Thursday, June 13, 2019

भाजप निष्ठावान सत्तेपासून वंचित !


कोणताही पक्ष कोणालाही मनमानी पद्धतीने चालविता येवू नये अशीच कायदेशीर व घटनात्मक व्यवस्था असायला हवी.
-----------------------------------------------------------------------------------

कार्यकर्ता ही भाजपची ताकद मानली जाते. मुख्यत: हा कार्यकर्ता संघातून आलेला असतो. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता संघ स्वयंसेवक असतोच असे नाही पण जवळपास सर्वच स्वयंसेवक भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करीत असतो. स्वयंसेवक कार्यकर्ता हीच भाजपची खरी ताकद आहे. संघ-भाजपाचे स्वतंत्र अस्तित्व असले तरी ते तांत्रिकदृष्ट्या आहे. संघाचे स्वयंसेवक इतरही पक्षात –मुख्यत: सत्ताधारी पक्षात सक्रीय असतात. आजवर कॉंग्रेस हा मुख्य सत्ताधारी पक्ष असल्याने अनेक ठिकाणी अनेक कॉंग्रेस नेत्यांचे सहाय्यक संघ स्वयंसेवक दिसतील किंवा दिसत होते म्हणणे संयुक्तिक ठरेल. आम्ही कोणत्याही स्वयंसेवकाला कोणत्याही पक्षात जाण्यापासून अडवत नाही हे संघाचे म्हणणे खोटे नाही. पण संघ विचारसरणी आणि कॉंग्रेससह इतर पक्षांची विचारसरणी भिन्न असल्याने संघ विचारसरणीने भिनलेला कार्यकर्ता दुसऱ्या पक्षाचे विचार पटतात म्हणून कधी त्या पक्षात जात नसतो. स्वत:ची सोय म्हणून किंवा संघाला अनुकूल धोरणे तयार करण्याच्या हेतूने तो दुसऱ्या पक्षासोबत कार्यरत असतो. त्याची खरी नाळ जुडलेली असते ती भाजपशीच.                                                          

संघा व्यतिरिक्त भाजपचे जे कार्यकर्ते असतात ते सत्ता मिळविण्याचे माध्यम म्हणून भाजपा नेतृत्वाकडूनच आणले जातात किंवा असे लोक सत्तालालसेपायी भाजपा मध्ये येत असतात. भाजपचा सत्तेतील वाटा वाढविण्यात स्वयंसेवक कार्यकर्त्यां इतकेच अशा दुसऱ्या पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांचे – नेत्यांचे योगदान महत्वाचे राहिले आहे. मुळ संघाचा असलेला भाजपा कार्यकर्ता ही संघाची ताकद असला तरी भाजप वाढला तो इतर पक्ष-संघटनांकडून आलेल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने किंवा प्रत्यक्ष दुसऱ्या पक्षाच्या मदतीनेच ! जनसंघ हा संघाच्या चौकटीत बद्ध होता तेव्हा तो अगदीच गोगलगायीच्या गतीने वाढला. आणीबाणीत १९७७ साली जनसंघ जनता पार्टीत विलीन झाला आणि भारतीय जनता पार्टी म्हणून बाहेर पडला ते नवे रूप आणि नवी शक्ती घेवून. हे नवे रूप आणि नवी शक्ती त्याला संघाबाहेरून आलेल्या इतर पक्ष-संघटनांच्या कार्यकर्त्यांमुळे प्राप्त झाली. भाजपच्या वाढीचे आणि यशाचे हेच सूत्र पुढे राहिले. या सूत्राने भाजपचा विस्तार झाला, सत्ता मिळाली पण सत्तेत वाटा बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना अधिक मिळाला . भाजपची ताकद असलेला मुळ कार्यकर्ता मात्र सत्तेपासून वंचित राहिला आहे.


भाजपचा पुरेसा विस्तार होवून स्वबळावर लढण्याच्या स्थितीत भाजप आल्यानंतरही निवडणूक लढण्यासाठी दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देवून त्यांना निवडणुकीसाठी प्राधान्य देणे थांबलेले नाही. यामागे अधिक शक्तिशाली बनण्याचा नेतृत्वाचा हव्यास आहे की स्वबळावर मोठे यश मिळविता येणार नाही ही भावना आहे हे सांगणे कठीण आहे. दुसऱ्या पक्षातील शक्तिशाली नेत्यांना आपल्याकडे खेचून त्या पक्षाला प्रभावहीन करून एकछत्री साम्राज्य प्रस्थापित करण्याची महत्वाकांक्षाही यामागे असू शकते. कारण काहीही असले तरी परिणाम मात्र एकच आहे आणि तो म्हणजे पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा मिळण्या ऐवजी उपऱ्याना निवडून देण्यासाठी कष्ट करणे तेवढे त्यांच्या नशिबी आले आहे. महाराष्ट्र याचे उत्तम उदाहरण आहे. मुंबई व पुणे सोडले तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात कोण्याही भाजपा निष्ठावन्ताना लोकसभेचे तिकीट मिळाले नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार घेवून भाजप जिंकली आहे. १-२ जागा कमी मिळाल्या तरी निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट देवून निवडून आणण्याचा निर्धार नेतृत्वाला दाखवता आला नाही. परिणामी निष्ठावान कार्यकर्त्यांना उपऱ्याची वेठबिगारी करावी लागली. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फोडून त्यांना भाजप कडून तिकीट देण्याचे घाटत आहे. वास्तविक कधी नव्हती तेवढी अनुकुलता भाजपसाठी निर्माण झाली आहे. अशा अनुकूल परिस्थितीत निष्ठावान कार्यकर्त्यांना निवडून आणायचे नाही तर मग कधी निवडून आणणार. भाजप नेतृत्व निष्ठावान कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेची कसोटी पाहत आहे. कार्यकर्त्यांना पण वाटायला लागले कि आता नाही तर कधीच संधी मिळणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पहिल्यांदा उपऱ्याना प्रवेश देवून तिकीट देण्या विरुद्ध आवाज उठू लागले आहेत. ही भाजप आणि त्याच्या निष्ठावान कार्यकर्त्यासाठी शुभसूचक घटना आहे.


बिगर संघी कार्यकर्त्यांनी,नेत्यांनी पहिल्यांदा भाजप प्रवेश केला तो भाजपची अटलजींच्या नेतृत्वाखाली स्थापना झाली तेव्हा. कॉंग्रेस विरोधात असलेल्या इतर नेत्यांपेक्षा वाजपेयींचे नेतृत्व भावले म्हणून. अटलजी नंतर सत्तेत आले तेव्हाही कोणाला प्रलोभन देवून किंवा सीबीआय – ईडीचा धाक दाखवून कधी भाजपमध्ये प्रवेश करण्यास बाध्य करण्यात आले नव्हते. आता सरळ सरळ असा धाक दाखवून किंवा तिकिटाचे प्रलोभन देवून विरोधी पक्षातील नेत्यांना-कार्यकर्त्यांना भाजप मध्ये सामील करून घेण्यात येत आहे. असे करणे स्वपक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय करणारे तर आहेच पण नैतिक दृष्टीनेही समर्थनीय नाही. कॉंग्रेसच्या घराण्यावर मनमानी पद्धतीने कॉंग्रेस चालविण्याचा सध्याच्या भाजप नेतृत्वाकडून सातत्याने आरोप होत असतो. कॉंग्रेसमध्ये लोकशाही नसून एका घराण्याचे नेतृत्व सगळे काही ठरवते असे बोलल्या जाते. भाजपमध्ये आज वेगळे काय होते. तिकीट कोणाला द्यायचे हे सर्वस्वी मोदी-शाह यांचे हाती आहे. पक्षाचे सभासद नसलेल्यांनाही ते भाजपचे तिकीट देवू शकतात. मुळात कोणताही पक्ष कोणालाही मनमानी पद्धतीने चालविता येवू नये अशीच कायदेशीर व घटनात्मक व्यवस्था असायला हवी. पक्षाच्या वतीने निवडणुकीचे तिकीट मिळवायचे असेल तर ती व्यक्ती किमान दोन वर्षापासून पक्षाची सभासद असायला हवी एवढे बंधन निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांवर घालायला हवे. पक्षात निष्ठावान कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी हे आवश्यक आहे.
-----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव, पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८

No comments:

Post a Comment