फडणवीस -अजित पवार सरकार हे ठकगिरीचे देशातील पहिले उदाहरण आहे. अजित
पवारांसोबत सरकार बनविल्याने भाजपचा ठकसेन असल्याचा नवा अवतार समोर आला तो जास्त
चिंताजनक आहे.
------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
शिवतीर्थावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची आणि
काँग्रेस-राष्ट्रवादी नेते मंत्रिपदाची शपथ घेत असताना आनंद व चैतन्याने भरलेला तो
नेत्रदीपक सोहळा काहीशा पडलेल्या चेहऱ्याने आणि खट्टू मनाने बघण्याची पाळी भारतीय जनता
पक्षाच्या कार्यकर्त्यावर आणि समर्थकांवर आली. आपल्या कार्यकर्त्यांना आणि
समर्थकांना दु:खात
लोटण्याचे काम शिवसेनेच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या नव्या महाराष्ट्र विकास
आघाडीने केले नाही तर हे पातक भाजप नेतृत्वाने केले. माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सारखे नेते नव्या सरकारच्या शपथविधी
सोहळ्याला हसतमुखाने हजर होते. हे हास्य उसने अवसान आणून केलेले होते कि खरे होते
हे तेच नेते जाणोत. कार्यकर्ते मात्र प्रयत्न करूनही चेहरे हसरे ठेवू शकले नाहीत
आणि आवंढा गिळून हा समारंभ पाहात असल्याचे उभ्या महाराष्ट्राने बघितले.
त्यांच्याच
नेत्याने त्यांना या स्थितीत आणले हे जितके खरे तितकेच पक्ष वाढीसाठी राबणारे
कार्यकर्ते देखील या परिस्थितीसाठी जबाबदार आहेत. आपल्या नेत्याच्या प्रत्येक
कृतीला ती चूक आहे कि बरोबर हे न बघता टाळ्या पिटून समर्थन देणारे कार्यकर्ते
असतील तर नेत्यांचा विवेक ठिकाणावर राहात नाही. आत्मविश्वास एवढा फुगतो कि तो
आत्मविश्वास न राहता अहंकारात परिवर्तित होतो. महाराष्ट्रात भाजप नेतृत्वाबाबतीत
नेमके हेच झाले आहे. राष्ट्रव्यापी विजयाने केंद्रीय नेतृत्व आधीच
आत्मविश्वासाच्या सीमा ओलांडून अहंकाराच्या प्रदेशात मुक्त संचार करीत असल्याने
महाराष्ट्रात जे काही होते ते वावगे आहे हे त्यांना वाटण्याचे कारण नव्हते. काय
करायचे ते करा आम्ही आहोत तुमच्या पाठीशी असा केंद्रीय नेतृत्वाने संदेश दिल्याने
महाराष्ट्रातील भाजपा नेते बेभान होऊन वागले नसते तरच नवल.
या निमित्ताने एक बाब
प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे भाजपच्या खालच्या कार्यकर्त्यापासून वरच्या नेत्यापर्यंत मोदी
आणि शाह काहीही करू शकतात याबाबतचा विश्वास कुटून कुटून भरला आहे. भाजपच्या
कार्यकर्त्यांची मोदी आणि शाह यांच्या बद्दलची ही श्रद्धा अंधश्रद्धा असल्याचे
महाराष्ट्रातील घडामोडीने दाखवून दिल्याने भाजपच्या पायाखालची वाळूच घसरली आहे.
मोदी-शाह काहीही करू शकतात या विश्वासाला तडा गेल्याने महाराष्ट्रातील भाजप
कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. सत्तेसाठी आंधळे नेतृत्व आपल्याला एकदिवस खड्डयात
पाडून आपला कपाळमोक्ष करेल याचे भान कार्यकर्त्यांनी तरी कुठे राखले होते.
भाजपमध्ये सगळेच सत्तेसाठी बेभान झाले आहेत ही दर्शविणारी घटना म्हणजे
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार याना घेऊन सरकार बनविण्याचा झालेला प्रयत्न.
एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवून निकालानंतर सरकार बनविण्याच्या
गरजेखातर किंवा वैयक्तिक गरजेपोटी एकत्र येऊन सरकार बनविण्याचे शेकडो प्रयोग आजवर
झालेत. तसाच अजित पवार याना सोबत घेऊन सत्ता बनविण्याचा प्रयत्न असता किंवा
एकमेकांविरुद्ध निवडणूक लढलेल्या भाजप-राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार बनविले असते
तर कोणाला फार आश्चर्य वाटले नसते किंवा धक्का बसला नसता. फडणवीस-अजित पवार
सरकारचे बनणे हे यापेक्षा वेगळे होते. आणि म्हणून तो साऱ्या महाराष्ट्राला नाही तर
देशासाठीच एक धक्का होता. हा धक्का का होता याचे नीट आकलन झालेले नाही. फडणवीस
-अजित पवार सरकार हे ठकगिरीचे देशातील पहिले उदाहरण आहे. अजित पवारांसोबत सरकार
बनविल्याने भाजपचा ठकसेन असल्याचा नवा अवतार समोर आला तो जास्त चिंताजनक आहे.
विरोधी राजकीय नेत्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवून आपल्याकडे ओढण्याचा भाजपचा
कार्यक्रम देशभर चालू आहे तेच अजित पवार यांचे बाबतीत घडले याबाबत दुमत नव्हते.
अजित पवारांना सोबत घेऊन जे कपटी कारस्थान
भाजपने रचले त्याला कायदा , संविधान
आणि जनतेसोबत केलेले फ्रॉड यापेक्षा त्याचे वेगळे वर्णन करताच येणार नाही. काय
होते हे फ्रॉड ? फडणवीस-अजित
पवार यांचा भल्या सकाळी झालेला शपथविधी हा भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारचा
शपथविधी असल्याचे सांगण्यात आले. भाजप -राष्ट्रवादीची युती आहे की अजित पवारांचे
बंड हा संभ्रम दूर व्हायला बराच वेळ लागला. अजित पवारांचे बंड असल्याचे लक्षात
आल्यावर त्यांच्या सोबत किती आमदार आहेत हे कळायला आणखी वेळ लागला आहे.
दिवसभराच्या घडामोडी नंतर अजित पवार यांचे सोबत आमदार नव्हतेच आणि जे होते ते संध्याकाळ पर्यंत
त्यांना सोडून गेल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले पण भाजप नेत्यांना दिसले नाही.
अजित पवारांसोबत आमदार असण्याची गरज भाजप नेतृत्वाला वाटतच नव्हती. राष्ट्रवादीचा
गटनेता आपल्या सोबत आहे आणि या गटनेत्याच्या हातात ५४ आमदाराच्या सह्यांचे पत्र
आहे तेवढेच भाजपला हवे होते. राष्ट्रवादीचे जवळपास सगळे आमदार शरद पवार यांचे सोबत
आहे आणि त्यांचा भाजप सरकारला पाठिंबा नाही हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आणि
स्पष्ट झाल्यावरही केवळ त्यांच्या सह्याचा कागद आपल्या ताब्यात आहे आणि सत्ता
स्थापण्यासाठीच नाही तर ती चालविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी तेवढेच पुरेसे आहे हे
एकजात सगळे भाजपनेते कॅमेरा समोर चेकाळून सांगताना महाराष्ट्राने पाहिले आहे. ही
केवळ टगेगिरी नव्हती तर ठगगिरी होती आणि मुंबई पासून दिल्ली पर्यंतचे नेते या
प्रकरणी ठग असल्या सारखे वागत होते. भाजपची ही ठगगिरी शरद पवारांच्या व्यूहरचनेने
आणि मुत्सद्देगिरीने तसेच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने निष्प्रभ झाली. ठगगिरी
निष्प्रभ झाली पण ठगांचा पक्ष ही नवी ओळख भारतीय जनता पक्षाला मिळाली.
--------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
सुधाकर जाधव
९४२२१६८१५८
Agadi kharay
ReplyDelete👍👍
ReplyDeleteवस्तुस्थिती निदर्शक विश्लेषण
ReplyDelete