Thursday, December 7, 2017

राहुल गांधींची कसोटी

२०१४ च्या पराभवानंतर लगेच राहुल गांधीकडे कॉंग्रेसचे अध्यक्षपद आले असते तर आजवरची त्यांची वाटचाल पाहता ते मोदीजी समोर प्रभावी ठरण्याची शक्यता कमी होती. असे झाले असते तर कॉंग्रेसमध्ये अधिक निराशा पसरली असती. आता मोदींच्या शब्दांची जादू ओसरत चालली आहे. लोकांना सरकारविरुद्ध ठाम भूमिका घेवून उभे राहणारे नेतृत्व हवे असताना राहुल गांधींच्या पुढे येण्याने कॉंग्रसची गरज आणि लोकेच्छा याचा सुरेख संगम साधला आहे.
--------------------------------------------------------------------------------

राहुल गांधी कॉंग्रेस अध्यक्ष होणार हे अपेक्षित होते तरीही या संबंधी निर्णय घ्यायला बराच उशीर झाला. सोनिया गांधींची आजारपणामुळे सक्रियता कमी झाल्याने कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाचे संकट होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील जबर पराभवाने कॉंग्रेसला झोपवले होते. गेल्या ३ वर्षात सरकारी धोरणांचे सर्वसामान्य जनतेला चटके बसत असताना लाचारीने बघण्या पलीकडे कॉंग्रेसला काहीच करता आले नाही. नोटबंदीमुळे असंघटीत क्षेत्राची आणि शेतीक्षेत्राची परवड झाली पण त्याविरुद्ध काहीच आवाज उठला नाही याचे कारण प्रमुख पक्ष असतानाही कॉंग्रेस खालपासून वरपर्यंत विस्कळीत झाली होती. राहुल गांधी आज ना उद्या कॉंग्रेस अध्यक्ष होणार हे माहित असल्याने भारतीय जनता पक्षाने राहुल गांधीत अजिबात नेतृत्व गुण नसल्याचे आपल्या प्रचारयंत्रणेतून फार आधीपासून ठसविणे चालू केले होते. हा प्रचार एवढा जबरदस्त होता की, कॉंग्रेस सुद्धा राहुलकडे नेतृत्व सोपवावे कि नाही या संभ्रमात पडली आणि हा संभ्रम अधिकाधिक वाढविण्यात भाजपच्या प्रचार यंत्रणेला यश आल्याने १३२ वर्षाची जुनी कॉंग्रेस नेतृत्वहीन अवस्थेत ३ वर्षे राहिली. विरोध नसण्याचा किंवा विरोधी पक्ष मजबुतीने उभा नसण्याचा फटका जनतेला तर सहन करावा लागला पण याचा सत्तापक्षावर देखील विपरीत परिणाम झाल्याचे ३ वर्षाच्या कारभारानंतर स्पष्ट होत चालले आहे.

 विरोधी आवाज नाही आणि स्वपक्षात तोंड उघडण्याची कोणाची हिम्मत नाही अशा स्थितीत आपण कोणाला उत्तरदायी आहोत ही भावनाच प्रधानमंत्री किंवा सरकारात उरली नाही. कोणत्याही धोरणावर कोणी प्रश्न उपस्थित न करण्याच्या परिणामी चुकीच्या धोरणाने किंवा योग्य धोरणाच्या चुकीच्या अंमलबजावणीने जनतेची ससेहोलपट होत होती. राष्ट्रवादाचा आणि धर्मवादाचा ज्वर निर्माण करून ती ससेहोलपट काही काळ दाबता आली तरी निर्णय घेण्याची व अंमलात आणण्याच्या पद्धतीत सुधारणा न झाल्याने असंतोष उफाळून येणे स्वाभाविक होते. आज गुजरातेत निवडणूकपूर्व असंतोषाचे जे चित्र दिसत आहे त्याचे हेच कारण आहे. विरोधी पक्ष मजबूत असता तर सत्तापक्षाला मनमानी निर्णय घेता आले नसते आणि आज जो असंतोष प्रकट होवू लागला तो अवघ्या तीन वर्षात प्रकट झाला नसता. एक प्रकारे विरोधी पक्षाला उभेच राहू न देण्याची चाल भाजपच्या चांगलीच अंगलट आली आहे. दुसरीकडे राहुलच्या अध्यक्ष होण्यास झालेला विलंब कॉंग्रेसच्या पथ्यावरच पडला आहे. आजवर निवडणुकीच्या राजकारणात राहुलला आपले नेतृत्व सिद्ध करता आल्याने राहुल संबंधी कॉंग्रेसचा संभ्रम भाजपने पद्धतशीर वाढविल्याने हा विलंब झाला. २०१४ च्या पराभवानंतर राहुल गांधीकडे कॉंग्रेसचे अध्यक्षपद आले असते तर आजवरची त्यांची वाटचाल पाहता ते मोदीजी समोर प्रभावी ठरण्याची शक्यता कमी होती. असे झाले असते तर कॉंग्रेसमध्ये अधिक निराशा पसरली असती. त्यामुळे मोदींच्या उभरत्या काळात राहुलचे मोदींच्या विरोधात उभे न राहणे राहुलच्या पथ्यावरच पडले. आता मोदींच्या शब्दांची जादू ओसरत चालली , मोदींना ऐकण्यासाठी सभेला गर्दी करणारे लोक येईनासे झालेत, आलेले मधूनच उठून जावू लागलेत अशा वेळी पुढे येवून राहुलने नेमकी वेळ साधली असे म्हणण्या सारखी परिस्थिती आहे. कॉंग्रेसला नव्या नेतृत्वाची गरज होतीच पण आज लोकांना सरकारविरुद्ध ठाम भूमिका घेवून उभे राहणारे नेतृत्व हवे असताना राहुल गांधींच्या पुढे येण्याने कॉंग्रसची गरज आणि लोकेच्छा याचा सुरेख संगम साधला आहे.
                                                                               २०१९ मध्ये आपल्याला आव्हानच नाही या थाटात वावरणाऱ्या प्रधानमंत्र्याला आणि त्याच्या पक्षाला गुजरातच्या जनतेने राहुल गांधीच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवून जमिनीवर आणले आहे. लोकांचा वाढता पाठींबा मतपेटीत उतरविण्यासाठी पक्षाचे संघटन मजबूत असावे लागते. गुजरातेत कॉंग्रेसचे संघटन मोडकळीस आलेले आहे आणि लोकप्रियता घसरल्याचे साफ दिसत असतानाही भाजपचे पक्षसंघटन मजबूत आहे. वाढती लोकप्रियता मिळविणारा राहुल आणि मोडकळीस आलेला कॉंग्रेसपक्ष एका बाजूला तर तीन वर्षातच लोकप्रियतेत घसरण होत असलेले मोदी आणि त्यांचे निवडणूक जिंकण्यासाठी सर्व साधनांनी युक्त असे मजबूत संघटन असा मुकाबला गुजरातमध्ये होत आहे. अशा परीस्थितीत सरकार बनविण्या इतपत यश राहुल गांधीला मिळाले नाही तरी राहुलचे उभरते नेतृत्व आणि मोदींचे घसरते नेतृत्व अशी जी छाप या निवडणुकीच्या निमित्ताने जनमानसावर पडली आहे त्याचा लाभ राहुल गांधी आणि कॉंग्रेसला होवू शकतो. त्यामुळे पक्षाची स्थिती अत्यंत वाईट आणि दयनीय असताना राहुल गांधीच्या हाती नेतृत्व आले असले तरी नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी काळ मात्र अनुकूल आहे. या संधीचा राहुल कसा उपयोग करून घेतात यावर पक्षाचे आणि त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. राहुलचा पूर्वेतिहास याबाबतीत फारसा चांगला नाही. सरकारात, संसदेत आणि संसदेबाहेर कर्तृत्व दाखविण्याची भरपूर संधी असताना त्या संधीचा लाभ राहुल गांधीनी उचलला नाही. संधी आणि वेळ वाया घालविला. कर्तृत्व दाखविण्याची संधी असताना कर्तृत्व दाखविण्याकडे गंभीरपणे लक्ष न दिल्याने गंभीर राजकारणी अशी प्रतिमा निर्माण झाली नाही आणि असे कर्तृत्व न दाखविता कॉंग्रेस अध्यक्षपदी विराजमान होत असल्याने घराणेशाहीचा आरोप अंगाला चिकटणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळेच भाजपला आधी ‘पप्पू’ आणि आता घराणेशाहीचा लाभार्थी असा आरोप करण्याची संधी मिळाली. गुजरात निवडणूक प्रचाराच्या एक महिन्याच्या काळात लोकांशी संवाद साधताना जी परिपक्वता , जो संयम आणि निग्रह राहुल गांधीने दाखविला त्यामुळे भाजपने बनविलेली ‘पप्पू’ प्रतिमा पुसून टाकण्यात राहुल गांधीने यश मिळविल्याने त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. असेच कर्तृत्व दाखवून घराणेशाहीचा आरोप त्यांना पुसून टाकावा लागणार आहे.

