Thursday, November 5, 2020

कॉंग्रेसची बचावात्मक भूमिका मोदीला आव्हान देण्यातील मुख्य अडथळा !

 पुलवामा मध्ये बळी गेलेले सैनिक मोदी सरकारच्या अपयशाचे सर्वात मोठे स्मारक असतांना त्या बळी गेलेल्या सैनिकांच्या नावावर मोदी मते मागतात हेच विरोधी पक्ष आणि विशेषत: कॉंग्रेसचे सर्वात मोठे अपयश आहे.
--------------------------------------------------------------------------


बिहार निवडणुकीतील रणधुमाळी संपत आली आहे. मागची सार्वत्रिक निवडणूक व त्यानंतर येणारी बिहारची निवडणूक या दरम्यान देशातील परिस्थिती बरीच बदलली आणि खालावली आहे.  प्रारंभी कोरोनाचे गांभीर्य मोदी सरकारला न कळल्यामुळे देशात कोरोनाचा प्रसार व्हायला मदत झाली. गांभीर्य कळले तेव्हा कोरोना हाताळणीतील घोड्चुकांच्या परिणामांना देशाला सामोरे जावे लागले. कोरोना काळात देशातील कोट्यावधी श्रमिकांना मोदी सरकारच्या दिशाहीन आणि संवेदनाशून्य निर्णयामुळे आणि धोरणामुळे जे सहन करावे लागले त्याची तुलना देशाच्या फाळणीच्या वेळी निष्पाप नागरिकांना भोगाव्या लागणाऱ्या यातनाशीच होवू शकते किंवा इतिहास काळात तुघलकाने राजधानी बदलण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना ज्या यातनांना सामोरे जावे लागले होते त्या यातनाशीच होवू शकते. अशा यातना सहन करण्यात बिहारचे श्रमिक मोठ्या संख्येत होते. त्याच बिहार मध्ये होत असलेल्या निवडणुकीत केंद्र सरकारचे प्रमुख मोदीजी आक्रमक दिसले आणि विरोधक बचावात्मक पवित्र्यात  ! देशातील परिस्थितीत वाईट अर्थाने बदल होवूनही काय बदलले नसेल तर ती आहे मोदींची आक्रमकता आणि विरोधकांचा बचावात्मक पवित्रा. धोरणाबद्दल खुलासा देण्याची वेळ मोदींवर यायला हवी पण येतेय विरोधकांवर ! मोदींचे विरोधक तरी कोण आहेत ? तर फक्त कॉंग्रेस आणि त्यातही राहुल गांधी. मोदी सत्तेत येण्यापूर्वी ज्यांच्या मनात प्रधानमंत्री बनण्याच्या कल्पनेचे लड्डू फुटायचे असे डजनभर तरी नेते होते. अडवाणी आणि राजनाथसिंह सारख्या भाजपायी नेत्यांचाही या इच्छुकांत समावेश होता. या सगळ्या नेत्यांना मोदीजीनी प्रधानमंत्रीपदाच्या स्वप्नातून जागे करून धरातलावर आणले. यातून मायाजी आणि ममताजी देखील सुटल्या नाहीत. पवारांना आपल्या मर्यादांची जाणीव आधीच झाली होती. राज्यातील प्रभाव टिकविणे यातच सगळे प्रधानमंत्रीपदाचे दावेदार इतके गुंतून पडले आहेत कि त्यांना मोदींना आव्हान देण्याचे भानही नाही. 
                                 

मायावतीजी सारखे प्रधानमंत्री पदाचे दावेदार नेते तर भाजपशी लढायलाही तयार नाहीत असे त्यांच्या ताज्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. उत्तर प्रदेशच्या राजकारणात भाजपा नंतर आपणच हे दर्शविण्यासाठी त्यांनी भाजपा ऐवजी अखिलेश यादवच्या समाजवादी पक्षाला लक्ष्य केले आहे. कॉंग्रेस नंतर देशभरात ज्यांना चांगले समर्थन लाभू शकते अशा मायावतींना उत्तर प्रदेशात भाजप नंतर कोणाचे स्थान हे दाखवून देण्याच्या लढाईत गुंतवून ठेवण्यात मोदी आणि भाजपला यश आले आहे. आश्चर्य म्हणजे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांची भूमिका मायावती पेक्षा वेगळी नाही. महाराष्ट्रात इतर राज्यासारखी पक्ष फोडून सत्तेत येणे शक्य होत नसल्यामुळे राष्ट्रपती राजवट लादण्यासाठी भाजप व्याकूळ आणि आतुर आहे. प्रकाश आंबेडकर सुद्धा त्याला अनुकूल दिसतात ! महाआघाडीच्या कारभारात अनेक त्रुटी आहेत आणि त्यासाठी आज होतो त्यापेक्षा अधिक विरोध व्हायला हवा. पण राष्ट्रपती राजवट लादणे असंवैधानिक आणि अनैतिक ठरेल. राष्ट्रपती राजवटी नंतर काय होईल याचा अंदाज प्रकाश आंबेडकर यांना नसेल यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. राष्ट्रपती राजवटीचा उपयोग भाजप इतर पक्ष फोडून सत्तेवर येण्यासाठी करणार हे उघड आहे. तरीही प्रकाश आंबेडकर बिहार निवडणुकी नंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल हे अशा पद्धतीने सांगतात ज्यातून अशा राजवटीला त्यांचा पाठींबा सूचित होतो !                                                                                

 बंगालमध्येही  ममतादीदीचे आव्हान मोदींना नाही तर अमित शाह आणि भाजपला आहे. मोदींना आव्हान देण्याची जबाबदारी कॉंग्रेसवर आणि राहुल गांधींवर येवून पडली आहे आणि कॉंग्रेस मध्ये एकटे राहुल गांधी बाजीप्रभू सारखी खिंड लढवत आहेत. राहुल गांधींचीही सर्वात मोठी कमतरता प्रधानमंत्रीपद मिळविण्याची जिद्द आणि आकांक्षा नसणे ही आहे. पद मिळविण्याची जिद्द आणि त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी काय असते याचे जीवंत उदाहरण मोदी आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दोघांनीही एकहाती विजय मिळविले आहेत. राहुल गांधी मोदींचा विरोध करण्यात कुठेच कमी पडत नाहीत .पण विरोधामागे ताकद उभी करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात तिथे ते कमी पडतात. एखादी गोष्ट मिळविण्याचा निर्धार असेल तर वाटेल ते कष्ट उपसण्याची उर्जा मिळते, उर्मी येते. तो निर्धार आणि ती उर्मी राहुल गांधी मध्ये दिसत नाही. त्याची काहीशी झलक प्रियांका गांधी मध्ये दिसते पण त्यांची भूमिका राहुल गांधीना मदत करण्यापुरती मर्यादित आहे. कॉंग्रेस मध्ये मोदींना आव्हान देण्यास सक्षम चिदंबरम् आणि थरूर सारखे नेते आहेत पण काँग्रेसजन गांधी घराण्याच्या कोशातून बाहेर यायला तयार नाहीत. देशातील राजकीय परिस्थिती अशी आहे कि मोदी आणि भाजप विरुद्ध राष्ट्रीय पातळीवर भूमिका घेणारा कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे आणि राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत आणि हे दोघेही आपल्यावर येवून पडलेल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी झोकून देत लढाई करायला तयार नाहीत. त्याच मुळे जे मुद्देही काढणे प्रचारात अडचणीचे ठरायला हवेत त्या मुद्द्यांवर मोदीजी मते मागतात आणि मिळवितात ! बिहार मधून  भाजप आणि नितीशकुमारची सत्ता जाणारा निकाल आला तरी भाजपची तिथली परिस्थिती सुधारल्याचे चित्र समोर आले तर त्यात नवल वाटण्यासारखे काही असणार नाही. बिहार पूर्वी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपला सत्ता मिळाली नसली तरी राज्यातील पक्षाची स्थिती सुधारल्याचे आपण पाहिलेच आहे. 

हे असे घडतेय याचे कारण मोदी आणि भाजप यांचा विरोध करण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्या कॉंग्रेस पक्षाची लेचीपेची भूमिका किंवा भूमिकाच नसणे हे आहे. मोदी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच असे घडत आहे  कि निवडणूक प्रचाराचे मुद्दे सत्ताधारी पक्ष व त्याचे नेते ठरवू लागले आहेत आणि त्यावर उत्तर देण्याची, स्पष्टीकरण देण्याची पाळी विरोधी पक्षांवर येत आहे. कॉंग्रेस सारखा सर्वात जुना आणि इतकी वर्षे सत्तेत राहिलेला पक्ष या सापळ्यात अलगद सापडतो हे बिहार निवडणुक प्रचारात दिसून आले. कलम ३७० वर काय भूमिका आहे हे मोदी विचारतात आणि त्यावर कॉंग्रेसला खुलासा देणे भाग पडते. कलम ३७० रद्द करून आतंकवादी कारवाया वाढण्या पलीकडे काय साध्य झाले हा प्रश्न कॉंग्रेसने उपस्थित करण्याची गरज होती पण कॉंग्रेसची भूमिका उत्तर देण्याची बचावात्मक राहिली आहे.  पुलवामा मध्ये बळी गेलेले सैनिक मोदी सरकारच्या अपयशाचे सर्वात मोठे स्मारक असतांना त्या बळी गेलेल्या सैनिकांच्या नावावर मोदी मते मागतात हेच विरोधी पक्षांचे आणि कॉंग्रेसचे मोठे अपयश आहे. याचीच पुनरावृत्ती लडाखच्या गलवान खोऱ्यात झाली. एप्रिल-मे मध्ये भारतीय हद्दीत चीनने घुसखोरी केली पण आजतागायत मोदींच्या ओठावर चीनचे नाव आले नाही आणि विरोधी पक्ष त्यांना तसे करण्यास भाग पाडू शकले नाहीत. उलट चिन्यांनी आपले सैनिक मारलेत आणि त्या मारल्या गेलेल्या सैनिकाच्या नावावर बिहार मध्ये मोदीजी मते मागतात. आपले वायुदल आणि सेनादल प्रमुख चीनचा मुकाबला करण्यास आम्ही सक्षम आहे हे सांगतात आणि पाकिस्ततानला तर मिटवून टाकण्रीयाची ताकद असल्हीयाचे सांगतात. मग मोदीजी त्यांना तसे करण्याचा आदेश किंवा मोकळीक का देत नाहीत हा प्रश्न विचारायचे सोडून विरोधी पक्ष व कॉंग्रेस मोदींना उत्तरे देण्याचा बचावात्मक पवित्र्यात असतील तर मोदींना आव्हान कसे मिळणार हा भारतीय राजकारणातील कळीचा प्रश्न बनला आहे. 

-----------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
ssudhakarjadhav@gmail.com

No comments:

Post a Comment