Friday, December 22, 2017

अजेयतेची कवचकुंडले गुजरातने हिरावली !


भाजपने गुजरात विजयावर उसने हसू आणि अवसान आणले असले तरी हा विजय त्यांना हादरवून टाकणारा ठरला हे लपून राहिलेले नाही. मोदीजींना काहीच आव्हान नाही ही निर्धास्तता तुटल्याने पक्षात सुप्त अस्वस्थता पसरली आहे. या निवडणुकीत भाजपला निसटता विजय तर मिळाला , पण मोदीजींची अजेयतेची कवचकुंडले गळून पडल्याचे लक्षात आल्याने विजयाच्या आनंदावर विरजण पडले आहे.
---------------------------------------------------------------------------------

तीन महिन्यापूर्वी गुजरात राज्यात प्रबळ निवडणूक संग्राम होईल असे भाकीत कोणी केले असते तर त्याला वेड्यात तरी काढले गेले असते किंवा कॉंग्रेस धार्जिणे तरी ठरविले असते. हिमाचल आणि गुजरात राज्याची निवडणूक चर्चा सुरु झाली तेव्हा फक्त भाजपकडे जाणाऱ्या राज्याची एकूण किती संख्या होणार त्याची तेवढी बेरीज केली जायची. कारण हिमाचल प्रदेशात प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल हा पूर्वेतिहास आहे आणि कॉंग्रेस पक्ष एवढा कमजोर आहे की, हा इतिहास बदलण्याची त्याच्यात क्षमता उरली नसल्याने तिथला निकाल अपेक्षेप्रमाणे भाजपच्या पारड्यात जाईल याबाबत कोणाच्या मनात शंका नव्हती. त्यामुळे हिमाचलच्या निवडणुक चर्चेत उर्वरित भारताला रस नव्हता. गुजरात मध्ये रस होता तो मोदी-शाह हे सध्या देशातील सर्वाधिक शक्तिमान नेते आपल्या गृहराज्यात किती दैदिप्यमान विजय मिळवितात यात. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत ६० टक्क्याच्या आसपास मते आणि २६ पैकी २६ जागा मिळवून मोदीजीनी गुजरात राज्यावरील आपली पकड आणि जादू सिद्ध केली होती. लोकसभा निवडणुकीत पक्षाध्यक्ष अमित शहांची काहीच भूमिका नव्हती व कोर्टाने त्यांना गुजरातेत येण्याची मनाई केल्याने ते गुजरात बाहेर निर्वासिताचे जीवन जगत होते. गुजरात आणि गुजरात बाहेरील लोकसभा विजय हा मोदीजींचा एकहाती विजय होता. मोदी विजयानंतर शहांच्या वाट्याला आलेले निर्वासिताचे जीने संपून शहांचे अच्छे दिन सुरु झाले आणि अल्पावधीत प्रधानमंत्री मोदी नंतरचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून त्यांची नवी ओळख देशाला झाली. त्यांच्या नियोजनामुळेच उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाला अशी भाजपात मान्यता आहे. त्यामुळे निवडणूक जिंकून देणारे जादूगर म्हणून मोदीजी सोबत शहांचे नांव जोडले गेले. देशभरात सुसाट वेगाने धावणारा मोदी-शहांचा निवडणूक विजय रथ गुजरातेत अडखळत चालेल ही गोष्टच कल्पनातीत असल्याने कोणाच्या डोक्यात येणे शक्यच नव्हते.

 गुजरात निवडणुकीची चर्चा सुरु होण्या आधी प्रधानमंत्री मोदी यांची जादू ओसरत असल्याची चर्चा सुरु झाली होती . तरी सुद्धा गुजरातेत भाजप मोठा विजय मिळविणार यात कोणाच्या मनात शंका नव्हती. शंकेची पाल पहिल्यांदा चुकचुकली ती हिमाचल आणि गुजरात या दोन राज्यात निवडणूक होणार असताना निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशच्या निवडणूक तारखा जाहीर केल्या आणि गुजरातच्या निवडणूक तारखा मुक्रर न करता फक्त मतमोजणीची तारीख तेवढी जाहीर केली. हा प्रकार अभूतपूर्व होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर फक्त विरोधी पक्षांनी नाही तर आधीच्या दोन मुख्य निवडणूक आयुक्तांनी देखील जाहीर टीका केली. निवडणूक आयोग केंद्राच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचे सकृतदर्शनी वाटावे अशी ही घटना असल्याने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेला बसलेला हा धक्का असल्याची कबुली माजी निवडणूक आयुक्तांनी देखील दिली. गुजरातची घडी नीट बसविण्यासाठी निवडणूक आयोगाने भाजपला देलेली ती उसंत होती हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आले होते. गुजरात मध्येच भाजपला आव्हान उभे राहात असल्याची जाणीव देशाला करून देणारी ती घटना होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष गुजरात वर केंद्रित झाले.

प्रचार जसजसा वाढत गेला तसतसे भाजप समोर कॉंग्रेसने मोठे आव्हान उभे केल्याचे स्पष्ट होत गेले. एकीकडे प्रधानमंत्री मोदी यांच्या सभेतील खुर्च्या रिकाम्या असल्याचे आणि सभा सुरु होत असताना लोक उठून चालल्याचे दृश्य दिसत होते तर दुसरीकडे राहुल गांधीना वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे दृश्य दिसत होते. गेल्या चार वर्षात अशा प्रकारचे दृश्य पहिल्यांदा गुजरातच्या निवडणूक प्रचारात दिसले. वारा कोणत्या दिशेने वाहतो याची कल्पना आल्याने प्रधानमंत्र्यांनी बिहार-उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या निवडणुकीत जेवढ्या सभा घेतल्या नाहीत त्याच्या पेक्षा जास्त सभा गुजरात सारख्या छोट्या राज्यात घेतल्या. निव्वळ सभाच घेतल्या नाही तर अतिशय आक्रमक आणि प्रधानमंत्री पदाच्या मार्यादाचे उल्लंघन करणारी विखारी भाषणे केली. या संपूर्ण निवडणुकीत गाजले काय असेल तर पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेल याची सीडी, दफन झालेले औरंगजेब आणि मोगल राजांचे उकरून काढलेले मुडदे, पाकिस्तानचे उभे करण्यात आलेले भूत या सारखे मुद्दे. गुजरात निवडणुकीच्या आधीच सोशल मिडियावर विकास हरवला किंवा विकास पागल झाल्याची विनोदी चर्चा सुरु होती. पण विकास खरोखरच गायब असल्याचे प्रत्यक्ष निवडणूक भाषणातून जाणवले. भाजप नेत्याच्या प्रचारात गुजरातच्या विकासासाठी काय केले आणि काय करणार याची अजिबात चर्चा नव्हती. कॉंग्रेस किती वाईट आणि राहुल गांधी कसे पोकळ हे सांगण्यावरच त्यांचा भर राहिला. भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे हे त्यांच्या भाषणातून आणि निवडणुकी दरम्यान दिसून आलेल्या वातावरणातून स्पष्ट झाले होते. असे वाटणे निराधार नव्हते हे गुजरात निवडणूक निकालाने दाखवून दिले.

