मोदी आणि फडणवीस यांच्या कार्यशैलीत आश्चर्यकारकरित्या साम्य आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्र्याच्या अनेक गोष्टींची नक्कल केली हे खरे असले तरी विरोधकांना गप्पगार करीत मंत्रीमंडळा वरची आपली पकड घट्ट करण्याचे श्रेय फडणवीस यांच्या राजकीय चातुर्यालाच जाते. सरकारवर पकड घट्ट झाली तशी पकड सरकारी यंत्रणेवर निर्माण करता आली नाही हे अपयश देखील त्यांचेच.
-----------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------
केंद्रातील मोदी सरकारला ३
वर्षे पूर्ण झाल्या पाठोपाठ महाराष्ट्रातील फडणवीस सरकारलाही ३ वर्षे पूर्ण झालीत.
केंद्रात कधी भाजपची स्वबळावर सत्ता येईल हे भाजपायीना देखील जसे स्वप्नातही वाटले
नव्हते तसेच महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष बनून भाजपचा मुख्यमंत्री बनेल असे इथेही
फारसे कोणाच्या ध्यानीमनी नव्हते. मोदीलाटेने ती किमयाही केली. सत्ता मिळविण्याचे
श्रेय सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस किंवा राज्यातील इतर नेत्यांना देता येत नाही.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी गोपीनाथ मुंडे यांनी छोट्या पक्षांची आणि नेत्यांची मोट
बांधत निर्माण केलेल्या महाआघाडीला मोदीलाटे सोबत थोडे श्रेय देता येईल. मोदी जसे
स्वकर्तृत्वावर प्रधानमंत्री झाले तसे स्वकर्तृत्वावर मुख्यमंत्री होण्याचे श्रेय
फडणवीस यांना देता येत नाही ही एक भिन्नता वगळली तर मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वात
आणि कार्यशैलीत आश्चर्यकारकरित्या साम्य आढळते. राज्यकारभार चालविताना मुख्यमंत्री
फडणवीस यांनी मोदींच्या अनेक गोष्टींची नक्कल केली हे खरे आहे. पण विरोधकांना
गप्पगार करीत सरकारवरची आपली पकड घट्ट करण्याचे श्रेय फडणवीस यांच्या राजकीय
चातुर्याला द्यावे लागेल. सरकारवर आपली पकड घट्ट केली याचा अर्थ राज्यकारभारावर
पकड निर्माण झाली असे मात्र म्हणता येत नाही. मोदी आणि फडणवीस यांच्यातील हा एक
फरक आहे. मोदीजी ज्या परिस्थितीत प्रधानमंत्री झाले त्यात विरोधाला कुठेच वाव
नव्हता. पक्षातील प्रधानमंत्री पदाचे इच्छुक मोदींनी निर्माण केलेल्या निवडणूक
वावटळीत मुळापासून उखडले गेलेत तसे विरोधीपक्षही कुठल्याकुठे भिरकावल्या गेलेत.
त्यामुळे केंद्रात मोदींच्या एकछत्री अंमलाला सुरुवातीपासूनच विरोध नव्हता.
फडणवीसांचे तसे नव्हते. पक्षात त्यांचे नाथाभाऊ आणि पंकजा मुंडे सारखे दमदार
विरोधक होते. श्रेष्ठींनी निवड करायच्या आधीच या दोघांनीही मुख्यमंत्री पदावर दावा
ठोकला होता. केवळ श्रेष्ठींचे दान फडणवीस यांच्या पदरात पडले म्हणून ते
मुख्यमंत्री होवू शकले. मुख्यमंत्री झाल्यावर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिले
नाही. अवघ्या काही महिन्यात पक्षातील विरोधकांना आणि सत्तेत राहून विरोधी वर्तन
करणाऱ्या शिवसेनेला काबूत ठेवत महाराष्ट्रात स्वत:चा एकछत्री अंमल निर्माण केला. या
बाबतीत विपरीत परिस्थिती असताना त्यांनी मोदींना गाठले आणि नंतर जुळ्या भावात
दिसण्यात जितके साम्य असते तेच साम्य दोघांच्या कार्यशैलीत आढळून येवू लागले. मोदीजी
गाजावाजा करीत जे करू लागलेत तेच फडणवीस स्वत:च्या शैलीत सहजपणे करू लागलेत.
मोदीजीनी ‘मन की बात’ सुरु
केली. फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ सुरु केले. प्रतिमा निर्मितीचे मोदी
तंत्र फडणवीस यांनी राज्यात अवलंबिले. रात्री एखादी घोषणा केली दुसऱ्या दिवशी
घोषणेचे फलक राज्यभरात झळकतील अशी व्यवस्था फडणवीस यांनी केली. राज्यात शेतकरी
आंदोलन सुरु झाले तेव्हा मध्यरात्री काही लोकांशी बोलणी करून कर्जमाफी मान्य करत पहाटे
४ वाजता आंदोलन मागे घेण्याची घोषणा झाली तेव्हा त्याच दिवशी फडणवीसांनी कर्जमाफी
केल्याचे फलक राज्यात अनेक ठिकाणी झळकले होते. आंदोलन सुरूच राहिल्याने नंतर
शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समिती बरोबर वाटाघाटी सुरु राहिल्या. त्या वाटाघाटीच्या
वेगापेक्षा आणि गांभिर्या पेक्षा कर्जमाफीची घोषणा करणारी फलके राज्यभर जास्त
वेगाने आणि जास्त गांभीर्याने लावल्या गेलीत. घोषणांची अंमलबजावणी कशी होते किंवा
होते की नाही याची चिंता न करता घोषणांचा इव्हेंट धुमधडाक्यात करण्याचा मोदी-मंत्र
फडणवीसांनी यशस्वीपणे अंमलात आणला. दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम पात्र
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असा आधी गाजावाजा केला. नंतर पहिला हप्ता म्हणून
४००० कोटी आठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा करण्यात येतील असे
सांगितले. दिवाळीपूर्वी ठिकठिकाणी समारंभ आयोजित करत शेतकऱ्यांना कर्जमाफीची
प्रमाणपत्रे वाटली. ज्यांना प्रमाणपत्रे दिलीत त्यांच्या खात्यातही दिवाळीपूर्वी
पैसे जमा झाले नाहीत. हा सगळा खेळखंडोबा झाला तरी जाहिरातबाजीत या सरकारने कोणतीही
कमी येवू दिलेली नाही. गेल्या तीन वर्षात सरकारने जितके काम केले नाही त्यापेक्षा
अधिक काम ३ वर्षाच्या कामाची जाहिरात करण्यासाठी केले. महाराष्ट्र सरकार आणि स्वत:
मुख्यमंत्री यांच्या आवडीची योजना म्हणून जलयुक्त शिवाराची खूप चर्चा झाली.
महाराष्ट्र जलमय केल्याचा भास निर्माण केला. सरकारला ३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त
जाहिरातीचा जो धुमधडाका सरकारने सुरु केला त्यात सरकारने जलयुक्त शिवारा संदर्भात
शेततळ्याची जी जाहिरात केली त्यातील समोर
आलेले तथ्य लक्षात घेतले तर फडणवीस सरकारने नेमके काय केले हा प्रश्न निर्माण
होतो. ‘मी लाभार्थी’ जाहिरातीची पुणे जिल्ह्यातील जी दोन प्रकरणे समोर आलीत त्याचे
श्रेय पूर्वीच्या सरकारचे होते. सरकारवर पूर्वीच्या सरकारची कामे आपल्या नावावर
खपविण्याची वेळ येत असेल तर सरकारने ३ वर्षात नेमके काय केले हा प्रश्न निर्माण
होतो. जाहिराती खऱ्या की खोट्या याची चर्चा काहीकाळ वृत्तपत्र किंवा समाजमाध्यमात
झाली तरी जाहिराती जो हेतू डोळ्यासमोर ठेवून केल्या जातात त्यावर अशा चर्चेचा
परिणाम होत नाही याची खात्री असल्यानेच सरकारचा कल कामा पेक्षा कामाची जाहिरात
करण्यावर अधिक आहे. सरकार जाहिरातीवर जेवढा पैसा खर्च करीत आहे तेवढ्या पैशात
शेतकऱ्यांना त्यांच्या तुरीचे चुकारे देवून मोकळे करता आले असते. शेतकऱ्यांना
ताटकळत ठेवून सरकार जाहिरातबाजीवर का खर्च करीत बसले यालाही कारण असावे असे या
सरकारच्या कार्यपद्धतीवरून वाटते.
लोकांना सुखासुखी काही दिले
तर त्याची जाणीव राहात नाही अशी या सरकारची भावना असावी. आपण लोकांसाठी अमुक एक
गोष्ट करतो हे ठसविणारी कार्यपद्धती हे या सरकारचे वैशिष्ट्य आहे. ठसविण्याचा एक
भाग तर जाहिरातीचा आहे आणि कमी अधिक प्रमाणात सर्व सरकारे तशी करत आली आहेत. या
सरकारचे वेगळेपण दुसऱ्या गोष्टीत आहे. जी गोष्ट लोकांना द्यायची आहे ती सुखासुखी
द्यायचीच नाही. ती मिळविण्यासाठी कष्ट पडले पाहिजेत आणि मिळविताना आपण काही
पराक्रम करीत आहोत असा आभासी आनंदही त्यांना झाला पाहिजे जेणेकरून ती गोष्ट
त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहील. पीकविमा मिळवायचा राहा रांगेत उभे. कर्जमाफी
मिळवायची राहा रांगेत उभे. रांगही वाईट गोष्ट नाही. पण ज्या गोष्टीसाठी रांगेत उभे
राहण्याची आजवर कधी गरज पडली नाही त्या गोष्टींसाठी फडणवीस सरकारने लोकांना रांगेत
उभे केलेत. पीकविमा आधीही होता आणि कर्जमाफी एकदा नाहीतर दोनदा आधीही झाली होती.
पण त्यासाठी रांगा लागल्यात आणि रांगेत लोकांचा जीव गेला असे कधी झाले नाही . पण
मग त्या सहज मिळणाऱ्या गोष्टी लोकांच्या कुठे लक्षात राहिल्या. आता मात्र पीकविमा
असो की कर्जमाफी याचेशी मोदी आणि फडणवीस यांचा संबंध लोक कधी विसरणार नाहीत !
लोकांना दिवस दिवस रांगेत उभे केलेत तर त्याचा वाईट परिणाम होत नाही , उलट फायदाच
होतो ही मोदीजींच्या नोटबंदीची शिकवण फडणवीस यांनी लक्षात घेतली आणि आपल्या योजनांच्या
अंमलबजावणीसाठी यशस्वीरित्या वापरली. काही तरी मोठे भव्यदिव्य केले तर लोकांच्या
लक्षात राहील ही सुद्धा मोदी आणि फडणवीस यांची समान धारणा. भव्यदिव्य कामाची
स्वत:ची अशी उपयुक्तता नसेल पण लोकांचे डोळे दिपण्यात राजकीय फायदा असतो हे
दोघांनीही अचूक हेरले. गरज नसलेली बुलेट ट्रेन किंवा समृद्धी महामार्ग हा त्याचाच
भाग. प्रत्येक काम लोकांच्या लक्षात राहील असेच निवडायचे आणि त्याच पद्धतीने
करायचे हे मोदी आणि फडणवीस यांचे समान कार्यसूत्र आहे. दोघानाही त्याचे सारखेच
राजकीय लाभ झालेले आहेत. दोघांच्या या कार्यपद्धतीला आव्हान देणारे कोणी उभे राहिले
नाही याचाही फायदा मोदी आणि फडणवीस यांना झाला आहे. कॉंग्रेसच्या संथ आणि एकसुरी
कार्यपद्धतीला कंटाळलेल्या लोकांना मोदी-फडणवीस यांची नवी कार्यपद्धती आकर्षित
करून गेली . आता या कार्यपद्धतीला काय फळ मिळतेय याचा लोक विचार करू लागले आहेत. रसाळ
कार्यपद्धतीला फळे गोमटी येण्याऐवजी झाडाला फळच येत नाही हे दिसू लागल्याने लोकात आता
अस्वस्थतेची बीजे रुजू लागली आहेत. ही अस्वस्थता देश पातळीवर जाणवू लागली असली तरी
प्रधानमंत्र्यापेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांना मिळणारे राजकीय आव्हान खडतर असणार
आहे. मोदींच्या कवचकुंडलांचा प्रभाव ओसरू लागल्याने फडणवीस यांना आपल्या कर्तबगारीवर
लोकांची साथ मिळवावी लागणार आहे. त्यांचा कसोटीचा काळ आता सुरु झाला आहे.
-----------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
-----------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
No comments:
Post a Comment