Thursday, September 24, 2020

कृषी गोंधळ !

 शेतकरी संघटनांची अवस्था हत्ती आणि आंधळ्याच्या गोष्टी सारखी झाली आहे. आपण जे करतो त्यानेच शेतीचा प्रश्न सुटणार आहे असे प्रत्येक संघटनांच्या सुभेदारांना वाटत आहे. आपली किल्ली लावली की प्रश्न सुटणार हा भाबडा आशावाद त्यांना संघटना चालविण्याचे बळ देत असेल पण यातून शेती प्रश्न सोडविण्याचे बळ निर्माण होत नाही.

-----------------------------------------------------------------------------------

सुमारे ३ महिन्यापूर्वी सरकारने कथित कृषी सुधारणा राबविण्यासाठी काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी मांडलेली विधेयके संसदेमध्ये गोंधळात आणि गदारोळात पारित करून घेतलीत. विधेयकातील तरतुदी बद्दल मत मतांतरे असणारच. सरकारच्या कथनानुसार कृषी क्षेत्रात या नव्या सुधारणांमुळे दूरगामी चांगले परिणाम होणार आहेत. सरकारच्या या दाव्यात तथ्यांश असेल तर सरकारने ही विधेयके फारसी चर्चा होवू न देता घाईत आणि गोंधळात पारित करून घेवून आपला चांगला हेतू संसदेतील चर्चेच्या माध्यमातून जनमानसावर बिम्बविण्याची संधी वाया घातली असेच म्हणावे लागेल. सरकारने विधेयक पारित करतांना केलेल्या दांडगाईने स्वाभाविकपणे सरकारच्या हेतूवर शंका घेणाऱ्यांची बाजू बळकट झाली आहे. सरकारकडे बहुमत आहे आणि प्रचंड बहुमत आहे. विरोधक काहीही आणि कितीही बोलले तरी सरकारला पाहिजे तशी विधेयके पारित करून घेण्यात संसदेतील चर्चेमुळे कोणताही अडथळा आला नसता. उलट विधेयकावर सांगोपांग चर्चा झाली असती तर कोणाची बाजू खरी आणि कोणाचा शेतकरी कळवळा खोटा हे शेतकऱ्यांना समजायला मदत झाली असती.

देशातील कृषी व्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारी विधेयके राज्यसभेत ज्या पद्धतीने पारित करण्यात आलीत ती पद्धत आक्षेपार्ह तर आहेच शिवाय विधेयकांचे समर्पक समर्थन करण्यात सरकारची अक्षमता दर्शविणारे आहे. तांत्रिक दृष्टीने संख्याबळाचा विचार केला तर सरकारचे राज्यसभेत बहुमत नाही. तसे असले तरी आजवर अत्यंत विवादास्पद विषयावरची विधेयके सरकारने पाहिजे तशी राज्यसभेत पारित करून घेतली आहेत. साम दाम दंड भेद वापरून विरोधकांना आपल्या बाजूने मतदान करण्यास भाग पाडण्यात मोदी सरकारने आपले नैपुण्य सिद्ध केले आहे. असे असताना विरोधकांची मतविभागणीची मागणी मान्य न करता आवाजी मतदानाच्या बळावर देशातील मोठ्या जनसंख्येला प्रभावित करणारी विधेयके मंजूर करून घेण्याचे समर्थन होवू शकत नाही. ज्या विषयांवर सरकार आणि विरोधकात फारसे मतभेद नाहीत अशी विधेयके आवाजी मतदानाने पारित होण्यावर कोणी आक्षेप घेणार नाही. टोकाचा विरोध आणि संख्याबळाच्या दृष्टीने अतीटतीची परिस्थिती असेल तेव्हा मतविभागणीच्या मागणीकडे सरकारच्या इशाऱ्यावरून दुर्लक्ष करणे हे पीठासीन अधिकाऱ्याने मिळालेल्या अधिकाराचा दुरुपयोग ठरतो आणि तसा दुरुपयोग कृषी विषयक विधेयके पारित करताना झाला आहे. त्यामुळे विधेयकात काय दडले आहे यावर सांगोपांग चर्चा होण्या ऐवजी सरकारने हुकुमशाही पद्धतीने विधेयके पारित केली यावरच चर्चा होणार आहे. आणि अशी चर्चा सत्ताधारी व विरोधी पक्षांना आपले वरवरचे शेतकरी प्रेम दाखविण्यास उपयुक्त ठरणारी आहे.  

सरकारने ३ महिन्यापूर्वी काढलेल्या अध्यादेशावर ते अध्यादेश संसदे पुढे येईपर्यंत देशात फारसी चर्चा झालीच नाही. कोविड १९ मुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अशी चर्चा होणे अवघड होते हे काही अंशी खरे मानले तरी कोविड मुळे देशात वेबिनारला उत आला होता आणि आहे. अनेक वेबिनार या अध्यादेशांवर व्हायला हवे होते. माध्यमातून यावर विस्तृत चर्चा आणि लिखाण व्हायला हवे होते. न्यूज चैनेल कडून गंभीर विषयावर गंभीर चर्चेची अपेक्षा बाळगावी असे दिवस नाहीत. सरकारचे अपयश झाकण्यासाठी निरर्थक विषयावर सनसनाटी निर्माण करीत राहणे एवढेच त्यांनी आपले काम मानले आहे. नियतकालिके आणि समाज माध्यमातून मात्र यावर चर्चा अपेक्षित होती तशी ती झालेली नाही. विरोधी पक्षांना जाग आली ती संसदेतच. ही विधेयके चुकीची वाटत होती तर उपलब्ध साधनांनी या विरोधात वातावरण निर्मिती करता आली असती. त्याच पद्धतीने सरकारला विधेयकाच्या बाजूने वातावरण निर्मिती करता आली असती आणि नियोजनपूर्वक विधेयके पारित करून घेण्यात आली असती. सरकार आणि विरोधक दोघानाही त्याची गरज न वाटणे ही शेती प्रश्नावरील त्यांच्या अनास्थेचे द्योतक आहे.        

दोषी फक्त सरकार आणि विरोधीपक्षच नाहीत. त्यांच्यापेक्षा जास्त दोषी आपणच शेतकऱ्यांचे हितैषी आहोत असा दावा करणाऱ्या खंडीभर शेतकरी संघटनांचा आहे. चांगल्या किंवा वाईट अर्थानी शेती क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणाऱ्या या सुधारणा असतील तर त्या गंभीरपणे समजून घेवून तितकीच गंभीर आणि विस्तृत प्रतिक्रिया शेतकरी संघटनांकडून अपेक्षित होती. सरकारी आणि विरोधी पक्षांनी तरी विधेयकांवर गदारोळ केला, गोंधळ घातला. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांची उदासीनता व्यथित करणारी आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी संघटना आता रस्त्यावर उतरल्या पण अध्यादेश निघाले तेव्हा मात्र प्रतिक्रिया उमटली नव्हती. महाराष्ट्रातही शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना आणि या संघटनेतून बाहेर पडून सवते सुभे निर्माण करणाऱ्या सुभेदारांनी आपसात आणि शेतकऱ्यात या विधेयकांच्या परिणामावर चर्चा केली नाही की विस्तृत लिखाण केले नाही. शरद जोशी नंतर शेतकरी चळवळीचे तत्वज्ञान मांडण्यात व चळवळ पुढे नेण्यात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे हे लक्षण आहे. शेतकरी संघटनांची अवस्था हत्ती आणि आंधळ्याच्या गोष्टी सारखी झाली आहे. आपण जे करतो त्यानेच शेतीचा प्रश्न सुटणार आहे असे प्रत्येक संघटनांच्या सुभेदारांना वाटत आहे. आपली किल्ली लावली की प्रश्न सुटणार हा भाबडा आशावाद त्यांना संघटना चालविण्याचे बळ देत असेल पण यातून शेती प्रश्न सोडविण्याचे बळ निर्माण होत नाही. सरकारने काढलेले शेती विषयक अध्यादेश आणि पुढे त्याचे कायद्यात झालेले रुपांतर यात शेतकरी संघटनांची काहीच भूमिका नसणे ही संघटनांची हलाखीची परिस्थितीच दाखवत नाही तर वैचारिक दिवाळखोरी दर्शविणारी आहे. संघटना क्रियात्मक नाहीत. त्या निव्वळ प्रतिक्रियात्मक बनल्या आहेत. सरकारचे पाउल चांगले आहे किंवा सरकारचे पाउल चुकीचे आहे एवढेच ते बोलतात. या सुधारणांच्या परिणामांची विस्तृत चर्चा आणि विश्लेषण करण्याची क्षमता त्यांनी गमावली आहे. त्यामुळे सरकार आणि विरोधीपक्षांनी घातलेल्या गोंधळात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज शेतकऱ्यांना येणे अवघड बनले आहे.
--------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
ssudhakarjadhav@gmail.com
 

No comments:

Post a Comment