्या वावरल्या तर मुस्लीम तरुण तुम्हाला फसवतील अशी भिती त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दाखवून घरा बाहेर पडलेल्या सावित्रीच्या लेकीना पुन्हा घरात बंदिस्त करण्याचा हा फंडा आहे. स्त्रियांचा घराबाहेरचा मोकळा वावर कमी झाला कि त्यांचा परधर्मीय किंवा परजातीय तरुणाशी संपर्क येणार नाही आणि स्त्रिया आपला निर्णयाधिकार वापरून करीत असलेले आंतरधर्मीय , अंतरजातीय आणि स्वजातीय प्रेमविवाह होणार नाहीत . लव्ह जिहादचे भूत उभे करून संघाला असे एका दगडात अनेक पक्षी मारायचे आहेत. मुस्लीमांविरूढ द्वेषभावना पसरविणे आणि स्त्री स्वातंत्र्यावर मर्यादा आणणे ही संघपरिवाराची दोन्ही प्रिय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 'लव्ह जिहाद' नावाची काल्पनिक संकल्पना संघ परिवार धूर्तपणे वापरीत आहे. संघ परिवार निर्माण करीत असलेली मुस्लीम विरोधी भावना मुस्लीम समाजाला तापदायक होत आहे हे खरे. मात्र मुस्लीम समाजालाही स्त्री स्वातंत्र्याचे वावडेच आहे. तेव्हा संघ परिवाराचे स्त्री स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे कारस्थान उधळून लावण्यासाठी सावित्रीच्या लेकीनीच संघा विरुद्ध जिहाद पुकारला पाहिजे. असा जिहाद पुकारताना स्त्रियांनी आणखी एक मागणी लावून धरण्याची गरज आहे. प्रत्येक आंतरधर्मीय विवाह हा नोंदणी पद्धतीनेच झाला पाहिजे. म्हणजे आंतरधर्मीय विवाह करताना कोणत्या धर्माच्या पद्धती प्रमाणे विवाह करायचा हा प्रश्न उरणार नाही आणि विवाह प्रसंगी होणारे धर्मांतर टळेल. एखादा अपवाद सोडला तर अशा प्रसंगी पुरुष कधीच धर्मांतर करीत नाहीत. स्त्रियांवरच ती सक्ती केली जाते. म्हणूनच अशी  मागणी  स्त्री स्वातंत्र्याचा एक भाग ठरते.
--------------------------------------------------------

सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------

No comments:

Post a Comment