सत्ता मिळविण्याची जिद्द नसलेले नेतृत्व हे कोणत्याही पक्षासाठी ओझे असते. राहुल गांधीच्या रुपात कॉंग्रेस पक्ष हे ओझे वाहत आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील पानिपता नंतर पुन्हा सैन्याची जुळवाजुळव करून लढाईच्या मैदानात उतरणारा सेनापतीच नसल्याने काँग्रेसजन हाय खाऊन घरात बसले होते. राहुल गांधीने मैदानात उतरण्याची तयारी दर्शविणे ही गेल्या ३ वर्षातील पक्षाला दिलासा देणारी सर्वात मोठी सकारात्मक घटना आहे.
------------------------------------------------------------------
तब्बल ३ वर्षानंतर सुस्तावलेला कॉंग्रेसरुपी अजगर पहिल्यांदाच थोडी करवट बदलतांना दिसू लागला आहे. करवट बदलण्याची सुरुवात गुजरात मधील राज्यसभेच्या निवडणुकीपासून झाली. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी विनाकारण प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे विश्वासू सल्लागार अहमद पटेल हे निव्वळ तांत्रिक कारणावरून निवडून आले तरी हा विजय येवू घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला संजीवनी आणि आत्मविश्वास देणारा ठरला. गुजराथ आम्हीच जिंकणार आणि किमान १२५ विधानसभेच्या जागा मिळविण्यासाठी रणनीती तयार करण्याची भाषा पक्षातर्फे केली गेली. अशा प्रकारचा विजयाचा दावा सध्या तरी निराधार आणि हवेतील असला तरी पक्षकार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणारा आहे. लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर स्वबळावर विजय मिळविण्याची भाषा पहिल्यांदा पक्षनेत्यांच्या तोंडी आली हे लक्षात घेतले तर तांत्रिक विजयाचा देखील मनोबलावर कसा परिणाम होतो हे लक्षात येईल. या आधी गोवा विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची कामगिरी चांगली होवूनही सत्ता मिळविण्यात नेतृत्वाला अपयश आल्याने जनतेने दाखविलेल्या विश्वासाचे आत्मविश्वासात रुपांतर झाले नव्हते. गोवा विधानसभेत भाजपपेक्षा चार जागा अधिक जिंकूनही कॉंग्रेसच्या सुस्त आणि निराशेने ग्रासलेल्या नेतृत्वामुळे सत्ता मिळविता आली नव्हती. त्यामुळे खालपासून वर पर्यंत निराशा वाढली होती. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक निकालाने तर आधारासाठी बुडत्याला तिनका देखील सापडत नव्हता. त्यातच बिहार मधील सत्तेतील भागीदारी संपुष्टात आली. बिहार मधील सत्तापरिवर्तन रोखण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडून ठोस प्रयत्न झालेच नाहीत. अशा सगळ्या निराशेत गुजरातमधील राज्यसभेच्या जागेवर अहमद पटेल निवडून आले म्हणण्या पेक्षा अमित शाह तोंडावर आपटल्याने पक्षनेतृत्वाला स्फुरण चढले. नुकतेच राहुल गांधी परदेशात जे आणि जसे बोलले त्याची भारतात उमटलेली प्रतिक्रिया पक्षाला सुखद हवेचा झोका देणारी ठरली. पक्षनेतृत्व बोबडे बोल का होईना पण आत्मविश्वासाने बोलू लागल्याचे कॉंग्रेसजनांना दिसले हे कॉंग्रेससाठी दिलासा देणारे ठरले आहे. आणखी एका प्रथमदर्शनी क्षुल्लक वाटणाऱ्या घटनेचा इथे उल्लेख केला पाहिजे . दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसपक्षाच्या एन एस यु आय या विद्यार्थी शाखेला मिळालेले यश. त्याच्या १ दिवस आधी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्या पक्षाच्या विद्यार्थी संघटनांची सरसी झाली होती. संघ-भाजपच्या डोळ्यात कुसळा सारखे खुपणाऱ्या जे एन यु मधील निवडणुकीत डाव्यांचा विजय लक्षणीय असला तरी तो त्यांचा फार आधीपासून बालेकिल्ला राहिल्याने त्या विजयाची नवलाई नाही. दिल्ली विद्यापीठातील विजयाचे महत्व यासाठी आहे की अभाविप या भाजपच्या विद्यार्थी संघटनेचा प्रभाव असलेल्या या विद्यापीठाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या संघटनेला हा विजय तब्बल ४ वर्षानंतर मिळाला आहे. जे एन यु पेक्षा दिल्ली विद्यापीठाचा मतदार संख्येने खूप मोठा आहे. त्यामुळे तरुण वर्गाचा कल दर्शविणारा मानला जातो. हा कल कॉंग्रेसकडे झुकणे हा पक्षाला मोठाच दिलासा समजला पाहिजे.

बर्कले विद्यापीठात राहुल गांधींचे भाषण चर्चेत आल्याने अगदीच अडगळीत गेलेला पक्ष अडगळीतून बाहेर आल्या सारखे पक्षकार्यकर्त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. असे एखाद्या ठिकाणी तेही परकीय भूमीवर केलेले भाषण एवढ्या चर्चेत येण्याचे तसे कारण नव्हते. अर्थात याकामी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मोलाची कामगिरी बजावली . या पक्षाच्या अमित शाह सह अनेक वरिष्ठ नेत्यांनी या भाषणा संदर्भात राहुल गांधीवर जो हल्ला चढविला त्यामुळे हे भाषण लोकांच्या नजरेत भरले. भाजपने एखादी मोहीम आखून या भाषणा संदर्भात हल्लाबोल केल्याने राहुल गांधीचे भाषण सरकारवर हल्लाबोल करणारे ठरले. वस्तुतः सरकारवर हल्लाबोल करणारे ते भाषणच नव्हते. राहुल गांधीचा हल्लाबोल मोदी सरकारपेक्षा स्वपक्षावर अधिक होता. सत्ताधारी नेत्यांनी बालिश आणि अतिउत्साहात प्रतिक्रिया देवून तो हल्ला आपल्यावर ओढवून घेतला. पक्षाचा तुटलेला जनसंपर्क , खुंटलेला जनसंवाद यावर ते बोलले. आपली कमजोर स्थाने आणि मोदींची बलस्थाने यावरही ते बोलले. १० वर्षातील सत्तेतील पक्षाची कामगिरी मांडली तशीच मोदी सरकारच्या 'मेक इन इंडिया' , स्वच्छता अभियान या कल्पनांची तारीफही केली. नोटबंदी व जी एस टी च्या घिसाडघाईवर टीकाही केली. एकंदरीत राहुलचे भाषण संयमित होते. आत्मपरीक्षण अधिक होते. पण नेहमी प्रमाणे भाजपने 'घराणेशाही'वर ते जे बोलले त्यावरच टीका केली. घराणेशाहीची सुरुवात कॉंग्रेस पासून झाली असली तरी आता भाजपमध्ये खालपासून वरपर्यंत घराणेशाहीचे दर्शन घडू लागले आहे. कोणताच पक्ष घराणेशाहीच्या रोगापासून दूर नाही हेच राहुल गांधी तिथे बोलले. त्यावर इथे भाजपने केलेली टीका राहुल गांधीनी घराणेशाही संदर्भात माझ्यावरच टीका का हा उपस्थित केलेला प्रश्न बरोबरच होता हे सिद्ध करणारी ठरली. इथे त्यांचे कोणी ऐकत नाही म्हणून परदेशी बोलतात ही भाजपा पक्षाध्यक्ष अमित शहा राहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी बोलले असले तरी त्यात तथ्य आहे. राहुल गांधी भारतातल्या कुठल्या विद्यापीठात बोलले असते तर त्यावर एवढी चर्चा झालीच नसती. लोकांनी सोडा भाजपने देखील दखल घेतली नसती. मोदीमय झालेल्या आपल्याकडील माध्यमांनी पहिल्यांदाच राहुल गांधीच्या भाषणाची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली त्याचे कारणही ते परदेशात बोलले हेच होते. एरव्ही त्यांच्या भाषणात सनसनाटी असे काहीच नव्हते . जे सनसनाटी होते त्याची दखल ना भाजपने घेतली ना माध्यमांनी. मी येत्या निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करायला तयार आहे , प्रधानमंत्री व्हायला तयार आहे हे पहिल्यांदा राहुलच्या तोंडून निघाले ते या भाषणात. आजवर राहुल गांधीना सत्ता मिळवायची आहे असे वागताना आणि बोलताना कोणी पाहिलेच नव्हते. सत्ता मिळविण्याची जिद्द नसलेले नेतृत्व हे कोणत्याही पक्षासाठी ओझे असते. राहुल गांधीच्या रुपात कॉंग्रेस पक्ष हे ओझे वाहत आला आहे. सत्तेच्या स्पर्धेत उतरण्याची तयारी राहुल गांधी यांनी दाखविणे हे पक्षासाठी महत्वाचे आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील पानिपता नंतर पुन्हा सैन्याची जुळवाजुळव करून लढाईच्या मैदानात उतरणारा सेनापतीच नसल्याने काँग्रेसजन हाय खाऊन घरात बसले होते. सेनापतीने मैदानात उतरण्याची तयारी दर्शविणे ही गेल्या ३ वर्षातील पक्षाला दिलासा देणारी सर्वात मोठी सकारात्मक घटना आहे.
अर्थात कॉंग्रेस पक्षासाठी लढाई अजिबात सोपी नाही. अनेक वर्षाच्या सत्तेने लढायची सवय सुटलेली आहे. पक्षाने कार्यकर्ते घडविणे केव्हाच सोडून दिले होते ते आता नडणार आहे. सत्तेच्या गुळाभोवती जमा झालेले मुंगळे हेच पक्ष कार्यकर्ते म्हणून मिरवत होते. गांधी घराण्याच्या नावावर मते मिळत होती तोपर्यंत कार्यकर्ता नावाची जमात पक्षातून नष्ट होत आहे आणि पक्षात संधीसाधूंचा भरणा होत आहे इकडे लक्ष देण्याची गरज कोणाला वाटली नाही. पक्षातील सगळ्यांनी आपापली काळजी व्यवस्थित आणि नको तितकी घेतली. पक्षाची काळजी घेण्याची गरज मात्र कोणाला वाटली नाही. आपल्या नावावर मते मिळत असल्याने नेतृत्वाला आपणच पक्ष असल्याचा भ्रम होवून पक्षबांधणीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे साठ वर्षे सत्तेच्या वैभवात राहणारा पक्ष सत्ता गेल्यावर एका रात्रीत भिकारी बनला. जिथे भिक जास्त मिळते तिकडे पक्षातील भिकारी चालले आहेत. असा पक्ष उभा करणे सोपे काम नाही. तशी जिद्द आणि क्षमता राहुल गांधीने आजवर कधी दाखविली नाही. आता फक्त त्यांनी लढायची तयारी दाखविली एवढाच काय तो सकारात्मक बदल झाला आहे. कशाच्या बळावर कसे लढणार हा प्रश्न कायम आहे. लढायला सामुग्री मोदी सरकारनेच भरपूर पुरविली आहे. नुसत्या नोटबंदीचा दारुगोळा वापरला तरी भारतीय जनता पक्षाला तोंड लपविण्यासाठी जागा सापडणार नाही. पण हा दारुगोळा वापरण्या इतपत हातात बळ आणि बुद्धिवैभव असावे लागते. कॉंग्रेसकडे त्याचीच कमी आहे. कॉंग्रेस पक्ष सत्तेत असताना नेत्यांचे मोठमोठे बंगले उभे राहिलेत. मोठमोठ्या शिक्षणसंस्था उभ्या राहिल्यात. सहकारी संस्था , सहकारी कारखाने उभे राहिलेत. पण यांनी पक्षासाठी कुठे काय उभे केले असा प्रश्न विचारला तर त्यांना निरुत्तर व्हावे लागेल. भारतीय जनता पक्षाने विरोधात असताना दूरदर्शीपणाने आणि परिश्रमाने कार्यकर्ते घडविण्यासाठी , विचाराला आकार आणि टोक देण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान सारख्या संस्था निर्माण केल्यात. सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी उभे केलेले दिल्लीतील विवेकानंद प्रतिष्ठान या सारख्या संस्था सत्ता परिवर्तनात आणि आता सत्ता टिकविण्यात पक्षासाठी मददगार ठरल्या आहेत. प्रदीर्घ काळ सत्ता भोगणाऱ्या कॉंग्रेसने पक्षाला बळ देणाऱ्या , नियोजन करणाऱ्या , कार्यकर्ते घडविणाऱ्या अशा संस्थाच उभ्या केल्या नाहीत. एका रात्रीतून मोठी परंपरा असलेला हा पक्ष हीनदीन झाला त्याला हे कारण आहे. कॉंग्रेसची सत्ता असताना त्याच सत्तेच्या मदतीने संघपरिवाराच्या संस्था उभ्या राहिल्या , वाढल्या. त्याच कॉंग्रेससाठी पुढे भस्मासुर ठरल्या. माहिती तंत्रज्ञान , संगणक हे कॉंग्रेसच्या प्रयत्नाने भारतात आले आणि विस्तारले . विजयासाठी त्याचा पुरेपूर उपयोग मोदी आणि भाजपने करून घेतला. कॉंग्रेसने पक्षात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोगच करून घेतला नाही. सत्तेत असताना गरज वाटली नाही. आता माहिती तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून भाजप आपल्याला बदनाम करीत असल्याचे रडगाणे ऐकविण्याची केविलवाणी पाळी राहुल गांधीवर आली आहे. कॉंग्रेसकडे सत्ता असताना अशा संस्था उभ्या करणे फार सोपे होते . पण नेत्यांनी स्वत:पलीकडे पक्षाची काळजी कधी केली नाही आणि त्यामुळे अवघ्या तीन वर्षात होत्याचे नव्हते होण्याची पाळी या पक्षावर आली. स्वत: राहुल गांधीनी किंवा त्यांच्या आधीच्या नेतृत्वाने याकडे कधी लक्ष दिले नाही. त्यामुळे पक्ष पुनरुज्जीवनाची वाट अवघड बनली आहे. सरकारच्या चुकांनी परिस्थिती अनुकूल बनत चालली असली तरी तेवढ्याने वाट सोपी बनत नाही. राहुल गांधीनी आजवर वेळ खूप वाया घालविला आहे. आता त्यांच्याकडे फार वेळ नाही. कमी वेळात अवघड वाटेवरून स्वत:च नाही तर पक्षाला सोबत घेवून किती वेगात ते वाटचाल करतात यावर त्यांचे आणि कॉंग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे.
--------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
--------------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
---------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------
मर्मग्राही लेख ! कॉंग्रेसला अच्छे दिन आले तरच देशाला अच्छे दिन येतील हे काही लोकांना झोंबणारे असले तरी काळ्या दगडावरची रेघ आहे !
ReplyDelete