Thursday, June 13, 2024

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाग आली !

 मोदींनी अमित शाहच्या मदतीने जसे भारतीय जनता पक्षाला गुंडाळून ठेवले तसेच संघालाही गुंडाळले आणि त्यातून आलेल्या हतबलतेने मोदींच्या मागे फरफटत जाणे एवढाच पर्याय गेली १० वर्षे संघप्रमुख भागवता समोर असावा. या निवडणुकीत मतदारांनी सुज्ञपणे मोदींच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावल्यानंतरच भागवतांची मोदी विरोधात बोलण्याची हिम्मत झाली. 
-----------------------------------------------------------------------------------

                                                                                                                              
मागच्या लेखात मी लिहिले होते की मोदी,मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांचे मागच्या १० वर्षातील वर्तन हे कुठलाही आणि कशाचाही विधिनिषेध बाळगणारे नसतानाही भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली नापसंती आणि आक्षेप नोंदविला नाही. यानंतर १-२ दिवसातच संघप्रमुख मोहन भागवत यांनी जाहीरपणे मोदींना लक्ष्य केले आणि कानपिचक्या दिल्या. जाहीरपणे कठोर शब्दात मोहन भागवत यांनी मोदींना सुनावले याचा अर्थ संघ आणि भाजपचे सरकार यांच्यात सुसंवाद सोडा साधा संवाद देखील नाही. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कोणाशी संवाद साधने ही मोदींची वृत्ती नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे की मोदींच्या ज्या वर्तनावर भागवतांनी टीका केली ते वर्तन काही मागच्या १-२ महिन्यातले नाही किंवा १-२ वर्षातले नाही. सत्ता हाती आल्यापासून मोदी असेच वागत आले आहे. दरम्यानच्या काळात काही प्रसंगी मोदी आणि भागवत एकत्र आलेले होते. तेव्हा त्यांना मोदींच्या व त्यांच्या सरकारच्या कार्यपद्धती बद्दल चर्चा करता आली असती. ती सुधारण्याचा सल्ला देता आला असता. संघाने मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी जे कष्ट घेतले ते लक्षात घेता भागवतांना मोदींना सल्ला देण्याचा पूर्ण अधिकार होता. पण हा अधिकार त्यांनी मागच्या १० वर्षात कधी वापरल्याचे ऐकिवात नाही. याचे अधिकृत कारण कळले नसले तरी मोदी आणि भागवत यांच्या भेटीतील भागवतांची देहबोली सारे काही सांगून जाते. दोन प्रसंगात सार्वजनिकरीत्या मोदी आणि भागवत एकत्र आल्याचे साऱ्या देशाने पाहिले. ते प्रसंग होते राममंदिरांच्या भूमिपूजनाचे आणि रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनाचे. या दोन्ही प्रसंगी भागवत मोदींच्या शेजारी असले तरी कार्यक्रमात सगळे महत्व मोदींना होते. मम म्हणण्यापुरती मोहन भागवतांची भूमिका होती. या दोन्ही प्रसंगात प्रसंगानुरूप काही गोष्टी भागवतांना अधिकार वाणीने सांगता आल्या असत्या. मोदींच्या हस्ते राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरला तेव्हा भागवतांना आठवण करून देता आली असती की भूमिपूजन तर राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या सरकारच्या परवानगीने विश्व हिंदू परिषदेने तेव्हाच केले होते. ते देखील एका दलित व्यक्तीच्या हस्ते. असे असताना पुन्हा भूमिपूजनाचा घाट कशासाठी हे त्यांना सांगता आले असते. पुन्हा बांधकाम अपूर्ण असलेल्या मंदिरात राममूर्तीच्या प्रतिष्ठापणेवर शंकराचार्य व काही धर्माचार्याने आक्षेप घेतला होता तेव्हाही भागवतांना सबुरीचा सल्ला मोदींना देता आला असता. पण राममंदिर निर्मितीचा फायदा घेण्याची मोदींना जितकी घाई झाली होती तशीच घाई संघालाही झाल्याचे भागवतांच्या कार्यक्रमातील उपस्थितीने देशाला दिसले.                                                                                                                                    

वर्षभरापासून धुमसत असलेल्या मणिपूर बद्दल संघप्रमुख आता बोलले. विरोधी पक्ष व अन्य अराजकीय संघटना मणिपूर बद्दल सतत चिंता व्यक्त करीत आलेत. पंतप्रधानांनी मणिपूरकडे लक्ष द्यावे , तिथे जावून लोकांना भेटावे, शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग सुकर करावा असा आग्रह धरत आलेत. पण पंतप्रधान आपल्या गुर्मीतच राहिले आणि संघ गुळणीधरून बसला होता. संघ नुसताच गुळणीधरून बसला नव्हता तर  मणिपूर पेटलेले असताना राममंदिरावर राजकीय पोळी भाजून घेण्याच्या मोदींच्या प्रयत्नात संघ सहभागी झाला होता. वर्षभर मणीपूर जळत होते, महिलांची विटंबना होत होती. तेव्हा संघ चूप होता आणि निवडणूक निकालानंतर भागवत त्यावर बोलू लागलेत याचा अर्थ गेली १० वर्षे मोदींनी संघाला बंधक बनवून ठेवले होते असाही अर्थ काढता येईल. मोदींनी अमित शाहच्या मदतीने जसे भारतीय जनता पक्षाला गुंडाळून ठेवले तसेच संघालाही गुंडाळले आणि त्यातून आलेल्या हतबलतेने मोदींच्या मागे फरफटत जाणे एवढाच पर्याय भागवता समोर असावा. या निवडणुकीत मतदारांनी सुज्ञपणे मोदींच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावल्यानंतरच भागवतांची मोदी विरोधात बोलण्याची हिम्मत झाली असावी. मोदींनी विरोधी पक्षाच्या बाबतीत जे केले तेच संघाच्या बाबतीतही केले. तुम्ही आमच्याकडे या, आमचे समर्थन करा आणि बदल्यात सत्तेची पदे घ्या आणि ऐश करा हा मोदींचा विरोधी पक्षांना संदेश होता. मोदींनी अशीच खिरापत संघाच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्त्यातही वाटली. वर्षानुवर्षे संघाचे निष्ठेने काम केलेले संघ स्वयंसेवक मोदी मंत्रीमंडळात मंत्री झालेत, राज्यपाल झालेत , मोठमोठ्या विद्यापीठाचे कुलगुरू झालेत, सत्तेचे असे कोणते क्षेत्र नव्हते जिथे संघ स्वयंसेवकांना स्थान नव्हते. संघ संस्कार काय असतात हे दाखवून देण्याची नामी संधी असताना या सगळ्या मंडळीनी मोदींना चुकीच्या वागण्यापासून परावृत्त करण्या ऐवजी प्रोत्साहनच दिले. आणि आताही संघ प्रमुखाने जेव्हा मोदी आणि मोदी सरकारच्या चुकीच्या वर्तनावर बोट ठेवले त्याचे उघड समर्थन सत्तेत असलेला एकही स्वयंसेवक पुढे येवून करणार नाही की सत्तेपासून वेगळे होणार नाही.                                               

मोदींनी संघ प्रमुखांना झेड दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेची खिरापत दिली ती संघ प्रमुखांनी तरी कुठे नाकारली. कॉंग्रेस राजवटीत अशा सुरक्षेविना राहणाऱ्या संघ प्रमुखाच्या जीवाला मोदी राजवटीतच असा काय धोका निर्माण झाला की झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था स्वीकारावी लागली. तेव्हाच बाणेदारपणे संघ प्रमुखांनी सुरक्षा नाकारली असती तर संघ आणि संघ प्रमुखांना गृहीत धरण्याची कृती मोदींच्या हातून घडली नसती. त्यामुळे आज संघ प्रमुख बरोबर बोलत असले तरी त्यांचे ऐकणारे कोण आहेत असा प्रश्न पडतो. निवडणूक प्रचार काळात याच स्तंभात मी लिहिले होते की निवडणुका हे मोदींसाठी युद्ध आहे आणि युद्धात सर्वप्रकारचे अतिरेक क्षम्य असतात हे गृहीत धरून  विरोधी पक्षांना शत्रू समजून ते निवडणुका लढवतात. या मुद्द्यावरही संघप्रमुख भागवत यांनी मोदींना कानपिचक्या दिल्या. विरोधक म्हणजे शत्रू नसतात असा हितोपदेश केला. पण हा उपदेश बैल गेला नि झोपा केला या थाटाचा आहे. गेल्या १० वर्षात विरोधकांशी मोदींचे वर्तन शत्रुत्वाचे होते तेव्हा संघ प्रमुखाने तोंडातून एक अक्षर काढले नाही. मोदींचे भक्त सोडले तर मोदींबद्दल सर्वाना सर्वात जास्त खटकणारी गोष्ट त्यांचा अहंकार राहिला आहे. आज भागवत जेव्हा मोदींच्या अहंकाराबद्दल बोलले तेव्हा हा अहंकार त्यानाही जाणवला हे उघड आहे. समाजा-समाजात फुट पाडणे निषिद्ध असल्याचे सांगणारे संघ प्रमुख या बाबतीत मोदींना सोडा सध्या संघ स्वयंसेवकांना अशा गोष्टीपासून परावृत्त करू शकले नाहीत. संघ प्रमुख अनेकदा बोलले की हिंदू आणि मुस्लिमांचा डी एन ए एकच आहे. मुसलमानाशिवाय आपण या देशाची कल्पना करू शकत नाही. आणि तरीही या देशात मुस्लीम द्वेष पसरविण्यात कोण आघाडीवर आहे हे संघ प्रमुखाला माहित नाही यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. १० वर्षात संघ स्वयंसेवकांचे लक्ष संघ प्रमुख काय म्हणतात तिकडे न राहता मोदी काय म्हणतात याकडे राहिले आहे. याकाळात संघ प्रमुख मोदींना उपदेश करणारे काही बोलले असते तर मोदींना विरोध करणाऱ्या शंकराचार्याची जी गत मोदी समर्थकांनी केली तीच अवस्था मोहन भागवतांची केली असती. मोहन भागवतांनी तोंड उघडले ते मोदींची सत्तेवरील पकड सैल झाल्यावर. उशिरा का होईना भागवत बोलले , कठोर बोलले आणि मुख्य म्हणजे खरे बोलले याचे महत्व आहेच. मोदींना बाहेरचा अहेर रोजच मिळतो. त्याने त्यांच्यात काही बदल होत नाही. भागवतांनी त्यांना घरचा अहेर दिला आहे.  भाजप अध्यक्षांनी आम्हाला संघाची गरज नाही आम्ही आमचे बघून घेण्यास समर्थ आहोत असे म्हंटले होते. त्यानंतर  भागवत बोलल्याने त्यांच्या बोलण्याचा संदर्भ भाजपा अध्यक्षाच्या या विधानाशी जोडल्या गेला तर भागवतांच्या बोलण्यातील परिणामकारकता कमी होईल. भाजपा अध्यक्षाच्या विधानाने संघ दुखावला हे खरे असले तरी संघ प्रमुख या विधानावर नाही तर मोदींच्या १० वर्षाच्या कारभारावर बोलले हे लक्षात घेतले पाहिजे. 

---------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव 
पांढरकवडा, जि. यवतमाळ 
मोबाईल - ९४२२१६८१५८ 

No comments:

Post a Comment