कॉंग्रेस मधील गांधी घराण्याने स्वत:ला असुरक्षित न समजता निवडून येतील त्या पदाधिकाऱ्यांसोबत काम करण्याची तयारी ठेवणे हाच कॉंग्रेसच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग आहे.
-----------------------------------------------------------------------
कॉंग्रेसच्या प्रमुख २३
नेत्यांनी कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांना लिहिलेल्या
पत्रात भारतीय जनता पक्ष वाढत आहे तर कॉंग्रेसचा जनाधार कमी कमी होत चालला आहे या
गंभीर परिस्थितीकडे नेतृत्वाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणांनी
कॉंग्रेसकडे पाठ फिरवून मोदींचे समर्थन केल्याकडे विशेषत्वाने या पत्रात उल्लेख
केला आहे. २०१४ सालच्या कॉंग्रेस पराभवाचे विश्लेषण करताना त्यावेळी याच स्तंभात
मी हा मुद्दा मांडला होता. २०१४ सालच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा जनाधार कमी झाला असे
म्हणण्या सारखी परिस्थिती नव्हती. आपल्या निवडणूक पद्धतीमुळे कॉंग्रेसचे त्यावेळी
फार कमी खासदार निवडून आले पण कॉंग्रेसचा पूर्वीचा जनाधार कायम होता. मतदानाच्या
आकडेवारीचा विचार केला तर आधीच्या सार्वत्रिक निवडणुकी पेक्षा २०१४ च्या निवडणुकीत
कॉंग्रेसला किंचित जास्तच मतदान झाले. कॉंग्रेसच्या वाढलेल्या मतांच्या तुलनेत
भाजपची वाढलेली मते प्रचंड अधिक होती. कॉंग्रेसचा जनाधार कायम असतांना २०१४ च्या
निवडणुकीत भाजपच्या मतात आणि जागांमध्ये प्रचंड वाढ कशी झाली या प्रश्नाचे उत्तर
नव्या आणि तरुण मतदारांनी कॉंग्रेसला नाकारून मोदींचे समर्थन करण्यात मिळते. २००९
ते २०१४ या पाच वर्षात नव्याने नोंद झालेल्या मतदारांची, ज्यात प्रामुख्याने तरुण
मतदारांचा भरणा होता, एकगठ्ठा मते भाजपच्या पारड्यात पडल्याने २०१४ च्या निवडणुकीत
भाजपचा अभूतपूर्व विजय तर कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला होता.
कॉंग्रेसच्या नेत्यांनी
आपल्या पत्रात २०१९ च्या पराभवाचे गंभीरपणे विश्लेषण झाले नसल्याचे निदर्शनास आणून
दिले आहे. पण २०१४ च्या पराभवावर तरी कॉंग्रेसने कुठे गंभीर मंथन आणि चिंतन केले
होते. तसे तेव्हाच केले असते तर आणखी एका दारूण पराभवाला २०१९ साली कॉंग्रेसला
सामोरे जावे लागले नसते. तुलनेने कॉंग्रेसकडे राहुल-प्रियांकाचे तरुण नेतृत्व
असताना तरुणाने कॉंग्रेसकडे का पाठ फिरविली याचे विश्लेषण कॉंग्रेस करत नाही तो
पर्यंत कॉंग्रेससाठी आश्वासक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. कॉंग्रेसने –
राजीव गांधी यांनी – १८ वर्षे वयाच्या तरुणाला मतदानाचा अधिकार दिला. त्याचा फायदा
कॉंग्रेसला होण्या ऐवजी प्रचंड तोटा का झाला यावर कॉंग्रेसजनानी विचार करण्याची
गरज होती. २०१४ ते २०१९ या काळात तो केला नाही आणि पुन्हा तीच परिस्थिती निर्माण
होवूनही आज तागायत कॉंग्रेसने यावर विचार केला नाही. तेव्हा तरुण आणि नवा मतदार
प्रधानमंत्री मोदीनी त्यांचे भवितव्य अंधकारमय करून सुद्धा कॉंग्रेसकडे वळत नाही
याचे कारण कॉंग्रेस त्यांच्या पर्यंत पोचतच नाही हे आहे. कॉंग्रेसच्या युवक
कॉंग्रेस, एन एस यु आय सारख्या युवक संघटना असताना त्या तरुणांना कॉंग्रेसकडे
आकर्षित करण्यात का अपयशी ठरल्या याचे उत्तरही कॉंग्रेस नेत्यांच्या या पत्रातच
आहे. युवक कॉंग्रेस आणि एन एस यु आय या संघटनांच्या निवडणुकात घराणेशाही आणि
पैशाचा वापर होत असल्याचा आरोप या पत्रात आहे तो चुकीचा ठरविता येणार नाही.
कॉंग्रेस मधील केंद्रीय घराणेशाहीपेक्षा खालच्या सर्व स्तरावरील घराणेशाहीने
कॉंग्रेसचे जास्त नुकसान केले आहे. आपल्याला कॉंग्रेसचे अध्यक्षपद मिळत नाही, मिळू
शकत नाही म्हणून आजवर एकाही नेत्याने कॉंग्रेस सोडली नाही. खालच्या स्तरावर
घराणेशाहीमुळे पद आणि वाव मिळत नाही म्हणून कॉंग्रेस सोडल्याची असंख्य उदाहरणे
आहेत. याच कारणामुळे कॉंग्रेस मधील नवी आवक थांबली आहे. खालच्या स्तरावरील
घराणेशाही मुळे कॉंग्रेस मध्ये आपल्याला भवितव्य नाही हे दिसत असल्याने राजकारणात
येवू इच्छिणारा तरुण वर्ग कॉंग्रेस व्यतिरिक्त दुसरा पर्याय अजमावत आहेत तर आपली
तरुणाई कॉंग्रेस मध्ये घालविलेल्या नेत्यांना वरच्या घराणेशाहीच्या निष्क्रियतेमुळे
आपले भवितव्य अंध:कारमय वाटू लागल्याने ते कॉंग्रेस सोडून जावू लागले आहेत.
परिणामी कॉंग्रेस हा मरगळलेल्या व थकलेल्या म्हाताऱ्याचा पक्ष असल्याचे चित्र
जनतेसमोर उभे राहिले आहे. हे चित्र बदलण्यासाठी तरुणांनी कॉंग्रेसकडे का पाठ
फिरविली यावर मंथन करण्याची कॉंग्रेस नेत्यांनी पत्रातून केलेली मागणी किती
महत्वाची आहे हे लक्षात येईल.
देश पातळीवर सर्वसामान्य
मतदारांना कॉंग्रेसकडे आकर्षित करण्याची क्षमता कॉंग्रेस मध्ये गांधी घराण्यातच
आहे यात शंकाच नाही. या क्षमतेमुळेच मोदी आणि भाजप कॉंग्रेसच्या नेहरू-गांधी
घराणेशाही वर सातत्याने हल्ला करीत असतात. कॉंग्रेस रसातळाला गेली तरी मोदी आणि
भाजपचे गांधी-नेहरू घराण्यावरील हल्ले वाढतच आहेत याचे कारण त्यांची घराणेशाही
बद्दल चीड नसून हे घराणे कॉंग्रेसला परत सत्तेत आणू शकते ही भीती त्यामागे आहे.
गांधी-नेहरू घराण्याचा जनतेशी संपर्क कमी होत गेल्याने आजचे दिवस कॉंग्रेसला आणि
गांधी घराण्यातील नेत्यांना पाहावे लागत आहेत. नेतृत्वाची मरगळ आणि निष्क्रियता हा
कॉंग्रेसचा आजचा आजार आहे. कॉंग्रेसला पुन्हा उत्साहाचा आणि विश्वासाचा डोज
द्यायचा असेल तर नेतृत्वाने संघटनात्मक निवडणुकांना हिरवी झेंडी दाखवण्याची गरज
आहे. घराणेशाही आणि पैशाच्या प्रभावाने कोणाला पद न मिळता काम करण्याच्या क्षमतेवर
ते मिळाले पाहिजे. यासाठी नेतृत्वाने तटस्थ राहून संघटनात्मक निवडणुकात पारदर्शकता
आणण्याची गरज आहे. कॉंग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष हा गांधी घराण्या बाहेरचा असावा
हा राहुल गांधींचा आग्रह सध्याच्या दयनीय स्थितीतून कॉंग्रेसला बाहेर काढण्यासाठी
उपयुक्त आहे. फक्त गांधी घराण्याच्या नेत्यांनी आपल्या मर्जीतला अध्यक्ष आणण्याचा
प्रयत्न करता कामा नये. कोणीही अध्यक्ष निवडला गेला तरी त्याला कॉंग्रेसला बरे
दिवस आणण्यासाठी गांधी घराण्याला पुढे करण्याशिवाय पर्याय असणार नाही. गांधी
घराण्याने स्वत:ला असुरक्षित न समजता निवडून येतील त्या पदाधिकाऱ्यांसोबत काम
करण्याची तयारी ठेवणे हाच कॉंग्रेसच्या पुनरुज्जीवनाचा महामार्ग आहे. केंद्रीय
नेतृत्वाच्या प्रदेशातील हस्तक्षेपाने क्षमता असलेले नेतृत्व कॉंग्रेसपासून दूर
गेले आहे. त्यांची जागा बुळ्या नेतृत्वाने घेतली आहे. नेतृत्वाचा हस्तक्षेप न होता
संघटनात्मक निवडणुका पार पडल्या तर कॉंग्रेस पासून दूर गेलेले सक्षम नेते कॉंग्रेस
मध्ये परतण्याचा विचार करू शकतात. कॉंग्रेस नेत्यांनी आपल्या पत्रात कॉंग्रेस
बाहेर गेलेल्या नेत्यांना पुन्हा कॉंग्रेस मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे
नेतृत्वाला आवाहन केले आहे. कॉंग्रेसला मजबूत करण्यासाठी त्याची गरज आहेच. पण
वाटाघाटी करून ते परतण्याची शक्यता कमी आहे. ज्याची जितकी क्षमता त्याला तितका वाव
ही परिस्थिती असेल तरच त्यांच्या परतण्याची शक्यता वाढेल. अशी परिस्थिती निर्माण
व्हायची असेल तर नेतृत्वाच्या, घराणेशाहीच्या आणि पैशाच्या प्रभावापासून मुक्त
संघटनात्मक निवडणुका झाल्या पाहिजेत. कॉंग्रेस नेतृत्वाने कॉंग्रेस नेत्यांच्या
पत्राला आपल्या नेतृत्वावरील आक्षेप न समजता त्यात केलेल्या सूचना अंमलात
आणण्यासाठी तातडीने पाउले उचलली पाहिजेत. थंड करून समस्या सोडविण्याच्या काँग्रेसी
पद्धतीने समस्या सुटल्या नाहीत तर वाढल्या आहेत हे लक्षात घेवून नेतृत्वाने कामाची
पद्धत बदलली पाहिजे. कॉंग्रेस मध्ये नेतृत्व “दिसले” पाहिजे आणि जाणवले पाहिजे ही
पत्रलेखक नेत्यांची मागणी समयोचित आहे. त्याशिवाय कॉंग्रेस पुन्हा उभी राहणे अशक्य
आहे.
------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव
ssudhakarjadhav@gmail.com
No comments:
Post a Comment