सरकार आणि सत्ताधारी पक्ष प्रधानमंत्र्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी
जेवढा सज्ज आणि तत्पर आहे तेवढा कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी दिसत नाही. सरकारचे व
नेतृत्वाचे अपयश झाकणे हेच गेली ७ वर्षे त्यांचे
काम राहिले आहे. कोरोनाच्या बाबतीतही अपयश झाकण्याचे तेवढे काम सुरु आहे.
----------------------------------------------------------
भारतातील कोरोनाच्या रौद्ररुपाला आणि त्यामुळे घातलेल्या मृत्युच्या थैमानाला
भारताचे प्रधानमंत्री कारणीभूत असल्याचा ठपका देशभरातूनच नव्हे तर जगभरातून आला.
समजा हा ठपका चुकीचा आहे असे गृहीत धरले तरी देशासमोर मोठे आव्हान कोरोनाचे आहे
आणि केंद्र सरकारची सारी शक्ती या आव्हानाचा मुकाबला करण्यावर केंद्रित व्हायला
हवी होती. तसे केले असते तर निवडणूक प्रचारात व्यस्त राहून देशाला कोरोना संकटात
ढकलण्याची चूक काही प्रमाणात तरी सावरल्या गेली असती. पण सरकारने आपली शक्ती कुठे
केंद्रित केली तर ती प्रधानमंत्र्याच्या प्रतिमा संवर्धनावर !
देशाला कोरोनाच्या विळख्यात लोटणारा पाच
राज्याचा निवडणूक प्रचार आटोपल्यावर तरी देशाला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी
व्यापक विचारविनिमयातून व्यापक उपाययोजना करण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे होता तो
देखील झाला नाही. मंत्रीमंडळाची बैठक घेवून देशाच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला
गेला, आवश्यक निर्णय घेतल्या गेले असे झाले नाही. कोरोनाच्या बाबतीत राज्य जे
ठरवेल त्याची अंमलबजावणी राज्यांना करावी लागते. मग मुख्यमंत्र्याची बैठक घेतली का
तर तेही नाही. कोरोना वाढत असताना लाखांची सभा घेवू शकतात पण देशातील ३०-३५
मुख्यमंत्र्यांना बोलावून बैठक करू शकत नाहीत. कारण कोरोना ! त्या ऐवजी प्रधानमंत्री
प्रत्येक मुख्यमंत्र्याशी वेगळे बोलले. एका मुख्यमंत्र्याने तर जाहीरपणे सांगितले
प्रधानमंत्री आमचे ऐकत नाहीत त्यांचेच ऐकून घ्यावे लागते ! सर्वांची समोरासमोर
बैठक घेणे आणि एकेकट्याशी बोलण्यात हाच फरक पडतो.
मुख्यमंत्र्याशी बोलणे भाग पडते विरोधीपक्ष नेत्यांच्या
बाबतीत तर त्याचीही गरज वाटत नाही. हे राष्ट्रीय संकट म्हणायचे आणि सर्वाना बरोबर
घेवून मात्र चालायचे नाही हे मोदींचे धोरण आहे. संकटकाळात तरी विरोधीपक्ष
नेत्यांच्या सूचना ऐकायच्या , योग्य सूचनांचा स्वीकार करण्या इतपत उदारता मोदी आणि
त्यांच्या सरकारकडे नाही हे माजी प्रधानमंत्री मनमोहनसिंग यांनी केलेल्या विधायक
सूचनांची देशाच्या आरोग्यमंत्र्याने ज्या प्रकारे खिल्ली उडविली त्यावरून स्पष्ट
होते. मनमोहनसिंग यांनी मोदींना पत्र लिहिले होते. त्याचे उत्तर मोदींनी द्यायचे
सौजन्य दाखवायला हवे होते.
राहुल गांधी हे देशातील सर्वात मोठ्या विरोधी
पक्षाचे नेते आहेत. पक्ष पातळीवर आपल्या समर्थकांकडून त्यांची खुशाल पप्पू म्हणून
संभावना करा, खिल्ली उडवा. पण सरकारी पातळीवर विरोधीपक्ष नेता म्हणून त्यांच्या
सूचनांचा विचार आणि आदर व्हायला हवा. स्वीकारणे नाकारणे ही पुढची गोष्ट आहे. पण
सरकारी पातळीवरून देखील खिल्ली उडवण्याचा प्रमाद सरकारी प्रवक्ते करतात ते
लोकशाहीसाठी घातक आहेच शिवाय राष्ट्रीय संकटाचा मुकाबला करण्यात सर्वांचा सहभाग
नाकारण्या सारखे आहे. या ज्या गोष्टी सरकारने पाळणे आणि करणे अपेक्षित असताना त्या
सरकारने केल्या नाहीत. त्या ऐवजी जे केले ते संकटकाळात अनावश्यक व चीड आणणारे आहे.
