Thursday, June 2, 2016

विरोधी पक्षाच्या पोकळीने लोकशाही पोकळ

 गेल्या दोन वर्षात कॉंग्रेसने विरोधी पक्ष म्हणून स्वत:ची वेगळी वाट निर्माण न करता भाजपाने विरोधी पक्षात असताना तयार केलेल्या वाटेवरून चालणेच या पक्षाने पसंत केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसला स्वबळावर सत्तापरिवर्तन घडवून आणता येणार नाही. सत्तापरिवर्तनासाठी संसदेतर अवतार पुरुषाची वाट पाहावी लागेल किंवा अण्णा हजारे सारखा एखादा अवतार पुरुष तयार करून लोकांपुढे उभा करावा लागेल.
--------------------------------------------------------------------------------------------------------


मोदी सरकारच्या दोन वर्षाच्या कार्यकाळाची झाडाझडती घेणारा माझा लेख वाचून एका वाचकाने प्रश्न केला की लोकशाही मध्ये सत्ता पक्षाच्या भुमिके इतकेच महत्व विरोधी पक्षाचे देखील असते. असे असले तरी सत्ता पक्षाच्या प्रत्येक निर्णयाची आणि चालीची चर्चा होते पण विरोधी पक्षाच्या  त्याच्या भल्या-बुऱ्या निर्णयाच्या बाबतीत टीका किंवा प्रशंसा पडत नाही. मुद्दा अगदी खरा आहे. अर्थात तसे होण्याची काही कारणेही आहेत.एखाद्या पक्षाला निवडून देताना तो पक्ष लोकहिताची काळजी घेईल असा लोकांचा जाणते-अजाणतेपणी विश्वास असतो. अमुक एक पक्ष चांगला विरोध करील , लोकहिताच्या चौकटीच्या बाहेरचे निर्णय सत्ताधाऱ्यांना घेवू देणार नाहीत म्हणून काही कोणी जाणूनबुजून विरोधी पक्ष म्हणून कोण्या पक्षाला निवडून देत नाहीत. विरोधी पक्ष म्हणून आमची कामगिरी बघा असे म्हणून काही कोणता पक्ष निवडणूक लढवीत नाही. आपण बोलताना सहज बोलून जातो की लोकांनी अमुक पक्षाला विरोधी पक्षाची भूमिका दिली आहे. प्रत्यक्षात लोकांनी त्यांना सत्ता नाकारलेली असते. त्यामुळे विरोधी पक्षाची जबाबदारी लोकांनी नाकारलेल्या पक्षावर येते आणि ती जबाबदारी तो पक्ष देखील अनिच्छेने स्विकारतो . इच्छा नसताना येवून पडलेली जबाबदारी कोणी आनंदाने आणि उत्साहाने स्वीकारत नसतो. आलिया भोगाशी असावे सादर अशाच पडेल मनोवृत्तीने विरोधी पक्षाची जबाबदारी स्विकारली जाते . अशा पक्षाच्या कामगिरीवर निवडणुकीतच कौल दिला असल्याने लोकांनाही लगेच नव्याने त्यांची कामगिरी तपासण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे विरोधी पक्षांची कामगिरी हा आपल्याकडे कायम दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. सत्ता पक्षाला जसा वेळोवेळी जाब विचारला जातो तसा जाब काही विरोधी पक्षाला विचारला जात नाही. त्यामुळे विरोधात असलेल्यांची व्यक्ती म्हणून कामगिरी उठून दिसत असली तरी पक्ष म्हणून पक्षाच्या कामगिरीला धार येत नाही. कोणताही पक्ष विरोधी पक्षात असताना काय भूमिका असावी याचा मुळापासून आणि सम्यक विचार कधीच करीत नाही. सत्ता पक्षाच्या निर्णयाला आंधळा विरोध हेच आपल्याकडील विरोधी पक्षाचे काम झाले आहे. लोकांना विरोधी पक्षाचा विरोध कळतो पण त्या विषयावर त्यांची भूमिका काय आहे हे कधीच कळत नाही. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून चांगली कामगिरी केली या आधारावर कोणी सत्तेत येत नाही . सत्ता पक्षाची कामगिरी वाईट आहे हे लोकमनावर बिम्बवूनच सत्ता प्राप्त करावी लागते. विरोधी पक्षाच्या कामगिरीच्या कोणत्याच कसोट्या आज तागायत प्रस्थापित झाल्या नाहीत. सजग आणि संघटीत विरोधी पक्षा अभावी निवडणुकीच्या रिंगणा बाहेरील संसदेतर नेतृत्वानेच आपल्याकडे विरोधी नेत्याची परिणामकारक भूमिका कायम निभावल्याचा आपला इतिहास आहे.

