Thursday, February 27, 2020

दिल्लीतील 'आप' विजयाचे अर्थ आणि अनर्थ !



‘आप’चा विजय फुकट वाटलेल्या सवलतीचा नाही. उपलब्ध साधनसामुग्री इमाने इतबारे जनकल्याणासाठी वापरल्याचा आहे. दिल्लीच्या विशेष परिस्थितीने जे शक्य झाले ते इतरत्र शक्य नाही हे समजून न घेणे अनर्थाला निमंत्रण देणे ठरू शकते.
-------------------------------------------------------------


दिल्ली विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी नजरे खालून घातली तर या निवडणुकीत मागची ५ वर्षे सत्तेत असलेल्या 'आप'च्या मैदानात जावून त्या पक्षाला कोणीच आव्हान दिले नाही. 'आप'चे मैदान होते सुशासन आणि जनतेपर्यंत शासन नेण्याचे प्रयत्न. जनते पर्यंत शासन नेण्याच्या प्रयत्नात जनतेला जास्तीतजास्त कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याची पक्षाच्या नेतृत्वाला जाणीव झाली आणि त्या समस्यावर लक्ष केंद्रित करून सोडविण्याच्या प्रयत्नात केजरीवाल आणि त्यांचे सरकार जनतेच्या अधिक जवळ गेले. केंद्र व जवळपास सगळ्याच राज्य सरकारांचे दुर्लक्ष झालेल्या शिक्षण आणि आरोग्या सारख्या समस्यांना 'आप' पक्षाने प्राधान्य दिल्याने 'आप'च्या मैदानात जावून त्या पक्षाला पराभूत करण्याचे आव्हान सत्ता,संपत्ती व कार्यकर्त्यांचे प्रचंड पाठबळ असलेल्या भाजप सारख्या दबंग आणि उन्मादी पक्षालाही पेलण्यासारखे नव्हते. कॉंग्रेस तर गलितगात्र झालेला पक्ष आहे. त्यामुळेच आधीपासून सर्वानीच 'आप' विजयाचे भाकीत केले होते.                                          

भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक 'आप'च्या विकासाच्या मुद्द्यापासून दूर नेत नेहमीच्या आपल्या राष्ट्रवाद, राष्ट्रद्रोह, हिंदू-मुसलमान, भारत-पाकिस्तान या नेहमीच्या हुकमी  मुद्द्यावर लढविली जाईल यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न आणि वातावरण निर्मिती केली. केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने कुशलतेने भाजपच्या मुद्द्यांकडे पाठ फिरवून आपण केलेल्या कामावरच मते मागितली. त्यामुळे भाजपचे प्रचंड साधन सामुग्रीनिशी सज्ज सैन्यबळ हवेतच तलवारी फिरवत राहिले. त्यांच्याशी भिडायला कोणीच समोर न आल्याने त्यांना विजयाची स्वप्नेही पडू लागली होती. भाजपला काय करायचे ते करू द्या, त्यांच्या प्रचाराला आडवे जायचे नाही आणि आपण आपल्याच मुद्द्यावर निवडणूक लढवून जिंकायची हा केजरीवाल यांचा आत्मविश्वास आणि रणनीती काम करून गेली.                           

कॉंग्रेसला तर आपला शत्रू 'आप' आहे की भाजपा हेच ठरवता न आल्याने पक्षाचा प्रचार दिशाहीन राहिला. काँग्रेसी मतदारांनी मात्र 'आप' आणि भाजप मध्ये आपला शत्रू कोण हे बरोबर हेरले आणि आपली मते 'आप'च्या पारड्यात टाकली. काँग्रेसमुळे आपला पराभव झाला हे भाजप प्रवक्त्याचे म्हणणे अंशत: खरे असू शकते ते यामुळे. असे असले तरी यामुळे 'आप' आणि केजरीवाल यांचा विजय झाकोळला जात नाही. कारण बऱ्याच कालावधी नंतर जनतेने प्रचाराला न फसता काम आणि मुद्द्याला धरून मतदान केले. या अर्थाने दिल्लीतील मतदाराने देशातील मतदारांसमोर आदर्श घालून दिला असे म्हणता येईल. 

'आप'चा दिल्ली विजय मोठा असला तरी त्या पक्षाकडे भाजपचा पर्याय म्हणून पाहणे घाईचे आणि भाबडेपणाचे ठरणार आहे. मुळात दिल्लीच्या विकासाचे 'आप' मॉडेल नीट तपासले तर असे मॉडेल देशाच्या अन्य राज्यात चालण्यासारखे नाही हे लक्षात येईल. 'आप'चे दिल्ली मॉडेल दुसरीकडे चालण्यासारखे नसेल तर 'आप' पक्षही दुसरीकडे वाढणे कठीण हे ओघाने आलेच. जनतेशी निगडीत आणि जिव्हाळ्याच्या आरोग्य आणि शिक्षणा सारख्या बाबींवर 'आप' मुक्तहस्ते पैसा खर्च करू शकते याला कारण दिल्लीची विशेष परिस्थिती आहे. दिल्ली हे राजधानी क्षेत्र असल्याने बरेच मोठे खर्च केंद्राला करावे लागतात. पोलीस आणि सुरक्षेचा सगळा भार केंद्रावर असल्याने दिल्ली सरकारचा हा खर्च वाचतो. दुसऱ्या बाजूने राजधानी क्षेत्र असल्याने तिथे समृद्ध वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. सगळ्याच देशांच्या वकिलाती येथे असल्याने परदेशी अतीसमृद्ध लोकांचा वावर दिल्लीत मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कमी भौगोलिक क्षेत्रात कराच्या व इतर उलाढालीच्या रूपाने जास्त पैसा दिल्ली सरकारच्या तिजोरीत जमा होतो.                                                       

दिल्लीला आधुनिक सुखसोयी देण्यासाठीही वेगळा खर्च - विशेषत: इन्फ्रास्ट्रक्चर साठीचा खर्च - सध्याच्या सरकारला फारसा करावा लागत नाही. यावरचा खर्च आधीच होवून गेला आहे. दिल्लीला आधुनिक चेहरा देण्याचे श्रेय कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या राजवटीकडे जाते. दिल्लीत बहुतेक सगळे मोठे आणि महत्वाचे प्रकल्प आधीच पूर्ण झालेले असल्याने सध्याच्या सरकारला त्यासाठी पैसा खर्च करावा लागत नाही. त्यामुळे येणारे उत्पन्न लोक कल्याणकारी योजनांवर खर्च करणे शक्य झाले आहे. अर्थात पैसा आहे आणि तो उडवायचा असेल तर अनेक भंपक आणि भपकेबाज प्रकल्प सुरु करता येवू शकतात पण तो मोह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टाळला आणि पैसा जनकल्याणाच्या कामी लावला ही 'आप' नेतृत्वाची मोठी जमेची बाजू आहे.

महाराष्ट्रा सारखे राज्य खर्च कमी करण्यासाठी शानशौकी वरचा खर्च कमी न करता शाळा बंद करण्याचा निर्णय घेते या पार्श्वभूमीवर शानशौकीत पैसा घालविण्या ऐवजी उत्तुंग शाळा आणि आणि दवाखाने दिल्लीत उभा होणे उठून दिसते. प्रचंड खर्चाचे प्रकल्प हाती घेण्याची गरज राहिली नसल्याचा आणखी एक फायदा केजरीवाल यांना झाला आणि तो म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपापासून ते मुक्त राहिले. केजरीवाल दिल्लीकरांना सवलती देवू शकलेत ते दिल्लीच्या विशेष परिस्थितीमुळे. अन्य राज्यांना तशा सवलती देणे शक्य होणार नाही. 'आप' विजयाने तसा खर्च करण्याचा दबाव अन्य राज्यांवर आला आहे. त्या दबावाला राज्ये बळी पडली तर आधीच संकटात असलेली अर्थव्यवस्था अधिक डबघाईला येईल. म्हणूनच आप विजयाचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. हा विजय फुकट वाटलेल्या सवलतीचा नाही. उपलब्ध साधनसामुग्री इमाने इतबारे जनकल्याणासाठी वापरल्याचा आहे.
-----------------------------------------------------------
सुधाकर जाधव
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment