Wednesday, February 3, 2021

सरसंघचालक भागवतांचे गांधी भागवत ! -- २

गांधींच्या हाती स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे आलीत त्याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली. या पार्श्वभूमीवर  'मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रिअट : बॅकग्राउंड ऑफ गांधीज हिंद स्वराजया भागवतांनी विमोचन केलेल्या पुस्तकाचे नाव 'मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रिअट : बॅकग्राउंड ऑफ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' असे का नाही या प्रश्नाचे कटू पण खरे उत्तर संघाचा आणि स्वातंत्र्य संग्रामाचा संबंध नव्हता हेच आहे. 
--------------------------------------------------------------------


महात्मा गांधी यांच्यावरील एका पुस्तकाचे प्रकाशन करतांना गांधी हे सर्वोच्च राष्ट्रभक्त हिंदू होते असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्याचा उल्लेख मागच्या लेखात केला होता. गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य संग्राम झाला. त्यावरून ते सर्वोच्च आणि सर्वोत्तम राष्ट्रभक्त सिद्ध झालेच आहेत. त्यांच्या राष्ट्रभक्तीवर पाकिस्तान धार्जिणे असल्याचा ठपका ठेवत शंका घेण्याचे काम आजवर करणाऱ्यात संघ परिवार आघाडीवर होता. आता त्या परिवाराच्या प्रमुखानेच गांधी सर्वोच्च राष्ट्रभक्त असल्याचे तोंडदेखले का होईना जाहीरपणे मान्य केले आहे. संघाने गांधींना आधीच प्रात:स्मरणीय मानले असताना हजारो स्वयंसेवक हजारो मुखांनी गांधींची टिंगल टवाळी व बदनामी करण्यात कसे आघाडीवर असतात हे मागच्या लेखात नमूद केले आहे. तोंडदेखले प्रात:स्मरणीय मानण्याचे हे द्योतक आहे. संघ ही एकचालकानुवर्ती संघटना आहे. वर जो निर्णय होतो त्याचे पालन सगळे स्वयंसेवक करतात असे मानले जाते. हीच तर त्यांची शिस्तप्रियता समजली जाते. संघात खालपासून वरपर्यंत एकाच भूमिकेची पोपटपंची ऐकायला मिळते. मग गांधींना प्रात:स्मरणीय ठरवतांना जो आदर अपेक्षित आहे तो खालचे स्वयंसेवक का दाखवत नाहीत या प्रश्नाचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे मजबुरी म्हणून संघाने गांधींना प्रात:स्मरणीय मानले याची प्रत्येक स्वयंसेवकाला खात्री आहे. आता सरसंघचालकाने गांधींना सर्वोच्च राष्ट्रभक्त म्हंटले ते प्रात:स्मरणीय सारखे तोंडदेखले आहे की नाही हे स्वयंसेवक आपसात आणि लोकांशी गांधी बाबत काय बोलतात यावरून ठरेल. भागवतांनी देखील गांधींना सर्वोच्च राष्ट्रभक्त म्हणताना एक मेख मारून ठेवली आहे. निखळ सर्वोच्च राष्ट्रभक्त न म्हणता त्यांनी सर्वोच्च हिंदू राष्ट्रभक्त  म्हंटले आहे. सरसंघचालक महात्मा गांधींना हिंदू राष्ट्रभक्त मानतात तर मग एक हिंदू म्हणून ते जे बोलत होते , कृती करत होते ते संघाला मान्य आहे का असा प्रश्न मागच्या लेखाच्या शेवटी उपस्थित केला होता.

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधींची राष्ट्रभक्ती तावून सुलाखून निघाली आहे. गांधींच्या हाती स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे आलीत त्याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली. या पार्श्वभूमीवर  'मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रिअट : बॅकग्राउंड ऑफ गांधीज हिंद स्वराज' या भागवतांनी विमोचन केलेल्या पुस्तकाचे नाव 'मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रिअट : बॅकग्राउंड ऑफ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' असे का नाही असाही प्रश्न भागवतांच्या गांधी संबंधी उद्गारावर पडतो. एकाचवेळी गांधी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उदय होत असताना आणि दोघेही घोषित हिंदू असतांना त्यांची वाटचाल हातात हात घालून का झाली नाही याचे पटेल असे समर्थन या प्रसंगी भागवतांनी दिले असते तर त्यांच्या प्रतिपादनावर आज उपस्थित झालेत तेवढे प्रश्न उपस्थित झाले नव्हते. आरेसेसचा घोषित उद्देश्य देशातील हिंदू ऐक्याचा होता. स्वातंत्र्य संग्रामाच्या यशस्वीतेसाठी गांधी समोरही जनतेचे ऐक्य टिकवून ठेवण्याचे आव्हान होते. ८० टक्क्यापेक्षा अधिक जनता हिंदू असल्याने त्यांच्यातील ऐक्य गांधींसाठी महत्वाचे होते. अर्थात गांधींसाठी मुस्लिम आणि इतर धर्मीय सुद्धा महत्वाचे होते आणि त्यासाठी हिंदू-मुस्लिम ऐक्यावर त्यांचा भर होता. गांधी आणि संघातील हा फरक मान्य करूनही हिंदू ऐक्याचा पुरस्कार करणाऱ्या संघाने गांधींना देखील हवे असलेल्या हिंदू ऐक्यासाठी  का मदत किंवा सहकार्य केले नाही या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. याचे तर्कसंगत उत्तर एकच आहे ते म्हणजे गांधीचे हिंदू असणे आणि संघाच्या दृष्टीतील हिंदू यात महद अंतर आहे. गांधीवरील ज्या पुस्तकाचे विमोचन भागवतांनी केले त्या पुस्तकातच एक उदाहरण देण्यात आले आहे ज्यातून संघांचे हिंदुत्व आणि गांधींचे हिंदू असणे यातील अंतर अधोरेखित होते. 

गोहत्या बंदी बाबत संघाचा जेवढा आग्रह आहे तेवढाच गांधींचाही राहिलेला आहे. याच्या सक्तीला मात्र गांधींचा विरोध होता. गोहत्या बंदीचा मुद्दा हिंदू-मुस्लिम-ख्रिस्ती यांच्या ऐक्याच्या आड येता कामा नये यावर गांधींचा कटाक्ष होता हे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. गोहत्ये पेक्षा राष्ट्रीय ऐक्य गांधींच्या दृष्टीने महत्वाचे होते. जे गोमांस भक्षण करतात त्यांनी स्वेच्छेने त्याचा त्याग करावा आणि त्यासाठी प्रयत्न करावा हा गांधींचा आग्रह होता. गोहत्या बंदी पेक्षा गोवंश संवर्धनावर गांधींचा भर होता आणि ऐन स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी गोरक्षा समिती स्थापन करून हे कार्य नेटाने पुढे नेले. त्यांच्या या भूमिकेचा हिंदू-मुस्लिम किंवा राष्ट्रीय ऐक्यावर अजिबात विपरीत परिणाम झाला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोहत्या बंदी संबंधीची दुराग्रही भूमिका मात्र राष्ट्रीय ऐक्य कमकुवत करीत आहे.  गोहत्या बंदीचा आग्रह धरूनही गांधींसोबत स्वातंत्र्यासाठी लढायला मुस्लिम आणि ख्रिस्ती लोक तयार झाले. याचे कारण गांधीं मानतात तो  हिंदू धर्म सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे . त्याचमुळे राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्राम सर्वसमावेशक बनला. पुस्तक विमोचन करतांना भागवतांनी आणखी एक मुद्दा मांडला. प्रत्येक हिंदू हा राष्ट्रभक्त असतोच असा त्यांनी दावा केला. यातून त्यांना इतर धर्मियांच्या बाबतीत असा दावा करता येणार नाही असे सूचित करायचे असावे. त्यांना काय सूचित करायचे त्याकडे दुर्लक्ष करून प्रत्येक हिंदू राष्ट्रभक्त असतोच  हा त्यांचा दावा तपासण्यासाठी   स्वातंत्र्य लढ्यातील संघाची जरी भूमिका लक्षात घेतली तरी भागवतांच्या या दाव्याचा फोलपणा लक्षात येईल.                                                           

-------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
ssudhakarjadhav@gmail.com 

No comments:

Post a Comment