Thursday, August 27, 2015

गुजरात विकासाचा बुडबुडा फुटला

 आजचे आरक्षण आंदोलन म्हणजे शेतीत खोलवर बुडत चाललेल्याना काडीच्या आधारा सारखे आहे. त्यांना खरा आधार देता आला तरच ते असा काडीचा आधार शोधणार नाहीत. शेतीला नुसते चांगले दिवस आणून भागणार नाहीत. त्याच सोबत नोकरीला वाईट दिवस आणण्याची गरज आहे.
------------------------------------------------------------------------------------------


लोकसभा निवडणुकीच्या वेळी विकासाचे गुजरात मॉडेल खूप प्रसिद्धीला आले होते. मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरात राज्याने जो विकास केला तो अभूतपूर्व असल्याचे सांगण्याची अहमिका संघपरिवारात लागली होती. या दाव्याला खोडून काढणारी आकडेवारी त्या काळात प्रसिद्ध होत होतीच. संघपरिवाराच्या कुशल प्रचारयंत्रणे पुढे वस्तुस्थिती दर्शविणाऱ्या त्या आकडेवारीचा टिकाव लागला नव्हता. मुळात लोक त्यावेळी कॉंग्रेसच्या राजवटीवर एवढे संतप्त होते की त्यांनी कॉंग्रेसला घरी पाठविण्याचा निर्णय घेतला होता. कॉंग्रेसला घरी बसवायचे तर संघपरिवाराने पुढे केलेल्या गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना समर्थन देण्याशिवाय दुसरा समर्थ पर्याय नव्हता. गुजरात दंगलीतील वादग्रस्त भूमिके साठीख्यात असलेल्या मुख्यमंत्र्याला समर्थन द्यायचे तरी कसे एवढाच काय तो प्रश्न होता आणि जनते समोरचा तो प्रश्न गुजरातचे विकासाचे मॉडेल समोर करून संघपरिवाराने सोडविला होता. गुजरात सारखा साऱ्या देशाचा विकास झाला पाहिजे म्हणून आपण पंतप्रधान पदासाठी मोदीजीना समर्थन देत आहोत ही समजूत करून घेणे जनतेसाठी गरजेचे असल्याने त्याकाळी गुजरातच्या विकासाच्या मॉडेलवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नचिन्हाकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली आणि गुजरात विकासाच्या बलून मध्ये बसून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्याच्या सिंहासनावर आरूढ झाले. ज्या कॅगने मनमोहन सरकार अप्रिय करण्यात मध्यवर्ती भूमिका निभावली त्या कॅगने गुजरातमध्ये मोदीकाळातील अनेक योजनावर ताशेरे ओढले. अनेक बाबतीत गुजरात इतर राज्याच्या तुलनेत मागे असल्याचे कॅगच्या अहवालाने दाखवून दिले. पण तोवर विकासाच्या गुजरात मॉडेलने कार्यसिद्धी साधल्याने कॅगच्या अहवालाने फारसा फरक पडला नव्हता. गुजरातमधील संपन्न समुदाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटीदार किंवा पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उभ्या राहिलेल्या आंदोलनाने मात्र गुजरातचे विकासाचे मॉडेल एका झटक्यात भंगारात काढले. गुजरातेतील पाटीदार समाज आजवर सगळ्याच क्षेत्रात आघाडीवर राहात आला आहे. या समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी लहानमोठ्या उद्योगात याच समाजाची आघाडी आहे. सहकार क्षेत्रावर याच समाजाचा ताबा आहे. गुजरातेतील प्रसिद्ध हिऱ्याचा व्यवसाय या समाजाच्या मुठीत आहे. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांमध्ये गुजराती लोक आघाडीवर आहेत आणि त्यातही पाटीदार समाज आघाडीवर आहे. सर्वच क्षेत्रात आघाडी घेतलेला हा समाज आणि विशेषत: या समाजातील तरुणवर्ग आपल्या भवितव्या बद्दल साशंक बनला आहे. विकासाच्या ज्या मॉडेलमध्ये संपन्न समजला जाणारा समुदायच जर स्वत:ला असुरक्षित समजत असेल तर समाजातील इतर घटकांची काय अवस्था असेल याचा अंदाज बांधणे अवघड नाही.

गुजरातेत पटेल समाजाची राजकीय कोंडी झाली आहे आणि या कोंडीमुळे समाजात सरकार विरोधी भावनेला या आंदोलनाने वाट करून दिली असली तरी राजकारणाच्या सारीपाटातून हे आंदोलन उभे राहिलेले नाही. परंपरागत राजकीय नेतृत्व यामागे नाही. नुकताच बी,कॉम. झालेला २२-२३ वर्ष वयाच्या हार्दिक पटेल नामक तरुणाकडे या आंदोलनाचे नेतृत्व आहे. गुजरातेत कॉंग्रेस पराभवाच्या दणक्याने अद्यापही आडवी झालेली असल्याने त्यांच्या सहभाग आणि समर्थनाविना एवढे मोठे आंदोलन उभे राहिले आहे. पटेल समाजाने आपले वजन भाजपच्या पारड्यात टाकल्या नंतरच गुजरातेत कमळ फुलले हे लक्षात घेतले तर या आंदोलनामागे कोणी सरकार विरोधक नसून सरकार समर्थक समूहच रस्त्यावर उतरला आहे. केंद्रात आणि राज्यात प्रधानमंत्री मोदी यांची असलेली पकड लक्षात घेता एवढ्यात त्यांना स्व-राज्यातून कोणी आव्हान द्यायला उभे राहील हे संभवत नाही. पण ज्याचा जितका एकाधिकार तितका तो जास्त असुरक्षित असतो. त्यामुळे या आंदोलनाने प्रधानमंत्र्याला आव्हान मिळाल्याचे समजून मोदी समर्थक अस्वस्थ झाले आहेत. त्यातून या आंदोलनाचा नेता असलेल्या हार्दिक पटेलच्या राजकीय संबंधा बद्दल अफवा पसरवत त्याची बदनामी करण्याची कुजबुज मोहीम सुरु केली आहे. दुसरीकडे प्रधानमंत्री मोदी यांना आव्हान देण्याच्या स्थितीत नसलेले स्व-पक्षासकट सर्वपक्षीय मोदी विरोधक आंदोलनाचे संभाव्य परिणाम लक्षात न घेताच आंदोलनाला छुपे किंवा जाहीर समर्थन देवू लागले आहेत. हे आंदोलन का उभा राहिले याचा विचार न करताच आपल्या सवलतीवर परिणाम होईल या भीतीने सध्या ओबीसी मध्ये गणना होत असलेला समाज या आंदोलनाला विरोध करीत आहेत. दुसऱ्या राज्यात पाटीदार समाजा इतकेच त्या त्या राज्यातील प्रभावी जात समूह या आंदोलनाने उत्तेजित झाले आहेत.आपल्याकडेही गुजरातमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या धर्तीवर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु होण्याची स्वप्ने त्यांना पडू लागली आहेत. पाटीदार समाजाचे आंदोलन कुशलतेने हाताळून थांबविण्यात यश आले नाही तर आरक्षण आंदोलनाचा वणवा इतर राज्यात पसरायला वेळ लागणार नाही. गुजरात सरकार बळाचा वापर करून आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सुरूच ठेवील तर हे आंदोलन राजकीय होण्याची शक्यता वाढेल. आजच्या घडीला खरी गरज कशाची असेल तर आंदोलकांच्या भावना समजून घेण्याची , त्यांचे प्रश्न समजून घेण्याची आहे. त्यांचे प्रश्न खरे आहेत पण ते आरक्षणातून सुटण्यासारखे नाहीत हे चर्चेतून पटवून देण्याची गरज आहे. त्यांचे प्रश्न आरक्षणातून सुटण्यासारखे नाहीत तर कशामुळे सुटतील या संबंधीचा आराखडा मांडण्याची आणि त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

ज्या जातसमूहांना आरक्षण मिळत नाही त्यामुळे आपल्यावर अन्याय होतो आहे असे वाटत आहे ते सगळे जातसमूह शेतीशी निगडीत आहेत. गुजरातेतील पाटीदार , महाराष्ट्रातील मराठा आणि धनगर  किंवा उत्तरेतील जाट समुदाय यांचा व्यवसाय प्रामुख्याने शेती आहे. ६० टक्क्याच्यावर जनसंख्या शेती किंवा शेतीशी निगडीत व्यवसायावर उदरनिर्वाह करते. शेतीची आजची अवस्था पाहता या व्यवसायाला काही भवितव्य उरले आहे यावर कोणाचाच विश्वास नाही. आर्थिकदृष्ट्या अत्यंत असुरक्षित अशी ही जनसंख्या आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाची अवस्था कोणापासून लपून नाही. शेतकरी समाजातील शिक्षणाची अनास्था इतर कोणत्याही समाजापेक्षा अधिक आहे. औद्योगीकरण नसल्यामुळे एकेकाळी समाजात शेतीशिवाय उत्पादनाची इतर साधनेच अस्तित्वात नव्हती त्याकाळी हाती शेती असलेला हा समूह प्रभावी होता . सामाजिक स्तर देखील उंचावलेला होता. हाती उत्पादनाचे साधन आणि वरचा सामाजिक स्तर यामुळे एकेकाळी या समाजाने मनमानी केली. औद्योगीकरण आणि शिक्षणाच्या प्रसारामुळे समाजात अनेक नव्या संधी निर्माण झाल्यात. आजवर ज्यांच्या हाती उत्पादनाची साधने नव्हती ते पटकन तिकडे वळले. शेतकरी समुदाय मात्र आपल्याच गुर्मीत स्वत:च्या हाताने शेतीच्या बेड्या आपल्या पायात अडकवून शेतीवर तळ ठोकून बसला. इतर समाज पुढे गेला. हा आहे तिथेच राहिला. थाट, विचार सरंजामीच राहिले पण आर्थिक पाठबळच नसल्याने सगळेच पोकळ वासा ठरले. इतर समाजाची बरोबरी , इतर समाजाशी स्पर्धा करण्याची त्याची शक्ती आणि क्षमता नगण्य असल्याची जाणीव त्याला आता कुठे होवू लागली आहे. अशी स्पर्धा करण्यासाठी त्याला आता आरक्षणाची गरज भासू लागली आहे. हा समाज आरक्षणाची मागणी करू लागला आहे त्याचे कारण न परवडणारी शेती आहे आणि शेतीतून निर्माण होणारी शिक्षण आणि आधुनिकते विरुद्धची मानसिकता आहे. आरक्षणामुळे या समाजाचा कोणताच प्रश्न सुटण्यासारखा नाही. आरक्षणाचा लाभ झालाच  तर या समाजात राजकारणामुळे आणि ज्यांना शिक्षणाची संधी मिळाली आणि या संधीचे ज्यांनी सोने केले अशा समाजातील प्रस्थापितांनाच होणार आहे. शेवटी नोकऱ्या मूठभरच असणार आहे आणि आरक्षण दिले तरी बहुसंख्य शेतकरी समाज त्यापासून वंचितच राहणार आहे. हा समाज दिवसेंदिवस एवढा अगतिक होत चालला आहे की साधक बाधक विचार करण्याच्या स्थितीत राहिलेला नाही. मुलगा नोकरीत नाही म्हणून त्याचे लग्न होत नसेल तर नोकरीत आरक्षण असावे या मागणीसाठी तो डोळे झाकून उतरणारच. आरक्षण मिळाले तर ज्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल असे प्रस्थापित या समुदायाला आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरायला लावणार हे समजून घेतले पाहिजे. यांच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध करणारे या समाजाच्या हातून आहे ते निसटून चालले आहे आणि त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा समुदाय अंत्यंत असुरक्षित बनला आहे हे समजून घेत नाहीत.


आज जे आरक्षण आंदोलन गुजरातेत उभे राहात आहे आणि इतरही राज्यात उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याचे मूळ कारण शेतीत आहे. शेतीचा प्रश्न सोडविल्या शिवाय आरक्षण आंदोलनाला अटकाव करणे शक्य नाही. शेतीवरील जनसंख्येला दुसऱ्या फायदेशीर उद्योगात सामावून घेणे हा तो प्रश्न सोडविण्याचा राजमार्ग आहे. असे करायचे तर शेतकरी कुटुंबातील तरुण तंत्रकुशल बनला पाहिजे. त्यासाठी ग्रामीण भागातील शिक्षणाची पुनर्रचना आणि पुनर्व्यवस्था करावी लागेल. शेतीत मोठ्या प्रमाणावर भांडवल ओतल्या शिवाय आणि आधुनिक तंत्रज्ञान आणल्याशिवाय शेतीव्यवसाय तरणार नाही आणि त्यावरील लोकांना तारणारही नाही. आजचे आरक्षण आंदोलन म्हणजे शेतीत खोलवर बुडत चाललेल्याना काडीच्या आधारा सारखे आहे. त्यांना खरा आधार देता आला तरच ते असा काडीचा आधार शोधणार नाहीत. शेतीला नुसते चांगले दिवस आणून भागणार नाहीत. त्याच सोबत नोकरीला वाईट दिवस आणण्याची गरज आहे. एकीकडे शेतीला नोकरी सारखे स्थैर्य आणि चकाकी आणली आणि दुसरीकडे नोकरीत शेती सारखी अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण केली तर कोणीही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार नाही.

-------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ

मोबाईल - ९४२२१६८१५८
------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment