Wednesday, April 13, 2022

इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - 3

जम्मुसह संपूर्ण देश फाळणीच्या दंगलीने होरपळत असतांना काश्मीरमध्ये मात्र सर्व धर्मीय एकमेकांना मदत करत पाकिस्तान विरुद्ध लढत होते.हे काश्मीरचे वेगळेपण होते. मग १९४७ ते १९९० दरम्यान असे काय घडले की ज्यामुळे काश्मिरी जनतेतील ऐक्य भंगले आणि काश्मिरी पंडितांना घरदार सोडून निर्वासिताचे जीवन जगावे लागले? याचे उत्तर आपल्याला १९४७ ते १९९० व त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडी व राजकीय वाटचालीतून मिळते.
-----------------------------------------------------------------------------------


मागच्या लेखात सांगितल्या प्रमाणे पाकिस्तान पुरस्कृत कबायली आक्रमणामुळे काश्मीरचे राजा हरिसिंग यांना काश्मीरला स्वतंत्र राष्ट्र ठेवण्याचा निर्णय बदलावा लागला आणि भारतात सामील होण्याचा निर्णय घ्यावा लागला. काश्मीर मुस्लीम बहुल प्रदेश असतानाही मुस्लिमांनी या निर्णयाचा विरोध केला नाही म्हणून हे विलीनीकरण शक्य झाले हे इथे लक्षात घेतले पाहिजे. विलीनीकरण आणि त्याआधी घडलेल्या घडामोडींची माहिती ज्यांना नाही त्यांना हे वाचून आश्चर्य वाटेल की सरदार पटेलांनी इतर संस्थानांच्या विलीनीकरणात पुढाकार घेवून कारवाई केली तसे काश्मीरच्या बाबतीत केली नाही. त्यावेळी त्यांचे सचिव असलेले मेनन यांनी लिहून ठेवले आहे की भारताच्या वाट्याला ५६० संस्थाने आल्याने काश्मीर बाबत विचार करायलाही फुरसत नव्हती. गांधी, नेहरू आणि शेख अब्दुल्ला या तीन नेत्यांना मात्र काश्मीर भारतात राहिले पाहिजे असे वाटत होते. लोकेच्छा लक्षात घेवून निर्णय घ्या असे राजा हरिसिंग यांना सांगायला महात्मा गांधी १९४७ साली मुद्दाम काश्मीरला गेले होते. शेख अब्दुल्ला तिथल्या राजा आणि राजेशाही विरुद्ध दीर्घ काळापासून लढत होते. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या स्वातंत्र्य लढ्याने विशेष प्रभावित होते. गांधी नेहरूंच्या प्रभावामुळेच त्यांनी आपल्या मुस्लीम कॉन्फरंसचे रुपांतर नैशनल कॉन्फरंस मध्ये केले होते. मुस्लीम लीगच्या फुटीरतावादी आणि सामंती राजकारणापासून ते चार हात लांब होते आणि म्हणून फाळणी झाली तेव्हाच नाही तर त्याच्या आधीपासून त्यांची पसंती पाकिस्तान ऐवजी भारत होती. त्यांनी १९४३ साली मिरपूर येथे नैशनल कॉन्फरंसच्या चौथ्या अधिवेशनातच आपल्या भाषणातून 'हिंदुस्तान हमारा घर है' हे सांगितले होते. 'हिंदुस्तान हमारा मादर-ए-वतन (मातृभूमी) है और रहेगा' हे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते. त्यांची हीच भूमिका काश्मीरचे भारतात विलीनीकरण करण्यात निर्णायक ठरली.   

काश्मीरची स्वायत्तता राखून भारतात विलीन व्हायचे ही त्यांची सुरुवातीपासूनच भूमिका होती. या भूमिकेत काश्मीर प्रश्नाचे मूळ आहे ! काश्मीरचे विलीनीकरण करताना स्वायत्ततेची मागणी भारताने मान्य केली पण अधिकृतरीत्या विलीनीकरण झाल्यावर भारतातील प्रत्येक राजकीय पक्षाने आणि नेत्याने काश्मीरच्या  स्वायत्तते विरुद्ध प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष भूमिका घेतली.  घटनासमितीत प्रत्येकाने काश्मीरची स्वायत्तता मान्य करणारे कलम ३७० मान्य केले. पण हे कलम तात्पुरते असल्याचे सांगत स्वायत्तता विरोधकांना रसदही पुरविली. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे राजे आणि संस्थानिकांसोबत झालेल्या विलीनीकरण कराराचे प्रारूप. हे प्रारूप सरदार पटेल यांच्या गृहखात्यानेच तयार केले होते आणि प्रत्येक संस्थानासाठी ते सारखेच होते अगदी काश्मीरसाठी सुद्धा ! काश्मीरसाठी वेगळा विलीनीकरण करार झाला आणि त्यातून पुढे काश्मीर समस्या निर्माण झाली असे म्हणणे चुकीचे आहे. सगळ्या संस्थानिक आणि राजे यांच्या सोबतच्या करारातच स्वायत्तता मान्य करण्यात आली होती. नंतर संस्थानिकांनी तनखे घेवून सगळा कारभार भारत सरकारच्या हाती सोपवला. याला अपवाद ठरले काश्मीर ! तिथला राजा हरिसिंग यांनी विलीनीकरणाच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करून आपली सर्व संपत्ती सोबत घेत श्रीनगर सोडले. श्रीनगर सोडण्यापूर्वी तुरुंगात असलेल्या शेख अब्दुल्लांना मुक्त करून त्यांच्या हाती जम्मू-काश्मीरचा राज्य कारभार सोपविला. शेख अब्दुल्ला पुढचे पहिले आव्हान भारतीय सैन्य काश्मिरात पोचे पर्यंत पाकिस्तानी आक्रमकांना रोखणे हे होते. नैशनल कॉन्फरंसच्या नेतृत्वाखाली हिंदू-मुस्लिमांनी मिळून आक्रमकाशी मुकाबला केला आणि आक्रमकांना मागे ढकलण्यात भारतीय सेनेची मदतही केली. सारा भारत फाळणीच्या दंगलीत होरपळत असताना काश्मीर मध्ये सर्वधर्मीय एकतेचे असे अभूतपूर्व चित्र होते. 


त्या काळातील शेख अब्दुल्ला यांचे एक सहकारी बारामुला निवासी मकबूल शेरवानी याची कहाणी फार प्रसिद्ध आहे. ज्या कबायली लोकांच्या मार्फत पाकिस्तानने काश्मिरात आक्रमण केले होते त्यांच्या विरुद्ध लढून  आणि भारतीय सैनिकाची मदत करून बलिदान दिले. त्याच्यावर 'डेथ ऑफ हिरो' ही मुल्कराज आनंद यांची कादंबरी १९५५ साली प्रसिद्ध झाली होती. आजही भारतीय सेना त्याच्या बलिदान दिवशी त्याचे स्मरण करीत असते. कबायली लोकांनी त्याच्या शरीरात खिळे ठोकून येशू ख्रिस्ता सारखे मरण दिल्याने त्याच्या बलिदानाला जास्त प्रसिद्धी मिळाली. काश्मीरला पाकिस्तान पासून वाचविण्यासाठी भारतीय सेना काश्मिरात पोहोचण्या आधी व नंतर सेनेला साथ देत बलिदान देणाऱ्या काश्मिरी नागरिकांची संख्या मोठी आहे.पाकिस्तानने शस्त्रसज्ज करून पाठविलेल्या कबायली विरुद्ध लढतांना ३४३ मुसलमान, २७४ हिंदू-शीख आणि ७ ख्रिस्ती मारल्या गेल्याची नोंद आहे. जम्मुसह संपूर्ण देश फाळणीच्या दंगलीने होरपळत असतांना काश्मीरमध्ये मात्र सर्व धर्मीय एकमेकांना मदत करत पाकिस्तान विरुद्ध लढत होते.हे काश्मीरचे वेगळेपण होते. मग १९४७ ते १९९० दरम्यान असे काय घडले की ज्यामुळे काश्मिरी जनतेतील ऐक्य भंगले आणि काश्मिरी पंडितांना घरदार सोडून निर्वासिताचे जीवन जगावे लागले? याचे उत्तर आपल्याला १९४७ ते १९९० व त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडी व राजकीय वाटचालीतून मिळते.  (क्रमशः)

------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा जि. यवतमाळ 
मोबाईल: ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment