Thursday, September 3, 2020

सुंभ जळाला तरी कॉंग्रेस नेतृत्वाचा पीळ कायम ! – १

२०१४ चा पराभव आपले पुनरागमन होणारच या पोकळ विश्वासापायी हलक्याने घेणारी कॉंग्रेस २०१९ चा पराभव का झाला याचा विचार करण्याच्या स्थितीत राहिली नाही. २०१९ च्या दारूण पराभवाला वर्ष उलटून गेले तरी त्या पराभवाचे विश्लेषण कॉंग्रेसने आजतागायत केले नाही.

----------------------------------------------------------------------------------------

कॉंग्रेस पक्षातील आणि देशातील विद्यमान स्थिती बाबत कॉंग्रेसच्या प्रमुख २३ नेत्यांनी कॉंग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले त्यावर कॉंग्रेस अंतर्गत मोठे वादंग झाले. असे वादंग होणे हे पक्षांतर्गत लोकशाही जीवंत असल्याचे लक्षण मानता आले असते जर पत्रातील मुद्द्यावर मुद्देसूद चर्चा झाली असती तर. वादंग झाले ते पत्र बैठकीच्या आधी सार्वजनिक केले गेले यावर. पक्षाच्या व्यासपीठावर बोला, माध्यमांशी बोलू नका हे प्रत्येकच पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सांगत असतो. प्रत्येक पक्ष लोककल्याणाचा दावा करीत असतो. पक्ष जनतेसाठी असेल तर पक्षात काय सुरु आहे हे जनतेला कळले तर काय बिघडते हे समजत नाही. पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेचा लोकांना फटका बसत असेल तर पक्षातील घडामोडीवर सार्वजनिक चर्चा होणे गरजेचे वाटायला हवे. पक्षातील घडामोडीची सार्वजनिक चर्चा हा प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाला मिळालेले आव्हान वाटते. सार्वजनिक हिताच्या तुलनेत पक्ष शिस्त आणि पक्ष हित दुय्यम असते असे कोणताच पक्ष मानत नसल्याने पक्षांतर्गत लोकशाहीची स्थिती आपल्या देशात अतिशय दयनीय आहे. सर्वात जुना पक्ष असलेल्या कॉंग्रेस मध्ये ती जास्तच दयनीय असल्याचे चित्र त्या पत्रावर कॉंग्रेस व्यासपीठावर जी चर्चा झाली आणि नेतृत्वाने त्या पत्रावर जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्यावरून स्पष्ट होते. या चर्चेने आणि प्रतिक्रियेने कॉंग्रेस ही गांधी-नेहरू परिवाराची बटिक आहे या भारतीय जनता पक्षाच्या सततच्या प्रचाराला बळ मिळाले आहे. भाजपची अवस्था कॉंग्रेस पेक्षा वेगळी नसताना जनमानसात मात्र कॉंग्रेस मध्येच लोकशाही नसल्याची भावना आहे ती भाजपच्या आक्रमक प्रचाराने आणि कॉंग्रेस नेतृत्वाच्या वर्तनाने वाढत आहे. भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्याची क्षमता फक्त कॉंग्रेस पक्षात असल्याने कॉंग्रेस बाहेरील लोकांची देखील कॉंग्रेसने भाजपला आव्हान देण्यासाठी स्वत:ला तयार करावे अशी अपेक्षा आहे. पत्रावरील चर्चेने आणि नेतृत्वाच्या नकारात्मक प्रतिक्रियेने पत्र लिहिणारांची जेवढी निराशा झाली असेल त्या पेक्षा जास्त निराशा कॉंग्रेस कडून अपेक्षा असणाऱ्या कॉंग्रेस बाहेरील लोकांची झाली आहे.

