Thursday, November 19, 2015

मुस्लिमजगाला गरज नव्या केमाल पाशाची

मुस्लिमसमाज आतंकवाद्यांविरुद्ध उभे राहण्याचे साहस करू लागला ही समाधानाची बाब आहे. पण नुसते आतंकवादी इस्लामी मुल्ये मानणारी नाहीत असे म्हणून चालणार नाही. आतंकवादी मानत असलेल्या मूलतत्ववादी धर्मव्यवस्थे पासून फारकत घेण्याचे साहस मुस्लिमसमाजाने दाखविले पाहिजे. आतंकवाद्यांची धर्मव्यवस्था नाकारल्यानेच आतंकवाद्यांच्या पायाखालची जमीन सरकणार आहे याचे भान मुस्लिमसमाजाला आले पाहिजे.
------------------------------------------------------------------------------------

पैरीस शहरातील अमानुष आतंकवादी हल्ल्याने जगातील देशांनी एकत्र येवून लढण्याची प्रेरणा आणि इच्छाशक्ती निर्माण केली ही वाईटातून निर्माण झालेली चांगली बाब म्हंटली पाहिजे. आतंकवादा विरुद्धची ही लढाई केवळ राष्ट्रांनी एकत्र येवून लढण्यासारखी नाही. आतंकवादा विरुद्धची लढाई ही मुलत: मुलतत्ववादाविरुद्धची लढाई आहे हे समजून घेवून योजना आखली तरच यश मिळण्याची शक्यता आहे. सैनिकी कारवाईने काही काळ हे आतंकवादी बिळात जातील , त्यांचे नेटवर्क मोडेल , त्यांच्या कारवायात कमी येईल पण आतंकवाद संपणार नाही. धर्माधारित आतंकवाद तर या पद्धतीने संपणारच नाही हे आजवरच्या अनुभवाने लक्षात यायला हवे. मूलतत्ववाद आणि मूलतत्ववादाचे आकर्षण संपत नाही तोवर धर्माधारित आतंकवादावर मात करणे कठीण आहे. लष्करी कारवाईने एका आतंकवादी गटाचे कंबरडे मोडले तर काही काळातच त्याची जागा घेणारा दुसरा गट उभा राहतो. मूलतत्ववाद या आतंकवाद्यांचे जन्मस्थान आहे . या मूलतत्ववादाविरुद्ध अनेक पातळ्यावर सर्वंकष लढाई पुकारल्याशिवाय धर्माधारित आतंकवादावर मात करता येणार नाही. आपण आपल्या देशात नक्षली आतंकवादा विरुद्ध अनेक वर्षापासून लढत आहोत. अनेक वर्षाच्या पोलिसी आणि निमलष्करी कारवाई नंतरही त्याला लगाम घालता आलेला नाही. नक्षलवादाला जन्म घालणारी परिस्थिती बदलत नाही तोवर नक्षलवाद संपणार नाही हा निष्कर्ष आता सर्वमान्य होत आहे. नक्षली आतंकवाद हा निधर्मी आतंकवाद आहे. धार्मिक आतंकवादा विरुद्ध लढणे त्यापेक्षा कठीण आहे. नक्षल्यांना समर्थन गरिबीने ग्रासलेल्या विशिष्ट समूहातून मिळते. धार्मिक आतंकवादाला काही खुले तर काही छुपे समर्थन त्या त्या धर्माच्या सर्व स्तरातून मिळत असल्याने त्याच्याशी लढणे कठीण जाते. सर्व धर्मात असे मूलतत्ववादी समूह आहेत . धार्मिक सुधारणांमुळे धर्म जितके जास्त उदार होत गेलेत तितके मूलतत्ववादी समूह कमी होत गेलेत , त्यांची ताकद क्षीण होत गेली. ज्या धर्मात सुधारणाची गती धीमी राहिली , सुधारणांना लोकांचे पाठबळ मिळाले नाही त्या धर्मात मूलतत्ववादी प्रबळ झालेत. इस्लाम हा असाच धर्म आहे. ख्रिस्ती किंवा हिंदू धर्माप्रमाणे सुधारणा स्विकारण्यात इस्लाम मागे राहिल्याने या धर्मात कट्टरपंथीय जास्त आहेत आणि त्यांना रसदही जास्त मिळते. त्यामुळे इतर धर्मीय आतंकवाद्यांची मानवजातीला हानी पोचविण्याची जेवढी क्षमता आहे त्यापेक्षा कैकपट जास्त क्षमता इस्लामधर्मीय आतंकवाद्यात आहे. इस्लामधर्मीय आतंकवाद्यांपासून प्रेरणा घेवून इतर धर्मातील मूलतत्ववादी डोके वर काढू लागल्याने आतंकवादा विरुद्धची लढाई अधिक बिकट होत चालली आहे. फ्रांसवर इस्लामी आतंकी हमला होताच तिथल्या मूलतत्ववादी शक्तींची राजकीय , सामाजिक ताकद वाढल्याचे वृत्त आहे. भारतातही आतंकवादी हल्ल्यातून इथल्या मूलतत्ववादी शक्तींना बळ मिळाल्याचा अनुभव आपल्याला आहेच. इस्लामी मूलतत्ववादातून जन्म घेतलेल्या आतंकवादी संघटनांचा हल्ला हे जगावरचे संकट आहेच , पण या हल्ल्यातून इतर धर्मात बळावत असलेले मूलतत्ववादी हे दुसरे संकट आहे. याचा एकत्रित परिणाम जगातील लोकशाही आणि स्वातंत्र्यावर मर्यादा येण्यात होवू लागला आहे. त्याचमुळे मूलतत्ववादाविरुद्ध सर्वंकष लढाई ही काळाची गरज बनली आहे. ख्रिस्ती मूलतत्ववादाविरुद्ध ख्रिस्ती समुदायात आवाज बुलंद होतातच. हिंदू मूलतत्ववाद्याविरुद्ध हिंदुत आवाज उठत आले आहेच. इस्लामी मूलतत्ववाद्याविरुद्ध असे संघटीत आवाज मुस्लिम समुदायात उठणे ही काळाची गरज बनली आहे. इस्लामी आतंकवाद्याविरुद्ध इस्लामी जगात रोष निर्माण होत आहे हे उत्साहवर्धक आहे. इस्लामी जगात या विरुद्ध जितका संघटीत आवाज शक्तिशाली होईल त्याचा उपयोग इस्लामी आतंकवादाला परास्त करण्यात होणार आहेच, शिवाय इतर धर्मियात मूलतत्ववादाविरुद्ध जे लढत आहेत त्यांचेही हात बळकट होणार आहेत. त्याचमुळे इस्लामी जगात बदलाचे वारे वाहण्याची नव्हे तर बदलाचे वादळ निर्माण होण्याची गरज आहे. ही गरज जितकी सुखी आणि संपन्न जगासाठी आहे तितकीच इस्लामधर्माच्या आणि इस्लामधर्मियाच्या अस्तित्वासाठी आहे हे मुस्लिमसमाजाने समजून घेण्याची ही वेळ आहे. इस्लामी आतंकवाद्यांनी जगाचे जेवढे नुकसान केले आहे त्यापेक्षा जास्त नुकसान धर्मभिरू मुसलमानांचे केले आहे हे लक्षात घेतले तर या लढाईत त्यांना मागे राहून चालणार नाही .

