गांधी घराण्याशिवाय कॉंग्रेसला तरणोपाय नाही हे खरे असले तरी गांधी घराण्यातील नेतृत्वाला प्रचंड मरगळीने ग्रासले आहे हे देखील तितकेच खरे आहे. शीर्षस्थ नेतृत्वातील मरगळीचे लोण अगदी कॉंग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्या पर्यंत पोचले आहे. कॉंग्रेस म्हणजे मरगळ हे समीकरणच बनून गेले आहे.
------------------------------------------------------------------------------
भाजपच्या वाटेवर असलेल्या कॉंग्रेस नेत्यांची कॉंग्रेस
नेतृत्वावरील टीका नेहमीच ऐकायला येते. कॉंग्रेसवर प्रेम असणारे , तळमळीने आणि
जबाबदारीने काम करणारे कॉंग्रेस नेते कॉंग्रेस नेतृत्वावर जाहीरपणे टीका करायचे
टाळत आले आहेत. नाकातोंडात पाणी चालले तरी कॉंग्रेस नेतृत्वाला जाग येत नाही हे
बघून या नेत्यांनी कॉंग्रेस नेतृत्वावर पत्रास्त्र सोडले आहे. या पत्राने आपल्याला
वेदना झाल्यात हे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या सोनिया गांधीनी
जाहीरपणे सांगितले. पत्रातील काही शब्द आणि वाक्य नेतृत्वाला टोचणारी असली तरी
कॉंग्रेस नेत्यांचे हे पत्र कॉंग्रेसला सक्षम आणि शक्तिशाली बनविण्याच्या हेतूने
लिहिले आहे हे नेतृत्वाने ध्यानात घेतले असते तर या पत्रामुळे त्यांना वेदना
झाल्या नसत्या. पत्र लिहिणाऱ्या
कॉंग्रेसजनांची ‘बुडती ही कॉंग्रेस देखवेना डोळा’ ही भावना स्पष्ट असताना
कॉंग्रेस नेतृत्वाला मात्र ती आपल्यावरील टीका वाटली याचे कारण
कॉंग्रेस नेतृत्वाला ऐकून घेण्याची संवय राहिली नाही. म्हणूनच गुलाम नबी आझाद आणि
अन्य काही कॉंग्रेस नेत्यांनी बैठकीत या पत्राचे वाचन व्हावे आणि त्यात काय चूक
आहे हे स्पष्ट करावे अशी मागणी केली होती. अर्थात बैठकीत पत्राचे वाचन होवून
त्यावर चर्चा होण्या ऐवजी बैठकीच्या आधी पत्र प्रसिद्ध कसे झाले यावरच अधिक चर्चा
करून पत्रलेखकांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुंभ जळाला तरी नेतृत्वाचा पीळ कायम
असल्याचे दर्शविणारा होता.
पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष असला पाहिजे, तो पक्ष कार्यालयात बसला पाहिजे आणि पक्ष
कार्यकर्त्यांना गरज असेल तेव्हा विचार विनिमयासाठी उपलब्ध असला पाहिजे या अतिशय
सामान्य अशा अपेक्षा आहेत आणि सामान्य असल्या तरी पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी आणि उभारणीसाठी
त्याची गरज आहे. श्रीमती सोनिया गांधींचे वय आणि स्वास्थ्य लक्षात घेतले तर
त्यांच्याकडून याची पूर्ती शक्य नाही हे समजण्या इतके पत्रलेखक नेते परिपक्व आहेत.
अशी गरज बोलून दाखविण्या मागे सोनिया गांधीवर टीका करण्याचा त्यांचा हेतू नसताना
सोनिया गांधी यांनी या गोष्टी मनाला लावून घेण्याचे कारण नव्हते. वय आणि प्रकृती
या दोन्ही कारणांनी त्यांना कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी पेलणे अवघड आहे.
त्यांनी कॉंग्रेससाठी खूप काही केले आहे. वाढवलेली कॉंग्रेस वाचवायची असेल तर
त्यांनी अध्यक्ष पदापासूनच नाही तर कॉंग्रेसच्या दैनदिन कामकाजापासून स्वत:ला दूर
ठेवणे गरजेचे आहे. त्यांचा पदावर असण्याचा गैरफायदा जुने, वयोवृद्ध आणि दरबारी
काँग्रेसजन घेत आहेत. तुलनेने तरुण असणाऱ्या कॉंग्रेसजनांना त्यांचे पर्यंत पोचता येत
नाही. त्यामुळे कॉंग्रेस मध्ये कोणत्याच पातळीवर नव्या रक्ताला वाव आणि चाल मिळत
नाही. वाढ खुंटलेला पक्ष अशी कॉंग्रेसची अवस्था झाली आहे. नेतृत्वाचे निष्क्रिय
असणे आणि घरात बसून असणे हे त्यामागचे मोठे कारण आहे आणि पत्रातून नेमकेपणाने ते
मांडले आहे.
गेल्या ६ वर्षात पक्षात पेचप्रसंग उद्भवले
तेव्हा पक्ष नेतृत्वाचे अस्तित्व कधीच जाणवले नाही. गोवा आणि मणिपूर मध्ये
कॉंग्रेस सरकार बनणे अवघड नव्हते पण ते बनले नाही. कारण नेतृत्वाने तो कधी
प्रतिष्ठेचा विषयच केला नाही. कर्नाटकाचा पेचप्रसंग उद्भवला तो सोडविण्यासाठी
स्थानिक नेतृत्व धडपडले पण केंद्रीय नेतृत्वाने काहीही केले नाही. त्याचीच
पुनरावृत्ती मध्यप्रदेशात झाली. कॉंग्रेस नेतृत्व वेळीच जागे झाले असते आणि
मध्यस्थी केली असती तर मध्यप्रदेशचे संकट टळू शकले असते. दिग्विजयसिंग यांची
पक्षासाठीची उपयुक्तता संपली असताना सिंधीयाला राज्यसभेची जागा न देता
दिग्विजयसिंह यांना देणे पक्षाला प्रचंड महागात पडले. एका राज्यसभा जागेसाठी पक्ष
नेतृत्वाने एका मोठ्या राज्याचे सरकार पणाला लावले आणि ते राज्य गमावले. कर्नाटक
मध्ये आमदारांनी राजीनामा देवून सरकार पाडल्या नंतर रिकाम्या जागेसाठी झालेल्या
निवडणुका कॉंग्रेस नेतृत्वाने प्रतिष्ठेचा विषय केला नाही. आता मध्यप्रदेशात
कॉंग्रेस आमदारांनी राजीनामा दिलेल्या ठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत. राजीनामा
दिलेले आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत यासाठी कॉंग्रेस श्रेष्ठींनी कंबर कसली
असे चित्र नाही. राजस्थान वाचले ते भाजप मधील एका गटाला सत्तापालट नको होता
म्हणून. तिथेही सरकार पडू नये यासाठी कॉंग्रेस श्रेष्ठींनी काहीही केले नाही.
गेल्या ६ वर्षात असा एकही प्रसंग दाखविता येणार नाही ज्यात कॉंग्रेस नेतृत्वाचा
प्रभाव दिसून आला. त्यामुळे नेतृत्व दिसले पाहिजे , जाणवले पाहिजे हे पत्रात
अधोरेखित करण्यात आले ते चुकीचे नाही.
गांधी घराण्याशिवाय कॉंग्रेसला तरणोपाय नाही
हे खरे असले तरी गांधी घराण्यातील नेतृत्वाला प्रचंड मरगळीने ग्रासले आहे हे देखील
तितकेच खरे आहे. शीर्षस्थ नेतृत्वातील मरगळीचे लोण अगदी कॉंग्रेसच्या ग्रामपंचायत
सदस्या पर्यंत पोचले आहे. कॉंग्रेस म्हणजे मरगळ हे समीकरणच बनून गेले आहे.
कॉंग्रेस नेतृत्व जनतेत जात नाही तो पर्यंत ना नेतृत्वातील मरगळ दूर होणार ना
संघटनेतील मरगळ दूर होणार. निवडणुकांमध्ये चार ठिकाणी फिरून भाषणे देणे म्हणजे
जनतेत जाणे नाही. जनतेत जाण्याचा विचार सुद्धा डोक्यात येवू नये इतकी नेतृत्वात
मरगळ आहे. अशा परिस्थितीत संघटनात्मक निवडणुकीतून नेतृत्व परिवर्तन आणि नव्या
नेतृत्वाने राहुल आणि प्रियांकाला जनतेत घेवून जाणे हाच एक पर्याय कॉंग्रेसकडे आहे
आणि त्याचेच सुतोवाच कॉंग्रेसच्या २३ नेत्यांनी या पत्रातून केले आहे. या
नेत्यांनी कॉंग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी सुचविलेल्या उपाययोजनांचा पुढच्या लेखात
विचार करू.
-----------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
ssudhakarjadhav@gmail.com
खुप छान लेख
ReplyDeleteखुप छान लेख
ReplyDelete