केंद्रातील पहिले सत्ता परिवर्तन सजग आणि संघटीत विरोधी पक्षामुळे घडले नाही. ते घडले लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या संसदबाह्य नेतृत्वामुळे. आपल्याकडे विरोधी पक्षाचे ऐक्य घडवायला देखील बाहेरचाच नेता लागतो. जयप्रकाश नारायण यांनी लोकशक्ती संघटीत करण्या सोबतच विरोधी पक्षाचे ऐक्य साधल्याने केंद्रात पहिले सत्ता परिवर्तन झाले. दोन वर्षापूर्वी  सत्तापरिवर्तन झाले ते काही विरोधी पक्ष म्हणून भाजपने केलेल्या कामगिरीने नव्हे. अण्णा हजारे आणि त्यांच्या आंदोलनाने जी वातावरण निर्मिती केली आणि लोकांचा विश्वास असलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे सततचे सरकार विरोधी ताशेरे यातून सत्तापरिवर्तनाचा रस्ता तयार झाला . या रस्त्यावरून चालत जाणारा कोणीही नेता सत्तेच्या शीर्षस्थानी पोचला असता. मोदी ऐवजी अडवाणीजी असते तरी सत्तापरिवर्तन झालेच असते. कारण अण्णा आंदोलन आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यामुळे सत्ता परिवर्तनाची लाट आधीच तयार झाली होती. फक्त या लाटेवर स्वार होण्याची औपचारिकता तेवढी बाकी होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही संधी अडवाणी ऐवजी मोदींना दिली कारण संघाला आपले ऐकणारा स्वयंसेवक शीर्षस्थानी हवा होता. अटलजी आणि अडवाणी यांनी संघाचा फक्त वापर करून घेतला होता . संघ तत्वज्ञानाचा सरकारी धोरणात शिरकाव होवू दिला नव्हता. आता अडवाणी आणि अटलजी विना सत्ता येवू शकते हे लक्षात आल्या बरोबर संघाने अडवाणीजींना अडगळीत टाकून मोदींना समोर केले. हा मुद्दा इथे मांडण्याचे कारण एवढेच आहे की यावेळी झालेल्या सत्ता परिवर्तनात देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघा सह अन्य संसदेतर शक्तीचाच हात होता. विरोधी पक्ष म्हणून केलेल्या कामगिरीच्या बळावर भाजपने केंद्रातील सत्ता काबीज केलेली नाही. प्रभावी विरोधी पक्ष नसल्यानेच संसदेतर शक्तीच्या झेंड्याखाली लोक एकत्र येतात आणि सत्तापरिवर्तन होते असेच आजवर प्रामुख्याने घडले आहे. संसदीय लोकशाहीत सत्तापरिवर्तनासाठी संसदेतर नेतृत्वावर सतत अवलंबून राहावे लागणे यातून विरोधी पक्षांची दुर्बलता दिसून येते. आजवर भाजप विरोधी पक्षात होता , आज कॉंग्रेस विरोधी पक्षात आहे पण यामुळे विरोधी पक्षाच्या भूमिकेत व मानसिकतेत काहीच फरक पडला नाही. यांच्या जागा बदलण्याचा परिणाम एवढाच झाला की विरोधी पक्ष म्हणून भाजप जो गोंधळ घालीत होता आणि जितक्या बेजबाबदारीने वागत होता अगदी तसाच कॉंग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून वागत आहे. विरोधी पक्ष म्हणून भाजपच्या पाउला वर पाउल टाकत आपण सत्तेच्या खुर्चीवर बसू अशी कॉंग्रेसची धारणा असेल तर याला नेतृत्वाची दिवाळखोरी म्हंटली पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून संसदेत गोंधळ घालून किंवा बेजबाबदारपणे संसद बंद पाडून कॉंग्रेसला ना जनतेचे भले करता येणार ना त्यामुळे त्यांचे काही भले होणार . दुर्दैवाने गेल्या दोन वर्षात कॉंग्रेसने विरोधी पक्ष म्हणून स्वत:ची वेगळी वाट निर्माण न करता भाजपाने विरोधी पक्षात असताना तयार केलेल्या वाटेवरून चालणेच या पक्षाने पसंत केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसला स्वबळावर सत्तापरिवर्तन घडवून आणता येणार नाही. सत्तापरिवर्तनासाठी संसदेतर अवतार पुरुषाची वाट पाहावी लागेल किंवा अण्णा हजारे सारखा एखादा अवतार पुरुष तयार करून लोकांपुढे उभा करावा लागेल.


गेल्या दोन वर्षात विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेसला काहीही वेगळे करून दाखविता न आल्याने कोणतीही छाप जनमानसावर सोडता आली नाही. विरोधी पक्ष म्हणून हा पक्ष आणि त्याचे नेते काय कामगिरी करतात यावर पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे याची जाण पक्ष नेतृत्वाला असल्याचे कोणतेच लक्षण दिसत नाही. मुळात पक्ष नेतृत्व म्हणून पक्षात कोणी आहे का असा प्रश्न पडावा अशी पक्षाची स्थिती आहे. सोनिया गांधी अध्यक्ष आहेत खऱ्या पण पक्षाला याची जाणीव आहे की हे नेतृत्व इतिहास जमा झाले आहे. राहुल गांधी कडे अध्यक्ष पद सोपविण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही म्हणून सोनियाजी त्या पदाचा भार वाहत आहेत. एखादी चमकदार कामगिरी राहुलच्या नावे नोंदविल्या जावी याचीच त्या वाट पाहत आहेत. ही चमकदार कामगिरी म्हणजे विरोधी पक्ष म्हणून किती प्रभावी भूमिकेत कॉंग्रेसला पुढे आणतात ही आहे हे मात्र त्या पक्षात कोणाच्या लक्षात येत नाही. निवडणूक विजयाच्या मृगजळा मागे पक्ष धावतो आहे आणि सपाटून मार खातो आहे. सरकारच्या प्रत्येक गोष्टीला विरोध आणि आक्रस्ताळी भाषणे म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका नव्हे. विरोधी पक्ष म्हणून आपल्या बळावर सत्ता मिळवायची असेल तर कॉंग्रेसच्या नेत्यांना विरोधी पक्ष नेता म्हणून अटलजींचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे ठेवावा लागेल. आपल्या विरोधात असलेल्या लोकांबद्दल आदर आणि गुणग्राहकता असेल तर आक्रस्ताळेपणा आपोआप कमी होतो हे त्यांना अटलजी कडून शिकता येईल. कॉंग्रेसचा नेता कोण हे फार महत्वाचे नाही. कॉंग्रेसचा नेता कोणीही असला तरी त्याला हे भान कार्यकर्त्यांना देता आले पाहिजे की पक्षाचा जन्म फक्त सत्तेची फळे चाखण्यासाठीच नाही तर विरोधी पक्ष म्हणून ताठ मानेने उभे राहणे तेवढेच महत्वाचे आहे. दीर्घकाळ सत्तेत राहिल्याने पक्ष नेतृत्व आणि कार्यकर्ते आळशी आणि ऐतखाऊ बनले होते. हा दोष काढून टाकण्यासाठी विरोधी पक्षात असणे ही मोठी संधी मानणारे नेतृत्व कॉंग्रेसला हवे आहे. आपल्याकडे विरोधी पक्षात राहूनही संपत्ती गोळा करून ऐषारामात राहता येत असल्याने कॉंग्रेसने हाच मार्ग पत्करल्यास त्याचा आत्मघात आणि कॉंग्रेसमुक्त भारत अटळ ठरेल. मात्र विरोधी पक्षाचे आजवर नसलेले मापदंड प्रस्थापित करण्याचा पक्षाने प्रयत्न केला तर या पक्षाला कोणाला संपविता येणार नाही. दुसरा देशव्यापी विरोधी पक्ष नसल्याने आज कॉंग्रेसची गरज आहेच . देशात निधर्मी आणि सहिष्णू वातावरण टिकविण्यासाठी या पक्षाची गरज आहेच. विरोधी पक्ष म्हणून देशातील वैविध्य , धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता यासाठी बांधिलकी असणारा पक्ष म्हणून लोकांमध्ये आणि लोकांपुढे आला तरच देशातील विरोधी पक्षाची पोकळी भरून येईल. कॉंग्रेसने दोन वर्षे वाया घालविली आहेत. विरोधी पक्षाचा आदर्श घालून देण्यासाठी त्यांना तीन वर्षे पुरे पडणार नसतील तर आणखी ५ वर्षे जनता त्यांना आनंदाने देईल ! पण मग त्या ५ वर्षात पक्ष शाबूत राहील की त्याचे अवशेष तेवढे उरतील याचा कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे .
------------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा,  जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
------------------------------------------------------------------------------------------- 

No comments:

Post a Comment