पत्रातील मुद्दे लक्षात घेतले तर कॉंग्रेस नेतृत्वाचा तीळपापड होणे स्वाभाविकच होते. २०१४ च्या पराभवानंतर आणि २०१९ ला पार पडलेल्या लोकसभा निवडणुकी आधी कॉंग्रेस मध्ये खालपासून वरपर्यंत एकच भावना होती. ती म्हणजे इंदिराजींच्या दारूण पराभवानंतर कॉंग्रेसने पुन्हा सत्ता मिळवून नंतर अनेक वर्षे राज्य केले त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होईल. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. २०१४ ते २०१९ ही पाच वर्षे कॉंग्रेसजनानी याच आशेवर हाताची घडी करून आणि तोंडावर बोट ठेवून अक्षरशः वाया घालविली. मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी होताना दिसत असल्याने कॉंग्रेसजनाना २०१९ मध्ये मोदींची सत्ता जाणार याची खात्रीच वाटू लागल्याने हाताची घडी अधिकच घट्ट झाली होती. सरकार विरोधात लोकमत तयार आणि संघटीत करावे लागते हे अनेक वर्षे सत्ता उपभोगत राहिलेल्या कॉंग्रेसला कळलेच नाही. सरकार विरोधात पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित करणे आणि राहुल गांधीनी सरकार विरोधात ट्वीटरवर टीव टीव करत राहणे या पलीकडे कॉंग्रेसचा मोदी सरकारला विरोध कधी प्रकटच झाला नाही. मोदी सरकारच्या अनेक निर्णयांनी जनतेचे अतोनात हाल होवूनही जनता कॉंग्रेसकडे वळली नाही कारण कॉंग्रेस मागच्या ५-६ वर्षात कधी जनतेत गेलीच नाही. राज्यकारभारातील अपयश मोदी आणि भारतीय जनता पक्षाने हिंदू-मुस्लीम दुही वाढवून आणि अतिरेकी राष्ट्रवादाची भावना निर्माण करून झाकले. सारी माध्यमे सरकारने आपल्या बाजूने वळवून घेतल्यावर तुमच्या पत्रकार परिषदेचा आणि ट्वीटर वरील टीवटिवीचा फार परिणाम होत नाही हे २०१९ च्या निवडणुकीने सिद्ध करूनही कॉंग्रेस नेतृत्व जागे झाले नाही. निवडणुकीत पाठोपाठ होणारे पराभव आणि जिथे विजय मिळाला तिथे सत्ता टिकविण्यात अपयश येवूनही नेतृत्वाला जाग आल्याचे कोणतेही लक्षण दिसले नाही. ज्यांनी राहायचे त्यांनी राहा आणि ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जा हा कॉंग्रेस नेतृत्वाचा तोरा अनेक राज्यातील सत्ता घालवूनही कमी झाला नाही. दिवसेंदिवस कॉंग्रेसची परिस्थिती वाईट होत चालल्याने एरव्ही नेतृत्वा विरुद्ध बोलायची सवय नसलेल्या कॉंग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी,नेत्यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वा विरुद्ध लेखणी चालविण्याची हिम्मत दाखवली. त्याची काय किंमत त्यांना मोजावी लागेल हे भविष्यात कळेल पण त्यांचे पत्र कॉंग्रेस आणि देशाच्या भवितव्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

२०१४ चा पराभव आपले पुनरागमन होणारच या पोकळ विश्वासापायी हलक्याने घेणारी कॉंग्रेस २०१९ चा पराभव का झाला याचा विचार करण्याच्या स्थितीत राहिली नाही. २०१९ च्या दारूण पराभवाला वर्ष उलटून गेले तरी त्या पराभवाचे विश्लेषण कॉंग्रेसने आजतागायत केले नाही. पराभवाचे विश्लेषण करून आपल्या चुका लक्षात घेण्या ऐवजी राहुल गांधीनी राजीनामा फेकण्याची आणखी एक चूक केली. कॉंग्रेस नेतृत्वाने कधी कोणत्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली नाही ती राहुल गांधीनी स्वीकारली हे कौतुकास्पद असले तरी त्यामुळे चर्चेचा फोकस निवडणूक पराभव न राहता राहुल गांधींचा राजीनामा झाला. त्यांनी राजीनामा द्यावा की नाही व परत घ्यावा की नाही यावरच उदंड चर्चा झाली. पराभवाचे विश्लेषण त्यामुळे बाजूला पडले आणि नेहमीप्रमाणे काँग्रेसजन पराभवापासून काही शिकले नाही. राहुल गांधीनी राजीनामा द्यायला हरकत नव्हती पण तो राजीनामा त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर पराभवाच्या सखोल विश्लेषणा नंतर द्यायला हवा होता. दुसऱ्या अध्यक्षाची नियुक्ती होत नाही तोपर्यंत अध्यक्षपद सांभाळणे गरजेचे होते. राजीनामा फेकून मोकळे होणे हा बालीशपणा झाला. राजकीय बाबतीत अनेकदा परिपक्वता दाखविणाऱ्या राहुल गांधींची अशी एखादी बालिश कृती भाजपच्या चांगलीच पथ्यावर पडते. राहुल गांधींचा राजीनामा भाजपच्या पथ्यावर पडला आहे. या राजीनाम्याने पराभवाचे विश्लेषण टळून भाजप विरुद्ध कसे उभे राहायचे याचा निर्णयच लांबला आहे. आपल्या पत्रातून कॉंग्रेसच्या २३ नेत्यांनी पराभवाच्या राहिलेल्या विश्लेषणाचे स्मरण नेतृत्वाला करून दिले आहे. दुसरेही अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी पत्रातून मांडले आहेत त्याची चर्चा पुढच्या लेखात करू.
--------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव

ssudhakarjadhav@gmail.com

No comments:

Post a Comment