मोदी-शहांच्या गृहराज्यातील हा निकाल नसता तर हा विजय फार मोठा वाटला असता हे नक्की. कारण लागोपाठ ६ निवडणुका जिंकणे ही सोपी गोष्ट नाही. पण लोकसभा निवडणुकीत स्वत: मोदीजीनी विजयाचा जो मापदंड घालून दिला आणि त्यानंतर दिल्ली, बिहार वगळता राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रधानमंत्री मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी जी चमकदार कामगिरी केली होती त्या तुलनेत त्यांचा गृहराज्यातील विजय फारच फिका ठरला. आज पर्यंतच्या विजय मालिकांनी मोदींचा पराभव करणारा समर्थ नेताच अस्तित्वात नाही अशी जी धारणा बनली होती त्या धारणेला तडा देणारा भाजपचा गुजरात विजय ठरला ! एकप्रकारे हवेत चाललेला मोदीजींचा विजय रथ गुजरातच्या मतदारांनी जमिनीवर टेकवला. गुजरातच्या जनतेने ‘आपल्या माणसाचा’ पराभव केला नाही पण पराभव शक्य आहे हे दाखवून दिले. आकड्यांच्या पलीकडे गुजरात निवडणुक निकालाने जो चमत्कार केला तो हाच आहे. हा चमत्कारच भविष्यातील राजकारणावर प्रभाव टाकणारा आणि राजकारणाची दिशा बदलणारा ठरणार आहे. ज्याला इंग्रजीत ‘गेम चेंजर’ म्हणतात तो अर्थ सार्थ करणारा गुजरातचा निवडणूक निकाल आहे. पराभवाचा हादरा बसतो हे आपण ऐकले आहे , पण गुजरात मध्ये भाजपचा जसा विजय झाला तो मोदीजी आणि भाजपला हादरा देणारा ठरला . उसने हसे आणि अवसान आणून हा विजय साजरा करण्याची पाळी भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यावर आली. पराभवानंतर आत्मपरीक्षण , आत्मचिंतन याच्या फेऱ्या झडत असतात हे आजवर आपण पाहत आलो. विजयानंतर आत्मपरीक्षण आणि कुठे चुका झाल्यात हे पाहण्याची , तपासण्याची वेळ आल्याचे चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळते.

भाजपला हादरा बसावा असे गुजरातच्या विजयी निवडणुक निकालात काय आहे या प्रश्नाचे उत्तर जितके आकडेवारीत आहे तितकेच आकडेवारी बाहेरचे आहे. यापूर्वी विधानसभेच्या जेवढ्या जागा जिंकल्या त्यापेक्षा अधिक जिंकू हा विश्वास असल्याने भाजपने १५० जागा मिळविण्याचे लक्ष्य ठेवले होते. मावळत्या विधानसभेत भाजपचे स्वत:चे ११५ आमदार होते. पण निवडणुकीच्या काही महिने आधी राज्यसभा निवडणुकीच्या वेळी अमित शाह यांनी कॉंग्रेस पक्ष फोडण्यात यश मिळविले होते. कॉंग्रेसचे १८ आमदार भाजपकडे गेले होते. विधानसभा निवडणूक घोषित होण्याआधीच्या भाजप-कॉंग्रेस यांच्या संख्याबळाचा विचार केला तर ते १३३ - ४३ असे होते. ताज्या निवडणुकीनंतर हे संख्याबळ ९९ – ८० असे झाले आहे. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे १६ आमदार कमी झाले आणि कॉंग्रेसचे १९ आमदार वाढले असे दिसत असले तरी प्रत्यक्षातील घट – वाढ जास्त आहे. भाजपला १५० चा आकडा गाठणे सोडाच प्रत्यक्षात भाजपचे संख्याबळ ३४ ने कमी झाले आणि कॉंग्रेसचे ३७ ने वाढले . २०१२ च्या तुलनेत भाजपचा मताचा टक्का अर्धाएक वाढला असला तरी कॉंग्रेसचा टक्का ३ ने वाढला आहे. २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकी नंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुका झाल्या आहेत आणि त्याचा विचार केला तर जागेतील आणि मताच्या टक्केवारीतील भाजपची घसरण खूप मोठी ठरते.

लोकसभा निवडणुकी पेक्षा या विधानसभा निवडणुकीत भाजपची मते ११ टक्क्यांनी घटली आहेत. तेवढीच कॉंग्रेसची मते वाढली आहेत. लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये १६५ विधानसभा मतदार संघात भाजपला मताधिक्य लाभले होते. यावेळी प्रत्यक्षात विजय ९९ जागांवर मिळाला. अवघ्या ७ जागांचे मताधिक्य. १० जागा तर कॉंग्रेसने फार कमी फरकाने गमावल्या आहेत. म्हणजे ऐनवेळी मणीशंकर अय्यर यांनी प्रधानमंत्र्याच्या हातात कोलीत दिले नसते तर भाजपपेक्षा १-२ अधिक जागा कॉंग्रेसला मिळणे अशक्य नव्हते ही वस्तुस्थिती  भाजपसाठी अस्वस्थ करणारी तर ठरलीच पण त्याहीपेक्षा त्यांच्यासाठी चिंता करणारी मोठी बाब कोणती ठरली असेल तर ती म्हणजे आपल्या गृह राज्यात प्रधानमंत्री आणि पक्षाध्यक्ष या दोघानाही पक्षाची घसरण रोखता आली नाही ! लोकसभा निवडणुकीत अशीच घसरण इतर राज्यात झाली तर काय होईल हा भाजप समोर आता पासून प्रश्न उभा राहिला आहे आणि या प्रश्नाने भाजप मध्ये अस्वस्थता पसरली आहे. मोदीजीना आव्हानच नाही आणि मोदीजीना कोणी हरवूच शकत नाही या सुरक्षा कोषात निर्धास्त असणाऱ्या भाजप समोर अचानक मोठे आव्हान उभे राहिले आहे. आणि हे आव्हान आजवर ज्याला ‘पप्पू’ म्हणून हिनाविण्यात आनंद मानला त्याच्याकडून मिळाल्याने भाजपच्या अस्वस्थतेत अधिक भर पडली आहे.

असे असले तरी भाजपपेक्षा आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची अधिक गरज कॉंग्रेस पक्षाला आहे. राहुल गांधी यांनी गुजरातची निवडणूक गंभीरपणे घेत आपल्यातील नेतृत्वगुण दाखवत भाजप पुढे आव्हान उभे करण्यात यश मिळविले हे खरे असले आणि दिलासा देणारे असले तरी गुजरातमध्ये जे घडले त्यात पक्ष म्हणून कॉंग्रेसची कामगिरी अजिबात प्रभावी राहिलेली नाही. राहुल गांधीचे नेतृत्व उजळून निघाले आणि गुजरात निवडणुकीत ते मध्यवर्ती स्थानी आले याचे कारण कॉंग्रेस संघटना नसून यात बीजेपीचा वाटा मोठा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. कॉंग्रेस किती वाईट आणि राहुल गांधी कसे पोकळ हे सांगण्यावरच त्यांचा भर राहिला. प्रचारात प्रधानमंत्री व सर्व भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांना एवढे महत्व दिले की राहुल गांधींचा मोदींचा प्रतिस्पर्धी म्हणून उदय झाला. राहुलच्या नेतृत्वाला लाभलेल्या झळाळीला जशी बीजेपी नेत्यांच्या मनातील भीती कारणीभूत ठरली तशीच जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर आणि हार्दिक पटेल या तीन बिगर काँग्रेसी युवकांनी बीजेपी सरकार विरुद्ध जे वातावरण निर्माण केले त्याचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे गुजरातच्या निकालाने कॉंग्रेसने हुरळून जावे असे काहीच नाही. उलट संघटनात्मक ताकद नसल्याने विजय मिळाला नाही याचे शल्य कॉंग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बोचले पाहिजे. ते बोचताना दिसत नाही हाच कॉंग्रेस साठी मोठा धोका आहे. बीजेपीचा भ्रम तुटल्याने ते सावध होवून विजयाची नवी रणनीती आखतील. गुजरात निवडणूक निकालाने भाजपला वेळीच सावध केले आणि कॉंग्रेसलाही उभारी दिली. त्यामुळे जनतेचा हा निर्णय अतिशय समंजस , दूरदर्शी आणि लोकशाहीला बळकट करणारा आहे यात वादच नाही.

-------------------------------------------------------------------
सूधाकर जाधव, पांढरकवडा, जि. यवतमाळ.
मोबाईल – ९४२२१६८१५८
---------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment