सत्ता ही जनतेच्या समर्थनावर मिळवायची असते याचा विसर राजकीय पक्षांना पडत चालला आहे. त्याचमुळे वरच्या पातळीवर तडजोडी करून सत्ता हस्तगत करण्यावर साऱ्याच पक्षाची मदार आहे. याच तडजोडीचे बीभत्स रूप युती आणि आघाडी बनविण्यासाठी झालेल्या वाटाघाटीतून दिसून आले आहे.
---------------------------------------------
---------------------------------------------
महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणुका जाहीर झाल्या नंतर राजकीय आघाडी तयार करण्यासाठी महायुती आणि आघाडी यांच्यात वाटाघाटीच्या आवरणाखाली सत्तालोलुपतेचे जे चित्र समस्त महाराष्ट्राला दिसले त्यावरून महाराष्ट्राची झालेली राजकीय घसरण लक्षात येते. ज्याला राजकीय पक्ष म्हंटल्या जाते ते पक्ष मुठभर नेत्यांचे अड्डे बनले असून जनतेशी सोडा त्यांच्या कार्यकर्त्याशी देखील काही देणेघेणे राहिले नाही हे मागच्या पंधरवड्यात दिसून आले आहे. मित्रपक्षावर दबाव आणण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांचा आमच्यावर दबाव आहे एवढे सांगण्या पुरतेच राजकीय पक्ष आणि नेते यांचा कार्यकर्त्याशी संबंध उरल्याचे विदारक चित्र या निमित्ताने दिसले. महाराष्ट्रातील सत्तेचे संभाव्य दावेदार असलेल्या शिवसेना - भाजप , कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अगदी २-४ जागा लढविण्याची क्षमता असलेल्या छोट्या - छोट्या पक्षांनी जनतेला गृहीत धरत आपल्या सत्तालोलुपतेचे जे विद्रूप दर्शन घडविले असे यापूर्वी घडले नव्हते. याचा अर्थ पूर्वी पक्ष नेतृत्वात सत्तालोलुपता नव्हती असा नाही. पण ती दिसू नये याचा आटोकाट प्रयत्न व्हायचा. जनतेच्या समस्या सोडविण्याच्या नावाखाली ते सत्तालालसा दडवून ठेवायचा प्रयत्न करायचे. आता त्यांना त्याचीही गरज वाटेनाशी झाली आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही निवडणूक लढवीत आहोत असा आविर्भाव देखील कोणत्याच राजकीय पक्षांनी ठेवला नाही. आपल्या वाट्याला अधिकाधिक सत्ता कशी येईल यासाठी मित्रपक्षा बरोबर शत्रुवत वर्तन कसे करता येते याचा आदर्श सर्वच राजकीय पक्षांनी घालून दिला आहे. एकमेकावर यांचा अजिबात विश्वास नाही आणि यांची मैत्री फक्त सत्तास्थानी पोचण्यासाठीची सोय आहे हे पुरतेपणी स्पष्ट झाले आहे. निवडणुकांना सामोरे जात असलेल्या राजकीय पक्षांनी जनतेच्या समस्याबाबत गेल्या १५ दिवसात अवाक्षरही काढले नाही यावरून हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट झाले आहे कि राजकीय पक्षांना फक्त सत्तेचा उपभोग घेण्यासाठी सत्तेत जायचे आहे . राजकीय पक्ष सत्तेत जाण्यासाठीच असतात. पण सत्ता उपभोगायची नसते तर तिचा उपयोग जनतेच्या हितासाठी करायचा असतो याचा विसर सर्वच राजकीय पक्षांना पडल्याचे ताज्या घडामोडी वरून स्पष्ट होते. या काळात राजकीय पक्षाचे जे स्वरूप दिसले ते लोकशाही व्यवस्थेसाठी चिंताजनक असल्याने त्याची वेळीच दखल घेतली गेली पाहिजे.
पक्षातील कार्यकर्ता संस्कृती संपल्याने पक्ष नेतृत्वाचा जनतेशी संबंध तुटला आहे. एकमेकांची मदत घेत सत्तास्थानी पोचण्याची राजकीय पक्षांना सवय लागल्याने पक्षातील कार्यकर्त्यांचे महत्व आणि महात्म्य संपले आहे. पक्षाचा कार्यकर्ता आता आपल्या विचारधारेचा विजय व्हावा यासाठी आता निवडणुकीत काम करेनासा झाला आहे याचे कारण पक्ष नेतृत्वाने त्याचा फक्त वापर करून घेण्याचे धोरण ठेवले हे आहे. कार्यकर्ता पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत कुठेच दिसत नाही. नेतृत्व आपला उपयोग करून घेत असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने ते देखील पक्ष हिताखातर काम करायला तयार नसतात. त्यामुळे निवडणूक काळात पक्षकार्यकर्ते देखील आपली किंमत वसूल करू लागले आहेत. नेतृत्व आणि पक्ष कार्यकर्ते यांचा संबंध न राहिल्याने राजकीय पक्षांना आपल्या निवडणुकांचे व्यवस्थापन करण्यासाठी मोबदला मोजून कार्यकर्त्याची फौज उभी करावी लागत आहे. मोठा मोबदला देवून एखाद्या संस्थेकडे आपल्या प्रचाराचे नियोजन करावे लागत आहे. हे सगळे घडू लागले याचे कारण सत्ता ही जनतेच्या समर्थनावर मिळवायची असते याचा विसर राजकीय पक्षांना पडत चालला आहे. त्याचमुळे वरच्या पातळीवर तडजोडी करून सत्ता हस्तगत करण्यावर साऱ्याच पक्षाची मदार आहे. याच तडजोडीचे बीभत्स रूप युती आणि आघाडी बनविण्यासाठी झालेल्या वाटाघाटीतून दिसून आले आहे. कार्यकर्ता आधारित पक्ष नसतील तर पक्षाचा जनतेशी आणि जमिनीवरील वास्तवाशी काही संबंध नसतो हे सत्य उग्ररूपाने या निमित्ताने समोर आले आहे. जनता काय विचार करते याचा विचार न करता आपण निवडून येणार या भ्रमात वावरणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षाच्या वाटाघाटीच्या केंद्रस्थानी मुख्यमंत्रीपद राहिले आहे. युती किंवा महायुतीला वाटते कि मोदी लाट आपल्याला सत्तास्थानी पोचविणारच . त्यामुळे जनतेच्या समस्यांचा विचार करण्याची गरज नाही. विचार करायचा तो फक्त मुख्यमंत्रीपद आपल्याकडे कसे येईल याचा. आघाडी सुद्धा याच धर्तीवर विचार करते. पोटनिवडणुकाचे निकाल पाहून मोदी लाट ओसरली असे त्यांना वाटते. ही लाट ओसरल्याने पुन्हा सत्ता आपल्याकडे येईल असे आघाडीतील नेत्यांना वाटू लागल्याने त्यांच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्रीपद एवढीच काय ती महत्वाची समस्या उरली. त्यामुळे त्यांचाही वाटाघाटीचा केंद्रबिंदू मुख्यमंत्रीपद आपल्याकडे कसे येईल हाच राहिला आहे. सत्तेसाठी चाललेली ही उघड सौदेबाजी महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीचे जनतेपासून तुटल्यामुळे झालेले पतन दर्शविते. हे पतन रोखले नाहीतर निवडणुकीत कोणीही जिंकले तरी महाराष्टात पेंढाऱ्याचेच राज्य येईल.
राजकीय पक्षांचे झालेले राजकीय पतन रोखायचे असेल तर मुठभर नेत्यांच्या तावडीतून राजकीय पक्षांची मुक्तता होणे गरजेचे आहे. राजकीय पक्षांची जनतेशी तुटत चाललेली नाळ पुन्हा जोडल्या गेली तरच राजकीय पक्ष सुधारतील. अशी नाळ जोडण्यासाठी कार्यकर्ता हा घटक महत्वाचा असतो. सर्वच पक्षाच्या नेतृत्वाने या घटकाकडे दुर्लक्ष केले आहे आणि याचा परिणाम जनतेशी संबंध तुटण्यात झाला आहे. राजकीय पक्षात नेत्या ऐवजी कार्यकर्त्याला महत्व प्रस्थापित झाल्या शिवाय हे होणार नाही. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत कार्यकर्त्याला स्थान मिळत नाही तो पर्यंत त्यांना पक्षात मानाचे स्थान मिळणार नाही. मुळात कार्यकर्त्याला नेतृत्वस्थानी पोचण्याची आशा असेल तरच त्याला पक्षात आपले काही भवितव्य आहे असे वाटेल. आजची राजकीय पक्षाची परिस्थिती लक्षात घेतली तर एकाही पक्षात कार्यकर्त्यांना नेतृत्वस्थानी पोचण्याचा वाव राहिलेला नाही असे चित्र आहे. ठराविक लोक वर्षानुवर्षे नेतृत्वस्थानी कब्जा करून बसले आहेत हेच चित्र प्रत्येक राजकीय पक्षात आढळून येते. पक्षातील नेत्यांची मक्तेदारी मोडून काढण्याचे सर्वात मोठे राजकीय आव्हान आहे. पदावर आणि पक्षावर मिळविलेला कब्जा हे नेते स्वत:हून कधीच सोडणार नाहीत. यासाठी कायदेशीर तरतुदी करण्याची गरज आहे. पक्षातील किंवा सत्तेतील कोणत्याही पदासाठी एका व्यक्तीला फक्त दोनदा निवडणूक लढविता येईल ही कायदेशीर तरतूद झाली तर राजकीय पक्षाच्या आजच्या स्वरुपात आमुलाग्र बदल होईल आणि राजकीय व्यवस्थेत नवनवीन लोकांचा येण्याचा , नवी प्रतिभा , नवा उत्साह येण्याचा मार्ग मोकळा होईल. बारामती म्हणजे पवार आणि कॉंग्रेस म्हणजे सोनिया किंवा राहुल गांधी अशी ओळख मिटविण्याची क्षमता या एका तरतुदीत आहे. एकच व्यक्ती आयुष्यभर एका पदावर किंवा एका मतदार संघावर कब्जा करून बसणार असेल तर इतर कार्यकर्त्यांना भवितव्य कसे राहील आणि पक्षाचे काम करण्याचा उत्साह कसा राहील. असे भवितव्य नसल्याने पक्षनिष्ठ कार्यकर्ते तयार होण्या ऐवजी मोबदला मागणारे कार्यकर्ते तयार झाले आहेत. पक्षीय व्यवस्थेत चैतन्य आणण्यासाठी आणि पक्षाचा जनतेशी संबंध तुटू न देण्यासाठी नेतृत्व केंद्रित नव्हे तर कार्यकर्ता केंद्रित पक्षरचना असावी लागेल. तळाचा कार्यकर्ता शिखरावर जावू शकेल अशी पक्षांतर्गत स्थिती असेल तर निरलसपणे पक्षकार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे मोहोळ उभे राहील. राजकीय व्यवस्थेचे झालेले बाजारीकरण संपविण्याचा हाच मार्ग आहे.
-------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
-------------------------------------------------
No comments:
Post a Comment