Thursday, June 27, 2019

जनमताचा अनादर !


कट्टरपंथीय हल्लेखोरांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ते फक्त एखाद्या असहाय्य व्यक्तीची धार्मिक कारणावरून हत्या करीत नसून जगातील सर्वात मोठा लोकशाही देश या लौकिकाची आणि जगाचे नेतृत्व करण्याच्या भारतीय आकांक्षेची हत्या करीत आहेत.
----------------------------------------------------------------------------

ताज्या सार्वत्रिक निवडणुकीत २०१४ च्या निवडणूक विजयापेक्षा मोठा विजय मिळाल्यानंतर जगभरातील नेत्यांकडून प्रधानमंत्री मोदी यांचे कौतुक होणे स्वाभाविक होते. अगदी पाकिस्तान आणि चीन ज्यांना आपण शत्रूराष्ट्र समजतो त्यांनीही केले. प्रत्येक निवडणुकीनंतर विजयी होणारांचे असे अभिनंदन करण्याची जगराहाटी आहे. तसे नसते तर पाकिस्तान-चीनने अभिनंदन केले नसते. कारण पूर्ण बहुमताचे मजबूत सरकार त्यांच्यासाठी अडचणीचे आहे. अशा विजयावर जगभरातील वृत्तपत्रांची प्रतिक्रिया ही नेहमीची जगरहाटी नसते तर ते त्यांचे आकलन असते. असे आकलन चुकूही शकते आणि बरोबरही असू शकते. प्रधानमंत्री मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या विजयावर संपादकीयातून आणि लेखातून ‘द गार्डियन’ आणि ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त वृत्तपत्रांची प्रतिक्रिया बरीच चर्चिल्या गेली आहे. दोन्ही वृत्तपत्राने मोदी विजयावर कटू आणि बोचरी टीका करणारे भाष्य केले आहे. गेल्या ५ वर्षात भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला जावूनही मोदींनी मोठा विजय मिळविला हे भारतासाठी आणि जगासाठी शुभसूचक नसल्याचे मत ‘गार्डियन’ने नोंदविले आहे. तर भारतासाठी पुढची ५ वर्षे भितीदायक असतील असे ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने म्हंटले आहे. या दोन्ही वृत्तपत्रांनी असे मत नोंदविण्यामागे अर्थव्यवस्थेची त्यांच्या मते झालेली घसरण हे एक कारण असले तरी मोठे आणि महत्वाचे कारण भारतातील अल्पसंख्यांक समुदायाची स्थिती असल्याचे त्यांच्या प्रतिपादनावरून दिसून येते.
 
ही वृत्तपत्रे भाजपला हिंदू राष्ट्रवादी संघटना आरेसेसची शाखाच मानत असल्याने त्यांच्यामते या विजयाने अल्पसंख्याकांना अंधाऱ्या गल्लीत सोडले आहे. ते या देशाचे दुय्यम नागरिक असल्याची भावना गेल्या ५ वर्षात वाढली आहे ती अधिक वाढेल. या समुदायाची लोकसंख्या २० कोटी असूनही २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकात मुस्लीम समुदायाचे लोकसभेतील प्रतिनिधित्व घटल्याचे ही वृत्तपत्रे लक्षात आणून देतात. मुस्लिमांचा वाली कोणीच नसल्याचे या वृत्तपत्राचे म्हणणे आहे. सत्ताधारी पक्ष कधी त्यांचा वाली नव्हताच पण विरोधी पक्षांनीही मुस्लिमांची साथ सोडल्याने हा समुदाय असुरक्षित बनला असल्याचा या वृत्तपत्रांनी दावा केला होता. या दोन्ही निवडणुकात मुस्लिमांचे राजकीय प्रतिनिधित्व घटले असले तरी त्यामुळे भारतीय राज्यघटनेने त्यांना दिलेले अधिकार कमी होत नाहीत हे या वृत्तपत्रांनी लक्षात न घेतल्याने अशी टोकाची प्रतिक्रिया व्यक्त केली असावी. ही वृत्तपत्रे म्हणतात त्याप्रमाणे मोदींना पाच वर्षात फार कर्तबगारी दाखविता आली नसेलही पण विरोधी पक्षाची अवस्थाच एवढी वाईट आणि कमजोर आहे की त्यांच्या हाती देश देणे मतदारांना सुरक्षित वाटले नाही हे मोदींच्या विजयाचे मोठे कारण असल्याचे या वृत्तपत्रानी लक्षातच घेतले नाही. त्यामुळेच या दोन्ही वृत्तपत्राकडून जनमताचा उपमर्द होईल अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
                                                                    
एवढ्या प्रमुख आणि प्रसिद्ध वृत्तपत्रांनी असे मत व्यक्त केल्याने आंतरराष्ट्रीय समुदायात भारताची प्रतिमा मलीन होवू शकते हे लक्षात घेवूनच प्रधानमंत्री मोदी यांनी निवडून आल्यावर अव्वल क्रमाने कोणती गोष्ट केली असेल तर ती म्हणजे अल्पसंख्यांक समुदायाचा विश्वास मिळविण्याचा संकल्प सोडला. आपल्या पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांसमोर बोलताना त्यांनी ‘सब का साथ सब का विकासा’ला ‘सब का विश्वास’ची जोड दिली. पहिल्या ५ वर्षात मुस्लिमांवर हल्ले झाले तेव्हा प्रतिक्रिया देण्यात मोदीजीनी अनाकलनीय विलंब लावल्याने हल्लेखोरांचे मनोबल वाढले होते आणि त्यामुळे देशात आणि देशाबाहेरही त्यांच्यावर टीका झाली होती. ती चूक सुधारून त्यांनी शपथ घेण्याआधीच अल्पसंख्याकांचा विश्वास मिळविण्याचा संकल्प सोडल्याने मुस्लीम समुदायाकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त झाल्याने वातावरणातील मुस्लीम आणि इतर अल्पसंख्यांका बद्दलचा द्वेष कमी होईल अशी आशा निर्माण झाली होती. मोदीजीनी त्यांच्या कट्टरपंथी समर्थकांना अल्पसंख्यांकांचा विश्वास मिळवायला सांगितल्याने त्यांच्याही वागण्या-बोलण्यात आणि कृतीत फरक पडेल अशी आशा निर्माण झाली होती. झारखंड आणि इतर ठिकाणच्या ताज्या घटनांनी त्यावर पाणी फेरल्या गेले आहे. गार्डियन आणि न्यूयॉर्क टाईम्सला जसा जनादेशाचा अर्थ कळला नाही व त्यामुळे त्यांच्याकडून जनमताचा अवमान झाला तीच गोष्ट सत्ताधारी पक्षाच्या कट्टरपंथीय हल्लेखोरांच्या बाबतीत म्हणता येईल. त्यांची कृतीच त्यांनी जनादेशाचा चुकीचा अर्थ लावल्याचे स्पष्ट करते.                    

पहिल्या कार्यकाळात अशा हल्लेखोरांवर जरब बसवणारी कारवाई झाली नाही. आत्ताही तसेच झाले तर मोदी विजया बद्दल गार्डियन आणि न्यूयॉर्क टाईम्स यांनी व्यक्त केलेले मतच बरोबर होते अशी आंतरर्राष्ट्रीय समुदायाची समजूत होवून भारताची प्रतिमा डागाळेल. कट्टरपंथीय हल्लेखोरांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ते फक्त एखाद्या असहाय्य व्यक्तीची धार्मिक कारणावरून हत्या करीत नसून जगातील सर्वात मोठा लोकशाही देश या लौकिकाची आणि जगाचे नेतृत्व करण्याच्या भारतीयांच्या आकांक्षेची हत्या करीत आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ‘मोदी है तो मुमकिन है’ असे म्हणाले तेव्हा खूप कौतुक झाले. आता त्यांच्याच मंत्रालयाने भारतात वाढत असलेल्या धार्मिक असहिष्णुता आणि अल्पसंख्यांकाविरुद्धची वाढती हिंसा याचा अहवाल जगासमोर ठेवून मोदी सरकारचेच नाही तर समस्त भारतीयांचे नाक कापले आहे. अमेरिकेला दोष देवून उपयोगाचे नाही. १ वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अशा हिंसे विरुद्ध कडक कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यांनी व केंद्राने न पाळून हल्लेखोरांना रान मोकळे करून दिले आहे.
---------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८

No comments:

Post a Comment