Thursday, February 11, 2021

सरसंघचालक भागवतांचे गांधी भागवत --- ३

भारत हिंदुराष्ट्र आहे म्हणणारा आणि हिंदू हित जपण्याचा, हिंदूंना संघटित करण्याचा दावा करणारा संघ आज महात्मा गांधींना सर्वोच्च हिंदू राष्ट्रभक्त मानतो. मग या सर्वोच्च हिंदू राष्ट्रभक्ताच्या नेतृत्वात  'हिंदू राष्ट्राच्यास्वातंत्र्यासाठी लढाई सुरु होती त्या लढाईत संघ का उतरला नाही  याचे स्पष्टीकरण या निमित्ताने भागवतांनी द्यायला पाहिजे होते.
--------------------------------------------------------------------------


 महात्मा गांधींना सर्वोच्च हिंदू राष्ट्रभक्त म्हणत असतांना हिंदू हे राष्ट्रभक्तच असतात आणि ते कधीच देशद्रोह करत नाहीत अशी पुस्ती सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात जोडली होती. सर्वसामान्य हिंदूंबद्दल मोहनजी भागवत यांचे विधान १०० टक्के खरे आहे. महात्माजी हे सर्वोच्च  राष्ट्रभक्त आहेत हे समजायला आणि मान्य करायला संघाला ९०-९५ वर्षे लागलीत पण सर्वसामान्य हिंदूंना हे कळायला फारसा वेळ लागला नाही. म्हणून तर ते आपले सर्वस्व पणाला लावून महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य संग्रामात सामील झाले होते. पण ज्यांना आपल्या हिंदू असण्याचा लाभ घ्यायचा आहे अशा हिंदूंबद्दल भागवतांचे हे विधान तितकेसे बरोबर नाही.  सर्वच शब्दकोषात देशभक्तीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून देशाप्रती निष्ठा सांगितली आहे. इतिहासात अनेक हिंदू महारथींनी देशनिष्ठेला तिलांजली देत परकीय सत्तेची मदत केली आहे. अर्थात दुसऱ्या धर्मातही निष्ठा विकून खाणारे मुबलक आहेत. पण भगवंतांनी अगदी च लावून हिंदू राष्ट्रभक्त असतात असे सांगितल्याने आपण त्यांचे म्हणणे तेवढे तपासू. गद्दार व्यक्ती पुष्कळ असतात. पण व्यक्तिगत पातळीवरील गद्दारी पेक्षा संस्था, संस्थाने आणि  संघटना यांनी केलेली गद्दारी देशासाठी नेहमीच घातक ठरत असते. सरसंघचालकांनी असे विधान केल्यामुळे त्यांना ममत्व वाटत असलेल्या व्यक्ती, संस्था आणि संस्थाने याचाच विचार केला तरी सत्य वेगळेच असल्याचे स्पष्ट होईल. 

१८५७ चा स्वातंत्र्य संग्राम देशासाठी महत्वाची घटना होती. देशी सेनानींनी इंग्रजा विरुद्ध पुकारलेला लढा यशस्वी न होण्यामागे महत्वाचे कारण अनेकांनी आपल्या निष्ठा देशा ऐवजी इंग्रजांच्या चरणी वाहिल्या हे होते. त्यात हिंदू राजांचाही समावेश होता. संघाला ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याबद्दल विशेष ममत्व आहे. १८५७ मध्ये ग्वाल्हेरच्या गादीवर बसलेल्या जियाजीरावांनी इंग्रजांशी हातमिळवणी करून १८५७ च्या स्वातंत्र्य सेनानी विरुद्ध युद्ध पुकारल्याचा इतिहास आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातील पराक्रम आजही भारतीयांना स्फुरण देणारा आहे. शिंदेंच्या आणि इंग्रजांच्या संयुक्त फौजांशी लढताना झाशीची राणी मारल्या गेली. पुढे याच शिंदे घराण्याच्या सैनिक सचिवाचे पिस्तूल भागवत आज ज्यांना सर्वोच्च राष्ट्रभक्त हिंदू म्हणतात त्या गांधींना मारण्यासाठी वापरण्यात आले. संघाचे इतिहासावर प्रेम आहे आणि संघाला इतिहासात रममाण व्हायला आवडतेही. मग इतिहासाने नोंद करून ठेवलेल्या या घटनांना डावलून इतिहास सांगणे दिशाभूल करणारे आहे. मोगल इथे स्थिरावले आणि शेकडो वर्षे राज्य केले त्यांना मदत करणारे अनेक हिंदू सेनानी होते हे कसे विसरता येईल. इतिहासात न शिरता आधुनिक काळ डोळ्यासमोर ठेवून भागवतांनी विधान केले असेल असे मानले तरी आधुनिक काळात तशी उदाहरणे कमी नाहीत. काही उदाहरणे तर थेट संघाशी संबंध दर्शविणारी आहे. 

१८५७ नंतरचा दुसरा स्वातंत्र्य लढ्याचे महत्व केवळ स्वातंत्र्य मिळवून देण्यापुरते नाही. या स्वातंत्र्य लढ्यातून बलशाली भारताचा उदय झाला. संघ बलशाली भारताबद्दल सतत बोलत असतो. पण ज्या स्वातंत्र्य लढ्यातून बलशाली भारत  उभा राहात होता तेव्हाही अनेक हिंदू नेत्यांच्या आणि हिंदू संघटनांच्या निष्ठा इंग्रज चरणी वाहिलेल्या  होत्या. इंग्रजांना चलेजाव म्हणणाऱ्या स्वातंत्र्य लढ्याच्या निर्णायक पर्वात ज्यांनी 'चले जावं' चळवळीचा जाहीर आणि  सक्रिय विरोध केला ते तर संघाच्या जवळचे होते. आजच्या भारतीय जनता पक्षाचा पहिला अवतार असलेल्या जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी इंग्रजांच्या बाजूने चलेजाव चळवळ मोडून काढण्यासाठी मैदानात उतरले होते. त्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जी बंगाल मध्ये मुस्लिम लीगच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री होते. मुस्लिम लीग आणि हिंदुमहासभाचे ते संयुक्त सरकार होते आणि हे दोन्ही घटक चलेजाव चळवळी विरुद्ध इंग्रजांना मदत करीत होते. मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे मंत्री असलेले श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालच्या इंग्रज गव्हर्नरला पत्र लिहून १९४२ ची चलेजाव चळवळ मोडून काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे वचन दिले होते. नुसते वचनच दिले नव्हते तर बंगाल मध्ये त्यांच्या सरकारने स्वातंत्र्य सैनिकांविरुद्ध दडपशाहीचा वरवंटा फिरवला होता. सरसंघचालकाच्या विधानाला पुष्टी देणारा इतिहास नाही हे स्पष्ट आहे. 

भागवतांच्या शब्दातील 'सर्वोच्च हिंदू राष्ट्रभक्त गांधी  यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यासाठी सर्वसामान्य हिंदू सोबत मुस्लिम ,ख्रिस्ती , पारशी लढले पण स्वत:ला हिंदूंचा कैवारी म्हणणारा संघ मात्र दूर राहिला. पूर्ण स्वातंत्र्य संग्रामात गांधींनी स्वत:चे हिंदू असणे याचा उपयोग सारा हिंदू समाज त्या लढाईत सामील व्हावा म्हणून केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदुत्व हिंदूंना राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यापासून दूर नेणारे राहिले आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्रामातील गांधींची भूमिका आणि कार्य याने त्यांच्या देशभक्तीवर आपोआप शिक्कामोर्तब होते. स्वातंत्र्य संग्राम सुरु असताना संघाची स्थापना झाली, वाढ होऊ लागली त्या काळात संघ स्वातंत्र्य संग्रामापासून दूरच राहिला. हिंदू हित जपण्याचा, हिंदूंना संघटित करण्याचा दावा करणारा संघ आज ज्याला सर्वोच्च हिंदू राष्ट्रभक्त म्हणतो त्या महात्मा गांधींच्या नेतृत्वा खाली स्वातंत्र्यासाठी का लढला नाही याचे स्पष्टीकरण या निमित्ताने भागवतांनी द्यायला पाहिजे होते. गांधींची अहिंसक लढाई संघाला मान्य नव्हती म्हणून संघ त्या लढाईत सामील झाला नसेल तर ते समजून घेता येईल. भगतसिंगांच्या  सशस्त्र लढाईत सामील होऊन संग्रामाचा तो प्रवाह संघाने पुढे का नेला नाही हे कळायला मार्ग नाही. भगतसिंगांच्या लढाई वेळी संघ बाल्यावस्थेत होता हेही समजून घेता येईल. पण मग सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांविरुद्ध  लढण्यासाठी आझाद हिंद फौजेची स्थापना केली त्या फौजेत सामील होणे, सुभाषचंद्र बोस याना बळ देणे हे काम संघाने आनंदाने आणि उत्साहाने करायला हवे होते. हिटलर , मुसोलिनी यांच्या बद्दल संघाला फार आकर्षण व आदर होता. सुभाषचंद्र बोस यांचा भारतीय स्वातंत्र्यासाठी हिटलर आणि मुसोलिनीची मदत घेण्याचा प्रयत्न होता . मग संघ आझाद हिंद सेनेत का सामील झाला नाही किंवा ती सेना उभी करण्यात का मदत केली नाही याचे उत्तर  मिळत नाही.                                                                                                                         

स्वातंत्र्य लढ्याचे जाऊ द्या. स्वातंत्र्यानंतर संघाने स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक बनलेल्या तिरंगा झेंड्या विरुद्ध भूमिका घेतली. ५० पेक्षा अधिक वर्षे आपल्या मुख्यालयावर तिरंगा फडकू दिला नाही. संघ तिरंगा फडकावत नाही म्हणून काही युवकांनी संघ मुख्यालयावर तिरंगा फडकावला तर  संघाने तक्रार करून त्यांना अटक करायला लावण्याच्या घटनेला अजून २० वर्षेही झाली नाहीत. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील काही लोकांनी लालकिल्ल्यावर फडकणाऱ्या तिरंग्याला धक्का न लावता थोड्या दूर आपला झेंडा लावला तर तिरंग्याचा अपमान झाल्याचा कांगावा करणाऱ्या संघ परिवाराचे तिरंग्या बाबतचे वर्तन महाअवमानकारक राहिले आहे. तेव्हा हिंदू असणे म्हणजे राष्ट्रभक्त असणे हा संघाचा दावा संघाच्याच भूतकाळातील कृतीशी सुसंगत नाही. त्यामुळे आता संघाला गांधीजी सर्वोच्च हिंदू देशभक्त वाटत असतील तर संघाने गांधींची  उदार,सहिष्णू आणि सर्वसमावेशक हिंदू धर्माची व्याख्या स्वीकारली पाहिजे. राष्ट्रीय ऐक्यासाठी त्याची गरज आहे. राष्ट्राची गरज ओळखून कार्य करतो तोच खरा राष्ट्रभक्त. राष्ट्रभक्त हा निखळ राष्ट्रभक्तच असतो. तो हिंदू,मुसलमान किंवा ख्रिस्ती असत नाही.
---------------------------------------------------
सुधाकर जाधव 
ssudhakarjadhav@gmail.com 

No comments:

Post a Comment