Friday, April 6, 2018

अण्णा हजारेंचा उदयास्त !



शरद पवारांच्या बाबतीत ‘एक ही मारा क्या?’ हे उद्गार अण्णांची घसरण स्पष्ट करतात. तरीही आपल्या कुवतीनुसार ८१ वर्षे वय झाले असताना कुठला स्वार्थ मनात न ठेवता समाजासाठी धडपडणाऱ्या अण्णा सारख्या व्यक्तीवर जहरी टीका व्हावी हे आमचे समाज जीवन किती विषाक्त आणि असहिष्णू झाले आहे याचे विदारक दर्शन घडविणारे आहे.
----------------------------------------------------------------------------

अण्णा हजारे यांना जागतिक कीर्ती मिळवून देणाऱ्या लोकपाल आंदोलनाच्या विरोधात त्याकाळी याच स्तंभात मी भरपूर लिखाण केल्याचे वाचकांना आठवत असेल. त्याकाळी म्हणजे २०११-१२ मध्ये अण्णाच्या मताला विरोध ही सोपी गोष्ट नव्हती. आंदोलनावर टीका करणारा लेख लिहिला की १०० च्या वर वाचक फोन करायचे आणि त्यातील ९० टक्के अण्णा आणि त्यांच्या आंदोलनावर टीका केल्याबद्दल संताप व्यक्त करायचे. अण्णांनी लोकप्रियतेचे शिखर गाठल्याचे ते लक्षण होते. नंतरच्या  ७ वर्षात अण्णा शिखरावरून तळाला कधी आलेत हे कोणाला कळलेच नाही. ज्या रामलीला मैदानात त्यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठून सर्वशक्तीमान सत्तेला हलवून आणि हादरवून सोडले होते त्याच रामलीला मैदानात अण्णा हजारे ७ वर्षानंतर एकाकी आणि असहाय्य अवस्थेत जगाला दिसले. तसे त्यांचे रामलीला मैदानात पुन्हा उपोषण करायचे कारण योग्यच होते. देशभरातील जनतेचे सक्रीय समर्थन मिळवून मनमोहन सरकारला घुटने टेकायला भाग पाडून लोकपाल संस्थेस मंजुरी मिळविली होती त्याच्या अंमलबजावणीची मागणी रास्तच होती. ज्या मागणीला अभूतपूर्व समर्थन मिळून मंजूरी मिळाली आणि मागणीला समर्थन देणारा संघपरिवार सत्तेत आला त्याची अंमलबजावणी होत नसेल तर त्यासाठी आंदोलन आणि उपोषण न्याय्यच म्हंटले पाहिजे. मंजूर झालेल्या लोकपालाच्या अंमलबजावणीसाठी अण्णांनी तब्बल ४३ पत्रे प्रधानमंत्री मोदी यांना लिहिली आणि त्यावर कार्यवाही सोडाच पण त्यापैकी एकाही पत्राचे साधे उत्तर देण्याचे सौजन्य मोदींनी दाखविले नाही ही माहिती पुढे आल्यावर तर लोकांचा संताप होवून अण्णा हजारेंचे जनसमर्थन वाढायला हवे होते. तसे काहीच न घडल्याने दिल्लीतील सत्ताधाऱ्यांनी आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष केले. जीव वाचविण्यासाठी उपोषण सोडण्याची केविलवाणी पाळी अण्णा वर आली. मागण्या न्याय्य असताना प्रसिद्धी माध्यमातून आणि समाज माध्यमातून त्यांना समर्थन मिळण्या ऐवजी या माध्यमांनी अनुक्रमे दुर्लक्ष आणि जहरी टीका केली. म्हणजे प्रसिद्धी माध्यमांनी दुर्लक्ष केले तर समाज माध्यमातून अण्णांवर जहरी टीका झाली. एकेकाळी याच समाज माध्यमातून अण्णांना विरोध करणाऱ्यावर अशीच जबर आणि जहरी टीका झालेली आहे. अण्णा स्वत:ला गांधीवादी म्हणवून घेत असले तरी विरोधकांवर कठोर हल्ला करण्यास त्यांनी कधीच कमी केले नाही. शरद पवारांच्या बाबतीत ‘एक ही मारा क्या?’ हे उद्गार अण्णांची घसरण स्पष्ट करतात. तरीही आपल्या कुवतीनुसार ८१ वर्षे वय झाले असताना कुठला स्वार्थ मनात न ठेवता समाजासाठी धडपडणाऱ्या अण्णा सारख्या व्यक्तीवर जहरी टीका व्हावी हे आमचे समाज जीवन किती विषाक्त आणि असहिष्णू झाले आहे याचे विदारक दर्शन घडते. असे विषाक्त आणि असहिष्णू वातावरण निर्मितीत अण्णांचा वाटा काही कमी नाही. ७ वर्षापूर्वी जगाच्या क्षितिजावर तळपणारा अण्णा सूर्य ज्या रामलीला मैदानात दिसला त्याच रामलीला मैदानात मावळताना पाहणे वेदनादायीच आहे.

