Thursday, June 16, 2016

झिंगाट पालक, सैराट विद्यार्थी !

आज प्रत्येक पालकाला आपला पाल्य आय आय टी मध्ये गेला पाहिजे किंवा यु पी एस सी उत्तीर्ण झाला पाहिजे असे वाटते. क्षमता आणि कल विचारात न घेता लोंढेच्या लोंढे या मागे धावत आहेत. उद्यमशीलतेची प्रेरणा देण्यास आणि महत्व बिंबविण्यात शिक्षण व्यवस्था सपशेल अपयशी ठरल्याने विशिष्ट क्षेत्रासाठी पालक झिंगाट बनले आहेत आणि विद्यार्थी सैराट झाले आहेत.
------------------------------------------------------


शाळा - महाविद्यालयांचे निकाल आणि प्रवेशाचा हंगाम सध्या सुरु आहे. निकाल आणि प्रवेशाचा सर्व ताण पालकांनी आपल्या अंग-खांद्यावर घेतलेला असतो. निकाल कसा लागणार याची सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांना कल्पना असते. पालकांना त्याची आधीच कल्पना देण्याची हिम्मत मात्र त्याची होत नाही. निकाल लागल्यावर पालकाची कटकट ऐकावीच लागणार आहे. मग आधी पासून कशाला बोलणे ऐकायचे हा सुद्न्य विचार विद्यार्थी करीत असतात. अभ्यासाचा , परीक्षेचा आणि निकालाचा विद्यार्थ्यापेक्षा त्यांच्या पालकांना कितीतरी पटीने जास्त ताण असतो. विद्यार्थ्यांवर ताण असतो तो पालकांच्या इच्छा - आकांक्षाचा आणि अपेक्षांचा . ज्या घरात विद्यार्थ्यांना त्याचे शाळा - महाविद्यालय निवडण्याचे स्वातंत्र्य आहे , अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य आहे आणि आपल्या सोयीने अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य आहे त्याच घरातील विद्यार्थी आणि पालक तणावमुक्त असतात. अशा तणावमुक्त घरांची संख्या फार तर ५ ते १० टक्के असेल . उर्वरित ९० ते ९५ टक्के घरात पालकांनी अभ्यास आणि अभ्यासक्रम यावर नुसता उच्छाद मांडलेला असतो. या उच्छादापायी त्यांनी स्वत:ची व मुलांची सुखचैन हरवलेली असते. पालकांना आपले पाल्य सभ्य , सुसंस्कृत असावे , त्याने चांगले नागरिक बनावे याची अजिबात चिंता नसते. कसेही करून त्याने आय टी प्रोफेशनल बनावे (आय टी क्षेत्राच्या उदयाच्या आधी प्रत्येक पालकाला आपला पाल्य डॉक्टर बनावा असे वाटत होते ), आय आय टी सारख्या नामांकित शिक्षण संस्थानातून त्याने शिक्षण पूर्ण करून परदेशात जावे ही आजच्या बहुतांश पालकांची अपेक्षा असते. अपेक्षा असण्यात वाईट काही नाही. निव्वळ अपेक्षा नसतात तर ती आकांक्षा असते आणि मुलांनी ती पूर्ण केलीच पाहिजे हा दुराग्रह असतो. पालक आपल्या मुलाने काय बनले पाहिजे यासाठी अक्षरशः झिंगलेले असतात. आणि असे झिंगाट पालक मुलांवर लादलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात. खर्चाची तर त्यांना अजिबात पर्वा नसते. होवू दे खर्च हे त्यांचे ब्रीद वाक्य असते ! अशा खर्चातून अनेक विपरीत गोष्टी घडतात याची जाणीव पालकांना कधीच होत नाही.


बिहारमध्ये १२ वी च्या परीक्षेत विविध शाखेतून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे विषयच माहित नसल्याचे उघड झाले. विषयच माहित नाही म्हंटल्यावर विषया अंतर्गत काय शिकविले जाते हे माहित असणे दूरची गोष्ट झाली. कला शाखेतून पहिल्या आलेल्या विद्यार्थीनीला पोलिटिकल सायन्स बद्दल पत्रकारांनी विचारले तर या विषया अंतर्गत खाण्याचे पदार्थ बनवायचे शिकवितात हे तिचे उत्तर. विज्ञान शाखेतून पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याची अशीच बोंब. ही सगळी बोंबाबोंब झाल्यावर बिहार बोर्डाने पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची चाचणीवजा मुलाखत घेतली. त्यात या विद्यानाच्या प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला एक साधा प्रश्न विचारला तर त्याने असे प्रश्न विचारून हैराण केले तर इथेच आत्महत्या करीन अशी धमकी दिली ! आता असे विद्यार्थी प्रथम क्रमांकाने कसे उत्तीर्ण झाले असतील हे कोणालाही कळेल. दाम करी काम हे यातील उघड सत्य आहे. आता या विद्यार्थ्यांविरुद्ध आणि ज्या संस्थेतून परीक्षा दिली त्या संस्थाचालका विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता हे सगळे घडवून आणण्यात पालकांचा मोठा हात असणार हे उघड आहे. पालकांच्या गुन्ह्याची शिक्षा मात्र विद्यार्थ्यांना मिळणार. बिहार मध्ये जंगलराज आहे त्यामुळे तिथे असे घडले तर नवल काय असे अनेकांना वाटू शकते. आपल्याकडेही काही मंगलराज नाही हे लक्षात घेतले पाहिजे. दुसरीकडे वेगळ्या प्रकारचे गुन्हे पालक करीत असतात. फक्त त्याला तांत्रिकदृष्ट्या गुन्हा म्हणता येत नाही इतकेच. ज्या शाखेचे शिक्षण पेलण्याची विद्यार्थ्यांची क्षमता नाही आणि ते शिक्षण घेण्याची त्याची इच्छाच नाही ते त्याच्यावर लादण्याची क्रूरता दाखविणारे पालक आपल्याला सर्वत्र आढळतील. पालकांच्या अशा मनोवृत्तीतून खाजगी शिकवण्यांचे पेवच फुटले आहे. मुलाच्या पहिल्या वाढदिवसा पर्यंत त्याला काय बनवायचे याचा पालकांचा निर्णय झालेला असतो. निर्णयाच्या दिशेने पाहिले पाउल ते पहिल्या वर्गात शिकवणी लावून टाकतात ! खेळण्याच्या वयात आणि वेळात शिकवणी लावून बालपण हिरावून घेण्याचा गुन्हा आज घरोघरी घडताना दिसेल. 


पूर्वी बलोपासने साठी आखाडे असायचे. तरुणांची तिथे गर्दी असायची. आता ठिकठिकाणी शिकवणी वर्गाचे नवे आखाडे तयार झाले आहेत. या आधुनिक आखाड्या समोरील रस्त्यावर वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिसी हस्तक्षेपाची गरज वाटावी इतकी गर्दी असते. वाहन चालविण्याचा परवाना मिळण्याचे वय नसलेले बालक - बालिकाच्या वाहनांची मोठी रांग रस्त्याच्या कडेला दिसेल. फर्लांगभर वाहनांची रांग दिसली की समजायचे इथे शिकवणीचा आखाडा सुरु आहे. परवाना नसताना मुलांना गाड्या चालवायला देवून नियमभंगाचे बाळकडू पालक देत असतात. हे झाले गावोगावचे चित्र. पण शिकवण्यासाठी काही शहरेच प्रसिद्ध झाली आहेत. त्या शहरांचे दाणापाणीच शिकवणी वर्गावर अवलंबून आहे. दिल्ली ही देशाची राजधानी नसती तर त्या शहराची ओळख केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी तयार करणारे शहर अशी राहिली असती. दिल्लीत चालणाऱ्या कोणत्याही व्यवसायापेक्षा या शिकवणी व्यवसायाची उलाढाल महाप्रचंड आहे. आय आय टी च्या प्रवेशासाठी विद्यार्थी तयार करण्याचा देशातील सर्वात मोठा बाजार २४ घंटे ३६५ दिवस राजस्थानातील कोटा शहरात भरलेला असतो. आय आय टी काय आहे याची समजही नसलेली  मुले-मुली कोटा शहरात शिकवणीसाठी  येवून राहतात. आय आय टी ला प्रवेश १२ वी नंतर मिळतो. त्या प्रवेशाच्या तयारीसाठी दूर दूरचे बरेच पालक आपल्या मुलामुलींना ७ वी - ८ वी मध्येच इथे आणून सोडतात. अशा विद्यार्थ्यांसाठी खास शाळा देखील या शहरात आहेत. प्रत्यक्षात ही मुले-मुली शाळेत जातच नाहीत. मोठी फीस घेवून मुलांचे शाळेतील रेकॉर्ड तयार करण्याचे आणि त्यांना उत्तीर्ण दाखविण्याचे कार्य तेवढे या शाळा करीत असतात. ११ वी - १२ वी साठी पाहिजे त्या शिकवणी वर्गात प्रवेश मिळेल की नाही या भीतीपोटी ७ वी - ८ वी पासूनच इथे मुलांना पाठविण्याकडे पालकांचा कल वाढत चालला आहे. दूरच्या प्रदेशातून नव्या ठिकाणी राहणे , तेथील वातावरणाशी जुळवून घेणे , रुची आणि गती नसलेल्या विषयाचा केवळ पालकांच्या हट्टास्तव अभ्यास करणे याचा विद्यार्थ्यावर किती ताण पडत असेल याचा सहज अंदाज बांधता येईल. आय आय टी च्या जास्तीतजास्त ५००० जागांच्या प्रवेशासाठी एकट्या कोटा शहरातून लाखाच्या वर मुले दरवर्षी प्रवेश परीक्षेची तयारी करीत असतात. देशभरातील अन्य शिकवणी वर्ग लक्षात घेतले तर लाखो विद्यार्थी निव्वळ पालकांच्या हट्टापायी या प्रवेश परीक्षेच्या घाण्यात  पिळले जातात. विद्यार्थ्यांना एवढ्या मानसिक ताणातून जावे लागते की विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येतो. कोटा शहरात गेल्या ५ वर्षात जवळपास ६० विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपविले. विद्यार्थ्यांच्या या आत्महत्या खरे तर पालकांनी क्रूरपणे केलेल्या हत्याच आहेत.


