Thursday, September 3, 2015

नावात काय आहे ?

 एखाद्या रस्त्याला औरंगजेबाचे नाव राहिले काय आणि गेले काय याने तसा काही फरक पडत नाही. फरक पडतो तो चुकीच्या दृष्टीकोनातून इतिहासाची मांडणी करण्यासाठी ऐतिहासिक सत्याची तोडमरोड करून लोकांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करण्यातून . रस्त्याच्या किंवा शहराच्या नामांतराला विरोध करण्या पेक्षा अशा प्रयत्नांना विरोध करणे जास्त महत्वाचे आहे.
-------------------------------------------------------------------------

नाव कोणतेही असले तरी काय फरक पडतो या अर्थाने विलियम शेक्सपियर यांनी हा प्रश्न विचारला होता. शेक्सपियर भारतात जन्मले असते तर कदाचित हा प्रश्न त्यांना पडलाच नसता आणि पडलाच असता तर वेगळ्या अर्थाने पडला असता. नावात काय नाही असे त्यांनी विचारले असते. भारतीयांसाठी नाव हे जीवन-मरणाच्या प्रश्नापेक्षा जास्त महत्वाचे असते. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे दुष्काळात होरपळून निघत असलेल्या औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यासाठी आग्रह वाढू लागला आहे. ज्ञानपीठ पारितोषक विजेते साहित्यिक नेमाडे यांनी शहराचे नाव बदलण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी तहानलेल्या औरंगाबादला घोटभर पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले तेव्हा काही लोक त्यांच्यावर तुटून पडले. कारण त्यांच्या साठी लोकांचे जीवन मरणाचे प्रश्न गौण आहेत. असे भावनिक वादळ निर्माण करून वर्तमानातील प्रश्न बाजूला फेकला जाण्याचा धोका असल्यानेच नामांतराचा जो जीन दिल्लीतील दोन्ही सरकारच्या कृपाछत्राखाली बाटलीतून बाहेर काढण्यात आला आहे त्याला बाटलीबंद करण्याची गरज आहे. तुम्ही एक नाव बदलले कि हजारो ठिकाणावरून लक्षावधी नावे बदलण्याची मागणी होईल आणि खरे प्रश्न बाजूला पडून देशभर नामांतरासाठी लढाया सुरु होतील. डॉ. कलाम यांचे नाव एखाद्या रस्त्याला देणे याला कोणीच विरोध करणार नाही. दिल्लीच्या प्रतिष्ठीत आणि सत्तेच्या वर्तुळातील असे अनेक प्रसिद्ध रस्ते आहेत ज्याला व्यक्तीचे नाव दिले गेलेले नाहीत. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर रेसकोर्स रोडचे देता येईल. रेसकोर्स रोडला कलामांचे नाव दिले गेले असते तर ते आनंदाने सर्वांनी स्विकारले असते. ज्यांना कलामांपेक्षा समाजात दुही निर्माण करण्यात जास्त रस आहे त्यांनी कलामांच्या नावासाठी मुद्दाम औरंगजेब रस्त्याची निवड केली. कलामांच्या हयातीत औरंगजेब रस्त्याच्या नामंतरणाचा प्रयत्न झाला असता तर कदाचित अशा नामांतराला विरोध करणारे कलाम हे पहिले व्यक्ती असते.

 औरंगजेब हा आदर्शाचा पुतळा होता अशा समजुतीने त्यांनी विरोध केला नसता तर इतिहासातील मुडदे उकरून त्याच्याशी लुटुपुटूची लढाई करून बेगडी विजयोत्सव करण्यापेक्षा जिवंत आणि खऱ्या शत्रूशी लढण्यासाठी भारताला महासत्ता बनविण्याच्या आड अशा गोष्टी येतील म्हणून त्यांनी विरोध केला असता. आजच्या निकषावर त्या काळात झालेल्या एखाद्या व्यक्तीचे आणि त्याच्या कार्याचे मूल्यमापन करणे चुकीचे ठरते. त्यावेळच्या परिस्थितीत तो कसा वागला या आधारेच ते मूल्यमापन करायला हवे. धर्मनिरपेक्षतेचे नाव घेतले तरी ज्यांचे पोट दुखायला लागते ती मंडळी धर्मनिरपेक्षतेचा चष्मा घालून औरंगजेबच्या धर्माधारित राज्याचे दाखले देत त्याला दुषणे देवून रस्त्याच्या नामांतराचे समर्थन करीत आहेत. औरंगजेबाने ज्या पद्धतीने राज्यकारभार केला त्याच पद्धतीने राजा रामदेवराय याने राज्यकारभार केला असता तर आज औरंगजेबावर जी टीका होतेय ती रामदेवराय वर झाली असती का याचे उत्तर नकारार्थीच मिळेल. एखाद्या रस्त्याला औरंगजेबाचे नाव राहिले काय आणि गेले काय याने तसा काही फरक पडत नाही. फरक पडतो तो चुकीच्या दृष्टीकोनातून इतिहासाची मांडणी करण्यासाठी ऐतिहासिक सत्याची तोडमरोड करून लोकांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करण्यातून . रस्त्याच्या किंवा शहराच्या नामांतराला विरोध करण्या पेक्षा अशा प्रयत्नांना विरोध करणे जास्त महत्वाचे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सर्वगुणसंपन्न राजा दुर्मिळ असतो. अशा राजाची तुलना तुम्ही दुसऱ्या कोणत्याही राजाशी करायला जाल तर ती सूर्य आणि काजवा यांची तुलना केल्यासारखे होईल. औरंगजेबाचा बराच काळ शिवाजी महाराज आणि दक्षिणेवर ताबा ठेवण्यात गेला आणि त्याचा शेवटही इकडेच झाला या गोष्टी मुळे तुलना करण्याचा मोह होईलही. पण अशी तुलना न करता औरंगजेबाकडे पाहिले तर त्याच्या कामगिरीचे डोळसपणे मूल्यमापन करता येईल. हिंदू मंदिरे ध्वस्त करणारा , हिंदुंवर अत्याचार करणारा आणि वेगळा कर लादणारा हिंदूद्वेष्टा राजा अशी त्याची सरसकट प्रतिमा उभी करणारे इतिहासाला न्याय देत नाहीत. औरंगजेबाच्या ५० वर्षाच्या प्रदीर्घ राजवटीत त्याने त्याने हिंदूंची १५ मंदिरे उध्वस्त केल्याची नोंद आहे. त्याला तात्कालिक अशी काही कारणे आहेत. इतिहास तर हिंदू राजानी दुसऱ्या हिंदू राजावर आक्रमण करून त्या राज्यातील मंदिरे उध्वस्त केल्याचा दाखला मिळतो. मराठा सैन्याने श्रुंगेरीतील शंकराचार्याचे मंदिर १७९१ साली उध्वस्त केल्याचा उल्लेख सापडतो. कारण शृंगेरी पिठावर टिपू सुलतानचा वरदहस्त होता. मराठ्यांनी उध्वस्त केलेले शंकराचार्याचे मंदिराचे पुननिर्माण नंतर टिपू सुलताननेच केले. तेव्हा त्याकाळी मंदिरावर झालेले हल्ले धर्मकारणापेक्षा राजकारण आणि अर्थकारणातून झालेले आहेत . कोणत्याही कारणास्तव अशी मंदिरे उध्वस्त करणे चूकच होते , पण हिंदू मंदिरे नाहीसे करून त्याचे रुपांतर मस्जीदीत करणे हा काही औरंगजेबाचा हेतू आणि कार्यक्रम नव्हता. तसा हेतू असता तर त्याकाळी किती मंदिरे सुरक्षित राहिली असती आणि टिकली असती याचा सहज अंदाज आपणास करता येईल. औरंगजेबाची सर्वाधिक दमछाक शिवाजी महाराजांचे अस्तित्व असलेल्या दक्षिणेने केली. तरीही दक्षिणेत त्याने मंदीर उध्वस्त केल्याचे दाखले मिळत नाही. शेवटच्या काळात तर त्याचा तळ देवगिरी जवळ म्हणजे वेरूळ परिसरात होता. मात्र वेरुळच्या लेण्यांना त्याने कोणती इजा पोचविली याचा दाखला नाही.

वस्तुत: त्याने जेवढी मंदिरे उध्वस्त केल्याचा दाखला इतिहासात मिळतो त्यापेक्षा १०० पटीने त्याने हिंदू मंदिरे टिकावीत यासाठी मदत केल्याचे दाखले इतिहासात मिळतात. हिंदुंवर बसविण्यात आलेल्या जिझिया करा बद्दल बोलले जाते तेव्हा हे सांगितले जात नाही की औरंगजेबच्या काळात हिंदू मंदिराच्या उत्पन्नावर कोणताही कर नव्हता . त्याकाळात हिंदूधर्माचे पुढारपण आणि सूत्रे ब्राम्हणांच्या हातात होती आणि जिझिया करातून ब्राम्हणांना सूट होती असे इतिहास सांगतो ! महिला , मुले , अपंग आणि जे हिंदू औरंगजेबच्या सैन्यात होते किंवा चाकरीत होते त्यानाही जिझिया माफ होता. उर्वरित हिंदुवर जसा जिझिया होता तसा मुस्लीम धर्मियांना जकात कर द्यावा लागायचा. जकात आणि जिझिया या कराचे प्रमाण सारखेच होते हे लक्षात घेतले तर औरंगजेबाने भेदभाव केला असे म्हणता येत नाही. त्याकाळी धर्म आधारित व्यवहार असल्याने मुस्लिमांना जकात तर हिंदुना जिझिया द्यावा लागायचा असे म्हणता येईल. इतिहासात आणखी एक उल्लेख आहे. शहाजहानच्या काळात (आमच्या लेखी हा औरंगजेब इतका अनुदार नव्हता) जेवढे हिंदू अधिकारी आणि मनसबदार होते त्यांच्या संख्येत औरंगजेब याचे काळात सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली होती. औरंगजेब हा हिंदूद्वेष्टा असता तर हे प्रमाण वाढण्या ऐवजी कमी झाले असते. हिंदू भावनांचा आदर म्हणून औरंगजेबाने आपल्या राज्यात गोहत्या बंदी केली होती . औरंगजेब धर्मभिरू होता आणि स्वत:च्या धर्मावर त्याचे अतीव प्रेम होते हे खरे . तेवढ्या कारणाने तो दुसऱ्या धर्माच्या विरोधी ठरत नाही. त्याने इतरावर जी आक्रमणे केली ती इस्लामच्या प्रसारासाठी नव्हती तर स्वत:च्या राज्याच्या सीमा वाढविण्यासाठी होती. शिवाजी महाराज आणि मोगल यांच्यातील लढाया हा काहीलोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी रंगवितात तशा दोन धर्मातील लढाया नव्हत्या. आपापल्या राज्याच्या सीमांच्या रक्षणासाठी आणि विस्तारासाठी झालेल्या त्या लढाया होत्या. ती धर्मयुद्धे असती तर शिवाजी महाराजाकडून मुस्लीम सरदार लढले नसते आणि औरंगजेबाकडून हिंदू सरदार मैदानात उतरले नसते. तेव्हा औरंगजेब हिंदुशी क्रूरपणे वागला असा कांगावा करत सूक्ष्मपणे एखाद्या धर्माबद्दल रस्त्याचे नाव बदलण्याचे निमित्त करून विषपेरणी करण्याचे थांबविले पाहिजे.
राज्यकर्त्यात असणारे  सगळे गुण-दोष औरंगजेबात होते. एका राजाने वैयक्तिक जीवनात किती साधेपणाने राहिले पाहिजे आणि स्वकमाईवर जगले पाहिजे याचा इतिहासातील एकमेव आदर्श औरंगजेब आहे. सत्ता हाती यावी म्हणून क्रूरपणाची परिसीमा गाठणारा राजा म्हणून औरंगजेब एकमेव नसला तरी अग्रस्थानी होता असे नक्कीच म्हणता येईल. संभाजी राजेचा जसा छळ करून क्रूर पद्धतीने मारण्यात आले तसाच छळ करून आपल्या सख्ख्या भावांना कपटाने मारले . आपल्या बापाला कैदेत ठेवणाऱ्या औरंगजेबाने कपटाने शिवाजीराजेंना कैद करून ठेवले तर त्यात नवल वाटावे असे काही नाही. असे करण्यामागे धर्मकांक्षा नव्हती तर राजकीय महत्वाकांक्षा होती . औरंगजेबाची ही काळी बाजू आहे. ही काळी बाजू पुढे करून कोणी औरंगजेबाचे नाव बदलण्याची मागणी करीत असेल तर ते समजून घेता येईल. मात्र तो हिंदुद्वेष्टे होता आणि त्याने हिंदुंवर खूप अत्याचार केलेत अशा कंड्या पिकवून नामांतरासाठी कोणी रान पेटवत असेल तर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा दुष्ट हेतू जनतेने लक्षात घेतला पाहिजे. सर्वोच्च पदी कसे येवू नये याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणून दिल्ली पासून ते गल्लीपर्यंत प्रत्येक राजकारण्याने औरंगजेबाकडे पाहिले पाहिजे. मात्र पदावर पोचल्यानंतर त्या पदाचा स्वत:साठी आणि कुटुंबासाठी कसा वापर करायचा नसतो याचा आदर्श म्हणून औरंगजेबाकडेच पाहावे लागते. या दोन्ही गोष्टी सत्तेतला असो कि विरोधातील प्रत्येक राजकारणी व्यक्तीच्या डोळ्यासमोर असायलाच हव्यात. यासाठी तरी प्रत्येक राजकारण्याने औरंगजेब मार्गावरून चालण्याची गरज होती. राजकारण्यांना कदाचित हेच त्याच्या डोळ्यासमोर नको असावे. म्हणूनच भाजप आणि आप ने नामांतराला  पटकन पाठींबा दिला आणि कॉंग्रेस पक्षाने सोयीस्कर मौन पाळले असावे.  विकासाला मागे टाकत  देशाला अस्थिर करण्याची ताकद नावात आहे हे लक्षात घेवून नामांतराचा प्रश्न संवेदनशीलतेने आणि संयमाने हाताळण्याची गरज सगळ्यांनीच लक्षात घेतली पाहिजे.
--------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
---------------------------------------------------------------------------------------

1 comment:

  1. A very good & enlightening article indeed. The part of history that you have mentioned is unknown to many.It is difficult to know any truth even regarding living persons, issues involving us today, so it is almost impossible to do justice to the history, given the viciated facts that already complicate such issues! Your article has opened our eyes wide! By the way, when our society will mature to an extent where naming any thing after any person is considered irrelevant, redundant & this practice is eliminated altogether? Glorifying so-called greats in their times like this is an insult to the common man, who is & should be actually the most important entity shaping history!

    ReplyDelete