एखाद्याला डोक्यावर घ्यायचे किंवा डोक्यावरून खाली पटकावून द्यायचे ही गोष्ट आमच्यासाठी नवीन नाही. एखादी छोटी गोष्ट डोक्यावर घेण्यासाठी पुरते आणि अशीच एखादी छोटी गोष्ट डोक्यावरून खाली आपटण्यासाठी आम्हाला पुरते. याच गोष्टीचा राजकारणी मंडळी पुरेपूर वापर करीत असतात. अण्णांना मोठे करण्यात आणि नंतर सोडून देण्यात याच लोकवृत्तीचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे. अण्णांच्या आताच्या रामलीला उपोषणाचा बोऱ्या वाजला त्याचे एक कारण तर स्वत: अण्णा आहेत. अण्णा तसे ‘एकला चलो रे’ वृत्तीचे आणि साधे पण. सामाजिक , राजकीय चळवळीत शुद्धतेचा आग्रह सोवळेपणात परिवर्तीत होतो. हा सोवळेपणा अण्णांना भोवला. एखादे आंदोलन उभे करण्यासाठी माणसे जोडावे लागतात. अण्णा अटी घालून माणसे तोडतात. लोकपाल आंदोलन हे सरळ राजकीय आंदोलन आहे आणि तरीही यात राजकीय कार्यकर्त्यांनी सामील होवू नये म्हणणे ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. ती अण्णांनी या रामलीला उपोषणात दाखविली आणि स्वत:च आपले समर्थन मर्यादित करून घेतले. अर्थात अण्णांनी अटी घातल्या नसत्या तरी त्यांना फार मोठे समर्थन मिळण्याची शक्यता नव्हती. एकतर त्यांनी भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे स्वत:चे समर्थक आपल्याच हातानी छाटले आणि दुसरे सगळ्या राजकीय पक्षांनी त्यांना एकमेकाविरुद्ध वापरून घेण्याचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. अनेक राजकीय पक्षांनी अण्णांचा वापर एकमेकांविरुद्ध केल्याने अनेकदा अण्णा याचे की त्याचे असा गैरसमज आहे. ते संघाशी जवळचे मानले जातात. एकूणच देशभक्तीच्या आणि हिंदू देवतेच्या रूपातील भारत मातेच्या संघ कल्पना आणि अण्णांच्या कल्पना जुळतात एवढ्यावर त्यांना संघी ठरवले जाते. हा कोट्यावधी जनतेचा भाबडेपणा आहे तसाच अण्णांचा आहे इतकेच. मनमोहन सरकार विरुद्धच्या लोकपाल आंदोलनात संघाने सारी शक्ती ओतली आणि त्या आंदोलनाच्या परिणामी भाजप आणि मोदी सत्तेत आले असले तरी त्यांना संघाचा माणूस म्हणता येणार नाही. त्यांना सर्वांनी वापरून घेतले तसे संघानेही वापरले इतकेच. त्यांच्या साधेपणाचा आणि त्यांची सामाजिक , राजकीय विषयाची समज मर्यादित असण्याचा गैरफायदा अनेकांनी घेतला. या गैरफायद्यातून अण्णा जसे मोठे झाले तसेच छोटेही झाले.

अण्णांची समाजसेवक ही प्रतिमा त्यांनी राळेगण सिद्धीचा कायापालट घडवून आणण्यासाठी जे निरलसपणे प्रयत्न केलेत त्यातून निर्माण झाली. याच त्यांच्या प्रतिमेचा राजकारणी मंडळींनी करून घेतला . यातून राजकारण्यांची इप्सिते पूर्ण झाली आणि अण्णा भोवतीही वलय निर्माण झाले. वाढत्या वलयाचा वाढता फायदा राजकारणी आणि अण्णा यांना समसमान झाला. शिवसेना-भाजप युतीचे पहिले सरकार महाराष्ट्रात आले तेव्हा भाजपने स्वत: नामानिराळे राहून शिवसेनेच्या मंत्र्या विरुद्ध अण्णांचा कुशलपणे वापर करून घेतला. यात शिवसेनेच्या मंत्र्याने अब्रूनुकसानीचा दावा ठोकल्याने अण्णांना तुरुंगवासही घडला आणि राजकारणातील त्यांचा प्रभाव वाढण्यास ते निमित्तही झाले. पुढे कॉंग्रेस-राष्ट्रवादी मंत्रीमंडळ आले तेव्हा कॉंग्रेसने कुशलपणे अण्णांचा वापर राष्ट्रवादी विरुद्ध करून घेतला. अण्णांच्या हाताने राष्ट्रवादीच्या पाठीवर न मिटणारा भ्रष्टाचाराचा शिक्का मारून घेतला. यातून अण्णांचे देखील राजकीय वजन वाढले आणि यातून काही चांगल्या गोष्टी घडल्या याची नोंद घेतली नाही तर ते अण्णांवर अन्याय करणारे ठरेल. अण्णांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रात माहिती अधिकाराचा कायदा आला आणि पुढे माहिती अधिकाराचा राष्ट्रव्यापी कायदा आला. अण्णांच्या मर्यादा लक्षात घेता ही फार मोठी उपलब्धी आहे. उमेदवार पसंत नसतील तर मत नाकारण्याचा अधिकार यासाठी देखील अण्णांचे प्रयत्न कामी आले आणि त्यांची देश पातळीवर ओळख निर्माण झाली. याचाच फायदा केजरीवाल, किरण बेदी , प्रशांत भूषण या कंपूने घेत मोठी रामलीला घडवून आणली. इथेही अण्णांचा वापरच झाला. या कंपूने अण्णांना पहिल्यांदा जेव्हा दिल्लीत नेले तेव्हा किरण बेदींनी जाहीरपणे म्हंटले होते की, अण्णा तर महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात पडून होते आम्ही त्यांना उचलून दिल्लीत आणले ! अर्थ स्पष्ट आहे मनमोहन सरकारला गोत्यात आणण्यासाठी जी रामलीला झाली त्यासाठी अण्णांचा वापर झाला. महाराष्ट्रात विरोधकांना नामोहरण करण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलनाच्या नावावर अण्णांचा झालेला वापर दिल्लीत आणखी मोठ्या प्रमाणावर करून घेण्यात आला.

दुसऱ्या कोणाला आपला वापर करू न देता आयोजलेले हे नुकतेच पार पडलेले अण्णांचे पहिलेच आंदोलन असावे. स्वतंत्रपणे आंदोलन चालविण्यासाठी नुसत्या चांगल्या भावना उपयोगाच्या नसतात. प्रतिभा आणि कुशल रणनीती आवश्यक असते. अण्णा जवळ याचाच अभाव आहे. गल्लीपासून दिल्ली पर्यंत अण्णांचा वापर झाला आणि ज्याचा वापर झाला ते एकच भांडवल अण्णा जवळ होते आणि ते म्हणजे त्यांची त्यागी प्रतिमा. आपल्याकडे त्याग हा परवलीचा शब्द आहे. त्याग या शब्दाची भारतीय जनमानसाला एवढी भुरळ पडते की त्यागाच्या आड सगळे दोषच नाही तर मर्यादाही दिसत नाही. त्याग कधी कधी भोगा पेक्षा जास्त घातक बनतो. घातक त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून अण्णा हजारे यांचेकडे पाहावे लागेल. अण्णांच्या ‘त्यागा’वर उभे राहिलेल्या आंदोलनाने सार्वभौम संसदेचे महत्व आणि महात्म्य कमी केले होते हे विसरून चालणार नाही. मोदी मंत्रीमंडळातील राज्यमंत्री असलेले महत्वाकांक्षी व्ही.के.सिंग त्याकाळी सैन्य प्रमुख होते आणि त्याकाळी सैन्याच्या दोन तुकड्या दिल्लीच्या दिशेने निघाल्याच्या वार्ता आल्या होत्या. अण्णांच्या त्यागाचे हे फळ मिळण्यापासून देश वाचला ते केवळ देशात रुजलेल्या लोकशाही परंपरेमुळे. अशा व्यक्तींच्या त्यागाचा वैयक्तिक पातळीवर सन्मान आणि आदर जरूर करावा पण त्याग ही काही राष्ट्रीय समस्या सोडविण्याची गुरुकिल्ली नाही आणि या गुरुकिल्लीने समस्यांचा गुंताच वाढतो एवढा धडा शिखर ते तळ गाठणाऱ्या अण्णा आंदोलनापासून घेतला तर ते मोठे राष्ट्रहित होईल.

-----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
------------------------------------------------------------------------------  

                                          



No comments:

Post a Comment