Thursday, February 18, 2021

देशविरोधी कारस्थान की निरपराधाना देशद्रोही ठरविण्याचे कारस्थान ? – १

मोदी सरकारला विरोध करणारामोदी सरकार विरुद्ध आंदोलन करणारे  पाकिस्तान समर्थक किंवा चीन समर्थक देशद्रोही असतात खलिस्तानी असतात नक्षलवादी असतात हे सतत लोकांच्या मनावर ठसवत राहणे आणि आपल्या विरोधात कोणी बोलू नये उभा राहू नये याची काळजी घेणे हेच या सरकारचे प्रमुख कार्य बनले आहे. 

--------------------------------------------------------------------------------------


शेतकरी आंदोलनामुळे मोदी सरकारची कार्यपद्धती - इंग्रजीत ज्याला मोडस ऑपरेंडी म्हणतात - ती आता सर्वसामान्यांना कळावी इतकी स्पष्ट झाली आहे. तरी ती कळत नाही याचे कारण सर्वसामान्यांनी प्रश्न विचारणे सोडले आहे. मोदी सरकारला  प्रश्न विचारणे गुन्हा आहे अशी धारणा मोदींच्या प्रचार यंत्रणेने बनविण्यात यश मिळविल्याचा हा पुरावा आहे. परिणामी आपण जे डोळ्याने पाहतो आणि मोदी आणि त्यांचे सरकार जे सांगते यात जमीन अस्मानाचा फरक असला तरी मोदी सांगतात तेच खरे असे वातावरण सरकारी व भाजपच्या प्रचार यंत्रणेने आणि त्यांच्या दावणीला बांधलेल्या लोकशाहीच्या तथाकथित चौथ्या स्तंभाने म्हणजे प्रसार माध्यमे यांनी तयार केले आहे. खोटे रेटण्याबाबत मोदी आणि त्यांच्या सरकारचा आत्मविश्वास एवढा वाढला आहे की कोट्यावधी लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेली घटना सुद्धा विपरीत आणि विकृत स्वरुपात मांडून तेच खरे असल्याचा आभास तयार करणे त्यांच्या हातचा मळ आहे !

प्रजासत्ताक दिनी लालकिल्ल्यावर काय घडले हे कोट्यावधी लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील एक गट ठरलेला मार्ग सोडून लालकिल्ल्याकडे गेला होता. लालकिल्ल्यात शिरून या गटाच्या नेत्यांनी शीख धर्माचा पवित्र ध्वज लालकिल्ल्यावर फडकावला. ठरलेला मार्ग सोडून लालकिल्ल्यावर जाणे , तिथे अशाप्रकारचा ध्वज लावणे हे समर्थनीय नाहीच. हा प्रकार करणारे लोक शेतकरी आंदोलनाचा भाग असले तरी त्यांची कृती आंदोलनाच्या पाठीत सुरा खुपसणारी होती हे मोदी सरकारने या घटनेचा उपयोग करून शेतकरी आंदोलनाबाबत जे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यावरून स्पष्ट होते. सुतावरून स्वर्ग गाठण्यात मोदींची प्रचारयंत्रणा माहीर आहेच. देशभरात लाखो मुखातून तिरंग्याचा अवमान झाल्याची आरोळी ठोकली गेली. खलिस्तानचा झेंडा लालकिल्ल्यावर फडकविल्याच्या प्रचाराचा मारा चोहोबाजूंनी करण्यात आला. प्रचार एवढा जबरदस्त की लोकांनी आपल्या डोळ्यांनी जे पाहिले त्यावर अविश्वास दाखवून मोदी सरकार व भाजपच्या प्रचारावर विश्वास ठेवला !      

 

शीख धर्माचा पवित्र ध्वज फडकवताना कोणीही तिरंग्याला स्पर्श केला नव्हता. ध्वज देखील तिरंग्याच्या उंचीच्या खालीच होता. या कृतीला फार तर अनुचित म्हणता येईल. पण ही अनुचित कृती मोदींच्या प्रचारयंत्रणेला मिळालेले घबाड ठरले आणि शेतकरी आंदोलन खलिस्तानीवादी आहे असे चित्र रंगविल्या गेले. कुठल्याही मिरवणुकीत हिरवा ध्वज दिसला की त्या मिरवणुकीत पाकिस्तानचे ध्वज फडकावले गेलेत असा प्रचार करणारे मोदी सरकारचे यशस्वी कलाकार शीख धर्माचा ध्वज म्हणजे खलिस्तानचा ध्वज असा आभास तयार करण्यातही यशस्वी झाले. या प्रचारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मोदी सरकारने राष्ट्रपतीच्या अभिभाषणात तिरंग्याचा अपमान झाल्याबद्दल अश्रू ढाळले. असे खोटे अश्रू ढाळण्यात दस्तुरखुद्द प्रधानमंत्री मागे नव्हते. संसदेच्या व्यासपीठावर जे सरकार राष्ट्रपतीला खोटे सांगायला भाग पडून शेतकरी आंदोलनाची बदनामी करू शकते ते सरकार देशभरात आपल्या चेलेचपाट्याकडून काय प्रचार करून घेत असतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

                                             

या प्रसंगाचा उपयोग करून शेतकरी आंदोलनाला ठोकणारे तेच लोक आहेत ज्यांचे स्वप्न लालकिल्ल्यावर तिरंग्या शेजारी नव्हे तर तिरंग्या ऐवजी भगवा ध्वज फडकावण्याचे आहे ! अशाप्रकारचे जाहीर वक्तव्य मोदी सरकार आल्यानंतर अनेक मुखातून बाहेर पडले. असे वक्तव्य तिरंग्याचा अपमान आहे असे मात्र मोदी सरकारला वाटत नाही. लालकिल्ल्यावरचा प्रसंग घडल्यानंतर ज्या व्यक्तीचा या मागे हात होता त्याचे प्रधानमंत्री व गृहमंत्र्यासोबतचे फोटो प्रसिद्ध झालेत. ती व्यक्ती गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारात आघाडीवर होती. असे असताना लालकिल्ल्याचे कारस्थान भाजपनेच रचले असू शकते असे वाटण्यासारखी परिस्थिती असताना हाच प्रसंग शेतकरी आंदोलनाचे मोदी सरकार विरुद्ध कारस्थान म्हणून रंगविण्यात मोदी सरकार आणि भाजप पुढे होते !  हा प्रसंग इथे विस्ताराने मांडण्याचे कारण ही घटना कोट्यावधी लोकांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली असूनही मोदी सरकार विकृत स्वरुपात देशासमोर ठेवत आहे याची जाणीव व्हावी आणि मोदी सरकारच्या  प्रचारयंत्रणा खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्यात किती वाकबगार आणि समर्थ आहे हे जनसामान्यांच्या लक्षात यावे. 
 

सरकारची चूक झाकून दुसऱ्यांना दोषी ठरविण्यात मोदी सरकारची प्रचारयंत्रणा किती वाकबगार आहे याचे आणखी एक ताजे उदाहरण बघू. चीन लडाख मधून माघार घेत असल्याच्या वार्ता सध्या झळकत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदींनी केलेले विधान आठवा. जगभरच्या माध्यमांनी गेल्या मे महिन्यात चीन लडाख मध्ये खोलवर आत आल्याच्या सचित्र वार्ता प्रसिद्ध झाल्यात. भारतीय माध्यमांनी सोयीस्कर मौन बाळगले. संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर चीनच्या घुसखोरीची कबुली देण्यात आली होती. ती लगेच काढून टाकण्यात आली. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी 'कोई अंदर आया नही और किसीने कब्जा किया नही' असे वक्तव्य केले. कॉंग्रेस व राहुल गांधीनी यावर आक्षेप घेतला तेव्हा मोदी सरकारच्या प्रचारयंत्रणेत राहुल गांधीना देशद्रोही ठरविण्याची स्पर्धा लागली. प्रधानमंत्र्याच्या विधानाचे चीनकडून जोरदार स्वागत झाले. चीनी घुसखोरीच्या वार्ता आल्यापासून प्रधानमंत्र्याने आजवर एकदाही चीनचे नांव घेवून चीनवर टीका केली नाही तरी  प्रधानमंत्री चीनधार्जिणे ठरले नाहीत. चीन धार्जिणे ठरले ते राहुल गांधी कारण ते लोकांना चीनच्या घुसखोरीबद्दल माहिती देत होते ! 


चीनच्या घुसखोरी बद्दल बोलून राहुल गांधी भारतीय सैन्यावर अविश्वास दाखवून सैन्याचा अपमान करीत आहेत हे सांगताना १९६२ मध्ये चीनने भारताचा पराभव करून मोठ्या भूभागावर कब्जा मिळविल्याच्या कहाण्या मात्र रंगवून आणि आनंदाने सांगितल्या जातात तेव्हा मात्र भारतीय सैन्यदलाचा अपमान होत नसतो. आपल्याला अडचणीत आणणारे जो कोणी बोलेल त्याला देशद्रोही ठरविण्याची स्पर्धाच मोदी समर्थक व्यक्ती व माध्यमात लागलेली असते. कोणी आत आलेच नव्हते तर माघारी कसे चालले हा प्रश्न विचारण्याच्या आधीच समर्थकांचे 'चीन मोदीला घाबरला, माघारी फिरला' अशा प्रकारचे ढोल बडविणे सुरु आहे. यात मोदींनी देशाची दिशाभूल केली , देशाला अंधारात ठेवले या बाबी सोयीस्कर दडविल्या जातात.चीनच्या घुसखोरीवर पांघरून घालणारे महान देशभक्त ठरतात आणि घुसखोरी उजेडात आणणारे देशद्रोही ठरतात ही या सरकारच्या प्रचारयंत्रणेची करणी आणि कमाल आहे !                             

---------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
ssudhakarjadhav@gmail.com

No comments:

Post a Comment