Friday, December 15, 2017

प्रधानमंत्र्याची प्रचारातील घसरण

धर्मवादाचे भूत पुन्हा उभे करून काही काळ लोकांचा असंतोष दाबून ठेवता येईल आणि निवडणुकीत विजयही मिळविता येईल. पण जसजसे आर्थिक चटके बसायला लागतील तसतसे धर्मवादाचे भूत लोकांच्या मानगुटीवरून उतरू लागेल आणि त्यावेळी भाजप आणि प्रधानमंत्र्याजवळ निवडणूक जिंकण्यासाठी कोणताच हुकुमाचा एक्का नसेल.
------------------------------------------------------------------------------

२०१४ साली श्री नरेंद्र मोदी यांची आधी भाजपचे लोकसभा निवडणुकीतील प्रचार प्रमुख म्हणून आणि नंतर भाजपचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्या नंतर मोदीजीनी प्रचाराचा जो धुराळा उडवून दिला त्याला भारतीय निवडणुकीच्या इतिहासात तोड नव्हती. या प्रचारात धुळवड कमी आणि झंझावात अधिक होता. श्री मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीचा प्रचार केला ती पद्धत अमेरिकन अध्यक्षाच्या निवडणुकीला साजेशी अशी होती. तितकीच ती खर्चिकही होती. भपकेबाज होती आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा परिपूर्ण वापर नियोजित पद्धतीने करण्यात आला होता. मोदीजींच्या भाषणा इतकेच या प्रचारतंत्राने भारतीय मतदार मोहित झाला होता. निवडणुकीतील यशाच्या रूपाने याचे फळ मिळून मोदीजी देशाचे प्रधानमंत्री देखील बनले. मोदीजीनी ज्या प्रकारे प्रचारयंत्रणा उभी केली आणि राबविली त्यामुळे जनता आकर्षित झालीच , पण निवडणूक यश हे फक्त प्रचारयंत्रणे मुळे पडलेली भुरळ नव्हती तर प्रचारात प्रभावी पद्धतीने जे मुद्दे मोदीजीकडून मांडले जात होते आणि देशाच्या भविष्याचे जे आशादायक चित्र मोदीजीनी आपल्या भाषणातून उभे केले त्याचे हे यश होते. मोदीजीची प्रचारयंत्रणा आणि प्रचारपद्धतीच अभूतपूर्व नव्हती तर भाषणातील मुद्द्यांची मांडणी देखील अभूतपूर्व अशी होती. म्हणजे प्रचारात नेहमी वापरले जाणारे भ्रष्टाचार , विकास , प्रगती , आतंकवाद आणि देशाची संरक्षण सिद्धता असे नेहमी असणारे मुद्देच होते पण मोदीजीच्या प्रचारात जनसंघ-भाजपच्या आजवरच्या प्रचाराशी ठरवून घेतलेली फारकत होती. ही फारकतच मोदीजीना अभूतपूर्व यश मिळवून देण्यास कारणीभूत ठरली. ही फारकत होती धर्मावादाशी !

भारतीय जनता पक्षाने केंद्रात पहिल्यांदा सत्ता काबीज केली ती अडवाणी यांनी काढलेल्या रथायात्रेमुळे झालेल्या धार्मिक धृविकरणातून. त्याआधी आणि नंतर देखील भाजपच्या निवडणूक प्रचाराची मदार धार्मिक धृविकरणावर राहिली होती. कॉंग्रेस अल्पसंख्यांकांचे लाड करते आणि बहुसंख्य असलेल्या हिंदुवर अन्याय होतो हे जनसंघ-भाजपचे लाडके निवडणूक प्रचारसुत्र राहात आले होते. समान नागरी कायदा लागू करणे , काश्मीर संदर्भातील कलम ३७० रद्द करणे आणि अयोध्येत राम मंदीर बांधणे हे तीन मुद्दे कायम भाजपच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे राहात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात यापैकी कोणताच मुद्दा आपल्या भाषणात येणार नाही याची काळजी मोदीजीनी घेतली होती. मोदीजीना तर पक्षाचे हे मुद्दे निवडणूक जाहीरनाम्यात देखील नको होते. पण ज्येष्ठ नेत्यांच्या हट्टामुळे त्यांना हे मुद्दे जाहीरनाम्यात समाविष्ट करणे भाग पडले आणि या वादात निवडणूक जाहीरनामा देखील उशिरा म्हणजे मतदानाची पहिली फेरी सुरु झाल्यानंतर बाहेर आला होता. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या शेकडो सभाना मोदीजीनी संबोधित केले आणि फक्त जम्मूच्या सभेत त्यांनी कलम ३७० चा मुद्दा उपस्थित केला होता. हा मुद्दा उपस्थित करतानाही भाजपची नेहमीची कलम रद्द करण्याची भूमिका त्यांनी घेतली नाही. या कलमावर खुली चर्चा झाली पाहिजे एवढेच त्यांनी मांडले. एका सभेत अशा पद्धतीने मांडलेला हा मुद्दा वगळता भाजपच्या धार्मिक धृविकरणाशी संबंधित कोणत्याच मुद्द्यांना या संपूर्ण प्रचार काळात मोदीजीनी स्पर्श देखील केला नाही. उलट त्यांनी कॉंग्रेसच हिंदू-मुसलमानांना वेगळे करते असे सांगत देशाच्या विकासात हिंदू आणि मुसलमानांनी खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे असे मुस्लीम लक्षणीय संख्येत असलेल्या भागातील प्रचार सभामधून प्रतिपादन केले होते. कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारावर आणि गैरकारभारावर टीका करत ‘सबका साथ सबका विकास’ हे त्यांच्या प्रचाराचे मुख्य सूत्र राहिले. भाजपच्या व्यासपीठावरून अशा पद्धतीचा प्रचार कधी झाला नव्हता तो मोदीजीनी केला आणि अभूतपूर्व यश संपादन केले.

भारता सारख्या बहुविधतेने नटलेल्या , अनेक जाती, धर्म आणि वंशाचे लोक राहतात अशा देशात निवडणूक प्रचार कसा असावा याचा वस्तुपाठच श्री नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचार भाषणांनी घालून दिला होता. असा आदर्श प्रस्थापित करणाऱ्या मोदीजींच्या नुकत्याच पार पडलेल्या गुजरात निवडणुकीतील प्रचारसभातील भाषणाकडे पाहिले तर धक्का बसल्या शिवाय राहात नाही. लोकसभा निवडणुकीत जसा प्रचाराचा आदर्श मोदीजीनी प्रस्थापित केला तसाच देशाच्या प्रधानमंत्र्याने प्रचार कसा करू नये याचा धडा प्रधानमंत्री मोदी यांच्या गुजरात विधानसभा निवडणुकीतील प्रचार भाषणांनी दिला आहे. लोकसभा निवडणूक ते गुजरात विधानसभा निवडणूक या दरम्यान अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यात आणि त्याचा प्रचाराचा भारही लोकसभा निवडणुकी प्रमाणे मोदीजींच्याच खांद्यावर राहिला. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीतील प्रचार सूत्र बदलत गेले. हळू हळू आणि अप्रत्यक्षपणे सूचित करणे ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीने मोदीजीचा प्रचार भाजपच्या आजवरच्या रणनीतीला साजेल असा मुस्लीम विरोधी होत गेला. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत मोदीजीनी गायीचा मुद्दा उचलला. त्याचवेळी नितीश-लालू यांची बिहार मध्ये सत्ता आली तर हिंदू समाजातील ज्या घटकांना आज आरक्षण मिळते त्यात मुस्लीमाना वाटा मिळेल असे सांगत हिंदू जनमत मुस्लिमांच्या बाबतीत कलुषित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हिंदू जमातीला मिळणाऱ्या आरक्षणात मुस्लीम वाटेकरी होतील अशी भीती घालणारी भाजपची जाहिरात निवडणूक आयोगाने रोखली होती. त्यानंतर झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत तर भाजपतर्फे एकही मुस्लीम उमेदवार न देवून मुस्लीम विरोधी छुपा संदेश देण्यात आला. हिंदू स्मशान भूमी – मुस्लीम स्मशान भूमी याचा वाद खुद्द प्रधानमंत्री मोदी यांनी प्रचार सभात उपस्थित करून निवडणुकीला हिंदू-विरुद्ध मुस्लीम असे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. लोकसभा निवडणुकीत फक्त विकासावर असलेला भर हळू हळू कमी कमी होत जाती-धर्मावर आणण्यास मोदीजीनी प्रारंभ केला आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत धर्मवादाच्या बिंदू जवळ येवून एक वर्तुळ पूर्ण केले. धर्मवादाला सोडचिट्ठी देत ज्या बिंदू पासून श्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार सुरु केला होता तो प्रचार वर्तुळ पूर्ण करीत गुजरात निवडणुकीत पुन्हा धर्मवादाच्या बिन्दुजवळ आणला. कोणत्याही वैधानिक पदावर नसलेले बीजेपीचे प्रचारक म्हणून त्यांनी असा प्रचार केला असता तर आधीपासून बिजेपीची भूमिका अशीच आहे म्हणून तिकडे दुर्लक्ष करता आले असते. पण देशाच्या प्रधानमंत्र्याने गुजरात विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारे मुस्लीम समाजाला लक्ष्य केले तो प्रकार प्रधानमंत्री पदाची अप्रतिष्ठा आणि मर्यादा भंग करणारा होता. सोनिया गांधी यांचे सल्लागार राहिलेले अहमद पटेल यांना भाजपने आणि प्रधानमंत्र्याने लक्ष्य केले. कॉंग्रेस निवडून आली तर अहमद पटेल मुख्यमंत्री होतील अशी सूचित करणारी पोस्टर्स गुजरात मध्ये झळकली. पण त्याही पुढे जावून प्रधानमंत्र्याने जे केले ते पदाला साजेसे नव्हतेच.

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कारण नसताना पाकिस्तानला खेचले होते. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी बिहार निवडणुकीत नितीश-लालू जिंकले तर पाकिस्तानात फटाके फुटतील असे सांगत भाजप विरोधकांची आणि इथल्या मुसलमानांची पाकिस्तानशी साठ्गाठ असल्याचे सूचित केले होते. त्यावेळी या मुद्द्यावर मोदीजी मौन साधून होते. गुजरात निवडणुकीत अमित शाह बिहार निवडणुकीत जे बोलले होते त्याच्याही दोन पाउले पुढे जात मोदीजीनी आपले मौन सोडले. अमित शाह यांनी तर फक्त नितीश-लालू यांच्या विजयाचा पाकिस्तानला आनंद होईल आणि त्या आनंदात तिकडे फटाके फुटतील एवढेच म्हंटले होते. मोदीजीनी त्याही पुढे जात कॉंग्रेस विजयासाठी पाकिस्तान गुजरातच्या निवडणुकीत ढवळाढवळ करीत असल्याचा आणि अहमद पटेल यांना मुख्यमंत्री पदी आरूढ करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. एका फटक्यात त्यांनी कॉंग्रेस आणि गुजरातेतील मुसलमानाची पाकिस्तान सारख्या शत्रूराष्ट्राशी साठ्गाठ असल्याचा आरोप केला. नंतर त्यांनी आपला आरोप खरा ठरविण्यासाठी आणखी चिखलात पाय घातले. कॉंग्रेसचे निलंबित नेते मणीशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानचे हायकमिशनर , पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री आणि तिथल्या सेनादलाचे अधिकारी यांची माजी प्रधानमंत्री मनमोहनसिंग आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या सोबत बैठक झाली आणि त्या बैठकीत गुजरात मध्ये भाजपचा पराभव कसा करता येईल यावर गुफ्तगू झाल्याचा सनसनाटी आरोप केला. मणीशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी अशी बैठक झाली हे खरे पण प्रधानमंत्री सांगतात तसे काही त्या बैठकीत घडले नाही आणि घडणे शक्यही नव्हते. जीभेला हाड नसल्यासारखे मणीशंकर अय्यर बोलतात व त्यामुळे ते बदनामही आहेत, पण ते पूर्वी परराष्ट्र सेवेतील अधिकारी होते आणि त्या अधिकारात त्यांनी तिथे कामही केले. भारत-पाकिस्तान संबंधात सौहार्द कसा स्थापित होईल याचा विचार करण्यासाठी ती बैठक होती. या आधी पण अशा बैठका झाल्या होत्या. प्रधानमंत्र्याने उल्लेख केलेल्या बैठकीसाठी अय्यर यांनी अनेक भारतीय पत्रकारांना , भारताच्या परराष्ट्र सेवेत महत्वाची भूमिका बजावलेल्या अनेक माजी अधिकाऱ्यांना आणि माजी सेनाधिकारी यानाही निमंत्रित केले होते. त्या बैठकीत हजर असलेले माजी लष्कर प्रमुख दीपक कपूर यांनी मोदीजीच्या आरोपा नंतर पत्रक काढून त्या बैठकीत गुजरात निवडणुकीचा साधा उल्लेखही कोणी केला नसल्याचे स्पष्ट केले. प्रधानमंत्र्याला हे माहित नसेल अशातला भाग नाही , पण पाकिस्तान – कॉंग्रेस – आणि भारतीय मुसलमान यांची साठ्गाठ असल्याचे चित्र इतर मतदारासमोर उभे करण्यासाठी त्यांनी हा अव्यापारेषु व्यापार केला. यापूर्वी वर उल्लेख केल्याप्रमाणे भाजपच्या प्रचारात धार्मिक ध्रुवीकरणाला मध्यवर्ती स्थान असायचे तरी पण त्यावेळी आपला विरोधी शत्रूराष्ट्राशी हातमिळवणी करतो असा आचरट आरोप कधी कोणी केला नव्हता.  मोदीजीनी केलेल्या आरोपात जरासेही तथ्य असते तर भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याच्या आरोपाखाली एव्हाना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या भारतातील हायकमिश्नरची हकालपट्टी केली असती. इथे पाहुणे म्हणून आलेल्या माजी परराष्ट्र मंत्र्याचा व्हिसा रद्द करून त्यांना भारत सोडण्याचा आदेश दिला असता. निवडणूक जिंकण्यासाठी हा कांगावा आणि क्लृप्ती होती हे उघड आहे.