या आतंकवादाचा निषेध करणे , त्याविरुद्ध मोर्चे काढणे ही प्रतीकात्मक कृती इतर धर्मियांना आश्वस्त करण्यासाठी गरजेची आहेच. पण त्यापेक्षा मोठी लढाई इस्लामधर्मियांना आपल्या धर्मातील मूलतत्ववादाविरुद्ध लढावी लागणार आहे. स्वत:ला बदलण्याची ही कठीण लढाई असणार आहे. मुस्लिमातील धार्मिकट्टरता वाढवायला धर्मच कारणीभूत नाही तर इतर घटकांची भूमिकाही महत्वाची राहिली आहे. तेल आणि मुस्लिम राष्ट्रे हे समीकरण झाल्याने आणि पाश्चात्यांच्या किंबहुना रशिया सारखे अपवादात्मक देश वगळता साऱ्या जगाच्या औद्योगीकरणाचा डोलारा या देशातील तेलावर अवलंबून होता आणि आहे. त्यामुळे पाश्चात्य राष्ट्रांनी विशेषत: अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी मुस्लिम राष्ट्रात आपल्या तालावर नाचणाऱ्या राजवटी राहाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केलेत. त्यासाठी लोकशाही हा मोठा अडथळा ठरला असता. तेल संपन्न मुस्लिम राष्ट्रात लोकशाहीचा उदय न होण्यामागे धर्म नाही तर हे आर्थिक कारण महत्वाचे ठरले. राजेशाही टिकवायची तर तीला धर्माचा आधार हवा असतो. त्यामुळे मुल्ला-मौलवीचे महत्व आलेच. जगातील आधुनिकतेचा स्पर्श मुस्लिम मनाला होणार नाही याची काळजी घेणे ओघाने आलेच. राजा , मुल्ला - मौलवी आणि अमेरिकासहित पाश्चात्य राष्ट्रे यांच्या संगनमतातून मुस्लिमांना धर्मवेडे आणि मागासले ठेवण्याचा कट शिजला. राजवटीचे जुलूम वाढल्यावर त्या राजवटीशी लढण्याचे हत्यारही धर्मच राहिले. पाश्च्यात्यांनी आपल्या सोयी प्रमाणे कधी जुलमी राजवटीना शस्त्र पुराविलेत तर कधी धर्माचा आधार घेत जुलमी राजवटी विरुद्ध लढणाऱ्याना शस्त्रे आणि साधने पुरविली.सर्वसाधारण मुस्लिम समुदाय मात्र दोन्हीही स्थितीत धर्माच्या जोखडात बांधला गेला. दुसरे धर्म कट्टरते कडून उदारतेकडे वाटचाल करीत असताना इस्लामची वाटचाल मात्र कट्टरते कडून अधिक कट्टरतेकडे झाली. त्याचा परिणाम आज आपण पाहात आहोत. सगळा मुस्लिमसमाज धार्मिक कट्टरतेच्या जात्यात भरडला गेला आहे. इस्लामी आतंकवाद्यांनी दुसऱ्या समुदायातील किंवा धर्मातील जेवढ्या लोकांना मारले त्यापेक्षा हजारपटीने स्वधर्मियांना मारले आहे. जगाच्या पाठीवर एकाही मुस्लिम राष्ट्रात स्थिरता आणि शांतता नाही. मुस्लिम राष्ट्रातून मुस्लिमांनाच मुस्लिम आतंकवाद्यामुळे निर्वासित होण्याची वेळ आली आहे. मुस्लिमांचा मुस्लिम राष्ट्रावर विश्वास उरला नाही. विश्वास असता तर मुस्लिम निर्वासितांनी दुसऱ्या मुस्लिम राष्ट्रात शरण मागितली असती. पण त्यांच्या धर्ममार्तंडानी त्यांना ज्या जगाचा तिटकारा करायला शिकविले त्या लोकशाहीवादी आधुनिक राष्ट्राकडे त्यांनी आश्रय मागितला. त्या राष्ट्रांनी देशात मूलतत्ववाद वाढण्याचा धोका पत्करून मुस्लिम निर्वासितांना आसरा दिला. निर्वासितांच्या रुपात आलेल्या आतंकवाद्यांनी फ्रांस मध्ये कहर केला. पण एकाही राष्ट्राने निर्वासितांना हाकलून लावलेले नाही. सारी राष्ट्रे निर्वासितांच्या बाजूने उभी आहेत. त्यांना ज्यांनी हाकलून लावले त्यांच्याशी लढत आहेत. त्यामुळे मुस्लिमांनी आता स्वत:लाच एक प्रश्न विचारला पाहिजे. ते ज्या मुस्लिम राष्ट्रात राहतात ते जग चांगले की आधुनिक मुल्ये मानणारे लोकशाहीवादी, उदारमतवादी जगत चांगले. आजचे मुस्लिम जगत मुस्लिमांना माणसा सारखे जगता येईल असे राहिलेलेच नाही हेच उत्तर येईल. मुस्लिमांनी आपली मातृभूमी सोडण्या ऐवजी आपले जगच आधुनिक , उदारवादी आणि लोकशाहीवादी बनविण्याचा संकल्प केला पाहिजे. 


पैरीस हल्ल्यानंतर आतंकवादाविरुद्ध मुस्लिम संघटीत होवून विरोध करू लागल्याचे दिसत आहे. कुर्दिश महिला तर आतंकवाद्याविरुद्ध शस्त्र हाती घेवून लढत आहेत. अफगाणिस्तानात मुले आणि महिला आतंकवाद्याविरुद्ध रस्त्यावर उतरून निदर्शने करू लागली आहेत. आपल्याकडेही जंतरमंतरवर मुस्लिम संघटनांनी निदर्शने केलीत. हे आवश्यक होते पण एवढे पुरेसे नाही. इसिस किंवा इतर आतंकवादी संघटनांचे लोक खरे मुसलमान नाहीत किंवा इस्लाम वरचा डाग आहे एवढे म्हणून भागणार नाही. ते जी धर्मव्यवस्था आणू पाहात आहेत त्या व्यवस्थे बद्दलचे तुमचे मत तुम्हाला मांडावे लागणार आहे. जी धर्मव्यवस्था आणण्यासाठी  इसिस, तालेबान, लष्कर सारख्या आतंकवादी संघटना लढाई करीत असल्याचा दावा करीत आहेत काय आहे ती धर्म व्यवस्था ? स्त्रियांनी शिकू नये, चूल आणि मूल सांभाळावे, बुरख्यातच राहावे हे त्यांना हवे आहे. शिक्षणात इतिहास,भूगोल नको, विज्ञान अन गणित तर अजिबातच नको. फक्त धर्मशिक्षणच हवे आहे त्यांना. पुरुषांनी दाढी ठेवली पाहिजे , विशिष्ट कपडे घातले पाहिजे. पाश्चात्य धर्तीचे कपडे अजिबात घालता कामा नये हा आग्रह आहे त्यांचा. पैगंबर त्या काळात जसे राहिले , त्या काळात त्यांनी जे केले तेच केले पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे. पैगंबराने एका पेक्षा अधिक बायका केल्या तशा आताही करायला त्यांचा विरोध नाही. त्या काळापासून आजवर झालेली प्रगती त्यांना मान्य नाही. परिस्थितीत झालेले बदल त्यांना मान्य नाहीत. लोकशाहीच काय दुसरी कोणतीही राज्यव्यवस्था त्यांना मान्य नाही. त्यांना खलिफा आणि त्याच्या हाताखालचे मुल्ला मौलवीचे राज्य हवे. पैगंबरकालीन परिस्थिती निर्माण करून तसे लोकांना जगायला भाग पाडायचे हा त्यांचा संकल्प आहे. मूलतत्ववाद म्हणतात तो हाच. सगळ्या आधुनिकतेला , सुखसोयीना विरोध मात्र त्या सगळ्या वापरून त्यांना मुस्लिमांनाच नव्हे तर साऱ्या जगाला रानटी अवस्थेत न्यायचे आहे. आजचा मुस्लिम समाज देखील प्रत्यक्षात मूलतत्ववाद जगत नाही पण या गोष्टीना विरोध करण्याची त्याची तयारी नाही. हेच आतंकवाद्याच्या पथ्यावर पडत आहे. मुस्लिमसमाज या मुलतत्ववादाच्या प्रेमात आहे तो पर्यंत साऱ्या समाजाला मूलतत्ववादाच्या दावणीला बांधायला आतंकवादी शक्तींना बळ मिळणार आहे. मूलतत्ववाद नाकारूनही धार्मिक राहता येते आणि सुखाने राहता येते हे मुस्लिमांनी डोळे उघडून पाहण्याची गरज आहे. काळागणिक समाज बदलतो, मूल्य बदलतात, व्याख्याही बदलतात. बदल हेच समाजमनाचे जिवंतपणाचे लक्षण असते. त्यामुळे आधुनिक काळाला साजेशी धर्माची व्याख्या करता आली पाहिजे आणि स्विकारता आली पाहिजे. आतंकवादी जे करताहेत ते धर्माची व्याख्याच करताहेत ना ? मग मागे जाणारी व्याख्या का करायची , पुढे जाणारी का नको हे मुस्लिमसमाजाने स्वत:ला विचारण्याची वेळ आली आहे. आजच्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग एका मुस्लिम नायकानेच २० व्या शतकात दाखवून दिला. नुसता मार्ग दाखविला नाही तर त्यावर तो स्वत:चालला आणि सोबत देशबांधवाना घेवून चालला. तो नायक म्हणजे तुर्कस्थानचा केमाल पाशा ! दुर्दैवाने मुस्लिमसमाजाने त्याच्या प्रयत्नाची आणि दूरदृष्टीची दखलच घेतली नाही. मुस्लिम राष्ट्रांनी केमाल पाशाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला असता तर जगातील मुस्लिम समुदाय सर्वापेक्षा जास्त आधुनिक , विज्ञानवादी , लोकशाहीवादी समाज म्हणून सन्मानास पात्र ठरला असता. केमाल पाशाकडे दुर्लक्ष केल्या मुळे या काळात कितीतरी क्रूर राजवटींचे अन्याय ,अत्याचार सहन करून मुस्लिमांना मागासले म्हणून जगावे लागत आहे. मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी आणि तरुणांनी केमाल पाशाच्या मार्गाने मुस्लिम समाजाला पुढे नेल्याशिवाय त्यांच्यावरचे आणि जगावारचे संकट दूर होणार नाही.

--------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------

2 comments:

  1. एक मूलभूत विचार करणारा लेख. मध्यंतरी आपल्या एका लेखात आतंकवादी मुस्लीम असतात या कल्पनेला छेद देणारी काही माहिती आपण सांगितली होती. प्रस्तुत लेखात मात्र आतंकवाद मुस्लिमांमध्ये जास्त आहे या सार्वत्रिक कल्पनेला पुष्टी दिल्याचे दिसते, हा आपल्या भूमिकेत झालेला बदल तर नव्हे?
    मुळात धर्म ही संकल्पना रद्द होण्याची गरज आहे. हे कधी शक्य होईल की धर्म हे मानवाच्या एकूणच अपुरेपणामुळे त्याच्या माथी मारलेले शाश्वत दुर्दैव आहे आणि म्हणून ते अपरिहार्य आहे?

    ReplyDelete
  2. भूमिकेत बदल नाही. या लेखातही इतर धर्मियांच्या आतंकवादा बद्दल उल्लेख आहेच. पण दोन कारणांनी इस्लामी आतंकवादी जास्त मारक बनले आहेत. आपल्या स्वार्थासाठी अमेरिके सारखी राष्ट्रे त्यांना रसद पुरवितात . इस्लामधर्मीय कट्टरता त्यांना जिहादी बनविते. आज देशभर ज्या हिंदू कट्टरपंथीया बद्दल चिंता व्यक्त होत आहे ते व्यक्तिगत, कौटुंबिक जीवनात अजिबात मूलतत्ववादी नाहीत. ते निव्वळ राजकीय लाभाच्या गणितामुळे धार्मिक कट्टरता वाढवीत आहेत. मनुष्याच्या धडावर हत्तीचे मुंडके कशीही शस्त्रक्रिया केली तरी बसविता येणार नाही हे कळण्या इतके आमचे प्रधानमंत्री बाळबोध नक्कीच नाहीत. जे गायीला पूजनीय मानण्याचे नाटक करतात त्यांना हे चांगले माहित असते की गायीच्या पोटात ३३ कोटी काय एकही देव नसतो. राजकीय फायद्याची ही नाटके आहेत. एका अर्थाने हिंदुत्ववाद्यांचा हा ढोंगी धर्मवाद आहे. मुस्लिम कट्टरपंथीयाबद्दल तसे म्हणण्या सारखी स्थिती नाही. राजकीय हानी आणि लाभात न अडकता आणि कुटुंबाची तसेच स्वत:च्या जीवन मरणाची पर्वा न करता सारा समाज त्यांना मूलतत्ववादी बनवायचा आहे. त्यामुळे त्यांच्यात मारकता अधिक असल्याने जास्त घातक बनले आहेत. त्या तुलनेत हिंदू कट्टरता सौम्य आहे तरीही त्याबद्दल दहशत निर्माण होवून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आल्या आहेत. जिथे मुस्लिम कट्टरपंथीय जास्त ताकदीने सक्रीय असतील तेथे काय परिस्थिती असेल याची यावरून कल्पना येईल.

    ReplyDelete