Thursday, February 20, 2020

दिल्ली निकाल : शाहीनबागची रेशीमबागवर मात ? -- २



या निवडणुकीत भाजपचा पराभव म्हणजे शाहीनबागेने रेशीमबागेवर केलेली मात आहे का किंवा आप पक्षाच्या विजयास फुकटेपणा कारणीभूत ठरला का याचे हो किंवा नाही असे ठाम उत्तर देता येणे कठीण आहे. एक उत्तर मात्र ठामपणे देता येते आणि ते म्हणजे भाजपच्या टोकाच्या आततायीपणाला मतदारांनी झिडकारले आहे. अमित शाह यांच्या कबुली नंतर तर हा निष्कर्ष तंतोतंत खरा ठरतो.
-----------------------------------------------------------------------------


दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर एका कार्यक्रमात बोलतांना भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक प्रचारा दरम्यान पक्षाच्या नेत्यांनी  वापरलेल्या आक्षेपार्ह  भाषेचा फटका पक्षाला बसल्याची कबुली दिली. जे.पी.नड्डा भाजप अध्यक्ष असले तरी अमित शाह यांनी दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराची आणि प्रचार नियोजनाची सगळी जबाबदारी आपल्या शिरावर घेतली होती. घरोघरी पत्रके वाटण्यापासून दिल्लीच्या कानाकोपऱ्यात सभा घेण्याचे काम अमित शाह यांनी केले. प्रचारा दरम्यान कोण काय करते आणि काय बोलते याची पूर्ण कल्पना अमित शाह यांना होती. शाहीनबागला पाकिस्तान संबोधने, गोळी मारो सालो को अशी अत्यंत नीच पातळीची भाषा भाजप नेत्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत एका पेक्षा अधिक वेळा वापरली. हीच भाषा आपल्याला विजय मिळवून देईल याची खात्री असल्याने प्रधानमंत्री व गृहमंत्री यांनी अशा भाषेवर गदारोळ माजूनही पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना आवरले नव्हते. निकालानंतर अशी भाषा वापरायला नको होती म्हणणाऱ्या अमित शाह यांच्या भाषणानेच पक्षाच्या प्रचाराची दिशा निश्चित झाली होती हे विसरून चालणार नाही. आपण देशाचे गृहमंत्री आहोत हे विसरून दिल्लीतील एका सभेत अमित शाह यांनी 'टुकडे-टुकडे गैंग'ला धडा शिकविण्याची चिथावणी अमित शाह यांनी दिली होती. अमित शाह यांच्या गृह मंत्रालयाला 'टुकडे-टुकडे गैंग' अस्तित्वात असल्याची कोणतीही माहिती नाही आणि गृहमंत्र्यांना अशा गैंगची माहिती असेल तर आपल्या मंत्रालयाला याची माहिती देवून अशा गैंगला जेरबंद करण्याचे आदेश शाह यांनी द्यायला हवे होते. पण तसे न करता जाहीर भाषणात बंदोबस्त करण्याचा आदेश शाह यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर चारच दिवसात जे एन यु वर हल्ला झाला आणि त्यापुढच्या आठवड्यात पोलिसांनीच तोंडावर फडके बांधून जामिया मिलीयाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनीना बेदम मारहाण केली होती.                                                              


'देशभक्त विरुद्ध देशद्रोही' असे दिल्ली विधानसभा निवडणुकीला स्वरूप देवून तो जिंकण्याचा डाव गृहमंत्री अमित शाह यांनीच आखला होता हे आपल्या लक्षात येईल. आता जरी ते प्रचारातील चिथावणीखोर व आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल पक्षातील दुसऱ्या नेत्यांना दोष देत असले तरी स्वत: शाह यांच्या प्रत्येक भाषणात शाहीनबाग आंदोलना विरुद्ध चिथावणी होती. मतदान यंत्राचे बटन एवढे जोरात दाबा की त्याचा झटका शाहीनबागला बसला पाहिजे किंवा तुम्ही कोणाची निवड करणार - शाहीनबागेची की नरेंद्र मोदींची असा प्रश्न ते प्रत्येक सभेत मतदारांना विचारत होते. या निवडणुकीत त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी असलेले 'आप'चे अरविंद केजरीवाल यांचेवर एकाच मुद्द्यावर टीका केली. शाहीनबाग आंदोलनाच्या पाठीमागे अरविंद केजरीवाल असल्याचे ते सांगत होते. प्रधानमंत्री मोदी यांनी जास्त सभा घेतल्या नाहीत . त्यांनी घेतलेल्या दोन्ही सभेत शाहीनबाग मुद्दा होताच. म्हणजे खालच्या कार्यकर्त्यापासून पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या प्रचारात  शाहीनबाग आंदोलन हाच प्रमुखच नव्हे तर एकमेव मुद्दा होता. प्रचारातील भाजपचा हा एकमेव मुद्दा मतदारांनी नाकारला असेल तर रेशीमबागवर शाहीनबागेने मात केली असा अर्थ कोणी काढला तर तो चुकीचा ठरणार नाही. समजा या निवडणुकीत भाजपला विजय मिळाला असता तर शाहीनबाग आंदोलन ज्या नागरिकत्व कायद्या विरोधात आहे त्या कायद्याला लोकांचा पाठींबा मतपेटीद्वारे व्यक्त झाल्याचे ढोल भाजपतर्फे बडविले गेले असते. तेव्हाही अरविंद केजरीवाल यांच्या धोरणाची हार असा आपल्या विजयाचा अर्थ भाजपने लावला नसता. लोकांनी नागरिकत्व कायद्याला पाठींबा दिला असेच आपल्या विजयाचे भाजपने वर्णन केले असते.

आता भाजप कार्यकर्ते आणि नेते त्यांनी निवडणुकीत पुढे केलेल्या मुद्द्याकडे मतदारांनी पाठ फिरविली हे सत्य झाकण्यासाठी 'आप'च्या विजयाला 'फुकटेशाहीचा विजय' संबोधू लागले आहेत. पण भाजपच्या नेत्यांनी केजरीवाल यांच्या 'फुकटेशाही' विरुद्ध प्रचारात एकही शब्द उच्चारला नव्हता. केजरीवाल महिलांना फक्त मेट्रो प्रवास फुकट घडवतात , आपण दिल्लीतील प्रत्येक सज्ञान विद्यार्थिनीला मोफत स्कुटी देवू असे म्हणत फुकटेपणात केजरीवालच्या पुढे दोन पाउले टाकण्याचा प्रयत्न भाजपने केला होता.भाजपच्या या फुकटेपणाचे आमिष मतदारांनी झिडकारले हे लक्षात घेतले तर मतदारांवर फुकटेपणाचा भाजपकडून मारण्यात येत असलेला ठप्पा असत्य आणि आततायीपणाचा आहे हे लक्षात येईल. भाजपने निवडणूक प्रचारात शाहीनबाग आंदोलना विरुद्ध केलेला प्रचारही असाच आततायीपणाचा होता. या निवडणुकीत भाजपचा पराभव म्हणजे शाहीनबागेने रेशीमबागेवर केलेली मात आहे का किंवा आप पक्षाच्या विजयास फुकटेपणा कारणीभूत ठरला का याचे हो किंवा नाही असे ठाम उत्तर देता येणे कठीण आहे. एक उत्तर मात्र ठामपणे देता येते आणि ते म्हणजे भाजपच्या टोकाच्या आततायीपणाला मतदारांनी झिडकारले आहे. अमित शाह यांच्या कबुली नंतर तर हा निष्कर्ष तंतोतंत खरा ठरतो. पण दिल्ली निवडणूक निकालाचा एवढाच अर्थ काढणे अपुरे आहे. हा मतदारांनी भाजपा विरुद्ध दिलेला नकारात्मक कौल नाही. केजरीवाल शासनाला आणि धोरणाला दिलेला विधायक प्रतिसाद देखील आहे हे विसरून चालणार नाही. निकालाचे आणखी अर्थ आणि परिणाम पुढच्या लेखात पाहू.
-------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
मोबाईल – ९४२२१६८१५८


No comments:

Post a Comment