बरे एवढे सगळे करून आय आय टी ची पदवी घेवून समाधान मिळते असेही दिसत नाही. आय आय टी मधून पदवी घेतलेल्या सर्वांनाच पुढच्या  शिक्षणासाठी परदेशात जायचे असते आणि तिथेच नोकरी करायची असते. तिथल्या शिक्षण पद्धतीशी जुळवून घेता घेता विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ येतात. अनेक विद्यार्थ्यांना मधूनच शिक्षण सोडावे लागते. असे विद्यार्थी नैराश्याने ग्रासले जातात. या दिव्यातून पुढे जावून पदव्युत्तर शिक्षण घेतले तरी वाढत्या स्पर्धेला तोंड देता येतेच असे नाही. यातून आलेल्या निराशेतून अमेरिका स्थित एका भारतीय विद्यार्थ्याने (वय - ३८ वर्षे !) आपल्या मार्गदर्शक शिक्षकावरच गोळ्या झाडून त्याला ठार केले. न झेपणारे शिक्षण देण्याचा पालकाचा अट्टाहास अनेक विद्यार्थ्यांचे जीवन नासवीत आहे. अशीच स्पर्धा केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षेसाठी देखील आहे. काही शेकडा जागांसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षा देत असतात. मात्र प्रचंड स्पर्धा असली तरी केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षार्थीमध्ये आय आय टी च्या स्पर्धकात दिसणारे ताण तणाव नसतात. कारण केंद्रीय लोक सेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय स्वत: विद्यार्थ्याचा असतो. निर्णय घेण्याची क्षमता आणि समज त्याला आलेली असते. विद्यार्थ्यांना मदत करण्या पलीकडे पालकांची यात लुडबुड नसते. केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पालकांची फारसी जबरदस्ती होत नसली तरी इथेही ती परीक्षा देण्याची क्षमता आपल्या पाल्यात आहे की नाही याचा ते विचार करीत नाही. डोळे झाकून पाल्याच्या निर्णयाला पाठींबा देतात. इतरत्र कुठे नोकरी मिळण्याची संधी कमी असल्याने उत्तीर्ण झाल्यास हमखास नोकरी मिळेल आणि ती देखील सर्वाधिक अधिकाराची , प्रतिष्ठेची या कारणाने केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षेकडे विद्यार्थी आकृष्ट होतात. याचा दुसरा अर्थ असा आहे की , साधी नोकरी मिळविण्याची संधी आणि क्षमता नसलेले बहुसंख्य विद्यार्थी उमेदीची वर्षे आणि पालकांचे लाखो रुपये लावून केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षेचा जुगार खेळतात. आमची नैतिकता एवढी सोयीची आहे की क्रिकेटच्या सट्टेबाजीची आम्हाला प्रचंड चीड, पण उमेदीची वर्ष वाया घालवत यु पी एस सी चा जुगार खेळणाऱ्यांचे भारी कौतुक ! विद्यार्थ्यांची , पालकांची , शिक्षकांची आणि शैक्षणिक धोरण आखणाऱ्याची मानसिकता बदलण्याची गरजच यातून अधोरेखित होते. 


शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षा अर्थहीन आणि उपयोग शून्य झाल्या आहेत हे आधी सर्व संबंधितानी लक्षात घेतले पाहिजे. अगदी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या १२ वी च्या परीक्षेचा  उपयोग महाविद्यालयीन प्रवेशासाठी तेवढा उरला आहे. तंत्रशिक्षण , वैद्यकीय शिक्षण किंवा तत्सम व्यावसायिक शिक्षणासाठी वेगळ्या प्रवेश परीक्षा आहेत. मुळात विद्यार्थ्यांचा कल , आवड हेच १२ वी पर्यंतच काय पदवी पर्यंत स्पष्ट होत नाही , तो होवू दिला जात नाही ही खरी अडचण आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता , आवड आणि कल शालेय शिक्षण घेताना स्पष्ट व्हावा किंवा त्याचे निदान व्हावे अशी कोणती व्यवस्था आम्हाला विकसित करता आलेली नाही. विद्यार्थ्यांच्या डोक्यात ज्ञानाच्या नावावर कचरा भरण्याचे उद्योग आम्ही बंद करीत नाहीत तो पर्यंत ना आम्हाला विद्यार्थ्यांचे बालपण टिकविता येणार आणि ना तरुणात चैतन्य निर्माण करता येणार. मेंढराच्या कळपा सारखे विद्यार्थी आणि पालक त्या त्या वेळी ज्या शाखांची चलती आहे त्यामागे धावत राहणार. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने जग क्षणाक्षणाला बदलू लागले आहे. बदलत्या जगाचा वेध घेण्याची क्षमता आम्हाला विद्यार्थ्यात विकसित करता आली नाही तर आजची आंधळी कोशिंबीर तशीच चालू राहील. बदलत्या जगा सोबत आम्हाला बदलता येणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता , आवडी आणि कल लक्षात येणारे शिक्षण मिळाले पाहिजे आणि त्यानुसार पुढे जाण्याचे स्वातंत्र्य देणारी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षणात आत्मा ओतता आला पाहिजे. आज आहे तो शिक्षणाचा निव्वळ सांगाडा आणि बाजार . उद्यमशीलता सर्वाधिक महत्वाची असताना आपल्या शिक्षणातून तीच गायब आहे. उद्यमशीलतेची प्रेरणा आणि महत्व बिम्बविण्याला महत्व न दिल्यानेच लोंढ्याने सुखासीनतेच्या मागे धावणारे विद्यार्थी तयार होत आहेत. सुखासीनतेची ओढ वाईट नाही. उद्यमशीलता हाच सुखासीनतेकडे नेणारा राजमार्ग आहे आणि हाच राजमार्ग दाखविण्यास शिक्षण व्यवस्था अपयशी ठरली आहे. म्हणून आज आय आय टी आणि यु पी एस सी चा संसर्गजन्य रोग शिक्षण व्यवस्थेत पसरला आहे. तरुणाईला पोखरणाऱ्या या रोगावर इलाज केला नाही तर जगातील सर्वात तरुण देश असण्याचा काही एक फायदा देश पुढे जाण्यासाठी होणार नाही.


------------------------------------------------------------------------------ 
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ 

मोबाईल - ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------------------------------

1 comment:

  1. तुम्ही एका अत्यंत गंभीर समस्येला हात घातला आहे.स्वातंत्र्योत्तर काळात भारताची अनेक बाबीत दुर्दैवी पीछेहाट झाली, सर्व कृती अर्थशरण झाल्या. नैतिक मूल्ये ढासळली. या सगळ्या ऱ्हासाच्या मुळाशी एक गोष्ट असावी, ती म्हणजे आपण शिक्षणाकडे केलेली डोळेझाक. शिक्षणाचे सुलभीकरण आणि त्याचे सार्वत्रीकरण ही उद्दिष्टे ऐकायला गोड, तत्त्वतः योग्य वाटली तरी त्याचा अतिरेक झाला तर त्याची परिणती अशी होते की शिक्षणाचा मूळ हेतूच नष्ट व्हावा. त्यामुळे आज आपल्याकडे विद्यापीठातील अभ्यासक्रमांचा दर्जा जागतिक स्तरावर कमी पडतो. कित्येक अशास्त्रीय विषय विद्यापीठीय पातळीवर अभ्यासक्रम म्हणून शिकवले जातात. हे शिक्षण विद्यार्थ्यामध्ये शास्त्रीय दृष्टीकोन निर्माण करू शकत नाही. आपला विद्यार्थी शिक्षणाची सुरुवात नको इतक्या लहान वयात करतो, पण अंतिम गुणवत्तेत मात्र कमी पडतो, त्यासाठी त्याला परदेशाची वाट धरावी लागते.आपल्या (आणि जगात इतरत्रही सर्वत्र कदाचित अशीच परिस्थितीत असावी) अभ्यासक्रमात नैतिक मूल्यांचे संवर्धन करण्याची क्षमता नाही. त्यामुळे शिक्षणातून एकवेळ नुसते तंत्रज्ञ निर्माण होतात, ती चांगली माणसेही असतील याची खात्री देता येत नाही. नैतिकतेचे पाठबळ नसणारी प्रगती अंतिमतः विनाशाकडे नेते. ही नैतिकता कशी निर्माण करावी? प्रचलित शिक्षण पद्धती या संदर्भात अपुरी आहे.
    शिक्षण क्षेत्राबाबत मूलगामी विचाराची गरज आहे. हे कधी होईल?

    ReplyDelete