सरकारने ३०० वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यशाळा
घेतली. या कार्यशाळेत कोरोनाचा कसा मुकाबला करायचा हा विषय नव्हता. कोरोना
हाताळणीत अपयश आल्याने होत असलेल्या चौफेर टीकेचा मुकाबला कसा करायचा हा या
कार्यशाळेचा विषय होता. मोदी आणि त्यांच्या सरकारची कामगिरी कशी सरस आहे याच्या
कथा लोकांसमोर ठेवण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. या
कामासाठी देशातील अधिकाऱ्यांनाच जुंपण्यात आले असे नाही. परदेशातील आपल्या
वकिलातीना जगभरच्या प्रसिद्धी माध्यमातून कोरोना हाताळणी संदर्भात प्रधानमंत्री
मोदींना आलेल्या अपयशा संदर्भात जो टीकेचा भडीमार होतो आहे त्याला उत्तर देण्याची
जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्वत: परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी वकिलातीतील
अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून आदेश दिले आहेत.
भारतातील कोरोना परिस्थिती आणि त्याच्या
हाताळणी संदर्भात भारतीय प्रसिद्धी माध्यमातून जगाला काहीच कळले नाही. कळले ते
परदेशी प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या सचित्र वृत्तांतावरून. जगाला
भारतातील परिस्थितीचे गांभीर्य कळण्यात व जगभरातून मदतीचा ओघ सुरु होण्यात जगातील
प्रसिद्धी माध्यमांची मदतच झाली. पण जगाला परिस्थितीचे जे गांभीर्य समजले ते
इथल्या सत्ताधारी पक्षाला किंवा सरकारला कळले असे म्हणण्या सारखी परिस्थिती नाही.
पहिली लाट ओसरली तेव्हा जग जिंकल्याच्या
अविर्भावात मोदी, त्यांचे सरकार व त्यांचा पक्ष वावरत होता. दुसऱ्या लाटेची कल्पना
व तयारी करण्याचा विचारही त्यांच्या डोक्यात आला नाही. दुसऱ्या लाटे विरुद्ध
लढण्यासाठी आमच्याकडे सामुग्री तोकडी होती आणि जगभरातून कोरोना विरुद्ध लढण्यासाठी
आवश्यक त्या मदतीचा ओघ सुरु असला तरी पक्षीय भेदभावाच्या पलीकडे जावून
गरजवंतापर्यंत तातडीने मदत पोचेल याचे काहीच नियोजन नव्हते आणि आजही नाही. सरकार
आणि पक्ष पातळीवर कोणते नियोजन असेल तर ते कोरोना हाताळणी संदर्भात मोदींवर
होणाऱ्या टीकेला उत्तर देण्याचे आहे !
नुकताच पक्षाच्या प्रसिद्धी सेलच्या
पदाधिकाऱ्याने कोविड संकटाचा मुकाबला करण्यासाठी मोदी कसे दिवसरात्र काम करीत आहेत
यावर प्रचारकी लेख लिहिला आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यानी व केंद्रीय मंत्र्यांनी तो
लेख कॉपी पेस्ट करून समाज माध्यमावर प्रसारित केला. मोदी सत्तेत आल्यापासून प्रधानमंत्र्यावर
टीका करणाऱ्यांची तोंडे बंद करणे हेच आजवर सत्ताधारी पक्ष आणि सरकार यांचे काम राहिल्याने
आजच्या आणीबाणीच्या परिस्थितीचा मुकाबला कसा करावा हेच सरकारला कळत नाही. आज आपण
ज्या संकटात सापडलो आहोत त्यासाठी मोदी आणि त्यांच्या पक्षाला व सरकारला दोष देणे
सोपे आहे पण खरे दोषी सर्वसामान्यजन आहेत ज्यांनी सत्ताधाऱ्यांच्या चुकांना चूक
म्हणण्याचे साहस दाखवले नाही. या चुकांची यादी मोठी आहे आणि चुकाही मोठ्या आहेत.
----------------------------------------------------------
सुधाकर जाधव
पांढरकवडा, जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
उत्तम भांडाफोड. पण पालथ्या घड्यावर पाणी.
ReplyDelete