Thursday, November 7, 2019

बेदरकार राजकारणाला मतदारांचा चाप !


तर्कसंगत विचार करायचा झाला तर ५६ आमदार असलेल्या शिवसेनेने १०५ आमदार असलेल्या भाजपकडे सत्तेत निम्मा वाटा मागणे विसंगत वाटते. पण भारतीय जनता पक्षाने राजकारणच 'जिसकी लाठी उसकी भैंस' या स्तरावर आणून ठेवल्याने तर्कसंगत राजकारणाचे दिवस इतिहास जमा झाले आहेत. म्हणून शिवसेनेची मागणी तर्कविसंगत असूनही सर्वसाधारण जनतेची सहानुभूती शिवसेनेच्या बाजूने आहे.  शिवसेना भाजपची  सत्तेची नशा उतरवत असल्याचा आनंद लोकांना होतो आहे.
------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल घोषित होऊन पंधरवडा होत आला तरी नवे सरकार बनविण्याचा घोळ संपलेला नाही. हा लेख प्रकाशित होईल तेव्हा तो संपलेला असेल. एक तर नवे सरकार शपथ घेईल किंवा राष्ट्रपती राजवट लागू होईल. कारण १० नोव्हेम्बरला विधानसभेची मुदत संपत आहे. सगळ्याच पक्षांच्या विशेषतः सत्ताधारी भाजपच्या मग्रुरी आणि मनमानीला मतदारांनी घातलेला लगाम हे सरकार लगेच न बनल्याचे खरे कारण आहे. केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाले नाही किंवा अगदी पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून जरी भाजप निवडून आला नाही तर साम,दाम,दंड,भेद वापरून सरकार बनविण्यात भारतीय जनता पक्षाने प्राविण्य मिळविले होते. कर्नाटक मध्ये काँग्रेसने सरकार बनविण्याच्या बाबतीत मात केली होती खरी पण बाजी उलटवायला भाजपला फार काळ लागला नाही. कर्नाटक मध्ये सरकार बनविण्यासाठी काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांनी राजीनामा देण्याचे नाट्य घडविण्यामागे कित्येक हजार कोटी खर्च करण्यात आले होते हे हळू हळू बाहेर येऊ लागले आहे. कर्नाटक मध्ये काँग्रेस-जेडीएसचे सरकार उलथून टाकण्याचे जे कारस्थान रचण्यात आले त्यामागे कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा नव्हते तर दस्तुरखुद्द भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह होते हे येदीयुरप्पा यांच्या संभाषणाची जी टेप समोर आली आहे त्यातून हे स्पष्ट झाले. अमित शाह 'काहीही' करू शकतात अशी जी त्यांची दबंग प्रतिमा तयार झाली ती अशा कारनाम्यातून. महाराष्ट्राच्या बाबतीत दबंग अमित शाहने देखील नांगी टाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजप-शिवसेना युती घडवून आणण्यात अमित शाह यांचा पुढाकार होता. त्यासाठी त्यांच्या अनेक मुंबई वाऱ्या झाल्या होत्या. निवडणुकीत युतीला सरकार बनविण्या इतके बहुमत मिळूनही सरकार बनविण्यात अडचणी येत असल्याचे पाहून देखील अमित शाह मुंबईत फिरकले नाहीत. पैसा आणि सत्ता यांच्या बळावर आपण काहीही करू शकतो या गुर्मीच्या फुग्याला मतदारांनी लावलेल्या टांचणीचा हा परिणाम आहे.
 
शिवसेना नेतृत्व ऐकत नाही, झुकत नाही हे बघूनही सर्व सत्ता हाती असतांना भाजप नेतृत्व काही करू शकत नाही असे चित्र २०१४ नंतर प्रथमच बघायला मिळते. कर्नाटक मध्ये भाजपने सत्तांतराचा जो नागडा खेळ केला त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करणे शक्य होत नाही याचे कारण मतदारांनी निवडून आलेल्या आमदारांच्या मनावर बसविलेली जरब आहे. निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपने प्रलोभन देऊन पक्ष तोडीचा जो खेळ केला तो मतदारांना रुचला नाही याचा स्पष्ट संदेश निवडणूक निकालातून मिळाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पैसा आणि सत्ता याच्या मोहाने जे पक्षांतर झाले त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक उमेदवारांना मतदारांनी लोळवले. आपण आता पक्षद्रोह करून भाजपला सरकार बनविण्यासाठी मदत केली तर आपलीही तीच गत होईल अशी धास्ती नवनिर्वाचित आमदारात निर्माण झाली आहे. शिवसेना हा सत्तास्थापनेच्या भाजपच्या मार्गातील अडथळा नाही तर नवनिर्वाचित आमदारात मतदारांमुळे निर्माण झालेली धास्ती हा खरा अडथळा आहे. असे नसते तर आता पर्यंत 'मतदारसंघाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी' शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून अनेक आमदार भाजपला जाऊन मिळाले असते आणि फडणवीसांचा शपथविधी एव्हाना पार पडला असता. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या हातात असलेला पैसा व सत्तेचा जादुई चिराग महाराष्ट्रात काम करेनासा झाला तो याच मुळे. 

भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत येऊन शिवसेनेला समजावण्याचा प्रयत्न करीत नाहीत याच्यामागे एक कारण आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्यासाठी महाराष्ट्रातील सत्तेत शिवसेनेला ५० टक्के वाटा देण्याचे त्यांच्या उपस्थितीत मान्य करण्यात आले होते आणि त्यांच्याच उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत  ५०:५० टक्के सत्ता उपभोगाचा फॉर्म्युला मान्य झाल्याचे घोषित करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत भाजप अधिक मजबूत होताच भाजपला या फॉर्म्युल्याचा विसर पडला. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला कौल लक्षात घेऊन शिवसेनेनेही थोडीशी कुरकुर करत विधानसभेच्या निवडणुकीत ५० टक्के जागांचा आग्रह सोडला. निवडणूक निकालाने शिवसेनेला पुन्हा आक्रमक होत सत्तेत ५० टक्के वाटा मिळविण्याची संधी मिळाली. त्यामुळेच आजचा तिढा निर्माण झाला आहे. तर्कसंगत विचार करायचा झाला तर ५६ आमदार असलेल्या शिवसेनेने १०५ आमदार असलेल्या भाजपकडे सत्तेत निम्मा वाटा मागणे विसंगत वाटते. पण भारतीय जनता पक्षाने राजकारणच 'जिसकी लाठी उसकी भैंस' या स्तरावर आणून ठेवल्याने तर्कसंगत राजकारणाचे दिवस इतिहास जमा झाले आहेत. म्हणून शिवसेनेची मागणी तर्कविसंगत असूनही सर्वसाधारण जनतेची सहानुभूती शिवसेनेच्या बाजूने आहे. भाजप-शिवसेना यांच्यातील संघर्ष तत्वाचा नाही तर सत्तेसाठीचा आहे. तरीही या संघर्षात लोक भाजपा ऐवजी शिवसेनेच्या बाजूने आहेत. कारण शिवसेना भाजपची  सत्तेची नशा उतरवत असल्याचा आनंद लोकांना होतो आहे. सत्ता भ्रष्ट करते आणि निरंकुश सत्ता अधिक भ्रष्ट करते याची प्रचिती मोदी-शाहच्या भाजपाकडे पाहून येते. साम-दाम-दंड-भेद वापरून केलेले मूल्यहीन राजकारण जनता फारकाळ सहन करत नाही हेच महाराष्ट्रातील निवडणूक निकाल आणि घडामोडीनी दाखवून दिले आहे.
------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment