ज्या मुद्द्यावरून भाजप विरोधकांना नामोहरण करू शकते तो मुद्दा भाजपच्या अंगाला कधीच चिकटत नाही. अंगाला तेल चोपडलेल्या पैलवाना सारखी भाजपची स्थिती आहे. नुसत्या ध्येय धोरणाच्या पातळीवर भाजपचा मुकाबला शक्य नाही. भाजपच्या तोडीची प्रचारयंत्रणा भाजप विरोधकांना उभी करता येणार नाही तोपर्यंत भाजपचा मुकाबला करता येणार नाही हे सर्वच पक्षांनी समजून घेण्याची गरज आहे.
-------------------------------------------------------------------------
उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अपूर्व यशाने सारेच स्तंभित आहेत. भाजपला ही निवडणूक कठीण जाईल असा राजकीय पंडितांचा होरा होता. असा अंदाज बांधण्याचे एक महत्वाचे कारण नोटबंदीचा निर्णय होता. नोटबंदीमुळे रांगेत उभे राहावे लागण्या पलीकडे मध्यमवर्गीयांचे फारसे आर्थिक नुकसान झाले नाही. पण ग्रामीण अर्थव्यवस्थेला याचा फार मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागातून रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या - दुसऱ्या शहरात , दुसऱ्या प्रांतात गेलेल्या - मजुरांना , कारागिरांना आणि कामगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार गमवावा लागला होता. उत्तर प्रदेश अजूनही शेतीप्रधानच आहे. उद्योगाचा वाढ आणि विस्तार नसल्याने स्थलांतरितात उत्तर प्रदेशचे लोक सर्वाधिक संख्येत आढळून येतात. या मुळे भाजपला ही निवडणूक सोपी जाणार नाही व मोदींना मोठा धक्का बसेल असा अंदाज वर्तविला जात होता. पण अशा अंदाजाना धुळीत मिळवत प्रधानमंत्री मोदी यांनी भाजपला पक्षाच्या अपेक्षेपेक्षा आणि अंदाजापेक्षा मोठा विजय मिळवून दिला. नोटबंदीचा तोटा होण्या ऐवजी फायदाच झाल्याचे निवडणूक निकालातून दिसले. भाजपच्या विजयाचे नोटबंदी हे कारण नाहीच , त्याची इतर अनेक कारणे आहेत हे खरे असले तरी नोटबंदीचे अपेक्षित नुकसान भाजपने होऊ दिले नाही हेही तितकेच खरे आहे. याचे मुख्य कारण भाजपची प्रचार यंत्रणा आहे. भाजपची प्रचार यंत्रणा भाजपच्या वाढत्या यशाचे आणि प्रभावाचे महत्वाचे कारण आहे . भाजपचे हे प्रचारतंत्र दुधारी किंवा दुहेरी आहे. एखाद्या मुद्द्यावरून विरोधी व्यक्ती , पक्ष , संघटना याना बदनाम करून जनतेच्या मनातून ते उतरतील एवढी ताकद भाजपच्या प्रचारतंत्रात आहे. ज्या मुद्द्यावरून भाजप विरोधकांना नामोहरण करू शकते तो मुद्दा भाजपच्या अंगाला कधीच चिकटत नाही. अंगाला तेल चोपडलेल्या पैलवाना सारखी भाजपची स्थिती आहे. ज्या मुद्द्यावरून विरोधक गोत्यात येतात त्या मुद्द्यांवर भाजप कधीच घेरला जात नाही. अशी उदाहरणे आपल्याला शेकड्याने पाहायला मिळतील.
-------------------------------------------------------------------------
उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अपूर्व यशाने सारेच स्तंभित आहेत. भाजपला ही निवडणूक कठीण जाईल असा राजकीय पंडितांचा होरा होता. असा अंदाज बांधण्याचे एक महत्वाचे कारण नोटबंदीचा निर्णय होता. नोटबंदीमुळे रांगेत उभे राहावे लागण्या पलीकडे मध्यमवर्गीयांचे फारसे आर्थिक नुकसान झाले नाही. पण ग्रामीण अर्थव्यवस्थेला याचा फार मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागातून रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या - दुसऱ्या शहरात , दुसऱ्या प्रांतात गेलेल्या - मजुरांना , कारागिरांना आणि कामगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार गमवावा लागला होता. उत्तर प्रदेश अजूनही शेतीप्रधानच आहे. उद्योगाचा वाढ आणि विस्तार नसल्याने स्थलांतरितात उत्तर प्रदेशचे लोक सर्वाधिक संख्येत आढळून येतात. या मुळे भाजपला ही निवडणूक सोपी जाणार नाही व मोदींना मोठा धक्का बसेल असा अंदाज वर्तविला जात होता. पण अशा अंदाजाना धुळीत मिळवत प्रधानमंत्री मोदी यांनी भाजपला पक्षाच्या अपेक्षेपेक्षा आणि अंदाजापेक्षा मोठा विजय मिळवून दिला. नोटबंदीचा तोटा होण्या ऐवजी फायदाच झाल्याचे निवडणूक निकालातून दिसले. भाजपच्या विजयाचे नोटबंदी हे कारण नाहीच , त्याची इतर अनेक कारणे आहेत हे खरे असले तरी नोटबंदीचे अपेक्षित नुकसान भाजपने होऊ दिले नाही हेही तितकेच खरे आहे. याचे मुख्य कारण भाजपची प्रचार यंत्रणा आहे. भाजपची प्रचार यंत्रणा भाजपच्या वाढत्या यशाचे आणि प्रभावाचे महत्वाचे कारण आहे . भाजपचे हे प्रचारतंत्र दुधारी किंवा दुहेरी आहे. एखाद्या मुद्द्यावरून विरोधी व्यक्ती , पक्ष , संघटना याना बदनाम करून जनतेच्या मनातून ते उतरतील एवढी ताकद भाजपच्या प्रचारतंत्रात आहे. ज्या मुद्द्यावरून भाजप विरोधकांना नामोहरण करू शकते तो मुद्दा भाजपच्या अंगाला कधीच चिकटत नाही. अंगाला तेल चोपडलेल्या पैलवाना सारखी भाजपची स्थिती आहे. ज्या मुद्द्यावरून विरोधक गोत्यात येतात त्या मुद्द्यांवर भाजप कधीच घेरला जात नाही. अशी उदाहरणे आपल्याला शेकड्याने पाहायला मिळतील.
काही महिन्यापूर्वी 'सर्जिकल स्ट्राईक' करण्यात आला. त्याबाबतीत सरकारचा हा दावा पोकळ तर नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी काहींनी सरकारकडे पुरावा जनतेसमोर सादर करण्याची मागणी केली. तेव्हा सरकार आणि बीजेपी समर्थकांनी हा तर सेनादलावर अविश्वास आहे, देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या जवानांचा अपमान आहे असा कांगावा केला. पुरावा मागणाऱ्यांना सैनिकांचा अपमान केला म्हणून देशाचे शत्रू ठरविण्यात आल्याचे आठवत असेलच. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचार सभेत भाजपा आमदार परिचारक यांनी समस्त सैनिक परिवाराचा घोर अपमान आणि चारित्र्यहनन करणारे विधान जाहीरपणे केले. त्यांच्या विधानाची चर्चाही झाली. पण संघ-भाजपच्या एकही नेत्याने आमदार परिचारकाचा निषेध केला नाही कि जाहीर समज दिली नाही. सगळ्या सैनिकांचा घोर अपमान करणारे केवळ भाजपात आहेत म्हणून सुरक्षित राहिलेत. देशद्रोही ठरले नाहीत. पुणे विद्यापीठात डाव्या विद्यार्थी संघटनांनी या भाजपच्या आमदाराचा निषेध करण्यासाठी निदर्शने केली तेव्हा अभाविपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शकावर हल्ला करून आमदार परिचारक यांचे समर्थन केले. या विधानाने कुठेही संताप निर्माण झाला नाही. उलट भाजपला भरघोस मतदान झाले ! आज परिचारक विधान परिषदेतून निलंबित असले तरी भाजपशी त्यांचा पूर्वीसारखाच संबंध आहे हे जिल्हापरिषदांच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकांतील परिचारक यांच्या सक्रियतेने दाखवून दिले आहे. हेच विधान दुसऱ्या पक्षाच्या एखाद्या आमदाराने केले असते तर या निवडणुकीत भाजपने किती आक्रमक पवित्रा घेतला असता याचा सहज अंदाज बांधता येईल. अजित पवारांनी धरण्यात मुतण्या संबंधी केलेले विधान जाहीर माफी मागितल्यानंतर आणि आत्मक्लेश घेण्यासाठी केलेल्या उपोषणानंतरही चर्चेत आहे आणि त्याचा मोठा राजकीय फटका त्यांना सहन करावा लागला आहे. भाजपचे प्रचारतंत्र किती मजबूत आहे आणि विरोधकांचे प्रचारतंत्र त्याच्या पासंगास सुद्धा पुरणारे नाही हे समजून घेण्यासाठी परिचारक-पवार उदाहरण पुरेसे ठरावे.
महाराष्ट्रात भाजप सत्तेच्या जवळ पोचला त्याचे एक महत्वाचे कारण होते गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांचेवर केलेला हल्लाबोल . शरद पवार यांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचे रंगवून पवारांना खलनायक ठरविण्यात भाजप यशस्वी झाला होता. कुठल्यातरी गुन्हेगाराला विमानात सोबत नेल्याचे प्रकरण मुंडेंनी गाजविले होते. पप्पू कलानी यांच्याशी संबंध असण्यावरून वातावरण तापविण्यात आले होते. काँग्रेसचे गुन्हेगारी जगताशी संबंध आणि आपला पक्ष साफसुथरा अशी प्रतिमा निर्माण करण्यात मुंडेंनी यश मिळवून भाजपला सत्तेचा वाटा मिळवून दिला. आज हाच भाजप गुन्हेगारी आणि भ्रष्ट प्रतिमा असलेल्याना आपल्या पक्षात प्रवेशच नाही तर निवडणुकीत उभे करून निवडून आणू लागला आहे. पारदर्शकतेचा अति आग्रह धरणारे मुख्यमंत्री अशा लोकांना व्यासपीठावर आपल्या शेजारी बसवून घेतल्या नंतरही मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळत नाही. उलट मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेने निवडणुकीत विजय मिळवून दिल्याचा दावा केला जातो. जे आरोप भाजपेतर नेत्यांना आणि पक्षांना सहज चिकटतात आणि सर्वसाधारण जनता त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते तेच आरोप भाजपला चिकटत नाहीत. काँग्रेस खासदार आणि मंत्री असलेल्या सुनील दत्त यांच्या चिरंजीवाचे एके ४७ रायफल प्रकरण आठवा. मुंबई बॉम्बस्फोट घटनेच्या वेळच्या या प्रकरणाने शिवसेना - भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला होता. काँग्रेस खासदाराचा मुलगा असलेल्या संजय दत्तला काँग्रेस राजवटीत जामीन मिळाला नाही. काँग्रेस सरकार तर्फे जामीनाला कोर्टात विरोध करण्यात आला होता. शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यावर शिवसेना प्रमुखाच्या सांगण्यावरून संजय दत्तला जामीन मिळाला. त्यावेळी गृहमंत्री होते गोपीनाथ मुंडे ! काँग्रेस राजवटीत संजय दत्तचा गुन्हा देशद्रोहाचा होता , हाच गुन्हा युतीच्या राजवटीत बालिशपणातून घडल्याचे सांगण्यात आले. संजय दत्तला जामीन मिळवून देण्याने भाजपच्या प्रतिमेवर कोणताच डाग लागला नाही. सत्तेत येण्यापूर्वी समुद्रात बुडवायची घोषणा ज्या दाभोळच्या वीज प्रकल्पाबद्दल करण्यात आली त्याचे पुनर्वसन निवडून आल्यावर भाजप-शिवसेना युतीने केले. पुनर्वसनात भ्रष्टाचार झाला हा आरोप काही भाजपला चिकटला नाही. इथेही वीज मंत्री गोपीनाथ मुंडेच होते ! संजय दत्त किंवा दाभोळ प्रकल्पाच्या बाबतीत महत्वाची भूमिका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती हे खरे, पण या दोन्ही प्रकरणात भाजपने तत्वनिष्ठ भूमिका न घेता सत्तेला चिकटून राहणे पसंत केले. तरीही भाजपची प्रतिमा तत्वनिष्ठ पक्षाची राहिली. निवडणूक प्रचारात भ्रष्टवादी पक्षाचे प्रमुख म्हणून पवारांवर टीका आणि तेच पवार निवडणुकीनंतर मोदींचे राजकीय गुरु असल्याचे सांगितले जाते. गंमत म्हणजे यातही मोदीजींची विश्वासार्हता कमी होत नाही. विश्वासार्हता कमी होते ती शरद पवारांची आणि त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसतो. भाजपच्या प्रचार तंत्राचे हे यश आहे !
५५ कोटीच्या दलालीचे बोफोर्सचे भूत काँग्रेसच्या मानगुटीवरून भाजपने कधीच उतरू दिले नाही. ज्या बोफोर्स वरून विश्वनाथप्रताप सिंग राजीव गांधी सरकार बाहेर पडले आणि भाजपच्या पाठिंब्याने प्रधानमंत्री झाले त्याकाळात बोफोर्स चौकशीत प्रगती झाली नाही. नंतर वाजपेयींचे ६ वर्षे सरकार होते . त्याकाळात बोफोर्सचा उलगडा झाला नाही. ३ वर्षाची मोदी राजवट झाली. बोफोर्स वर नवा प्रकाशझोत नाही. तरी काँग्रेसला बोफोर्सचा डाग घट्ट चिकटला. बोफोर्स दलालीत अभिनेते अमिताभ बच्चन यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा भाजपचा आरोप होता . या आरोपाने व्यथित बच्चन यांनी काँग्रेसची खासदारकी सोडली होती. ते अमिताभ बच्चन मोदी सरकारच्या सर्व योजनांच्या जाहिरातीत मानाने मिरवतात. त्या घोटाळ्यात बच्चन आणि त्यांचे छोटे बंधू यांचे नाव होते हे लोक विसरून देखील गेलेत. विसरले नाही ते दलाली घेण्यात राजीव गांधींचा संबंध होता हा भाजपचा आरोप. कोणालाही कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे आणि कोणाला त्या पिंजऱ्यातून बेदाग बाहेर काढायचे हे भाजपच्या प्रचार यंत्रणेच्या हातचा मळ आहे. मनमोहन काळातील हेलिकॉप्टर घोटाळ्या विषयी भाजपने असेच रान पेटविले होते. या घोटाळ्यात तत्कालीन नौदल प्रमुखाला सीबीआयने अटक केली. निवृत्तीनंतर हे नौदल प्रमुख दिल्लीत संघाची एक संस्था चालवितात. सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल यांचे ते निकटवर्ती समजले जातात. बोफोर्स पेक्षा कितीतरी अधिक कोटींचा हा घोटाळा. त्यात संघ-भाजपाशी निगडित व्यक्तीला अटक होते पण यामुळे भाजपची प्रतिमा डागाळत नाही. कॅगनी ओढलेल्या ताशेऱ्याने मनमोहन सरकार बदनाम होऊन पायउतार झाले. मोदी प्रधानमंत्री झाल्यावर कॅगने त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी उद्योगपतींना मदत करून सरकारी तिजोरीचा कोट्यवधींचा तोटा केल्याचे ताशेरे ओढले . पण यातील एकाही ताशेऱ्याने मोदींजींची प्रतिमा डागाळली नाही. आत्ता नुकतीच गुजरात विधानसभेत एक माहिती उघड झाली. अदानी याना कच्छ मधील जी जमीन १ रुपया चौरस मीटर दराने देण्यात आली , तिच्या शेजारची जमीन भारतीय तटरक्षक दलाला ३८५८ रुपये प्रती चौरस मीटर दराने दिली. मोदी काळात हा व्यवहार झाला. अशा माहितीचा वापर भाजप ज्या कुशलतेने करीत रान पेटवून जनमानस अनुकूल करून घेते तसे तंत्र काँग्रेससह कोणत्याही विरोधी पक्षाला अवगत नाही. त्यासाठी प्रचारतंत्राची जी उभारणी करावी लागते, ठिकठिकाणी जी माणसे पेरावी लागतात तिकडे इतर पक्षांनी कधी लक्षच दिले नाही. भाजपने प्रचारतंत्रावर मेहनत घेतली आणि आता त्याची फळे त्यांना चाखायला मिळत आहेत.
अर्थात भाजपच्या या प्रचार तंत्राचा कणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राहिला आहे. अलीकडच्या काळात प्रचार तंत्रावर संघाने जे प्रभुत्व मिळविले आहे त्यामुळे कोणाला महात्मा बनवायचे आणि कोणाचा रथ जमिनीवर उतरवायचा ते संघाला उत्तम जमायला लागले आहे. याची तीन ठळक उदाहरणे तर आपल्या समोर आहे. अण्णा हजारे , लालकृष्ण अडवाणी आणि सध्याचे प्रधानमंत्री मोदी ही ती तीन उदाहरणे. राळेगण ते मंत्रालय या मार्गावर पायपीट करणाऱ्या अण्णांना संघाने कोणत्या उंचीवर नेले होते हे आता सगळ्यांनाच माहित आहे. रामलीला मैदानातील मंतरलेल्या त्या १० दिवसात अण्णा महात्मा गांधी पेक्षा मोठे भासत होते. नव्हे माध्यमात तशी चर्चाही होती. तेथून राळेगणला परतलेल्या अण्णांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि आपल्या आंदोलनाचा संबंध नाही म्हणताच त्यांचे मुंबई आंदोलन कसे फसले हे जगजाहीर आहे. त्यानंतर अण्णांना पदमभूषण देऊन विस्मरणात ढकलण्यात आले. संघाच्या मनातून जे उतरतील ते बाजूला पडतात हा अनुभव लालकृष्ण अडवाणींना आला आहे. बाबरी पाडण्याच्या काळात अडवाणीजी भाजपचे सर्वोच्च नेते होते आणि ते म्हणतील ती पूर्व दिशा मानली जात होती. तेच प्रधानमंत्री व्हावेत अशी भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यापासून वरच्या नेत्यांपर्यंत सर्वांची इच्छा होती. त्यांनी वाजपेयीजींना प्रधानमंत्रीपद दिले हा भाग वेगळा. पण अशा सर्वोच्च नेत्याला मोदी उदय व्हावा म्हणून वनवासात जायला भाग पाडणारी हीच कुशल यंत्रणा होती. प्रधानमंत्री मोदी राष्ट्रीय राजकारणात येण्यापूर्वी भाजपच्या नीति निर्धारक व्यासपीठावर कधीच दिसले नाहीत. पक्षाच्या राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत मोदीजींना काहीच स्थान नव्हते. सोशल मीडियावर ३-४ वर्षांपूर्वीच्या एका फोटोची चर्चा होती. नितीन गडकरी अध्यक्ष असतानाच्या अधिवेशनात व्यासपीठावर मोदीजींना स्थान नव्हते. एखाद्या स्वयंसेवकासारखे कुठला तरी निरोप गडकरींना देताना मोदी दिसत होते. एक वर्षानंतर हेच मोदीजी भाजप आणि देशाचे भाग्यविधाते ठरले. मोदींचा हा भाग्योदय कोणी घडवून आणला असेल तर संघ ज्या प्रचार यंत्रणेचा कणा आहे त्या प्रचार यंत्रणेने घडवून आणला आहे. नुसत्या ध्येय धोरणाच्या पातळीवर भाजपचा मुकाबला शक्य नाही. भाजपच्या तोडीची प्रचारयंत्रणा भाजप विरोधकांना उभी करता येणार नाही तोपर्यंत भाजपचा मुकाबला करता येणार नाही हे सर्वच पक्षांनी समजून घेण्याची गरज आहे.
------------------------------ ------------------------------ ------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि . यवतमाळ
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि . यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
------------------------------ ------------------------------ -------
------------------------------
No comments:
Post a Comment