Thursday, January 28, 2021

सरसंघचालक भागवतांचे गांधी भागवत ! -- १

महात्मा गांधींचे नाव कानावर पडले की तुच्छतेचा भाव चेहऱ्यावर दिसणार नाही असा स्वयंसेवक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा अशी पैज कोणी लावली तर त्याला कवडीही खर्च करावी लागणार नाही अशी परिस्थिती आहे. गांधीजी संघ शाखेत प्रात:स्मरणीय आहेत म्हणजे काय आहेत हे कळायला संघ शाखेत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे वाटत असतांनाच गांधी हत्येच्या ७३ वर्षानंतर एक कारण सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढे केले आहे.
--------------------------------------------------------------------------------

 
 गांधी स्मृती दिनानिमित्त जगभर महात्मा गांधींचे स्मरण करण्यात येत आहे.. ७३ वर्षांपूर्वी ३० जानेवारीला नथुराम गोडसे याने गांधीला गोळ्या घातल्या होत्या. नथुराम आणि गांधी हत्येचे नियोजनकर्ते गांधींना पाकिस्तान धार्जिणे समजत होते. गांधींना संपवून आपल्या 'जाज्वल्य देशभक्ती'चा परिचय नथुरामने दिल्याचे हजारो हिंदुत्ववादी मानतात.त्यांच्या दृष्टीने गोडसे महान राष्ट्रभक्त आहेत. गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते असा आरोप असला तरी संघाने खुलेपणाने ते कधी मान्य केले नाही. हिंदू महासभेने मात्र त्यांचे पितृत्व स्वीकारले. एवढेच नाही तर २०१४ पर्यंत घरात आणि २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यावर रस्त्यावर नथुरामचा गौरव सुरु ठेवला आहे. २०१४ पर्यंत भारतीय जनता पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना जाहीरपणे नथुरामच्या गौरवाची अनुमती दिली नाही. मागच्या सार्वत्रिक निवडणुकीत मात्र नथुरामचे जाहीर समर्थन आणि गौरव करणाऱ्या साध्वी प्रज्ञा याना लोकसभेचे तिकीट देऊन निवडून आणले. यावर संघाने आपली पसंती-नापसंती जाहीरपणे नोंदविली नाही. अर्थात संघाला सत्तेशी काही देणेघेणे नसल्याचे संघ नेतृत्व सातत्याने सांगत आल्याने हे सुसंगतच म्हंटले पाहिजे.                       

संघ एवढा लोकशाहीवादी आहे की स्वनिर्मित संघटना जे बोलतात आणि करतात त्याच्याशी सुद्धा संघ आपला संबंध जोडू देत नाही. संघ स्थितप्रद्न्यही आहे. त्यामुळे नथुरामचा गौरव करतात त्यांचे बद्दल काही बोलत नाही आणि गौरव करीत नाहीत त्यांचेही त्याला कौतुक नसते. नथुरामने गांधीला गोळ्या घातल्याची वार्ता देशभर पसरली तेव्हा कित्येक संघ शाखांनी ही वार्ता पेढे वाटून साजरी केली. त्यावर सुद्धा संघाने मौनच बाळगले. मौन म्हणजे संमती ही सर्वसामान्यांची धारणा. पण संघ असामान्य आहे. त्यामुळे संघ मौनाचा संमती असण्याशी संबंध जोडता येणार नाही. त्यावेळचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी तसा संबंध जोडून तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी याना खरमरीत पत्र लिहिले होते आणि संघबंदीसाठी गांधी हत्येनंतरचा आनंदोत्सव हेही एक कारण दिले होते हा भाग वेगळा. संघाने निर्माण केलेल्या विषारी वातावरणाने गांधींचा बळी गेला असे पटेलांनी स्पष्ट म्हंटले असले तरी गांधी हत्येचे कारस्थान संघाने रचले असा आरोप त्यांनी केला नाही. आता सुद्धा संघ प्रयत्नाने मोदी सरकार येऊन जे वातावरण तयार झाले त्यातून गोडसेवाद्यांच्या गोडसे गौरवाला राजमान्यता मिळाली हे सकृतदर्शनी दिसत असले तरी गोडसेवाद्यांना गोडसे गौरवाची खुली सूट द्यावी  अशी मागणी किंवा सूचना  संघाने कधी केली नाही.       

संघाला समजून घेणे वाटते तितके सोपे नाही हे यावरून आपल्या लक्षात येईल. म्हणूनच संघावर टीका करणाऱ्यांना स्वयंसेवकांचे एकच उत्तर असते. शाखेत आल्याशिवाय संघ कळणार नाही. त्यांचे म्हणणे अगदीच चुकीचे नाही. संघ शाखेत महात्मा गांधी प्रात:स्मरणीय आहेत म्हणजे नेमके कोणत्या कामासाठी त्यांचे स्मरण संघ स्वयंसेवक करतात हे डोक्याचा भुगा करूनही कधी समजले नाही. तुम्ही स्वयंसेवकाशी चर्चा केली तर गांधींच्या चळवळीने, अहिंसक सत्याग्रहाने देशाला स्वातंत्र्य मिळाले याची टिंगल तुम्हाला ऐकायला मिळेल. एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करण्यावर त्यांचे कुत्सित हास्य कानावर पडेल. मूठभर मीठ उचलून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दांडी यात्रेच्या कल्पनेची  खिल्ली उडवताना त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद तुम्हाला दिसेल. बकरीच्या दुधाचा विषय म्हणजे स्वयंसेवकांची ब्रम्हानंदी टाळीच ! गांधींचे नाव कानावर पडले की तुच्छतेचा भाव  चेहऱ्यावर दिसणार नाही असा स्वयंसेवक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा अशी पैज कोणी लावली तर त्याला कवडीही खर्च करावी लागणार नाही अशी परिस्थिती असल्याने गांधीजी संघ शाखेत प्रात:स्मरणीय आहेत म्हणजे काय आहेत हे कळायला संघ शाखेत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे वाटत असतांनाच गांधी हत्येच्या ७३ वर्षानंतर एक कारण सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढे केले आहे. 

१ जानेवारी रोजी "मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रिअट : बॅकग्राउंड ऑफ गांधीजी'ज हिंद स्वराज" या पुस्तकाचे प्रकाशन करतांना  सरसंघचालक भागवत यांनी गांधींचे वर्णन 'सर्वोच्च हिंदू देशभक्त' असे केले. संघ देशभक्त असल्याचे नेहमीच सांगितले जाते. मोदी सत्तेत आल्यानंतर तर संघ स्वयंसेवकांची देशभक्ती ओसंडून वाहताना  दिसत आहे. असे असले तरी ते स्वत:ला फक्त देशभक्त म्हणवून घेतात. आम्ही 'हिंदू देशभक्त' आहोत असे म्हणत नाही. 'गर्व से कहो हम हिंदू है ' म्हणत बजरंग दलात काम करणारे संघ स्वयंसेवकही कधी स्वत:ला 'हिंदू राष्ट्रभक्त' म्हणवून घेत नाही. फक्त राष्ट्रभक्त म्हणवले जातात. असे असतांना महात्मा गांधींना भागवतांनी 'सर्वोच्च हिंदू राष्ट्रभक्त' म्हणणे कोड्यात टाकणारे आहे. राष्ट्रभक्तांची अशी धार्मिक विभागणी आजवर कोणी केली नव्हती. प्रत्येक जाती धर्मातील महापुरुषांची  त्या त्या जाती धर्मात विशेष गौरव केल्या जातो हे खरे असले तरी आमच्या जातीतला किंवा धर्मातला हा देशभक्त असे कधी बोलले जात नाही. त्यामुळेच गांधींच्या मागे हिंदू शब्द जोडून त्यांची राष्ट्रभक्ती दर्शविण्याचे प्रयोजन लक्षात येत नाही. देशात सध्या धार्मिक विभागणीचे जे वारे वाहत आहे ते देशभक्तांची तशी विभागणी करण्यापर्यंत पोचले असा एक अर्थ त्यातून निघतो. गांधीजींनी जाहीरपणे आपण हिंदू असल्याचे अनेकदा सांगितले. पण मोहंमद अली जीना सारखे लोकच त्यांना हिंदूंचे नेते समजायचे. देश गांधींना स्वातंत्र्य आंदोलनाचा सर्वोच्च नेताच मानत होती. गांधी जगजाहीरपणे स्वत:ला हिंदू म्हणवून घेत असताना हिंदू हा शब्द कधी त्यांच्या कपाळावर चिकटला नाही. उलट सर्व समावेशकतेचे दुसरे नाव महात्मा गांधी मानले जाते आणि जगभर तीच त्यांची ओळख आहे. सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता मिटवून देश फक्त हिंदू धर्मियांचा आहे असे वातावरण संघ प्रभावातील मंडळी सातत्याने तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गांधींना सर्वोच्च हिंदू राष्ट्रभक्त संबोधून हा फक्त हिंदूं धर्मीयांचा देश आहे अशी जगन्मान्यता मिळविण्याचा भागवतांचा हा प्रयत्न नसेल तर गांधींची हिंदू असण्याची व्याख्या संघाला मान्य आहे का असा प्रश्न पुढे येतो. हा आणि यातून निर्माण  होणाऱ्या अनेक उपप्रश्नांचा विचार पुढच्या लेखात करू.
----------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
ssudhakarjadhav@gmail.com 

No comments:

Post a Comment