Thursday, June 20, 2019

हे राम !


लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर श्रीरामा बद्दल प्रेम आणि श्रद्धा दाखवायला मनाई नाही पण ती मर्यादा पुरुषोत्तमाला शोभेल या पद्धतीनेच दाखवायला हवी होती.  
---------------------------------------------------------------------------

नव्या १७ व्या लोकसभेत नवनिर्वाचित सभासदांच्या शपथविधी प्रसंगी धार्मिक घोषणांचा झालेला गदारोळ धक्कादायक आणि धोकादायक आहे. जनतेने विश्वासाने जे कार्य आपल्यावर सोपवले आहे ते पूर्ण करण्याचा संकल्प म्हणजे ही शपथ असते. तेवढ्याच गांभीर्याने ती घेणे अपेक्षित असते. आजवर सर्वच्यासर्व १६ लोकसभेत ती तशीच घेतली गेली. अगदी २०१४ साली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा लोकसभेत शपथ घेतली आणि त्या पाठोपाठ इतर सदस्यांनी शपथ घेतली तेव्हाही हे गांभीर्य टिकून होते. किंबहुना जनतेने दाखविलेल्या  विश्वासाने आणि टाकलेल्या जबाबदारीचे भान ठेवत ती अधिक गांभीर्याने घेतली गेली होती. या सरकारवर आणि सरकारी पक्षावर जनतेने २०१४ पेक्षाही अधिक विश्वास दाखविला पण संसद सदस्यांच्या शपथविधी समारंभात त्या विश्वासाचे उन्मादात रुपांतर झालेले पाहावे लागणे क्लेशदायक आहे. आपण लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर विराजमान आहोत हे विसरून संसदसदस्य रस्त्यावरील झुंडी सारखे वर्तन आणि गदारोळ करतात तेव्हा ते त्या व्यासपिठाचाच नाही तर ते ज्या प्रक्रियेतून तिथपर्यंत पोचले त्या लोकशाही प्रक्रियेचाच अपमान करीत असतात. तेही देशाच्या कोट्यावधी जनतेला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणून प्रिय असलेल्या श्री रामाच्या नावावर ! श्रीरामाच्या नावावर लोकशाहीच्या पुजास्थानाच्या मर्यादा ओलांडणे हा रामाचा अपमानच आहे. श्रीरामाचे नांव घेत जो गदारोळ केला गेला आणि विरोधी सदस्याची जशी खिल्ली उडविल्या गेली आणि आपल्या संख्याबळाची जरब बसविण्याचा प्रयत्न झाला ते मर्यादा उल्लंघनच म्हंटले पाहिजे. याच्या प्रतिक्रियेतून ‘अल्लाहू अकबर’ आणि ‘जय दुर्गामाता’ सारख्या झालेल्या घोषणा तितक्याच आक्षेपार्ह आहेत. अशा घोषणाबाजीमुळे लोकशाहीचे व्यासपीठ हे धार्मिक युद्धाचा आखाडा बनले. अशा प्रकारच्या ‘धर्मयुद्धा’ने १७ व्या लोकसभेचा प्रारंभ व्हावा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचाही अवमान आहे.  

लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर श्रीरामा बद्दल प्रेम आणि श्रद्धा दाखवायला मनाई नाही पण ती मर्यादा पुरुषोत्तमाला शोभेल या पद्धतीनेच दाखवायला हवी. शपथ घेतल्यानंतर त्या सदस्याने विनम्रतेने जय श्रीराम म्हणत सर्वाना अभिवादन केले असते तर ते लोकसभेच्या आणि मर्यादा पुरुषोत्तमाच्या मर्यादेला साजेसे झाले असते. रामनामाचा उच्चार कोणाला भीती दाखविण्यासाठी जर कोणी करत असेल तर त्याला या देशातील लोक ज्या रामाला पूजनीय मानतात तो राम समजलाच नाही असा होतो. लोक रामनामाचा जप आणि उच्चार करतात ती मनातील भिती दूर करण्यासाठी. लहानपणी अंधारातून जाताना आपल्यापैकी प्रत्येकाला वाटणारी भिती दूर करण्यासाठी आपण रामनामाचा जप करायचो हे आपल्या पैकी कोणी विसरले नसेल. अशा रामाचा एखाद्या व्यक्ती किंवा समाजाला भिती दाखविण्यासाठी, त्यांच्यावर जरब बसविण्यासाठी उपयोग निन्द्नीयचं समजला पाहिजे. रस्त्यावर अशा उपयोगाची अनेक उदाहरणे आहेत पण लोकसभेत असे घडणे अनपेक्षित आणि अवांछनीय आहे. या सगळ्या प्रकारावर कोणताही रामभक्त ‘हे राम’ असेच म्हणेल. लोकसभा हे देवाचे भजन करण्याचे स्थान नाही, तर सर्वसामान्य जनतेला देव मानून काळजी घेण्याचे स्थान आहे याचा सुरुवातीलाच संसद सदस्याना विसर पडला असेल तर पुढे काय वाढून ठेवले याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. अमरावतीच्या नवनिर्वाचित संसद सदस्या नवनीत राणा यांनी देवाचा जयघोष करण्याचे स्थान संसद नसून मंदिर आहे याची आठवण आणि जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. असा प्रयत्न प्रधानमंत्री मोदी आणि सत्ताधारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला असता तर काही काळासाठी भारतीय संसद धर्म संसद बनल्याचे चित्र जगाला दिसले नसते.

प्रधानमंत्री मोदी यांनी हा गदारोळ शांत करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे होते. कारण २-४ दिवस आधी ते जे बोलले त्याच्या विरोधात हे सगळे घडत होते. नव्याने निवडून आल्यावर नेतेपदी निवड झाली तेव्हा त्यांनी अल्पसंख्याकांचा विश्वास मिळविण्याची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाची असल्याचे आपल्या पक्षाच्या नवनिर्वाचित संसद सदस्यांना सांगितले होते. संसदेचे अधिवेशन सुरु होण्याआधी बोलावलेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत त्यांनी संख्येची चिंता करू नका. तुमचा आवाज महत्वाचा आहे आणि तो ऐकला जाईल असे सांगून विरोधीपक्ष नेत्यांना आश्वस्त केले होते. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी शपथविधी प्रसंगी जे काही केले त्यामुळे प्रधानमंत्र्याची आश्वासने आणि विश्वास धुळीस मिळाला. हैदराबादचे खासदार ओवैसी शपथ घेत असताना मुद्दामहून केलेला मोठा गदारोळ अल्पसंख्याकांचा विश्वास उडविणारा होता. स्वपक्षाचे खासदार शपथ घेताना प्रकट झालेला उन्माद विजयाचा उन्माद म्हणून दुर्लक्षित करता आला असता. पण संख्येनी कमी असलेल्या विरोधीपक्षाच्या सदस्यांच्या शपथविधी वेळी रामाचा गजर करून आपल्या शक्तीची जाणीव करून देण्याचा प्रकार अनाठायी आणि अनावश्यक होता. विरोधीपक्षांचा आवाज आम्ही कसा दाबू शकतो याचे ते प्रात्यक्षिक होते. प्रधानमंत्री मोदींच्या उपस्थितीत त्यांनी देशाला आणि विरोधी पक्षांना दिलेल्या आश्वासनाची त्यांच्याच समोर अशी खिल्ली उडाली असेल तर सत्ताधारी पक्ष विजयाने बेभान झाला आहे असाच त्याचा अर्थ निघतो. प्रज्ञा ठाकूर यांनी नथूरामची भलावण केल्यानंतर मोदीजी म्हणाले होते की मी त्यांना कधीच माफ करू शकणार नाही. असे असताना मोदीजीच्या उपस्थितीत प्रज्ञा ठाकूर यांनी शपथ घेतली तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ सत्ताधारी भाजपने दाखविलेला अति उत्साह आणि अति उन्माद बघता आपण फक्त असहाय्यपणे ‘हे राम’ म्हणू शकतो.
--------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८   
--------------------------------------------------------------------------------------------------
ताजा कलम : संसदेत धार्मिक घोषणाबाजीला परवानगी नाही - नवनिर्वाचित लोकसभा अध्यक्ष श्री बिर्ला 

No comments:

Post a Comment