   आजवर गांधी-नेहरू घराण्यातील जवळपास सर्वानीच अध्यक्षपद भूषविले हे खरे, पण राजीव गांधी आणि आता राहुल गांधी हे दोघेच असे आहेत ज्यांना कर्तृत्वाच्या बळावर  अध्यक्षपद मिळाले आहे असे म्हणता येत नाही. बाकी सर्व अध्यक्ष झालेत ते आपल्या कर्तृत्वामुळे. संघ-भाजप परिवार नेहरू द्वेषाने ग्रस्त असल्याने कॉंग्रेस म्हणजे या घराण्याची जहागिरी असे भासवीत असला तरी राजीव आणि राहुल अपवाद वगळता प्रत्येकाने स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करीत अध्यक्षपद मिळविले आहे. राहता राहिला प्रश्न सोनिया गांधींचा. त्यांची तर राजकारणात सक्रीय होण्याची इच्छाच नव्हती. कॉंग्रेसजनानी जबरदस्तीने त्यांना अध्यक्षाच्या खुर्चीवर बसविले. त्या जन्माने भारतीय नसल्याचा आरोप करून कॉंग्रेस सोडणारे शरद पवार त्यांना कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर आरूढ करण्यात अग्रेसर होते. म्हणजे राजीव नंतर खंडित परंपरा सुरु करण्यात गांधी घराण्याचा नाही तर कॉंग्रेसजनाचा पुढाकार होता हे लक्षात घ्यावे लागेल. स्वत: राजीव गांधीना राजकारणात स्वारस्य नसताना कॉंग्रेसजनांनीच प्रधानमंत्रीपद व अध्यक्षपद बहाल केले होते हे देखील विसरून चालणार नाही. आज राहुल गांधीना घराणेशाहीचा लाभार्थी म्हणून हिणविणारा संघपरिवार त्याकाळी राजीव गांधीच्या मागे ठामपणे उभा राहिला होता आणि निवडणुकीत नेहरू-इंदिराना लाभले नाही एवढे यश राजीव गांधीनी मिळविले हे लक्षात घेतले तर घराणेशाहीच्या आरोपाला अर्थ उरत नाही.


  स्वातंत्र्यपूर्व काळात कॉंग्रेसला अनेक दिग्गज नेते लाभले आणि महात्मा गांधीसह अनेक दिग्गजांनी अध्यक्षपद भूषविले. महात्मा गांधी तर एकदाच वर्षभर अध्यक्ष राहिले पण इतर दिग्गजही वर्ष किंवा दोन वर्षेच अध्यक्ष राहिलेत. त्याकाळात देखील याला अपवाद पंडित नेहरुच होते. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक  दिग्गज आणि उत्तुंग नेते कॉंग्रेसमध्ये असताना दोन पेक्षा अधिकवेळा अध्यक्षपद भूषविण्याचा मान फक्त पंडित नेहरुंना मिळाला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात तब्बल पाच वेळा पंडित नेहरूंनी अध्यक्षपद भूषविले. तेव्हा तर घराणेशाहीचा प्रश्न नव्हता. स्वातंत्र्यानंतर गांधी-नेहरू घराण्याची कॉंग्रेसवर पकड राहिली हे खरेच आहे. पण ही पकड कर्तृत्व आणि त्यागाच्या बळावर राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस मधून नेहरू-गांधी घराण्याला आव्हान मिळाले आहे. असे आव्हान देणाराना तात्पुरते का होईना यश देखील मिळाले आहे. स्वातंत्र्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेहरू पुरस्कृत उमेदवार पराभूत झाला आहे. इंदिरा गांधीच्या इच्छे विरुद्ध कॉंग्रेस अध्यक्ष निवडला गेला आहे. घराणेशाहीचा स्पर्श नसलेल्या जनसंघ किंवा भाजप मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अशी चुरस कधीच आढळून आली नाही हे पण सत्य आहे. शेवटी भाजपचा अध्यक्ष कोण असावा हे ठरविण्याचा अधिकार जसा भाजपचा आहे तसाच कॉंग्रेसचा अध्यक्ष कोण असावा हे ठरविण्याचा अधिकार कॉंग्रेसचा आहे. कॉंग्रेसला विशिष्ट घरातीलच अध्यक्ष हवा असेल तर ते ठरविण्याचा अधिकार त्यांना आहेच. त्याने काहीच बिघडत नाही किंवा फरक पडत नाही. शेवटी अशा कॉंग्रेसला स्वीकारायचे कि नाही हे जनतेच्या हातात असते. कॉंग्रेसने आपला नेता म्हणून राहुल गांधीला पुढे केले असले तरी आपला नेता म्हणून स्वीकारायचे कि नाही हा जनतेचा अधिकार अबाधित आहे. औरंगजेबचे घराणे स्वीकारायचे कि नाही हा अधिकार त्याकाळी जनतेला नव्हता. आज ती स्थिती नाही. भलेही कॉंग्रेसने राहुल गांधीना नेता मानले तरी जनतेला राहुल गांधी आणि कॉंग्रेस या दोघानाही झिडकारण्याचा अधिकार असल्याने पूर्वीच्या राजेशाहीची आणि गांधीघराण्याची तुलना पूर्णत: गैर आहे. इथल्या राजकीय व्यवस्थेत अधिकारपद त्यालाच मिळू शकते जो जनतेला मान्य आहे. ही जनमान्यता मिळविण्याचे कसब आणि धमक राहुल गांधीमध्ये असेल तर राहुल गांधी आणि कॉंग्रेस टिकेल अन्यथा काळाच्या पडद्याआड जातील.
-------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
----------------------------------------------------------------------   

No comments:

Post a Comment