मूळ प्रश्न असा आहे की आपल्याच गृहराज्यात निवडणूक जिंकण्यासाठी असा कांगावा करण्याची वेळ मोदीजीवर का यावी. मोदीजीनी १४ वर्षाच्या मुख्यमंत्री म्हणून गाजविलेल्या कारकिर्दीत तिथे विकासाचा मोठा चमत्कार घडला आणि तसा साऱ्या देशाचा विकास व्हावा म्हणून मोदीजीना प्रधानमंत्री केले पाहिजे असा प्रचार लोकसभा निवडणूक काळात संघ परिवाराकडून करण्यात आला होता. गुजरातच्या विकासाच्या मॉडेलला पुढे करून लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या आणि त्या आधारे प्रधानमंत्री होणाऱ्या मोदींना गुजरातमधील निवडणूक एवढी कठीण का जावी हे एक कोडेच आहे. जर खरेच भाजपच्या विजयासाठी प्रतिकूल परिस्थिती असेल तर ‘विकासाचे गुजरात मॉडेल’ हा एक चुनावी जुमला होता असा त्याचा अर्थ होतो. विकासाची संघभूमी असलेल्या गुजरात मध्ये विकासाचा मुद्दा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनविता येत नसेल तर आता विकासाच्या नावावर कोणी मत देणार नाही या निष्कर्षाप्रत प्रधानमंत्री मोदी आणि त्यांचा पक्ष भाजपा आला असावा असे मानावे लागेल. अन्यथा लोकसभा निवडणुकीतील प्रचारात मोदीजीनी आपल्या हाताने गाडलेले धर्मवादाचे भूत पुन्हा आपल्याच हाताने वर काढले नसते. आजही कॉंग्रेसची गुजरात मधील संघटनात्मक स्थिती भाजपच्या तुलनेत अतिशय दुबळी आहे आणि भाजप आजवर ज्याला ‘पप्पू’ म्हणत आली त्या राहुल गांधी शिवाय कॉंग्रेसकडे दुसरा प्रचारक नाही. तरीही गुजरात मध्ये भाजपची आणि खुद्द प्रधानमंत्र्याची दमछाक होत असेल तर त्याचा अर्थ भाजप आणि प्रधानमंत्र्यांनी समजून घेतला पाहिजे. लोकांचा असंतोष संघटीत करण्याच्या स्थितीत कॉंग्रेस आणि राहुल गांधी नसताना प्रधानमंत्र्यांनी आणि त्यांच्या पक्षातील सर्वच नेत्यांनी त्यांना लक्ष्य करून त्यांचे महत्व आणि ताकद वाढविण्याची चूक केली आहे. अशा चुका तेव्हाच होतात जेव्हा तुमचा आत्मविश्वास डळमळीत होतो. गुजरात मध्ये भाजपचे आणि प्रधानमंत्र्याचे तेच झाले आहे. प्रधानमंत्र्याचा आत्मविश्वास डळमळीत होत चालल्या संबंधीचे निदान मी काही दिवसापूर्वी याच स्तंभात केले होते. गुजरात निवडणुकीने त्याला पुष्टीच मिळाली आहे. प्रधानमंत्री आणि भाजप पुढे खरे  आव्हान राहुल किंवा कॉंग्रेसचे नाही तर ढासळत चाललेला आत्मविश्वास सावरण्याचे आहे. चुकीच्या धोरणातून लोकअसंतोष निर्माण होतो हे ओळखून धोरणे बदलण्याची गरज आहे. धर्मवादाचे भूत पुन्हा उभे करून काही काळ लोकांचा असंतोष दाबून ठेवता येईल आणि निवडणुकीत विजयही मिळविता येईल. पण जसजसे आर्थिक चटके बसायला लागतील तसतसे धर्मवादाचे भूत लोकांच्या मानगुटीवरून उतरू लागेल आणि त्यावेळी भाजप आणि प्रधानमंत्र्याजवळ निवडणूक जिंकण्यासाठी कोणताच हुकुमाचा एक्का नसेल.
 
----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
----------------------------------------------------------------------------------   

No comments:

Post a Comment