Thursday, March 2, 2017

भाजपच्या यशाचे रहस्य !

राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने भरघोस यश मिळविले आहे. या यशामागे सत्ता-संपत्ती आणि मुख्यमंत्र्यांची स्वच्छ प्रतिमा आहे हा ढोबळमानाने काढण्यात येत असलेला अर्थ अगदीच चुकीचा नसला तरी विजयामागे तेवढेच कारण नाही. स्वत: सत्तेचा 'त्याग' करून दुसऱ्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याचा भाजपचा गुण त्याच्या मोठ्या विजयास कारणीभूत ठरला आहे.
------------------------------------------------------------------------------


राज्यात झालेल्या नगर पंचायत , नगर परिषद , महानगर पालिका , पंचायत समिती , जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीत भाजपने चढत्या क्रमाने भरघोस यश मिळविले आहे. महाराष्ट्रावर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले असे आजच म्हणता येणार नाही , मात्र या निवडणुकांनी निर्विवाद वर्चस्व मिळविण्याचा पाया नक्कीच रचला आहे. या निवडणुकात भाजपचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांची संघटनात्मक स्थिती पाहता त्यांनी वेळीच आपल्यात सुधारणा करून भाजपचा वारू रोखण्याचा प्रयत्न केला नाही तर या तिन्ही पक्षाची अवस्था  'शेतकरी कामगार पक्षा' सारखी झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्यातील कार्यकर्ते ओढून नेले आणि जनाधार नसताना भाजपने निवडणुका जिंकल्या अशा भ्रमात हे पक्ष राहिले तर त्यांच्या पाया खालची वाळू कधी घसरेल याचा त्यांना पत्ता देखील लागणार नाही. इतर पक्षातील कार्यकर्त्याच्या बळावर सध्याचा विजय भाजपने मिळविला हे खरे असले तरी या कार्यकर्त्यांचा जनाधार पुढे भाजपचा जनाधार बनू शकतो हे विसरून चालणार नाही. उद्या केंद्रात आणि राज्यात सत्ता परिवर्तनाची चाहूल लागली तर भाजपकडे वळलेले कार्यकर्ते , नेते स्वगृही किंवा दुसऱ्या बलशाली पक्षात जातील. पण पुन्हा पलटी खाण्याच्या या प्रयत्नात या कार्यकर्त्यांनी आपली विश्वासार्हता गमावलेली  असेल. अशा अविश्वासार्ह कार्यकर्त्या सोबत त्यांनी भाजपकडे वळविलेला जनाधार पूर्णपणे त्यांच्या सोबत जाणार नाही. बऱ्याच प्रमाणात हा जनाधार भाजपचा आधार बनतो. भाजपच्या पक्षवाढीची कारणे नीट समजून घेतल्याशिवाय या पक्षाला निवडणूक मैदानात रोखण्याची रणनीती यशस्वी होणार नाही. सत्तेच्या प्रभावाने आणि पैशाचा वापर करून आणि मतदान यंत्रात फेरफार करून  भाजपने हे यश मिळविले असे इतर पक्ष समजत असतील तर ती त्यांची घोडचूक  ठरेल. सत्ता आणि त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या सुविधा याचा काही अंशी विजयात हातभार लागला हे मान्य केले तरी विजया मागची खरी कारणे  ती नाहीत याची स्पष्टता असेल तरच भाजपच्या विजयाचा अर्थ लावता येईल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भाजपच्या वाढीस कारणीभूत आहे अशी समजूत आहे. भाजपच्या वाढीत संघाची भूमिका महत्वपूर्ण आहे यात वाद नाही. परजीवी वनस्पती सारखा भाजप संघाच्या वेलीवर वाढला आहे. भाजपचा जनाधार विस्तारित होण्याच्या मार्गातील खरे तर संघ हा मोठा अडथळा होता. संघ म्हणजे जातीयवादी, संघ म्हणजे धर्मवादी अशी मान्यता असल्याने सर्वसामान्य लोक संघ आणि त्यांचा पक्ष म्हणून जनसंघ-भाजप पासून दूरच राहात आलेत. संघाबद्दलच्या मतप्रवाहाचा दीर्घकाळ जनसंघ-भाजपला फटका सहन करावा लागला . केवळ मुस्लिम विरोध हाच संघ-भाजप वाढीचा दीर्घकाळ आधार राहिला . निव्वळ मुस्लिम विरोधाच्या टॉनिकवर चौफेर वाढ शक्य नाही त्यासाठी दुसऱ्या घटकांना सोबत घ्यावे लागेल याची जाणीव झाल्यावरच खऱ्या अर्थाने जनसंघ -भाजप वाढीची सुरुवात झाली. अशा विस्तारात सर्वात मोठी अडचण होती ती संघ आणि जनसंघ किंवा भाजपच्या नेत्यांना जनतेत स्थान नसण्याची. यासाठी त्यांनी जनतेत स्थान असणाऱ्या नेत्यांसोबत जाण्याचा मार्ग पत्करला. सुरुवातीच्या काळात सर्वत्र काँग्रेसचा प्रभाव होता. तरीही काँग्रेसचा विरोध करणारे संघ-जनसंघा व्यतिरिक्त अनेक पक्ष आणि गट सक्रिय होते. या काँग्रेसविरोधी गटाना गळाला लावत संघाने जनसंघाच्या वाढीचा मार्ग खुला करून दिला. संघ-जनसंघाच्या गळाला पहिला मोठा मासा लागला तो म्हणजे डॉ. राममनोहर लोहिया आणि त्यांचा समाजवादी पक्ष. नेहरू नंतर काँग्रेसच्या पराभवासाठी आतुर लोहियांनी उत्तर प्रदेशात जनसंघाशी हातमिळवणी केली आणि उत्तरप्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक राजकीय प्रभाव असलेल्या राज्यात जनसंघाला हातपाय पसरविण्यास मदत केली. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनातील सहभागाने  संघ-जनसंघाला  देशव्यापी आधार, मान्यता, प्रतिष्ठा आणि राजकीय पक्षासाठी प्राणवायू असलेली सत्ता मिळवून दिली.


प्रत्येक राज्यात काँग्रेस विरोधी पक्षांशी म्हणतील त्या अटीवर हातमिळवणी करायची आणि त्या त्या राज्यात हातपाय पसरवायचे ही भाजपची रणनीती राहिली आहे. काँग्रेस विरोधी पक्षांना काँग्रेसच्या शक्तिशाली संघटनेशी लढण्यासाठी भाजप आणि त्याच्या पाठीशी असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन उपयोगी वाटत होते. त्यामुळे संघ-भाजपच्या मदतीने काँग्रेसचा मुकाबला ही रणनीती सगळ्याच राज्यात अवलंबिली गेली. याचा तात्कालिक आणि अल्पकालीन फायदा त्या-त्या राज्यातील पक्षांना नक्कीच झाला. भाजपकडे असलेल्या संघ संघटन शक्तीच्या बळावर भाजपचा मात्र दीर्घकालीन फायदा झाला. भाजपच्या बळावर अनेक काँग्रेस विरोधी पक्षांनी राज्या-राज्यात सत्ता मिळविली, उपभोगली आणि शेवटी भाजपनेच त्यांना जमिनीवरही आणले. त्यातील काहींना पोटात घेतले तर काहींना जमिनीत गाडले ! महाराष्ट्राकडे पाहिले की भाजपच्या यशाचे रहस्य चटकन लक्षात  येईल. जनसंघाच्या काळात हा पक्ष महाराष्ट्रातील सर्वात छोटा पक्ष होता. समाजवादी, शेकाप आणि कम्युनिस्ट हे तिन्ही पक्ष जनसंघापेक्षा वरचढ होते. लोहियांनी मार्ग दाखवून दिल्याने समाजवाद्यांना काँग्रेस विरोधात जनसंघाची साथ घेण्यात अडचण गेली नाही. १९७७ च्या आधी समाजवादी-जनसंघ एकत्रितपणे काँग्रेस विरोधात लढत होते. १९७७ नंतर समाजवाद्यांच्या गळाला शरद पवार लागले आणि महाराष्ट्रात पुलोदचा प्रयोग सुरु झाला. पुलोद मध्ये पवारांचे लांगुलचालन करत भाजप वाढला. पुढे शरद पवार काँग्रेसवासी झाल्यावर वाढीसाठी भाजप शिवसेनेच्या दारात गेला. शिवसेना - भाजप युतीचे श्रेय बाळासाहेब आणि प्रमोद महाजनांना देण्यात येते. यात प्रमोद महाजनांची भूमिका कोणती होती तर बाळासाहेबांचा प्रत्येक शब्द झेलण्याची ! बाळासाहेबांनी भाजपची टिंगल केली, खिल्ली उडविली तरी कोणताही स्वाभिमान न दाखविता लाचार हास्य करीत भाजपने शिवसेने बरोबरची युती टिकविली. भाजपला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पाय ठेवायला आणि रोवायला खरी मदत शिवसेनेचीच झाली आणि या मदतीच्या बदल्यात भाजपने बाळासाहेब व शिवसेनेने केलेले सगळे अपमान मुकाटपणे सहन केलेत. शिवसेने पुढे लोटांगण घालत आपले पाय घट्ट रोवलेल्या भाजपने शिवसेनेचे पाय कधी ओढले हे शिवसेनेला देखील कळले नाही. याच मार्गाने देशभरात भाजपने आपला जनाधार वाढवत नेला आहे.


दुसऱ्या पक्षाशी युती करताना केलेला 'त्याग' भाजपच्या पथ्यावर पडला आहे. भाजपने सत्तेसाठी कधी हापापलेपणा केला नाही. युतीतील पक्ष टाकतील त्या तुकड्यावर समाधान मानले. अनेकदा स्वत: सत्ता न उपभोगता दुसऱ्याला सत्ता उपभोगण्यास मदत केली. ७७ साली केंद्रात आलेले मोरारजी सरकार कोसळ्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर अनेक प्रधानमंत्री आले आणि गेले ! सत्ता उपभोगून ते संपले आणि भाजप वाढला. त्याकाळी भाजपच्या पाठिंब्याने औटघटकेचे प्रधानमंत्री झालेल्या चौधरी चरणसिंग यांचा दरारा उ.प्र., हरियाणा, राजस्थान या राज्यात होता. आता त्या पक्षाचे अस्तित्व काही जिल्ह्यापुरते उरले आणि भाजप सर्वत्र पसरला ! विश्वनाथ प्रताप सिंगांचा उदयास्त भाजपनेच घडविला. बाळासाहेब असताना ज्याचे आमदार अधिक त्याचा मुख्यमंत्री हे मुकाटपणे मान्य करणारा भाजप कमी नगरसेवक असताना मुंबईत आमचाच महापौर पाहिजे अशी मिजास दाखविण्याच्या स्थितीत आला आहे. पडते घेत घेत वरचढ कसे व्हायचे याचे तंत्र कोणी आत्मसात केले असेल तर ते भाजपने . आणखी एक मोठा गुण लक्षात घेतल्याशिवाय भाजपच्या वाढीचे गणित उलगडणार नाही. सत्तेच्या बाबतीतील भाजपचा त्याग हा केंद्र व राज्याच्या सत्तेपुरता मर्यादित नाही. अगदी खालच्या कार्यकर्त्या पर्यंत तो झिरपला आहे. आता महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकात पक्षात ऐनवेळी प्रवेश केलेल्याना मोठ्या प्रमाणावर तिकीट देण्यात आले . पक्षाचे अनेक वर्षांपासून काम करीत असलेली तिकीट इच्छुक मंडळी डावलल्या गेली. थोडीशी कुरबुर आणि कुजबुज ऐकायला मिळाली. पण बंडखोरी झाली नाही. दुसऱ्या कोणत्याही पक्षात असे झाले असते तर इच्छुकांनी बंडखोरी करून आपल्याच पक्षाचा पराभव करण्यात धन्यता मानली असती. सत्तेसाठी भाजपात येणारा कार्यकर्ता-नेता सामावून घेण्याची क्षमता , इच्छा आणि हिम्मत फक्त भाजप मध्ये आहे. भाजप वाढीचे हे मोठे कारण आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी मधील अनेक वर्षांपासून सत्तेत असलेली मंडळी आपल्याच पक्षातील दुसऱ्यांना संधी द्यायला तयार नाहीत. अशा सत्तालोलुप नेत्यांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाढीवर मर्यादा आली आहे. साहजिकच सतरंजी उचलून कंटाळलेले कार्यकर्ते सत्तेसाठी दुसऱ्या पक्षात जायला सहज तयार होतात , नव्हे सत्ता मिळविण्याचा तोच एक मार्ग त्यांच्या समोर असतो. अशा सगळ्यांसाठी भाजप आपली दारे उघडी ठेवत असल्याने भाजप वाढतो आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तालोलुपता सोडून नव्या रक्ताला संधी दिल्याशिवाय भाजपचा वारू रोखता येणार नाही हे लक्षात घेतले तरच त्यांच्या पक्षाला भवितव्य आहे.

   --------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि . यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
-----------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment