Friday, June 24, 2016

जाती - धर्माची आणीबाणी

इंदिराजींनी देशात आणीबाणी लागू केली त्या घटनेला ४१ वर्षे पूर्ण झाली आहेत. ती राजकीय आणीबाणी होती. पण तेव्हाही आणि आताही जाती-धर्माच्या आणीबाणीत मोठा समाज समूह राहात आला आहे. राजकीय स्वातंत्र्याचा उपयोग अशा विविध क्षेत्रातील आणीबाणीस आळा घालण्यास न झाल्यानेच राजकीय स्वातंत्र्य धोक्यात आले होते. ही परिस्थिती बदलली नाही तर राजकीय स्वातंत्र्य पुन्हा केव्हाही धोक्यात येईल. किंबहुना अशा संकटाचे काळे ढग जमा होताना दिसत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------

तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या अनपेक्षित आणीबाणीला आज ४१ वर्षे पूर्ण होत आहेत. नव्या पिढीला आणीबाणी , तिचे स्वरूप आणि परिणामाची कल्पना असण्याचे कारण नाही. इसविसनपूर्व इतिहास विद्यार्थ्यांच्या माथी मारण्यात धन्यता मानणाऱ्या आमच्या शैक्षणिक व्यवस्थेला आधुनिक काळातील ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेण्यात रस नसतो. आधुनिक इतिहास लिहावा लागतो. तो लिहिण्याचे कष्ट घेण्यापेक्षा कोणीतरी लिहून ठेवलेले समोर करणे सोयीचे ठरते. त्यामुळे आणीबाणी सारख्या घटनेचे गांभीर्य नव्या पिढीला नाही. स्वातंत्र्य हे जन्मसिद्ध असते अशी या पिढीची भावना आहे .  ते मिळविण्यासाठी , टिकविण्यासाठी काही करावे लागते हे त्यांच्या ध्यानीमनी नाही. आतातर इसवीसनपूर्व लिहिलेला इतिहासच नाही तर अगदी वेदकाळात नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे देशाला जगातील महासत्ता बनविण्याचा घोष सुरु आहे तर दुसरीकडे समाजाला वेदकाळाकडे घेवून जाण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशाच्या प्रगतीचा , देशाला महासत्ता बनविण्याचा मार्ग हा स्वातंत्र्य आणि लोकशाही व्यवस्थेतून जात असतो हे आम्हाला समजले नसण्याचा हा परिणाम आहे . इंदिराजींनी लादली होती ती राजकीय आणीबाणी होती. सामाजिक , धार्मिक ,आर्थिक आणीबाणी तर आधीपासून होतीच. सामाजिक ,आर्थिक , धार्मिक आणीबाणी विरुद्ध लढण्यासाठीच राजकीय स्वातंत्र्य हवे असते. दुर्दैवाने देशात अस्तित्वात असलेल्या आर्थिक ,सामाजिक आणि धार्मिक आणीबाणी विरुद्ध लढण्यासाठी राजकीय स्वातंत्र्याचा फारसा उपयोग आम्ही केला नाही. स्वातंत्र्य लढ्यातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा आणि आणीबाणी विरुद्धच्या लढाईतून मिळालेल्या स्वातंत्र्याचा देखील असा उपयोग झाला नाही. त्यामुळे स्वातंत्र्य ही मुठभर लोकांची चैन आहे ही भावना निर्माण झाली. सर्वप्रकारच्या आणीबाणीतून मुक्तीसाठी स्वातंत्र्याचा वापर झाला असता तर अशी भावना निर्माण झाली नसती. जे स्वातंत्र्य उपभोगत होते त्यांचेच स्वातंत्र्य आणीबाणीने धोक्यात आणले होते. जाती-धर्माच्या आणीबाणीत तर बहुतांश समाज आधीपासून जगत आला आहे. आजही परिस्थिती फार बदलली असे म्हणता येत नाही. उलट अघोषित धार्मिक आणीबाणी लादण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत हे दर्शविणाऱ्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
अल्पसंख्यांक ख्रिस्ती , मुस्लिम किंवा बौद्ध समूहाला असुरक्षित वाटत असेल तर ती एक प्रकारची धार्मिक आणीबाणीच समजली पाहिजे. अशी असुरक्षितता वाढीस लागली आहे आणि ते लोक यास कारणीभूत ठरत आहेत ज्यांची मुस्कटदाबी इंदिराजींच्या आणीबाणीने केली होती. अल्पसंख्यांका विरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य आणि कृतींची बरसातच संघपरिवाराकडून होवू लागली आहे जो आणीबाणीचा भुक्तभोगी राहिला आहे. ज्यांनी आणीबाणी भोगली तेच दुसऱ्या समाजासाठी आणीबाणीची परिस्थिती निर्माण करीत आहे याचा अर्थ आणीबाणी विरुद्ध लढूनही त्यांना स्वातंत्र्याचा ना अर्थ कळला ना मोल. एकचालकानुवर्ती मानसिकतेत संघस्वयंसेवकाची जडणघडण होत असल्याने त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ आणि मोल उमगले नसावे. अन्यथा आणीबाणी नंतर संघाच्या कार्यपद्धतीत मुलभूत बदल झाले असते आणि आज आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यात त्यांचे हात रक्ताळले नसते. अर्थात संघ ही काही स्वातंत्र्य आणि लोकशाही प्रेमी संघटना नाही. त्यांना इंग्रजांचे राज्यही मान्य होते आणि इंदिराजींची आणीबाणी देखील. इंदिराजींनी दिसला स्वयंसेवक टाक तुरुंगात हे धोरण अवलंबिले होते व त्यामुळेच आणीबाणी विरुद्धचा संघर्ष संघावर लादल्या गेला. तत्कालीन सरसंघचालकांनी आणीबाणीत देशाला शिस्त लावण्याचे जे प्रयत्न चालविले त्याबद्दल मुक्तकंठाने तुरुंगातून पत्रे लिहून इंदिराजींचे कौतुक केले होते. तरीही इंदिराजींना पाझर फुटला नाही आणि आणीबाणी विरुद्ध लढण्याची भूमिका संघावर लादल्या गेली. त्यामुळे संघ हिंदुत्ववादी असण्यापेक्षा स्वातंत्र्यवादी म्हणून ओळखला जावू लागला व जो हिंदू समाज त्याच्या हिंदुत्ववादी ओळखीमुळे दूर होता तो संघाच्या जवळ आला. संघाला समाजमान्यता खऱ्या अर्थाने मिळाली ती आणीबाणीमुळे. ज्यांच्या सरकार विरोधी आंदोलनाने आणीबाणी लादण्याचे निमित्त मिळाले त्या लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्यामुळे संघाला प्रतिष्ठा आणि समाजमान्यता मिळाल्याचे अनेक राजकीय विश्लेषक मानत असले तरी गरज नसताना आणीबाणी विरोधी समूहात संघाला ढकलून समाजमान्य होण्याची संधी इंदिराजीनीच उपलब्ध करून दिली हे काही खोटे नाही. संघ कधी स्वातंत्र्यवादी नव्हताच त्यामुळे आज ज्या प्रकारे धार्मिक आणीबाणी निर्माण करण्यास संघ हातभार लावत आहे ते फारसे अनपेक्षित म्हणता येणार नाही. मात्र जे स्वातंत्र्यवादी समूह आणीबाणी विरुद्ध लढले त्यांनी तरी कुठे धार्मिक मूलतत्ववादातून निर्माण होणाऱ्या आणीबाणी विरुद्ध डोळसपणे लढाईची आखणी केली. धार्मिक मूलतत्ववादातून होणाऱ्या स्वातंत्र्याच्या पायमल्ली विरुद्ध स्वातंत्र्यवादी समूहाने देखील कोणतीच रणनिती आखून कार्य केले नाही. त्यामुळे आजच्या परिस्थितीला फक्त संघाला जबाबदार धरून चालणार नाही. आणीबाणी विरोधी लढलेल्या अन्य स्वातंत्र्यवादी समूहांच्या निष्क्रियतेला आजच्या परिस्थिती बद्दल जास्त जबाबदार धरले पाहिजे.
जी परिस्थिती धार्मिक बाबतीत तीच जातीच्या बाबतीत. सैराट चित्रपटाच्या प्रदर्शना नंतर समाजमाध्यमात उमटलेल्या प्रतिक्रिया जात वास्तव आणि जातींच्या दाहकतेची , जाती जातीत उभ्या असणाऱ्या भिंतीची आणि भीतीची जाणीव करून देणाऱ्या आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर जातीच्या भिंती पाडण्याचे काम बंदच पडले. त्याऐवजी जातींची तटबंदी मजबूत करण्याचेच काम वाढले. अशी तटबंदी स्वातंत्र्य विरोधी असताना स्वातंत्र्यवादी समूहाने तिकडे दुर्लक्षच केले आहे. स्वातंत्र्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज बाबासाहेबांना होता. त्यामुळेच त्यांनी आधी जात मुक्ती आणि मग स्वातंत्र्य अशी भूमिका घेतली होती. स्वातंत्र्यवादी समूहाने जातीनुकुल भूमिका घेतली नसली तरी जात निर्मूलनाचे कार्यही हाती घेतले नाही या वास्तवाने बाबासाहेबांच्या मताची पुष्टीच होते. बऱ्याच अंशी दारिद्र्य कमी होवून आर्थिक आणीबाणी कमी झाल्याचे चित्र दिसते हे खरे. पण याचे श्रेय स्वातंत्र्यवादी समूहाच्या डोळस प्रयत्नांना देता येणार नाही. परिस्थितीच्या रेट्याने आर्थिक उदारीकरण - जागतिकीकरण स्विकारावे लागले आणि त्यातून अर्थकारणात मोकळीक येवून आर्थिक आणीबाणी कमी होण्यास मदत झाली. स्वातंत्र्याचा उपयोग स्वातंत्र्य हे मूल्य जपणारा समाज निर्माण करण्यासाठी करायचा असतो याचे भान स्वातंत्र्यवादी समूहात नाही. त्यामुळे त्यांचा आणीबाणी विरुद्धचा संघर्ष वाया गेला असेच म्हणावे लागेल. कारण जाती-धर्मा पलीकडचा विचार करणारा समाजच स्वातंत्र्याचा मूल्य म्हणून स्विकार करू शकतो. उदारीकरणामुळे आर्थिकक्षेत्र आणीबाणी विरुद्ध उभे राहण्याच्या स्थितीत आहे. जाती-धर्माचे क्षेत्र मात्र नव्या आणीबाणीला जन्म देण्या इतके घातक आणि स्फोटक बनत चालले आहे. इंदिराजींच्या आणीबाणी विरुद्ध यशस्वीपणे लढलेल्या सर्व स्वातंत्र्यवादी पक्ष आणि समूहाचे हे दारूण अपयश आहे.
-----------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment