कॉंग्रेस पुढचा सर्वात मोठा प्रश्न आणि सर्वात मोठे आव्हान कोणते असेल तर
कॉंग्रेसला सत्तेच्या नव्हे तर विचाराच्या पायावर उभे करण्याचे आहे.
----------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------
देशातील
सर्वात जुना आणि एकेकाळचा सर्वात मोठा असलेला कॉंग्रेस पक्ष सध्या मरणासन्न
अवस्थेत आहे. दीर्घकाळा पासून सत्ता हाच कॉंग्रेस पक्षाचा श्वास बनला होता. लढाऊ आणि
विचारी कॉंग्रेस कार्यकर्ता हा कॉंग्रेसचा भूतकाळ आहे. आजच्या नव्या पिढीला तर
कॉंग्रेसचा हा भूतकाळ देखील माहित नाही. त्यांच्यासाठी कॉंग्रेस नेते आणि
कार्यकर्ते म्हणजे सत्तेला चिकटलेले मुंगळे वाटतात. सत्ता भाजपकडे असेल तर हे
मुंगळे तिकडे जातात आणि सत्ता कॉंग्रेसकडे आली तर कॉंग्रेसच्या भेलीला चिकटतात.
विचाराशी यांना काही देणेघेणे आहे असे वाटण्या सारखे कॉंग्रेसजनांचे वर्तन
नसल्याने हा पक्ष म्हणजे सत्तालोलुप लोकांचा गोतावळा वाटला तर यात जनतेचा दोष
नाही. राजीनामा दिलेले आणि राजीनाम्यावर ठाम असलेले कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल
गांधी यांच्या बद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांना पप्पू
म्हणून हिणवत असले तरी ज्या रोगाने कॉंग्रेस मरणासन्न अवस्थेत पोचली आहे त्या
रोगाचे अचूक निदान त्यांनी केले आहे. राजीनाम्यावर ठाम असल्याचे काँग्रेसजनांना
सांगण्यासाठी लिहिलेले चार पानी जाहीर पत्र अचूक रोगनिदानाची आणि त्यांच्या
वाढत्या प्रगल्भतेची देखील साक्ष देते. भाजप समर्थकांना माझे म्हणणे कदाचित पटणार
नाही. राजीनामा हे नाटक असून राहुल गांधीच अध्यक्षपदी कायम राहतील हा भाजप
समर्थकांचा अंदाज सपशेल चुकला यावरून तरी राहुल गांधी हे वेगळे रसायन आहे याचा बोध
त्यांनी घेतला पाहिजे. आजवर कॉंग्रेसमध्ये विजयाचे श्रेय कॉंग्रेस नेतृत्वाकडे आणि
पराभवाचे खापर अन्य कार्यकर्ते आणि नेते यांच्या डोक्यावर फुटत होते. शीर्ष नेतृत्वाने
पराभवाची जबाबदारी स्विकारून राजीनामा देण्याची आणि त्यावर ठाम राहण्याची
स्वातंत्र्योत्तर काळातील पहिलीच वेळ असावी.
कॉंग्रेस
पुढचा सर्वात मोठा प्रश्न आणि सर्वात मोठे आव्हान कोणते असेल तर कॉंग्रेसला
सत्तेच्या नव्हे तर विचाराच्या पायावर उभे करण्याचे आहे. याची स्पष्ट जाणीव राहुल
गांधीना असल्याचे त्यांचे जाहिरपत्र दर्शविते. भारतीय जनता पक्षाने आज जे स्थान
मिळविले आहे ते प्रामुख्याने त्यांचा जो काही बरावाईट विचार आहे त्याला ते प्रतिकूल
परिस्थितीतही चिकटून राहिल्यामुळे मिळाले आहे. दुसरीकडे कॉंग्रेसची जी घसरण झाली
ती विचार विसरल्यामुळे झाली. पंडित नेहरू नंतर कॉंग्रेसचा विचाराचा पाया कमकुवत
करून सत्तेचा पाया मजबूत करण्याचा श्रीगणेशा इंदिराजीच्या काळात झाला. एक
प्रधानमंत्री म्हणून इंदिराजींची कामगिरी देशाला मजबूत करणारी असेल पण त्यांच्या
काळात कॉंग्रेस पक्ष बुजगावणे बनायला प्रारंभ झाला. दुर्बल विरोधकांसाठी हे
बुजगावणे बराच काळ भारी ठरले. इंदिरा काळात सुरु झालेले पक्ष संघटनेचे पतन
सत्तेच्या झळाळीत दिसले नाही पण शेवटी बुजगावणे ते बुजगावनेच. पराभवाचा झटका बसताच
ते उघडे पडले. दारूण पराभवाने तर पक्ष संघटनेची दारूणता उघडी झाली. भाजपचा पराभव
होत होता तेव्हा त्यांची पक्ष संघटना दारूण आहे असे कधी भासले नाही. संघटना असूनही
त्यांचे विचार पटत नसल्याने त्यांना लोक समर्थन लाभत नव्हते. कॉंग्रेसने विचाराचा
प्रचार-प्रसार आणि तो विचार रुजविण्यासाठीचा प्रयत्न आणि संघर्ष कधीच सोडला
असल्याने देशातील पुढच्या पिढ्यांपर्यंत कॉंग्रेस विचार पोचलाच नाही. देशातीलच
कशाला कॉंग्रेस मधील पुढच्या पिढ्यांपर्यंत सुद्धा कॉंग्रेस विचार पोचला नाही.
कॉंग्रेस म्हणजे सत्ता मिळविण्याचे आणि चालविण्याचे एक साधन बनले. विचाराचा अंकुश
नसल्याने काँग्रेसजनांचे वर्तन भ्रष्ट होत गेले आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम
झाला. कॉंग्रेस लोकांच्या मनातून उतरली. सत्तेकडून विचाराकडे कॉंग्रेसजनांना
वळविणे आणि भाजपशी वैचारिक संघर्ष सुरु ठेवणे कॉंग्रेसच्या अस्तित्वासाठी आणि
पुन्हा उभारी घेण्यासाठी गरजेचे असल्याचा संदेश राहुलच्या पत्रात आहे.
संघ-भाजपशी
आपल्याला एकाकी संघर्ष करावा लागल्याची खंत राहुल गांधीनी व्यक्त केली आहे.
त्यांची खंत बरोबर आहे. एकाकी पडण्याची परिस्थिती निर्माण झाली नाही तर कॉंग्रेस
नेतृत्वाने ती ओढवून घेतली याचा मात्र राहुल गांधीना विसर पडला. ज्या वैचारिक
संघर्षाची भाषा आज राहुल गांधी करत आहेत ती सत्तेत असताना केली नाही. कॉंग्रेसच्या
सर्वसमावेशकतेचा विचार आणि संविधानातील मुल्ये रुजविण्यासाठी कॉंग्रेसने सत्तेचा
उपयोग केला नाही त्यातून ही परिस्थिती ओढवली आहे. विचार आणि त्याच्यासाठी काम
करण्याचा संकल्प संपल्याची शिक्षा जनतेने कॉंग्रेसला दिली आहे. उशिरा का होईना
राहुल गांधीना याची जाणीव झाली आणि ते कॉंग्रेसजनांना जाणीव करून देत आहेत हे कॉंग्रेससाठी
आशादायक आहे. भाजप आणि संघपरिवार त्यांच्या भारता बद्दलची कल्पना सतत मांडत आलेत
आणि नेहरू नंतर कॉंग्रेसची भारताबद्दलची संकल्पनाच लोकांसमोर ठेवणे बंद झाले.
एकप्रकारे भाजप आणि संघपरिवाराला मिळालेले हे मोकळे रान होते. एकच एक विचार जेव्हा
सातत्याने लोकांसमोर येत राहतो आणि त्याचा प्रतिवाद करणारा दुसरा विचार लोकांसमोर
येत नाही अशावेळी मांडल्या जाणाऱ्या विचाराचा आपसूक प्रभाव सर्वसामान्य जनतेवर पडतो.
जो विचार लोकांनी सातत्याने ६० वर्ष नाकारला त्याला काँग्रेसमुळे अच्छे दिन आलेत.
आता भाजपला हरवायचे असेल तर कॉंग्रेसला सत्तेऐवजी विचाराची लढाई लढावी लागणार आहे.
भाजपच्या कल्पनेतील भारतापेक्षा कॉंग्रेसच्या कल्पनेतील भारत देशातील जनतेसाठी आणि
जगासाठी सुखकारक आहे हे पटविण्यात जो पर्यंत कॉंग्रेसला यश येत नाही तो पर्यंत
कॉंग्रेस सत्तावंचित राहणार आहे.
--------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
--------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
No comments:
Post a Comment